Wednesday, 29 October 2014

कुमार गंधर्व : एक पुण्यस्मरण



       गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात जन्माला आलेल्या पिढीचं एक दुर्दैव कायम असणार आहे. असं म्हटलं जातं कि कोणत्याही कलेचा, साहित्याचा विकास फक्त स्वातंत्र्यातच होऊ शकतो. तसं झाल्याचा परिणाम आल्याला दिसतो कि सर्व क्षेत्रातील असामान्य प्रतिभा आणि ती प्रतिभा लाभलेली माणसं या शतकांनी पहिली. त्या माणसांना बघण्याच, ऐकण्याच, अनुभवण्याच भाग्य या पिढीला लाभलेला नाही. लेखक, गायक, वादक, चित्रकार, शिल्पकार सर्वच क्षेत्रात २० व्या शतकात अनेक माणस निर्माण झाली. आपल्या पिढीच्या नशिबी त्या लोकांचा फार सहवास नाही. प्रेरणादायी चरित्राने दिपून जावं, स्वर्गीय आवाजाने खरोखर स्वर्गसुखाचा आनंद देणारे आवाज आता फार राहिलेले नाहीत. एखाद्या विशाल झाडाच्या पायाशी बसावं, दोन क्षण शांततेचा थंडगार सावलीचा अनुभव घ्यावं पुढे निघावं, किंवा नुसत्या षड्जानी अजस्त्र सह्याद्रीची आठवण व्हावी अशीही माणसं आता राहिलेली नाहीत. म्हणून अशा चरित्र नायकाची आठवण येत राहते. यातली बऱ्यापैकी माणसे आपण जाणते होण्याआधीच निघून गेली याच दोष कोणाला द्यायचा?
      त्यातल्या ‘कुमार गंधर्व’ यांची आज विशेषत्वाने आठवण होते आहे याचं कारण येत्या १ नोव्हेंबरला ‘कालजयी कुमार गंधर्व’ या ग्रंथाचे पुण्यात प्रकाशन होणार आहे. हा ग्रंथ इंग्लिश आणि मराठी या दोनीही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे आणि मुख्य म्हणजे हा ग्रंथ दोन खंडांमध्ये असणार आहे. कदाची ‘कुमार गंधर्व’ यांच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकाचा उद्योग प्रथमच होत असेल. म्हणून आज त्यांची आठव होते आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे चरित्र प्रेरणादायी आहे. शांततेचा अनुभव देणारे आहे. विशाल झाडाच्या सावलीमध्ये बसल्याचा आनंद देणारे आहे. पण एक गोष्ट सर्वात महत्वाची जी जाणवते ती अशी कि ‘अत्यंत दुःखाच्या परिस्थितीमध्ये खचून जायचं नसतं तर त्या दुःखाने, निराशेने आणि Negativity ने भरून राहिलेल्या स्थितीतही आपल्या व्यक्तीमत्वातील सर्वोत्कृष्ट ते बाहेर येऊ द्यायचं असत. सर्व लोकांना शुद्ध शास्त्रीय संगीत आवडेलच अस नाही, तसा आग्रह पण नाही पण कुमार गंधर्वांकडे पाहून ‘दुःखाच्या परिस्थितीत निराश व्ह्यायचं नाही तर आपल्यातून सर्वोत्कृष्टला बाहेर येऊन द्यायचं’ हे जरी समजलं तरी आनंद मानला पाहिजे.
      लोकमान्य टिळकांच्या “अरे, हा तो बालगंधर्व!” याच चालीवर कोणीतरी छोट्या ‘शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीनाथ’ नावाच्या मुलाकडे बोट करून “अरे, हा तो कुमारगंधर्व!” असे म्हटले. ते वयाच्या १०व्या वर्षी. छोटा शिवपुत गाण्याकडे वळण्याच कारण मात्र मोठं गमतीदार आणि विचित्र आहे. शिवपुत्राचे वडील किरान घराण्याचे गायक होते. आईसुद्धा गोड गाणारी होती. वडील शिवपुत्राच्या थोरल्या भावाला बालगंधर्वांच्या रेकॉर्ड ऐकवायचे आणि त्याप्रमाणे म्हणायला सांगायचे. तोपर्यंत शिवपुत्र कोमकलीनाथ अजून कुमार गंधर्व झालेले नव्हते इतकेच नव्हे तर शिवपुत्र म्हणूनही त्यांना कोणीच विचारत नव्हतं. बालगंधर्वांची पद म्हणून जुन्या बेळगावमध्ये शिवपुत्राचा थोरला भाऊ मात्र मोठ कौतुक मिळवत होता. लोकं आपल्याला मात्र विचारीतही नाहीत आणि मोठ्या भावाचं मात्र भरपुर कौतुक करतात याच छोट्या शिवपुत्राला त्रास होत असेल. लहान शिवपुत्राला ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवण्याची स्वाभाविक भावना निर्माण झाली. थोरल्या भावासाठी आणलेल्या रेकॉर्ड्स तो एकून म्हणू लागला. वय वर्ष ७. एका आसुयेपोटीच शिवपुत्र गाण्याकडे वळला. वयाच्या ७ व्या वर्षी आपण पण कोणी कमी नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी म्हटलेलं बालगंधर्व याचं एक पद, हा प्रवास पुढे ‘मला उमजलेले बालगंधर्व’ इथपर्यंत पोचतो. ५२-५३ साली मुंबईला बालगंधर्वांच्या उपस्थितीत कुमार गंधर्वांनी हा कार्यक्रम केला. हा त्यांचा एक सन्मान मानला गेला. हा प्रवास ९० साली मिळालेलं पद्मविभूषण आणि ९२ साली मृत्यूपर्यंत सुरूच होता.
      भावाला हरवण्यासाठी सुरु झालेला प्रवास पद्मविभूषण पर्यंत सहज, सरळ झालेला नाही. माझ्या मते चरित्रनायकाच्या आयुष्यात तसं अपेक्षितही नाही. चाळीसच्या दशकात त्यांना टीबी झाला, तो ५ वर्ष टिकला. म्हणजे पाच वर्ष गाणं पूर्ण बंद. अशाच एक दीर्घ आजारात एक फुफुस काढून ताकाव लागलं. शास्त्रीय गायकाला एक फुफुस नाही म्हणजे काय करिअर उरलं? पण दुःखाच्या परिस्थितीमध्ये आपल्यातलं उत्तम ते बाहेर येऊ द्यायचं म्हणजे काय? एक फुफुस नसल्यामुळे श्वास फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी पूर्वीच्या ३२-३२ आवर्तनाच्या ताना ८ आवर्तानापर्यंत लहान केल्या. आणि लहान ताना हि एक नवीन परंपराच त्यांनी जन्माला घातली. हॉस्पिटलच्या दीर्घ काळात त्यांनी मध्य प्रदेशातील लोकसंगीताचा अभ्यास केला. तो सुद्धा हॉस्पिटलच्या खोलीत बसून. रस्त्यावर सुरु असलेलं संगीत त्यांनी ऐकल आणि लोकगीताच्या स्वरबिजातून त्यांनी सहेल तोडी, मधसुरजा, मालवती, मघवा यांच्यासारख्या धुनरागांचे व्रुक्ष फुलविले. नवीन राग जन्माला घातले. ७१ च्या युद्धात भारताने प्रचंड विजय मिळवला त्याचा आनंद त्यांनी नवीन राग जन्माला घालून साजरा केला. इंदिरा गांधींच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून त्या रागाचे नाव ‘प्रियदर्शनी’ ठेवले आणि तो राग त्यांनी इंदिरा गांधीना अर्पण केला.
      भारतीय शास्त्रीय संगीतच एक महत्वाच वैशिष्ट्य आहे. राग हा प्रकार एका विशिष्ट format मध्ये बांधलेला असतो. तो राग सदर करण्याचे नियमही काटेकोर असतात. कोणत्या रागाचे कोणते सूर कोमल, कोणते मध्यम, कोणते तीव्र हे सगळा ठरलेलं असत. तानांची निवड कशी करायची, सरगम कसा असावा हे सर्व ठरलेलं असतं. ते सर्व आत्मसात करून, पचवून आपली प्रतिभा त्याला जोडून नवीन भर घालता येते. या वैशिष्ट्यामुळे कोणताही बंधन सादरीकरणाच्या आड येत नाही. याच संदर्भात पुलंनी मस्त किस्सा सांगितला आहे. आचार्य अत्र्यांच्या उपस्थितीत कुमार गंधर्वांची एक मैफल झाली. त्यावेळी त्यांनी ‘हमीर’ हा राग सादर केला, पण ते कोणाच्याच लक्षात आलं नाही. अत्र्यांनी विचारलं हमीर सारखा सर्वश्रुत राग असून सुद्धा तो कोणाच्याच लक्षात आलं नाही हे कसा काय? त्यावर कुमारजी म्हणाले; “लोकांची चूक नाही, आत्रेसाहेब ह्या लोकांना राग जर समोरून आला तरच ओळखता येतो. मी ‘हमीर’च प्रोफाईल रंगवत होतो. कुमारजी म्हणत असत, “एखाद्या प्रियकराची प्रयासिशी प्रथम “पहिली वळख गोडीची” व्हावी, तशीच रागाच्या कुल्मार्यादेत वाढलेल्या चीजेचा अंतर्यामी जाऊन तिची ओळख करून घ्यावी लागते. सौंदर्याच्या नानाप्रकारात दडलेल्या स्थानांचा शोध घ्यावा लागतो. चीजेची आधी सगळी फिगर दाखवायला पाहिजे. एखादी सुंदर जागा असते. म्हणजे काय पुन्हा पुन्हा तीच दाखवायची? बाईच नाक सुंदर आहे म्हणून फक्त नाकाच चित्र काढतात का? अरे, चेहे-याच्या प्रपोर्शन मध्ये नाक छान दिसत! समाज डोळे तिरळे असले, तर नाक कितीही छान असुदे इम्प्रेशन राहील का? म्हणून चीजेची ओळख चांगले हवी. तर प्रोफाईल वगैरे जमतं!”
      बेगम अख्तर यांनी गायलेली एक सुंदर गझल आहे, ‘जाने क्यू आज तेरे नाम पे रोना आया है|’ त्यात थोडासा बदल करून म्हणाव असं वाटतं कि, ‘जाने क्यू आज तेरे ना होने पें रोना आया है| रोना आया है||’                                   

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....