पुण्यातून गाडी घेऊन एकटा बाहेर पडलो. पुण्यातून बाहेर पडल्याच्या पहिल्या दिवशी माझं साडेचारशे किलोमीटर फिरणं झालं. कोकणात गेलो होतो. कऱ्हाडला एका मित्राला सोडलं. पुणे ते कऱ्हाड माझ्याबरोबर मित्र होता. पुढे संपूर्ण ट्रीपमध्ये माझ्याबरोबर कोणीही नव्हतं. एकटा होतो. आंबा घाटातून खाली उतरलो. मला शेवटी जायचं होतं संगमेश्वरला. पण माझ्याकडे पूर्ण दिवस होता. आणि रात्री संगमेश्वराच्या मंदिरात गाण्याचा कार्यक्रम होता. त्याच्यासःती मी गेलेलो. मग आंबा घाटातून खाली उतरून पालीहून थेट रत्नागिरीला गेलो. रविवार होता. रत्नागिरीला भगवतीदुर्गावर गेलो, तिथून आरे-वारे बीचवर थोडा वेळ घालवला. एकटाच होतो, काहीही गडबड नव्हती. चांगला तास दोन तास समुद्रकिनारी फिरत होतो.
मग गणपतीपुळ्याला गेलो तिथून पुढे. गणपतीचं दर्शन घेण्याचा काही फार मूड नव्हता. पुळ्याच्या किनाऱ्यावर गेलो, पण तिथे गर्दी होती खूप. आणि साधारण चार-साडेचार झाले होते. मी विचार केला की आरे-वारे बीचवर सनसेट बघावा आणि संगमेश्वरकडे निघावं. म्हणून मी परत आलो. खाडीपुलावर गाडी लावली आणि चालत चालत किनाऱ्यावर गेलो. तो किनारा खूप मोठा आहे. आणि सनसेट व्हायला अजून तरी दीड तास होता. भरपूर लांब पर्यंत चालत गेलो. किनाऱ्यावर सुशोभीकरण केलेलं आहे तिथे कपल्स बसून मिळालेल्या वेळेचा आणि एकांताचा चांगला उपयोग करत होते. वेळ-काळ-स्थळाचा तो सदुपयोग पाहून भारावून गेलो.
पुण्यातून निघताना मी आणि मित्र यांच्याशिवाय कोणालाही माहिती नव्हतं की मी कुठे चाललो आहे. आरे-वारे बीचवरून मी आईला फोन केला होता. पण बाकी कोणालाही माहिती नव्हतं. actually ,पुण्यातून बाहेर पडलो तेच मुळी भांडण करून. डोकं शांत करायचं होतं म्हणून! तिला कळलं जेव्हा मी आरे-वारे बीचवर आहे, तेच ती चिडली आणि रुसून बसली. फोनवर तिला म्हणालो, आरे-वारेवर आहे तेव्हा चिडून तिने फोन कट केला, आणि मेसेज केला, 'तुझं माझ्यावर प्रेमच नाही!'
तो मेसेज पाहून मला हासायला आलं. हे सगळं होईपर्यंत सहा वाजले होते. आणि मी शांत होतो पण back of the mind एक गाणं वाजायला लागलं. मला असं वाटलं की माझ्यामागे कोणीतरी संतूर वाजवत आहे. त्यातसुद्धा त्याने 'यमन' वाजवायला घेतला आहे. शेजारी रुसलेली ती उभी आहे, असा भास झाला. तिचा हात माझ्या हातात आहे असाही भास झाला.
तिच्या 'तुझं माझ्यावर प्रेमच नाही!' या मेसेजला उत्तर म्हणून तो 'यमन', संतूर, शेजारी उभी असलेली ती. तो अस्ताला जाणारा सूर्य सगळं गात होतं लताबाईंच्या आवाजात,
तिन्ही सांजा सखे मिळाल्या.
मी तिला म्हणालो,
ही वेळ नोंद करून ठेव. हा मागचा यमन, ती संतूर, तो बघ समोरचा लाल, केशरी झालेला सूर्य. हे सगळं नोंदवून ठेव. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, आणि या वेळेला तुला वचन देतो, 'आज पासुनी जिवे अधिक तू माझ्या, हृदयाच्या!
मी तिला म्हणालो,
ही वेळ नोंद करून ठेव. हा मागचा यमन, ती संतूर, तो बघ समोरचा लाल, केशरी झालेला सूर्य. हे सगळं नोंदवून ठेव. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, आणि या वेळेला तुला वचन देतो, 'आज पासुनी जिवे अधिक तू माझ्या, हृदयाच्या!
तो सोन्याचा गोळा, हा बुडणारा सूर्य पाहून ठेव, तो सूर्य आणि खालचा समुद्र याला अर्थ मिळतो तो त्या चक्रवालामुळे (क्षितीजामुळे) ते क्षितीजसुद्धा पाहून ठेव. तिन्ही लोकांत फिरणारा पवित्र वारा आणि तितकीच ही गंभीर होत जाणारी रात्र. त्याची ही सुरवात आहे, पाहून ठेव. हे सगळं तुझ्या मनात तू जे चित्र काढते आहेस ना, त्याच्यावर नोंदवून ठेव. ठेवलंस? आता ऐक, हे सगळं साक्षी ठेवून आता तुझा हात माझ्या हातात दे!
बासरी ऐकली आहेस, श्रीकृष्ण वाजवतो ती? कशी गोड लागते कानाला. आठव. तुला वाटेल हे काय आठवायला सांगतो आहे? पण आठव, सुंदर कविता वाचली आहेस? त्यात 'रस' कसा असतो? तसाच गंध सुमनांत, रस जसा बघ या द्रक्ष्यात. पाणी जसे मोत्यात, मनोहर वर्ण सुवर्णात.
हे सगळं आठव. बासरी आणि नाद वेगळे काढता येत नाहीत, येतात का? सुंदर कवितेतून रस वेगळा काढता येत नाही, गंध सुमनांतून. मोत्यातून पाणी वेगळं काढता येतं का? सोन्यातून त्याचा तो मनोहर वर्ण येईल काढता वेगळा?
मगाशी जे चित्र मनावर नोंदवून ठेवलं आहेस ना, ते आता पुन्हा नजरेसमोर आण. ही आता दिलेली उदाहरण पुन्हा आठव. या यमन, संतूर, तो बुडणारा सूर्य यांच्या साक्षीने तुझा हात हातात घेतेलेला आहे तेव्हा तुला वचन देतो,
'हृदयी मी साठवि तुज तसा, जीवित जो मजला.' तिन्ही सांजा सखे मिळाल्या..
मगाशी जे चित्र मनावर नोंदवून ठेवलं आहेस ना, ते आता पुन्हा नजरेसमोर आण. ही आता दिलेली उदाहरण पुन्हा आठव. या यमन, संतूर, तो बुडणारा सूर्य यांच्या साक्षीने तुझा हात हातात घेतेलेला आहे तेव्हा तुला वचन देतो,
'हृदयी मी साठवि तुज तसा, जीवित जो मजला.' तिन्ही सांजा सखे मिळाल्या..
माझ्या मनात सुरु असलेलं गाणं संपलं होतं. म्हणून मी बाजूला पाहिलं तर मोबाईल वाजत होता. मी उघडून पहिला तर फक्त '😊' एवढाच मेसेज होता.
(गाणं लिहायचं म्हणून प्रसंग उभा केलेला आहे!)
https://www.youtube.com/watch?v=D6OqMMxtyWc
#एक_दिवस_एक_गाणं
No comments:
Post a Comment