Saturday, 21 April 2018

एक_दिवस_एक_गाणं - 'शाम' कल्याण

संध्याकाळ कोणाचीच नाही. ती धड दिवसाची नाही, धड रात्रीची नाही. जसा 'मारवा', तो जिथून सुरवात होते तिथे जातंच नाही. त्याच्या आसपास फिरत राहतो, पण षड्जावर येत नाही. हे गुलझारच्या संध्याकाळच्या वर्णनाचे मराठी शब्द आहेत.
"रात और दिन कितने खूबसूरत दो वक़्त हैं, और कितने खूबसूरत दो लफ्ज़। इन दो लफ़्ज़ों के बीच में, एक वक्त आता है, जिसे शाम का वक़्त कहते हैं। ये वो वक़्त है, जिसे न रात अपनाती है, न दिन अपने साथ लेकर जाता है। इस छोड़े हुए, या छूटे हुए लावारिस वक़्त से, शायर अक्सर कोई न कोई लम्हा चुन लेता है, और सी लेता है अपने शेरों में। लेकिन कोई-कोई शाम भी ऐसी बाँझ होती है, के कोई लम्हा देकर नहीं जाती।"
इजाजतमध्ये 'महिंदर'चं मायावर पूर्वीपासून प्रेम असतं. पण आई वडिलांच्या दबावाखाली आणि स्वखुशीने, असं एकाच वेळी सुधाशी लग्न करतो. सुधाला महिंदरचं माया वरचं प्रेम मान्य असतं किंवा ते तिने स्वीकारलेलं असतं. सुधा सतत स्वतःला समजावत असते की, आपल्याला महिंदरचं प्रेम मान्य आहे! कारण मानवाचा मूळ स्वभावापैकी असलेला गुण म्हणजे 'पझेसिव्हनेस' तो माणसाची पाठ सोडत नाही. हा गुण हळूहळू कमी करत नेला पाहिजे, ही साधना सतत करायची आहे. पण ही साधना सगळ्यांना जमत नाही. काही लोक त्या स्वभावात गुरफटून जातात आणि आपल्याबरोबर आपल्या जोडीदाराचं आयुष्य कडवट करत नेतात. पण इथे सुधाला याची जाणीव आहे की हा पझेसिव्हनेस चुकीचा आहे. पण शेवटी ती सुद्धा 'माणूस' आहे. तिला कल्पना देऊन महिंदर मायाला भेटायला जातो आणि अनेक दिवस परत घरी येत नाही.
दिवसाच्या रोजच्या रुटीनमध्ये वेळ कसा जातो हे लक्षात येत नाही, पण ही जी संध्याकाळची वेळ आहे ती आयुष्य, सुख, समाधान हे सगळं अधांतरी असल्याचा फील देते. ते सुद्धा मोकळा वेळ असेल, आपण एकटे असू, बोलायला कोणी नसेल तर तो वेळ मांजा तुटलेल्या पतंगासारखा अधांतरी फिरत राहतो. मारव्यासारखाच!
सावल्या लांब गेलेल्या असताना घराच्या एका कोपऱ्यात बासरीच्या सुरात डोळ्यात आलेलं पाणी डोळ्यातून बाहेर पडणार नाही याची काळजी घेत सुधाच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, तबला सुद्धा वाजतो आहे तो offbeat. तो सुद्धा काहीतरी 'चुकतय' असं सतत भासवत राहतो..
खाली हात शाम आई है, खाली हात जायेगी..
आज भी ना आया कोई, खाली लौट जायेगी ..
जसे गेले अनेक दिवस संध्याकाळी, जेव्हा तुझी मला गरज आहे तेव्हा तू माझ्याबरोबर नाहीस. ही संध्याकाळ येताना एकटी आली, ती तुला घेऊन आली नाही आणि याचा अर्थ जाताना सुद्धा एकटी जाईल! आणि नेहमीप्रमाणे मी एकटीच .. खाली हात शाम आई, खाली हात जाये गी. आज भी ना आया कोई, म्हणजे याचा अर्थ आजची संध्याकाळ सुद्धा रिकामी रिकामी जाणार.. सावल्या अशाच लांब होत होत नाहीश्या होणार आणि माझं सांत्वन करायला सावल्या सुद्धा उरणार नाहीत.
सुधाला महिंदरचं मायाशी असलेलं रिलेशन मान्य करायचं आहे, असं तिचा मेंदू सांगतो आहे, पण वो नादान दिल, ये मानने के लिये तय्यार नाही. तिला रडायचं आहे, पण मेंदू सांगतो रडायचं नाही.
आज भी ना आये आसू, आज भी ना भिगे नैना
आज भी ये कोरी रैना, कोरी लौट जायेगी ..
आजच्या संध्याकाळी फक्त 'खाली हात शाम आई है'एवढं एकंच गाणं आठवत नाहीये. तिकडे मदन मोहननी संगीत दिलेली एक गझल आहे, गायली आहे तलत महमूदनी.. आणि तलत नी गायली आहे यातच ती गोड आहे, हे आलं. शब्द आहेत,
फिर वही शाम, वही गम, वही तनहाई है
दिल को समझाने तेरी याद चली आई है ..
म्हणजे सुधाची जी तक्रार आहे तीच तलत गातो आहे. पुन्हा एकदा ती संध्याकाळ येणार तेच दुःख, तीच बेचैनी घेऊन येणार .. आणि माझ्या सांत्वनाला तू नसणार. मग कोण? तर, दिल को समाजाने तेरी याद चाली आई है ..
असं होऊ नये, की आता भेट सुद्धा होण अवघड होईल. कदाचित होणार ही नाही. आपण शेवटचे भेटलो होतो तेव्हाची मी तुला सांगत होतो ती गोष्ट अपुरी राहील का? तेवढी गोष्ट पुरी ऐकून घेण्यासाठी तरी ये, रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ, तसं अजून एकदा भेटलं पाहिजे,
जाने अब तुझसे मुलाकात कभी हो के ना हो,
जो अधुरी रेही वो बात कभी हो के ना हो,
मेरी मंझील, तेरी मंझील से बिछड आई है ..
खाली हात शाम आई है -
https://www.youtube.com/watch?v=LysB0v2wKVY
फिर वोही शाम, वोही गम, वोही तनहाई -
https://www.youtube.com/watch?v=07aPnoiSCKU

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....