Monday, 9 April 2018

एक-दिवस_एक_गाणं - कई बार यूं भी देखा है


रिलेशनमध्ये असताना दोघांचीही प्रगती झाली पाहिजे, दोघांनीही एकमेकांना आधार देत, मागे उभं रहात एकमेकांच्या उत्कार्षामध्ये सहभागी असलं पाहिजे, हा एक विचार मी वपुंच्या कथांमधून ऐकला होता. आता वपुंच्या कथांबद्दल फारसं अप्रूप वाटत नाही. कारण तो एक काळ असतो. वपु आवडण्याचा एक काळ असतो. पण मी जो रोज वागतो बोलतो, याच्यावर खूप मोठा प्रभाव मी सुरवातीला वाचलेल्या पुस्तकांचा आहे. कधी कधी तो भार वाटतो, पण त्याला इलाज नाही. रिलेशनमध्ये असताना किती सावध असावं लागतं याचा धडा 'दुनियादारी' पेक्षा कोणत्याच पुस्तकातून मिळू शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. चित्रपटावर जाऊ नका, मूळ पुस्तकाला हात घाला.

अशाच मनस्थितीमध्ये असताना एका नवीन मुलीशी ओळख झाली. चुणचुणीत होती, हुशार होती, दिसायची पण चांगली बर का! आणि मित्रमंडळीत पुस्तकं, वाचन वगैरे संबंधी आपण आत्मविश्वासाने बोलत असलो की कोणालाही आकर्षण वाटतं हा माझा अनुभव आहे. असंच एकदा चारचौघात वपुंच्या कथांबद्दल तावातावाने बोलत होतो. ते बहुदा तिने ऐकलं. तोपर्यंत मुली आपणहून आपल्याशी बोलायला येतात ही मला अंधश्रद्धा वाटायची. पण ती वपुंचं नाव ऐकून बोलायला आली. बोलणं झाल्यावर असं लक्षात आलं कि वपु म्हणजे तीचा जीव कि प्राण. ती सुद्धा तावातावानेच बोलत होती. पण तिच्याशी मैत्री झाली. त्याचं एकमेव कारण वपु होतं. ती आपणहून बोलायला आली होती, यावरून डेरिंगसुद्धा दिसत होतं. काही दिवसांच्या मैत्रीनंतर असं कळलं कि तिला क्लासिकल खूप आवडतं. जुनी हिंदी गाणी खूप आवडतात. एक एक धागा जुळत होता, असं म्हणायला हरकत नाही! एक दिवस असच कोणतं तरी गाणं मी सकाळपासून ऐकत होतो. नवीन काहीतरी कळल्यासारखं वाटत होतं. मी तिला फोन केला, आणि 'तुला काही तरी जबरदस्त सांगायचं आहे' असं म्हणालो. मग आम्ही एका निवांत ठिकाणी बसून तास-दोन तास ते गाणं ऐकलं, त्यावर भरपूर बोललो. पुढे काही दिवसांनी तिने मला सांगितलं कि, 'तु मला आवडतोस', पण मी तेव्हा रिलेशनमध्ये होतो. तेव्हा वरचे वपुंचे विचार सतत डोक्यात फिरायला लागले. 'आपली प्रगती होते आहे का? आपली प्रगती होते आहे का?' आणि मी आधीच वेगळ्या रिलेशनमध्ये होतो, ही मला आपण केलेली गडबड वाटायला लागली. 'मी कन्फ्युज' झालो!!

पुढे सगळं सुरळीत झालं. पण कधी कधी माणूस कन्फ्युज होऊ शकतो, आणि हा त्याचा गुन्हा नसतो, समोरच्यावर केलेला अन्याय नसतो. एक वाईट स्वप्न म्हणून त्याच्याकडे बघायचं असतं!!

एक उच्चशिक्षित मुलगी नोकरीसाठी म्हणून मुंबईमध्ये येते. तिचं ज्याच्याबरोबर लग्न ठरलेलं असतं तो दिल्लीमध्ये असतो. त्याची तिथे परमनंट नोकरी असते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं. टिपिकल कपल सारखे ते कायम भांडत असतात. तो कायम उशिरा येणार. हिला भेटायला आला कि मित्रांबरोबर बोलत वेळ घालवणार, हिच्या नवीन साडीचा रंग अॅप्रिशिएट करणार नाही. पण या सगळ्यासहीत दोघांचही एकमेकांवर प्रेम असतं. ती नोकरीसाठी मुंबईला मुलाखतीसाठी जाते. तिथे तिला तीचा जुना कॉलेजमधला मित्र भेटतो. तिची मुंबईमधली सगळी सोय करतो. तिच्यासाठी कॉफी बनवून आणतो. तिच्या साडीचा रंग अॅप्रिशिएट करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेवर येत असतो.

अशा वेळी माणूस कन्फ्युज होणं स्वाभाविक आहे. मुलाखतीचं काम आटपून ते बहुदा जेवण करून घरी चाललेले असतात. टॅक्सीमधून जाताना तीचा मुंबईचा मित्र नवीन शेजारी बसलेला असतो, त्याचा कॅज्युअली हात टॅक्सीच्या सीट वर पडलेला असतो. तिच्या मनात द्वंद सुरूच आहे. ती तिच्या मदतीमुळे भारावून गेलेली आहे. तिच्या मनातलं द्वंद संगीतकार सलील चौधरी आणि गायक मुकेश यांची जे काय पडद्यावर उतरवलं आहे त्याला तोड नाही!

टॅक्सीचा प्रवास, त्याचा तिच्या शेजारी पडलेला हात, कॅज्युअली तो घेणारा सिगरेटचा झुरका याच्यामागून आपल्याला कोणत्याही वाद्याशिवाय मुकेशचे शब्द ऐकू येतात,

'कई बार यूं ही देखा है, ये जो मन की सीमा रेखा है' आपल्याच मनाने स्वतःसाठी घालून घेतलेल्या काही चौकटी असतात. कधी कधी असं वाटतं की आपणच आपल्या मनाला बंधनं घालून घेण्यात काय हशील आहे! एखादे संवाद चालावेत इतके साधे शब्द कवी योगेश याचे आहेत. 'कई बार यूं ही देखा है, ये जो मन की सीमा रेखा है' आणि मग सॅक्सोफोन सुरु होतो. तिचा अभिनय क्युट अशा 'विद्या सिन्हाचा' आहे. सॅक्सोफोनचा आवाज सुरु असतो तेव्हा तिने आपलं द्वंद आणि अस्वस्थता क्लासिक दाखवली आहे. सॅक्सोफोन थांबतो तिथे ती त्याच्या हाताकडे बघते आणि पुन्हा एकदा मुकेश 'कई बार यूं ही देखा है, ये जो मन की सीमा रेखा है' अन्जानी प्यास के पीछे, अन्जानी आस के पीछे, मन दौड़ने लगता है'

सतत आपण या विचारात असतो कि 'हे योग्य कि ते योग्य?', 'राहों में, जीवन की राहों में जो खिले हैं फूल फूल मुस्कुराके' उघड्या डोळ्यांनी बघताना समोर असलेल्या पर्यायांचा आपण सम्यक विचार करू शकत नाही. 'कौन सा फूल चुराके, रख लूं मन में सजाके?' कवितेचा अर्थ लागायला लागू नये इतके सोपे शब्द आहेत!

कन्फ्युजन नेमकं काय आहे, कोणत्या दोन बाबींत कन्फ्युजन आहे हे सुद्धा कळेनास होतं. अशा वेळी कन्फ्युजन दूर कसं करायचं हा प्रश्न खूप अवघड होऊन बसतो, जानूँ ना, उलझन ये जानूँ ना, सुलझाऊं कैसे कुछ समझ न पाऊँ'

'किसको मीत बनाऊँ, किसकी प्रीत भुलाऊँ!' तिची अस्वस्थता जितकी बालिश आणि चाईल्डीश आहे तितकाच मुकेश याचा आवाज.. 'मुकेश'च्या आवाजाची रेंज किशोर कुमार किंवा रफीइतकी व्हर्सेटाईल नसेल. पण त्याच्या आवाजातला निरागसपणा आहे त्याला तोड नाही!

हे सगळं जरी असलं तरी गाण्याचा आणि पिक्चरचा शेवट कोणाचाही गैरसमज होऊ नये यासाठी सांगणे अत्यावश्यक आहे. शेवटी ती दिल्लीच्याच मुलाबरोबर जाते. थोडाकाळ कन्फ्युजन झालं म्हणून जुने सगळे धागे ती तोडून टाकू शकत नाही. आणि टिपिकल बॉलीवूड टाईप पिक्चर संपवला आहे,
And they happily lived ever after!
https://www.youtube.com/watch?v=CPwbi-hfenI




No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....