Monday, 9 April 2018

एक_दिवस_एक_गाणं - तेरे बिना जिंदगी से


'जब तक तुम यहां हों, रोज घर पें खाने के लिये तो आयाही करोगी, खाने के बाद घुमने निकाल आया करेंगे, कम से कम ये इमारते खुछ दिनो के लिये तो बस जायेगी' असं म्हणून संजीव कुमार आरती देवीला रोज तिच्या अत्यंत बिझी अशा सार्वजनिक आयुष्यापासून लांब न्यायचं नियोजन करतो. आणि मग अशा ३ रात्रींची ती गोष्ट आहे. दिवसा जरी ते फिरायला बाहेर पडलेले असले तरी ते थंड प्रदेशात. पूर्वीची आरती आता झालेली 'आरती देवी' शाल आणायला विसरते, तो पूर्वीप्रमाणेच आपला कोट काढून तिच्या अंगावर चढवतो, 'तुम नही बदलोगी' म्हणून चालायला लागतो!
उध्वस्त प्राचीन मंदिरांच्या प्रदेशात वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी दूर गेलेले दोन जीव पुन्हा एकत्र येतात. ते दिवस अगदी काल घडल्याप्रमाणे दोघानाही आठवत तर असतातच, पण दोघंही आता तसे एकेमेकांपासून लांब गेलेले आहेत, त्यांच्या त्यांच्या आयुष्यात ते आता एकमेकांशिवाय सेट झालेले आहेत, दोघांची वयं सुद्धा झालेली आहेत, पण पूर्वीचा तो 'तुम आ गये हो, नूर आ गया है' वाला काळ दोघांच्याही स्मरणातून जात नाही, एकमेकांच्या अस्तित्वानी सुद्धा वातावरण फ्रेश होऊन जातं, याचा त्यांनी पूर्वी अनुभव घेतलेला आहे ना, तो विसरता येत नाही. म्हणून 'जब तक यहां हो, खाने का बाद घुमने निकल आया करेंगे' म्हणून ते बाहेर पडलेत. बहुतेक जुन्या आठवणी आठवून रडण्यासाठीच. एरवीच्या सार्वजनिक आयुष्यात असं मोकळेपणानी रडता थोडंच येतं!
त्या वातावरणाचाच एक दोष असतो, उदा. संध्याकाळी हमखास मारवा लागावा. त्यात हमखास 'खाली हात शाम आयी, खाली हात जायेगी' हे लागावं. तसंच, त्या उध्वस्त मंदिरांच्या आसपास त्यांना अजून व्याकूळ करणारा भूतकाळच आठवतो. 'शायद उन दिनो की बात होगी, जब ये इमारते अभी उजडी नाही थी|' तिला वाजत असलेली थंडी त्याच्या लक्षात येते, तो आपला कोट तिच्या अंगावर चढवतो, आणि कंठाशी आलेला आवेग अनावर होतो. आतापर्यंत मोठ्या कष्टानी आवर घातलेलं मन वाहू लागतं! 'तुम नही बदलोगी' म्हणून मारलेला बाण सुटला आहे, आता त्याला कोणी रोखू शकत नाही, याची दोघानांही जाणीव होते.
पण जखम झालेली आहे, ती झालेली होतीच मागची ९ वर्ष! तिला त्या बाणानी उघडं पाडलं! ९ वर्षाचा दुष्काळ संपवून ते दोघं एकत्र आलेत ते जुन्या आठवणी आठवून फक्त रडायला! बाकी आयुष्य चांगलं चाललंय, तक्रारीला फारशी जागा नाही. पण माहितीये का, तु नाहीस 'त्याला मी आयुष्य मनातच नाही!' खरं म्हणजे एकच तक्रार आहे की, या माझ्या आयुष्यात तु नाहीस..
आता ९ वर्षांनी पुन्हा असं होण्याची काही शक्यता आहे का, की आपल्या वाटा जुळतील? किंवा तुझ्याबरोबर मला चालता येईल? काय आहे माहितीये का, तु बरोबर असलास तर, 'तुम अगर साथ हो, मंजिलो की कमी तो नही' सगळं आहे, फक्त 'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नाही'
तीव्र भावना कधीच शब्दात व्यक्त करता येत नाहीत. कारण शब्दांचीच मर्यादा पडते. भावना तीव्र असतात तेवढे भावनेचा अर्थ पोचवू शकतील असे शब्द उपलब्ध नसतात. त्यामुळे अशा भावना मुक्याने व्यक्त होतात. इथे सुद्धा दोघांचेही डोळे भरून आलेत, डोळे बोलतायेत, पण तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीत. केवळ 'उरातले थेट उरामध्ये!' सगळा जो आकांत मनात दोघांच्याही सुरु आहे, तो 'मागे' सुरु आहे.
'खाने के बाद घुमने निकल आया करेंगे' या शब्दाला जागून ते दुसऱ्या दिवशी फिरायला येतात तेव्हा आदल्या दिवशीची चूक तिने सुधारलेली असते. ती येताना शाल बरोबर लपेटून घेऊन येते. पण, 'चांद? वो तो रोज निकलता होगा?, 'हम, लेकीन बीच मै अमावस आ जाती है. वैसे तो अमावस पंधरा दिन की होती है, लेकीन इस बार बहोत लंबी थी!' ...... 'नौ बरस लंबी थी ना?' ....
तो नऊ वर्षाचा दुष्काळ फक्त तुझ्यासाठी नव्हता रे! रोज वाटतं, 'जी मै आता है तेरे दामन मै सर छूपाके हम रोते रहे, रोते रहे! का रे, तुला नाही वाटत! आपल्याला समोर दिसते ती 'आरती देवी' रडत नाहीये, पण डोळे भरून आलेत. तिचं समाजातलं स्थान तिला चारचौघात रडण्याची परवानगी देत नाही बहुदा! पण तिला रडायचंय, त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन! आणि तिला माहितीये त्यालाही! पुन्हा 'उरातले थेट उरामध्ये' त्याला कळतं तिला रडायचंय, ती मुक्यानेच विचारतीये, 'तेरी ही आंखो मै आसूओं की नमी तो नही?' त्यावेळी तो म्हणतो, मुक्यानेच, माझंही दुःख तेच आहे जे तुझं आहे. 'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही, तेरे बिना जिंदगी भी लेकीन, जिंदगी नही' त्याचा सुद्धा तिच्याशी चालेलला संवाद मूक आहे! त्याच्या तोंडून शब्द फुटत नाहीत, पण आकांत लक्षात येतो! न राहवून त्याच्या 'कोरड्या' डोळ्यात पाणी उभं राहतं, ते पाहून तिच्या जीवात जीव येतो. तिला याची खात्री पटते 'त्याला सुद्धा रडायचंय, तिच्या खांद्यावर डोकं ठेऊन!' तिच्या चेहेऱ्यावर हास्य उमटतं!
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले! (-सुरेश भट)
दोघंही एकमेकांकडे पाहून केविलवाणा हसण्याचा प्रयत्न करतात. दोघांनाही माहितीये की, हसण्याचा हा प्रयत्न केविलवाणा आहे!
तिसऱ्या दिवशी मात्र ते रात्री फिरायला बाहेर पडतात. बहुतेक ही त्यांना मिळालेली निवांतपणाची शेवटची रात्र. उद्या कितीही झालं तरी तिला तिचं आता चांगलं प्रस्थापित झालेलं राजकीय आयुष्य आहे, त्याचं तेजीत चाललेलं हॉटेल आहे. तर आता शेवटची रात्र आपल्या हातात आहे. तेव्हा काय करूया? बघ, तु जर सांगितलंस त्या रात्रीला की, आजची रात्र थोडी हळूहळू पुढे सरक. तु त्या चंद्राला सांगितलंस की आजची रात्र तु आहे तिथेच थांब, तर तो थांबेलही! कारण ही रात्र हातातून गेली तर जगण्यासाठी लागणारं एकमेव साधन 'तू' तेच निघून जाईल.
रात की बात है, और जिंदगी बाकी तो नही|'
तेरे बिना जिंदगी भी लेकीन,
जिंदगी नही, जिंदगी नही ...

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....