Wednesday, 18 March 2020

राजकारणाचा थंड पण निर्दयी चेहेरा – हाउस ऑफ कार्डस्

हाउस ऑफ कार्ड्स ही अमेरिकन राजकारणाचं चित्र दाखवणारी एक चित्तथरारक कथा आहे. 1990 साली ब्रिटीश ब्रॉडकास्टद्वारा एक याच नावाची एक लहान मालिका प्रदर्शित केली होती, त्याचं हे विस्तारित रूप आहे असं म्हणायला हरकत नाही. या मालिकेचे पहिले 13 भाग नेटफ्लिक्स या प्रसिद्ध वेबसाईटवर 2013 साली प्रथम प्रकाशित झाले. अमेरिकन ब्युटी या अप्रतिम सिनेमासाठी ज्याला ऑस्कर मिळालं होतं असा आणि आता ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत असा एक गुणी अभिनेता केवीन स्पेसी या मालिकेत मुख्य भूमिकेत होता. जबरदस्त महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत निर्दय राजकारणी ज्याला, अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायचं आहे, असा फ्रँक अंडरवूड या नेत्याची भूमिका केवीन स्पेसी या अभिनेत्याने केली आहे.
हाउस ऑफ कार्ड्स ही अशा एका साउथ केरोलीनामधला खासदार आणि संसदेमधला मेजोरीटी व्हीप असलेला महत्त्वाकांक्षी राजकरणी आणि त्याची तितकीच महत्त्वाकांक्षी बायको क्लेयर यांची कहाणी आहे. ही मालिका ज्या पुस्तकावरून चित्रित केली आहे, ते मूळ पुस्तक ब्रिटीश कादंबरीकार मायकेल डूब्स याच्या 1989 साली प्रकशित झालेल्या याच नावाच्या कादंबरीवरून झालं आहे. अर्थात ते पुस्तकं ब्रिटीश राजकारणाच्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलं होतं. पण अमेरिकन राजकारणावर तयार झालेली ही हाउस ऑफ कार्ड्स ही मालिका याच पुस्तकावरून प्रेरित झालेली आहे. अमेरिकेच्या राजकारणात नवीन टर्म सुरू होते. फ्रँक अंडरवूड निवडून येतो. त्याचा अनुभव, त्याची ताकद आणि महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन त्याला असं वाटत असतं की, अमेरिकेच्या राजकारणातलं राष्ट्राध्यक्षानंतरचं सर्वात पप्रतिष्ठेचं पद म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट, भारतीय राजकारणाच्या संदर्भात या पदाला नाव परराष्ट्रमंत्री हे आहे. पण सर्व बाजूंनी अधिकारी असणारा फ्रँक अंडरवूड याला ते सेक्रेटरी ऑफ स्टेटचं पद नाकारलं जातं आणि या चित्तथरारक कथेला सुरवात होते. आपल्याला ते पद मिळणार आहेच, याचा त्याला प्रचंड विश्वास सुद्धा असतो. त्या पदावर करायचं असलेलं काम तो सुरू सुद्धा करतो, मग त्याला सांगितलं जातं की, राजकारणातली काही अपरिहार्यता म्हणून हे आता तुला देता येणार नाही. आणि जखमी झालेला सिंह जसा अधिक आक्रमक होतो, तसा हा अपमानाची जखम झालेला सिंह अधिक आक्रमक होतो. आणि या कथेला सुरवात होते.
वैयक्तिक माझी राजकारणाची समज खूपच मर्यादित होती. सत्तेच्या ठिकाणी असणारा माणूस हा किती ताकदवान असतो, त्याच्या हातात किती सत्ता असते आणि power currupts and absolute power currupts absolutly हे वाक्य किती सत्य आहे, हे ही मालिका बघताना लक्षात येतं. आपल्या मार्गातला अडथळा दूर करण्यासाठी तो आपल्याच पक्षातल्या आपल्याच शिक्षणमंत्र्याला कसा अडकवतो, त्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लिक करतो, त्यासाठी एका मिडीया हाउसशी संधान बांधतो, तिथल्या एका तरूण पत्रकार स्त्रीला सत्तेच्या ठिकाणची आमिषं दाखवून तिच्याकडून सत्तेच्या खेळाची पुढची पावलं टाकतो. त्याला माहिती आहे, की लोकांना चटपटीत बातम्या वाचायला आवडतं, ते चटपटीत देणारं आणि लोकांपर्यंत पोहोचवणारं माध्यम आपल्या हातात पाहिजे, आणि अशा माध्यमात आपल्यासारखा एखादा अल्पसंतुष्ट नसणारा, अधिकची अपेक्षा असलेला माणूस आपल्याबरोबर पाहिजे. या सगळ्याची गणितं त्याच्या डोक्यात पक्की आहेत. सत्ता मिळवण्याच्या प्रवासात लागणार्‍या सगळ्या शिड्या तो लीलया वापरतो, वापरून झाल्यावर फेकून देतो. सत्तेच्या ठिकाणी असल्यामुळे आपण केलेलं गुन्हे, खूप निस्ताराचे कसे याचं त्याला नेमकं गणित माहिती आहे.
सत्तेच्या ठिकाणी बसलेला ही माणूसच असतो आणि सत्तेच्या ठिकाणी नसलेला ही माणूसच असतो. पण दोघांच्या ताकदीमध्ये इतका फरक पडतो की सामान्य माणसाला ते सहन होत नाही. पत्रकार झोई बार्न्स हा उपयोग झाल्यावर, तिच्याकडून अपेक्षित काम झाल्यावर आणि ती जास्त धोकादायक बनते आहे, पूर्वीइतकी विश्वासपात्र राहिली नाही हे लक्षात आल्यावर तो तिला मेट्रोखाली ढकलून देतो. ती मानसिक रुग्ण झाली आहे, टीव्हीवर झळकायची सवय लागली आहे, प्रसिद्धी आणि पैसा याला भुलून ती गैर मार्गाला लागली आहे, याच प्रयत्नात तिची नोकरी गेली वगैरे गोष्टी परिस्थितीला निर्माण करून देऊन त्याला पडद्यामागे राहून फक्त आकार देण्याचं काम फ्रँक करतो. तिचा खून पचवतो. ज्या ज्या लोकांना तो खून आहे, याचा संशय असतो, त्यांचाही तो बंदोबस्त करतो. राजकरणातले हे छक्के-पंजे आपल्याला सामान्य माणसाला माहिती नसतात. अचानक व्हाईट हाउसच्या चार बंद भिंतींच्या आत एका जबरदस्त महत्त्वाकांक्षी राजकारण्याच्या नजरेतून आपल्याला अचानक राजकारण दिसायला लागतं आणि आतापर्यंत अज्ञात असलेलं एक विश्व आपल्याला उलगडत जातं.
फ्रँक अंडरवूडचं काम केलेल्या केविन स्पेसीच्या असामान्य अभिनयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे, तो त्याच्या या अत्यंत अनैतिक, निर्दयी, तत्त्वशून्य, गलिच्छ राजकारण प्रेक्षकांच्या साक्षीने करत असतो. या मालिकेचं वैशिष्ट्य आहे की कथा बघणार्‍या पेक्षकाला त्यात जोडून घेते. फ्रँक अंडरवूड त्याची भूमिका पेक्षकाला समजावून सांगतो, आणि तो आपल्याला समजावून देतो की जर सत्तेच्या ठिकाणी बसायचं असेल, तर तुमच्या हाताला कोणाचंतरी रक्त लागणारच आहे. पवित्र हातांनी तुम्हाला सत्तेच्या ठिकाणी बसता येणार नाही. फ्रँक अंडरवूडचे असे काही प्रसंग आहेत, जिथे तो प्रत्यक्ष प्रेक्षकांशी बोलतो. ही निवेदनाची पद्धत आपल्याकडे पूर्वी संगीत नाटकांमध्ये असे. तिथे एक विदुषक किंवा सूत्रधार कथा सांगे, आणि मागे वेगवेगळी पात्र ती कथा अभिनयातून आपल्याला सांगत.
हाउस ऑफ कार्ड्स ही मालिका बघताना आपल्याला राजकरणाच्या अनेक ज्या बाबी लक्षात येतात. उदा. शासनाच्या पातळीला एखादा निर्णय घेतला कसा जातो. किंवा उदा. आघाडी युतीच्या राजकरणामध्ये मित्रपक्षांबरोबर जागावाटपाच्या तडजोडी कशा होतात, प्रत्यक्ष त्या चर्चांमध्ये काय होतं, ‘म्हणजे जागा कमी लढवा, पण मंत्रीमंडळात एखादं प्रतिष्ठेचं पद देऊ’, किंवा तत्सम तडजोडी बंद दारांच्या मागे नेमक्या कशा होतात, अशा अनेक गोष्टी आपल्याला कळत जातात. किंवा महत्त्वाचे निर्णय जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा आयोजित होणार्‍या पत्रकार परिषदा किंवा देशाचा सर्वात मोठा नेता जनतेला उद्देशून काही बोलतो, निर्णय जाहीर करतो, त्यामागचं नियोजन या गोष्टी आपल्याला कळू शकतात.
या मालिकेत पुढे, अमेरिकेचा रशियाबरोबरचा संघर्ष सुद्धा दाखवला आहे. अर्थात तो सत्य घटनांवरून प्रेरित आहे. निवडणुकांमध्ये होणारी परकीय सत्ता आणि पैशाची मदत, त्यासाठी करावे लागणारे जुगाड. त्यांची भांडाफोड होते आहे असं लक्षात आल्यावर त्यांच्यासाठी केलेल्या तडजोडी आणि या सगळ्याच्या माध्यमातून सत्तेच्या जवळ जाण्याची फ्रँक अंडरवूडची धडपड. या प्रयत्नात तो चुकतो सुध्दा. काहीवेळा त्याची गणितं चुकतात, निर्णय चुकतात. पण ते माणूस म्हणून आपलं वैशिष्ट्य आहे. आपण चुकतो, पडतो, अडखळतो. पण त्यातूनच शिकत शिकत पुढे जातो.
सत्तेची, राजकारणाची आणि त्याच्या बदललेल्या स्वरूपाची एकूण समज जर आपल्याला हवी असेल तर ही मालिका बघावी. निवडणुकीमध्ये अनैतिक मार्गांचा अवलंब केला, काळा पैसा वापरला, विरोधकांना नामोहरम करण्याची रणनीती आखून प्रचार केला वगैरे भारताच्या आजच्या राजकारणात सुद्धा जे आरोप सत्ताधारी पक्षावर होतात ते सगळे आरोप फ्रँक अंडरवूडच्या सरकारवर होतात. आधीच्या राष्ट्राध्यक्षाला, शरद पवार यांनी वसंतदादांच्या बाबतीत जे केलं आणि सत्ता मिळवली, त्याप्रकारचं कारस्थान करून फ्रँक अंडरवूड राष्ट्राध्यक्ष गॅरेट वॉकर याला हाकलून देऊन सत्ता मिळवतो. जेव्हा निवडणुकीतील गैरप्रकारांविरोधात त्याच्याविरुद्ध खटला भरला जातो आणि महाअभियोग चालवला जातो तेव्हा त्यानी दिलेलं उत्तर किंवा दिलेलं स्पष्टीकरण हे इतकं भयानक आहे, की अनितीचं इतकं ढळढळीत समर्थन ऐकायची सामान्य माणसाला सवय नसते. तो म्हणतो, की आज तुम्ही माझ्यावर अनैतिकता, भ्रष्टाचार याचे आरोप करत आहात. तुम्ही माझ्यावर नियम मोडून वागल्याचे आरोप करत आहात, पण मी तुम्हाला सांगतो की, मी जे खेळलो आहे तो नियमांनुसारच खेळलो आहे. हेच ते नियम आहे जे तुम्ही मी एकत्र बसून तयार केले आहेत. हे तेच नियम आहेत, ज्याच्या आधारे तुम्ही तुमची सत्तास्थानं मिळवली आहेत. जर त्या नियमांकडे बोट दाखवून तुम्ही मला दोषी ठरवत असाल, तर लक्षात ठेवा की आपण सगळेच दोषी आहोत. आता तुम्हाला पूर्वीचे फायदे माझ्यामुळे मिळायचे बंद झाल्यावर तुम्ही माझ्यावर त्या नियमांकडे बोट दाखवून आरोप करणार, हे बरोबर नाही.’ आणि मग फ्रँक अंडरवूड प्रेक्षकांकडे पाहून बोलतो. तो आपल्याला याची जाणीव करून देतो की,
“मला मान्य आहे मी दोषी आहे. पण मी कोणालाही उत्तरदायी नाही. तुम्हाला, म्हणजे सामान्य माणसाला तर मी खिजगणतीतही धरत नाही. तरी तुम्हाला मी का आवडतो, तर मी काम करतो. मी तुम्हाला नवीन स्वप्न देतो, नवीन उमेद देतो, नाहीतर तुमची आयुष्य किड्यामुंग्यांसारखीच आहेत. आणि शेवटी मी तुमचाही विचार करत नाही. तुमच्या आयुष्यातली निष्क्रियता आणि उथळपणा इतका वाढला आहे की कोणीही काम करणारा माणूस तुम्हाला भावतो. पण शेवटी मी फक्त माझा विचार करतो. हा काळच असा आहे की, इथे सत्तेच्या जागी बसला आहेस की नाही इतकंच विचारलं जातं. तुम्ही तुमच्या काळात सत्तेच्या जागी असता आणि नंतर नसता, इतकं साधं गणित आहेत..”
फ्रँक अंडरवूडचं ते दोन मिनिटांचं स्वगत ऐकण्यासारखं आहे. केवीन स्पेसीचा अभिनय बघण्यासारखा आहे. एक क्षण असा येतो की आपल्यासारखा सामान्य माणूस अनितीच्या अशा समर्थनामुळे हादरून जातो. हे स्वगत ऐकल्यावर माझ्यासमोर प्रतिमा आली होती ते भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. ज्या नियमांमुळे तुम्ही इतके दिवस सत्तेच्या जागी बसत होता, त्या नियमांचा आधार घेऊन मी तिथे बसलो तर तुम्हाला त्रास का होतो आहे? ल्युटीयन्स दिल्लीच्या बाहेरचा एक नेता इथे येऊन बसतो, आपल्या टाळूवरून हात फिरवतो हे इथल्या प्रस्थापित वर्गाला सहन होणं शक्यच नाही. पण त्याने सगळ्यांच्याच टाळूवरून हात फिरवून राज्य केलं. मोदी खूप नैतिक आहेत, किंवा नियमांतला पोकळपणा कुठे कसा वापरायचा हे ही त्यांना कळतं, या अर्थाने ते नैतिकही नाहीत. पण जसं तुम्ही पूर्वी वागत होतात, बाकीच्या कोणाचा तुम्ही विचार करत नव्हतात, आता तो ही तसाच वागतो आहे, आणि तोही बाकीच्या कोणाचा विचार करत नाही. अनैतिकतेने वागण्याचा आरोप ते लोकं करत आहेत, ज्यांनी या मार्गाची पायाभरणी केली.
फ्रँक अंडरवूडमध्ये सुद्धा मला अनेकदा मोदी दिसतात. निश्चालनीकरणासारखा विषय आहे. तो निर्णय चुकला. फ्रँक अंडरवूड अमेरिकेत रोजगार निर्मितीसाठी काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतो. ते प्रकल्प त्याचे इगोचे विषय असतात. ते फसणार असतातं, हे त्याला सांगणारेही अनेक लोकं असतात. पण तो ते निर्णय घेतो. प्रत्यक्ष प्रचाराची तारीख संपल्यानंतर नरेंद्र मोदी अमरनाथ यात्रेला गेले. भगवी वस्त्र परिधान करून ध्यानाला बसले. ते सगळे फोटो भारतभर व्हायरल झाले. तो मोदींचा प्रचारच होता. नियमातली एक पळवाट मोदींनी वापरली. आपला हेतू साध्य करून घेतला. यासाठी त्यांना दोष देता येईल का? याचं उत्तर ज्याने त्याने द्यायचं आहे. फ्रँक अंडरवूड त्याच्या स्वगतामध्ये हेच सांगतो, “की अरे तुम्ही कोणत्या नियमांबद्दल बोलताय. ते नियम आपणच बनवले आहेत. त्यात कुठे कुठे काय काय पळवाटा आहेत, ते तुम्हाला मला नीट माहिती आहे. त्याच्यासाठी तुम्ही मला दोष देऊ शकत नाही. जर जर मी दोषी असेन, तर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर दोषी आहात हे मान्य करा.”
बराक ओबामा यांच्या कारकिर्दीमध्ये मध्यपूर्वेत गृहयुद्ध सुरू झाली. सिरीया आणि इराकच्या खूप मोठ्या प्रदेशावर इस्लामिक स्टेटनी ताबा मिळवला. तो विषय अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने आपल्याला बघायला मिळतो. सत्तेच्या ठिकाणी बसल्यावर आपल्या एका निर्णयामुळे काही प्राण वाचू किंवा मरू शकत असतात. सत्तेच्या ठिकाणी बसणार्‍या माणसाला लोकांच्या आयुष्याविषयी निर्णय घ्यायचा असतो. त्यातला समतोलपणा, निर्णयाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी या सगळ्या बाबी आणि त्यातलं गांभीर्य आपल्या लक्षात येऊ शकतं. ओबोमाच्याच काळात, अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणारा ओसामा बिन लादेन याचा छापा टाकून खात्मा करण्यात आला होता. तो ही प्रसंग हाउस ऑफ कार्ड्समध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. फ्रँक अंडरवूड आणि त्याची तितकीच महत्त्वाकांक्षी बायको क्लेयर अंडरवूड या दोघांचाही सत्ता संघर्ष मालिकेत पुढे आलेला आहे. फ्रँक अंडरवूडला मिळत जाणार्‍या संधी, सत्तेची स्थानं, आणि ताकद पाहून क्लेयरला ही ती स्वप्न पडू लागतात. त्यापूर्वी ती एक स्वयंसेवी संस्था चालवत असते. त्याच्यातले चढउतार, त्याचं यशापयश, त्यातून तिचासुद्धा एक नेता म्हणून होणारा उदय. पुढे फ्रँक अंडरवूड राष्ट्राध्यक्ष झाल्यावर रशिया प्रश्न फ्रँक अंडरवूडच्या बरोबरीने सोडवण्यातली तिची फ्रँकला झालेली मदत. आणि त्या अनुभावाच्या आधारावर तिचा सेक्रेटरी ऑफ स्टेट पदावर दावा, या सगळ्यागोष्टी आपल्याला पुढे पुढे उलगडत जातात. या दोघांना स्वतंत्रपणे असणार्‍या महत्त्वाकांक्षा ते एकमेकांच्या सत्तेचा फायदा घेऊन पूर्ण करत असतात.
वर सांगितल्याप्रमाणे सत्तेसाठी फ्रँक अंडरवूड आणि क्लेयर दोघंही काही माणसांचा वापर करून पुढे जातात. जसं त्या तरुण पत्रकार स्त्रीचा फ्रँक अंडरवूड खून करतो, तसंच फ्रँक अंडरवूड राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ते दोघंजण एक लेखक निवडतात. त्यांना असं अपेक्षित असतं की, आपली स्टोरी सामान्य अमेरिकी लोकांनी वाचली तर त्यांना प्रेरणा मिळेल. तर आपली गोष्ट प्रेरणादायी करून लिहू शकणारा एक लेखक ते निवडतात. क्लेयरचे त्याच्याशी कामापलीकडचे संबंध निर्माण होतात. तसे संबंध झोई बार्न्स आणि फ्रँक अंडरवूडचेही निर्माण झालेले असतात. पण तो लेखक फ्रँक अंडरवूड आणि क्लेयर अंडरवूड यांना हवं तसं लिहित नाही, उलट यांच्या गैरकृत्यांचं बिंग उघड करणारं लिहितो. आणि ते यांच्यापाठीमागे प्रकाशित करण्याचीही तयारी करतो. हे लक्षात आल्यावर क्लेयर त्याचा काटा काढते. आणि फ्रँक प्रमाणेच तीसुद्धा तो खून पचवते. आणि उजळ माथ्याने पुन्हा राजकारणात लक्ष देते. पुढे जाते. हाउस ऑफ कार्ड्सच्या शेवटच्या सिझनमध्ये फ्रँक अंडरवूड गूढपणे गायब होतो आणि देशाचा कारभार क्लेयर सांभाळते असं दाखवलं आहे.
केवीन स्पेसीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे, त्यामुळे या मालिकेच्या निर्मात्यांनी केवीन स्पेसीला पुढच्या भागात घ्यायचं नाही असा निर्णय घेतला आणि म्हणून केवीन स्पेसी शेवटच्या भागात नाही. पण पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर अशी सत्तेची दोन स्थानं आहेत. पब्लिक सेक्टरमध्ये राज्य करेल क्लेयर आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये राज्य करेल फ्रँक अशी तडजोड करून फ्रँक अंडरवूड गायब होतो, भूमिगत होतो.
फ्रँक अंडरवूडच्या बरोबरीने त्याचा एक सहाय्यक असतो, डग स्टँपर असं त्याचं नाव. फ्रँकचा त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो. फ्रँकने केलेली सगळी कामं त्याला माहितीही असतात, आणि प्रत्येक कामामध्ये तो त्याच्याबरोबरीने उभा असतो. पुन्हा एकदा मला याचं प्रतिबिंब दिसतं ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीत. अर्थात अमित शाह आता सत्तेच्या जागीही आहेत. पण 2019 च्या आधी ज्याप्रमाणे अमित शाह भारतीय जनता पक्षाचा पडद्यामागून कारभार हाकत होते, पक्ष संघटना बळकट करत होते, मोदी घेत असतील ते सगळे निर्णय यशस्वी करून दाखवण्यासाठी झटत होते, तसा फ्रँक अंडरवूड उजवा हात म्हणजे डग स्टँपर. झोई बार्न्सचं फ्रँक अंडरवूडने नेमकं काय केलं, हे डगला माहिती असतं. पिटर रुसो या खासदाराला नैराश्यात जायला, त्याची नोकरी, बायको मुलं, सगळं हिसकावून घेऊन आत्महत्या करायला भाग पाडणारा फ्रँक अंडरवूड डगला माहिती असतो. झोई बार्न्स या प्रकरणाचा संशय असलेली रेचल पोज्नर ही डग स्वतः संपवतो. रेचलच्या नकळत तो प्रेमात पडतो. तिचा आधीच बंदोबस्त करण्याच्या ऐवजी तो तिला पैसे, किंवा इतर धमक्या देऊन गप्प बसवतो. पण जेव्हा ते प्रकरण हाताबाहेर जाऊ लागेल अशी शंका येते तेव्हा तो तिच्या हाताने तिला मारतो.
फ्रँक अंडरवूड आणि क्लेयर अंडरवूड यांचं नातंही खूप गुंतागुंतीचं आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे की नाही याचं ठाम उत्तर आपण देऊ शकत नाही. दोघं एकमेकांना सांभाळून घेतात, आणि भांडतातही. आपलं आयुष्यं खूप गुंतागुंतीचं आणि समर्पित असणार आहे, हे लक्षात घेऊन ते आपत्य होऊ देत नाहीत. सार्वजनिक कारकीर्द सुरू होण्याच्या आधी क्लेयरवर झालेला बलात्कार आणि नंतर स्वीकारलेली वाट लक्षात घेऊन ते आपत्य न होण्याचा निर्णय घेतात. अमेरिकन सिव्हील वॉरमध्ये फ्रँक अंडरवूडच्या खापर पणजोबांनी दक्षिणेकडून भाग घेतलेला असतो. त्या सिव्हील वॉरच्या आठवणी जपत फ्रँकचं वागणं, सिव्हील वॉरच्या संस्कारांचा त्याच्या वर्तनावर पडलेला प्रभाव हा सगळ्यामध्येच केवीन स्पेसीचा अभिनय अतिशय प्रभावित करणारा आहे. झोई बार्न्सच्या प्रकरणात तिचा प्रियकर पुढे फ्रँक अंडरवूडवर खुनी हल्ला करतो. एका निवडणूक प्रचारासाठी फ्रँक सभा घेत, लोकांशी बोलत फिरत असतो, तेव्हा एक सभेनंतर त्याच्यावर झोई बार्न्सचा प्रियकर गोळ्या झाडतो. त्या सगळ्या प्रकरणामध्येसुद्धा त्याच्या मनात सिव्हील वॉरच्या आठवणी येत असतात. या सगळ्याच नाजूक परिस्थितीमध्ये केवीन स्पेसीनी अभिनय अतिशय उत्तम केला आहे.
आणि म्हणूनच, शेवटच्या सिझनमध्ये फ्रँक अंडरवूड हे पात्रच नाही हे जेव्हा चाहत्यांना कळलं तेव्हा एक तीव्र टीकेची प्रतिक्रिया उठली होती. फ्रँक अंडरवूडचे संवाद, त्याचा निर्दयी, आणि थंड डोक्याने विचार करण्याची सवय आणि या सगळ्याची प्रेक्षकांवर पडलेली मोहिनी इतकी जबरदस्त होती की शेवटच्या सिझनकडे लोकांनी पाठ फिरवली. 73 भागांची ही मालिका 2013 साली प्रथम प्रदर्शित झाली. पहिल्या पाच सिझन्समध्ये प्रत्येकी 13 एपिसोड आहेत. शेवटच्या सिझनमध्ये मात्र केवळ आठ एपिसोड आहेत.
व्यक्तीशः मी गेम ऑफ थ्रोन्स आणि हाउस ऑफ कार्ड्स या दोन मालिका सलग बघितल्या. आपल्याला चित्रपटांची सवय असते, त्यामुळे इतका प्रचंड मोठा विषयचा कॅनव्हास पाहण्याची आपल्याला सवय नसते. या दोन्ही सिरियल्सचा पहिला सिझन संपल्यावर झाली प्रतिक्रिया अशी होती की, ‘आता पुढे काय व्हायचं शिल्लक राहिलं आहे?, या विषयात जेवढं होण्यासारखं आहे ते झालं. आता पुढे काय?’ गेम ऑफ थ्रोन्समध्ये सुद्धा पहिल्या सिझनच्या शेवटी नेड मारतो, तेव्हा वाटलेलं आता गोष्टीमध्ये काहीच शिल्लक नाही. पण आयुष्याप्रमाणेच कोणत्याच विषयाचा कॅनव्हास कधीच इतका लहान नसतो.
© अक्षर मैफल

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....