वेश्यागृहामध्ये आत चाललेला सेक्स हा डॉक्टर हातात टॉर्च घेऊन दरवाज्याच्या फटीतून, लपून बघत असतो. आत प्रत्यक्ष सेक्स करत असलेल्या वेश्येलाही दरवाज्याच्या फटीतून एक डॉक्टर बघतो आहे हे माहिती असतं. हातातल्या घड्याळाकडे पाहून दुसर्या हातात धरलेल्या कागदावर तो डॉक्टर काही नोंदी घेत असतो. तोंडामध्ये एक टॉर्च, एका हातात ते घड्याळ दुसर्या हातात कागद, पेन असा सगळा अवतार आणि दाराच्या फटीतून आत चाललेल्या सेक्सचं सगळं वर्णन नोंदवून ठेवण्यासाठीची त्याची चाललेली गडबड, अशा या सिरीजचा ओपनिंग सीन आहे.
२
19व्या शतकातलं जगाचं शास्त्र तंत्रज्ञान, आर्थिक विकास आणि त्यानं येणारी समृद्धी याचं केंद्र म्हणजे त्यावेळचा युरोप. अमेरिकेचं जगाच्या इतिहासातलं स्थान हे पहिल्या महायध्रद्धानंतर बदलत गेलेलं आहे. पण युरोप आणि त्यातही जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, पोर्तुगाल या सोळाव्या, सतराव्या, अठराव्या शतकातल्या जगाच्या महासत्ता. त्यामुळे अर्थातच ज्या ज्या आधुनिक संस्था आजच्या जगण्याच्या सर्वात जवळ आहेत अशा सर्व संस्थांच्या निर्मितीचा तो काळ होता. आणि त्या संस्थांच्या निर्मितीमध्ये युरोपचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. औद्योगिक क्रांती ही सुद्धा प्रामुख्याने युरोपमध्ये सुरू झाली हा योगायोग नव्हता. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात जो सर्वात आमूलाग्र बदल घडवून आणला तो हा होता की, तोपर्यंतच्या मानवी आयुष्याच्या केंद्रस्थान ‘पारलौकिक’ बाबी होत्या. साहित्य निर्माण होत होतं ते ही प्रामुख्याने धार्मिक. चित्र काढली जात होती ती सुद्धा धार्मिक. सर्व कला, साहित्य, संगीत यांच्या मुख्य प्रेरणा धार्मिक होत्या. औद्योगिक क्रांती ने त्या प्रेरणा मानवीय पातळीवर आणून ठेवल्या. त्यानंतर ‘माणसाचा’ अभ्यास सुरू झाला. माणसासाठी अभ्यास सुरू झाला.
हळूहळू पारलौकिक बाबींचं महत्त्व कमी होत गेलं. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून मानवी लैंगिक व्यवहारांचाही डोळसपणे अभ्यास सुरू झाला. या विषयी लिहिताना, बोलताना, चर्चा करताना कायमच शब्द अतिशय सावधपणे वापरले पाहिजेत. औद्योगिक क्रांतीच्या आधीही लोकं सेक्स करत होतीच. औद्योगिक क्रांतीच्या आधीही लैंगिक व्यवहारांचा अभ्यास झालेला होताच. पण आधुनिक संस्थांची अवजारं वापरून अभ्यासाच्या दिशा निश्चित करणे, आणि मानवी व्यवहार बदलतील असे वैज्ञानिक निष्कर्श काढणे हे काम मात्र औद्योगिक क्रांतीनं सुरू केलं.
इसवीसनाच्या दुसर्या शतकात ‘अर्स अमटोरिया’ म्हणजे Art of Love नावाचा ग्रंथ प्राचीन रोमन साम्राज्यात तयार झाला होता. परंतु याच्या व्यतिरिक्त लैंगिक व्यवहारांच्या अभ्यासाचं साहित्य प्राचीन युरोपमध्ये निर्माण झालं नाही. भारतामध्ये मात्र अशा साहित्याची एक समृद्ध परंपरा आहे. ज्याचा काळ निश्चित सांगता येत नाही अशा वैदिक साहित्यापासून मानवाच्या लैंगिकतेचे स्पष्ट संदर्भ असलेले उतारे भारतीय प्राचीन साहित्यात सापडतात. उपनिषदांमध्ये, गीतेमध्ये ‘जो अधर्म नाही असा ‘काम’ मीच आहे’ असं म्हणणारा श्रीकृष्ण, भारताच्या मध्ययुगात लोधी दरबारातला एक राजकवी याने ‘अनंग रंग’ नावाचा लिहिलेला ग्रंथ. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे वात्स्यायनाचा ‘कामसूत्र’. जगाच्या पाठीवर एकमेव संस्कृती अशी आहे की जिने ‘काम’ हे सुद्धा मानवी जीवनाचं एक ध्येय मानलं आहे. इसवीसनाच्या पूर्वीच्या तिसर्या-चौथ्या शतकात मानवाच्या लैंगिकतेचा इतका विस्तृत पट वात्स्यायनाने मांडून ठेवला आहे. समृद्ध समाजाचं एक लक्षण सांगताना आमचे सर कायम एक उदाहरण देत असंत. ते म्हणत, “वात्स्यायनाने दोन हजार वर्षांपूर्वी कामसुत्रामध्ये कामक्रीडेच्या 87 आसनांचं वर्णन केलं. मधल्या दोन हजार वर्षांत आपण आपल्या अनुभवातून नवीन 88 वं आसन शोधून काढू शकलेलो नाही. याचा अर्थ भारत प्राचीन काळात समर्थ होता, आता आपण आपलं सामर्थ्य गमावलं आहे.”
सांगायचा मुद्दा असा की, मानवाच्या लैंगिक व्यवहारांचा अभ्यास माणूस औद्योगिक क्रांतीच्याही पूर्वीपासून करत होता. पण आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक तर्कशास्त्र, मानसशास्त्र अशी अत्याधुनिक अवजारं वापरून जो अभ्यास सुरू झाला तो युरोपात सुरू झाला.
1837 साली फ्रान्समध्ये पॅरिस या शहरात काम करणार्या 3558 वेश्यांचा अभ्यास करणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला. ‘पॅरिस शहरातील वेश्या’ असंच त्या अहवालाचं नाव होतं. या अहवालापासून आधुनिक सेक्सच्या अभ्यासाची सुरवात झाली असं मानतात. जसं जसं मानवाच्या विचार कक्षेमध्ये ‘माणूस’ केंद्रस्थानी आला, तसं तसं त्याच्या सर्वच बाबींचा अभ्यास सुरू झाला. मध्ययुगीन, धार्मिक रूढी कल्पनांच्या तावडीतून लैंगिक व्यवहारांची मुक्तता या नंतर युरोपात सुरू झाली. 1886 साली रिचर्ड फ्रेईहेर्र याने ‘सायकोपॅथिया सेक्शूलीस’ नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथापासून ‘सेक्सोलॉजी’ ही विज्ञानाची शाखा म्हणून प्रस्थापित झाली. 1830 पासून 1966 पर्यंत सेक्सोलॉजीचा अभ्यास केलेल्या 58 जणांची नावं सांगता येतील. सगळ्यांचं कार्य स्थलकालाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तरी मूलभूत होतंच. पण आपण जागेच्या अभावी काही ठराविक एक-दोन जणांचे उल्लेख करून पुढे निघू.
एकोणिसाव्या शतकाचं शेवटचं दशक, व्हिएन्नामध्ये सिग्मंड फ्रोइड याने लैंगिकतेवरील 3 निबंध हा ग्रंथ प्रकाशित केला. फ्रोईड स्वतः मेंदूचा अभ्यासक होता, आणि सायकोअनॅलिसिस नावाची नवीन शाखा निर्माण केली. त्याच्यासमोर येणारे रोगी, पिडीत यांचे अनुभव आणि त्याने केलेली काही निरीक्षणे यांच्या आधारे त्याने काही थीअरिज मांडल्या. फ्रोईडच्या बहुतेक थिअरीज पुढे त्याच्यात काही शिष्यांनी आणि अनेक अभ्यासकांनी खोडून काढल्या. पण पुढची पन्नासएक वर्षं तरी सेक्सोलॉजीच्या अभ्यासात फ्रोईड आणि त्याचे विचार हे अत्यंत मोलाचे ठरत होते. 1900 साली हॅवलॉक एलीस याने Studies in the Psychology of Sex असे दोन ग्रंथ प्रकाशित केले. एलीस हा मुळातला भौतिकशास्त्रज्ञ. पण त्याने हे ग्रंथ प्रकाशित केले. या ग्रंथात त्याने अनेक केस स्टडीज सुद्धा प्रकाशित केल्या आहेत. मी त्यातला पहिला ग्रंथ वाचला आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो की, आज 120 वर्षं झाली असली तरी अभ्यासक या नात्याने एलीसची विचारपद्धती, तार्किकता, अभ्यासाची पद्धत हे आजसुद्धा मोलाचं ठरतं.
आपण 1900 सालापर्यंत आलो आहोत. जगाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवहारात अमेरिका आता येऊ लागली होती. लिंकनच्या नेतृत्वाखाली अमेरिका यशस्वीपणे गृहयुद्धातून बाहेर पडली. एका बलाढ्य अमेरिकेच्या निर्मितीची पायाभरणी सुरू होती. मुळामध्ये युरोपातून अमेरिकेच्या किनार्यावर वसाहत करून राहिलेले लोकं युरोपमध्ये असमाधानी असलेले होते. नवीन जग शोधून तिथे नवीन आयुष्य उभं करण्याची उमेद बाळगून ते अमेरिकेत पोहोचलेले. त्यामुळे मुळात त्यांच्यात स्वातंत्र्याची स्फूर्ती होती. जगाच्या इतिहासात लोकं एकत्र येऊन राष्ट्र निर्माण होण्याची पहिली घटना म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. पण 1776 पासून ते विसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत अमेरिकेचं जगाच्या व्यवहारातलं स्थान नगण्य होतं, असं म्हणता येईल. जगाचं रहाटगाडगं चालवत होता तो युरोपच.
विसाव्या शतकाच्या दुसर्या दशकात मानववंशशास्त्राचा अभ्यास करणारी एक स्त्री शास्त्रज्ञ सामोआ नावाच्या बेटावर आदिवासी समाजव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी म्हणून गेली होती. तिथे सामोआ आदिवासी मुलींच्या वाढीचा तिने खूप सूक्ष्मपणे अभ्यास केला. तिची मुख्य प्रेरणा मानववंशीयदृष्ट्या अभ्यास करण्याची होती. त्या स्त्री संशोधिकेचं नाव मार्गारेट मेअड, तिच्या Coming of age in Samoa या ग्रंथात तेथील आदिवासी स्त्रियांच्या लैंगिक व्यवहारांवर भाष्य होतं. तिचं मत असं होतं की सामोआतील आदिवासी स्त्रियांमध्ये लैंगिक जाणीवा खूप विकसित आहेत, आणि त्यामुळे बालपणातून तरूणपणामध्ये होणारं त्यांचं मार्गक्रमण हे सुलभ होतं. 1920च्या सुमारास सुरू झालेला तिचा अभ्यास आणि 1928साली प्रत्यक्ष प्रकाशित झालेलं तिचं हे पुस्तक याने अमेरिकेत बदलाची सुरवात झाली.
३
1830पासून 1966पर्यंत ज्या 58 जणांच्या यादीचा मी उल्लेख केला त्यापैकी एक म्हणजे अल्फ्रेड किन्से. 1938 साली आल्फ्रेड किन्सेच्या पहिल्या ग्रंथापूर्वी झालेल्या पुरेशा लैंगिक व्यवहारांच्या पुरेशा अभ्यासाने युरोप आणि अमेरिकेत लैंगिक क्रांतीला सुरवात झाली होती. अमेरिकेच्या तुलतेन युरोपातील हा संघर्ष अत्यंत सहज पार पडला. अमेरिकेतमात्र इतर कोणत्याही क्रांतीप्रमाणे मोठा संघर्ष उभा राहिला. अमेरिकेतल्या लैंगिक क्रांतीचा मात्र आपण लक्षपूर्वक अभ्यास केला पाहिजे. आज आपण ज्या मास्टर्स आणि जॉन्सनबद्दल अधिक सविस्तर बोलणार आहोत त्यांच्या कामाची पायाभरणी मार्गारेट मेअडच्या ग्रंथाने झाली. अमेरिकेतील लैगिक क्रांती, त्याने निर्माण केलेला हिप्पी संप्रदाय, बीटल्स, ओशोंचं ‘संभोग से समाधीत तक’, योगी महेश या सगळ्याने 1960-1980 च्या काळात जी अमेरिका अस्वस्थ, अशांत काळातून जात होती त्याची सुरवात 1920 साली झाली. तीन-चार मुख्य घटनांनी लैंगिक क्रांतीला प्रचंड इंधन पुरवलं. 1928 साली मार्गारेट मेअडचं पुस्तक ही पहिली ठिणगी. त्यांतर 10 वर्षानी इंडियाना विद्यापीठामध्ये आल्फ्रेड किन्सेच्या पुढाकारातून सुरू झालेला ऐतिहासिक अभ्यास. त्या अभ्यासातून तयार झालेली दोन अत्यंत मोलाची पुस्तकं Sexual Behavior in the Human Male (1948) आणि Sexual Behavior in the Human female (1953). 1953 सालीच सेंट लुईसमध्ये वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये सुरू झालेला एक अभ्यास, तो किन्सेच्या अभ्यासाचं पुढचं पाऊल होतं. तो अभ्यास म्हणजे मास्टर्स आणि जॉन्सन यांनी केलेला ‘ह्यूमन सेक्शूअल रिस्पॉन्स’.
किन्सेने 12 हजार लोकांच्या अतिशय सविस्तर मुलाखती घेऊन अमेरिकेतील लोकांच्या लैंगिक व्यवहारांचा एक आलेख उभा केला. त्या दोन अहवालांनंतर अमेरिका पुरती हादरून गेली. लग्नापूर्वी केला जाणारा सेक्स, लग्नानंतर केला जाणारा सेक्स, वेश्यासंस्था, समलैंगिकता अशा अनेक विवाद्य बाबींवर किन्सेच्या अहवालातून अत्यंत धक्कादायक निष्कर्ष बाहेर आले. किन्सेच्या अहवालाचं वैशिष्ट्यं असं होतं की किन्सेने कुठेही आलेल्या निष्कर्षांवर भाष्य केलं नाही. अमुक निष्कर्ष चुकीचा, बरोबर, योग्य, अयोग्य असं कोणतंही व्हॅल्यु जजमेंट किन्सेच्या दोन्ही अहवालांत नाही. पण त्याने दिलेले आकडे अत्यंत धक्कादायक होते. तोपर्यंतची अमेरिकेतली समज या प्रकारची होती, ‘की बहुतेक माझ्या मानसिक विकृतीमुळे किंवा माझ्या आत असलेल्या राक्षसामुळे माझ्यात समलिंगी भावना निर्माण होतात, मला वेश्येकडे जावं असं वाटतं, मला मुखमैथुन करावं असं वाटतं, मला गुदमैथुन करावं असं वाटतं. वगैरे.’ पण सर्व समाज कमीअधिक प्रमाणात बंद दारामागे तसाच वागत असेल यावर कोणाचाही विश्वास नव्हता. किन्सेच्या अहवालातून समोर आलेल्या निष्कर्षातून वेश्यांकडे जाण्याचं प्रमाण किती आहे, याबद्दल धक्कादायक आकडे समोर आले. आणि तिथून खर्या अर्थाने लैंगिक क्रांतीला सुरवात झाली. Sexual Behavior in the Human female हा किन्सेचा ग्रंथ 1953 साली प्रकाशित झाला.
सेक्सचा 1830 पासून किन्सेच्या 1953 च्या ग्रंथापर्यंत मानसशास्त्रीय अभ्यास खूप झाला. फ्रोइडने ऑरगॅझमबद्दलच्या काही थिअरीजसुद्धा मांडल्या होत्या. पण आपल्या अभ्यासाचं महत्त्व विद्यापीठाच्या कुलगुरूला आणि आपल्या जुन्या मित्राला समजावून सांगताना डॉक्टर विल्ल्यम मास्टर म्हणतो, तेचं मास्टर्स आणि जॉन्सन यांच्या अभ्यासाचं वेगळेपण आहे, ते म्हणजे, I simply answer the question, What happens to the body during sex?’’
सेक्स होताना जी प्लेजरची भावना शरीरातून संचार करते, त्याने शरीराची होणारी थरथर. तो केल्यानंतर निघून जाणारी मरगळ, कमी होणारा ताण. ऑरगॅझमनंतर थकल्यामुळे पडून राहिल्यानंतर मिळणारं समाधान या सगळ्या गोष्टी आणि त्याचे मानसिक पातळीवर होणारे बदल याबद्दल किन्सेपर्यंत अनेकांनी नोंदवून ठेवलं होतं. विल्ल्यम मास्टरचं कुतूहल त्याच्या पुढचं होतं. त्याला हे जाणून घ्यायचं होतं की सेक्सच्या दरम्यान शरीराचा प्रतिसाद कसा असतो, शरीर थरथरतं म्हणजे नेमकं काय होतं What happens to the body during sex? याचा अभ्यास करण्यासाठी सेक्सचं प्रत्यक्ष निरीक्षण केलं पाहिजे हे त्याच्या लक्षात येतं. सेक्सबद्दल मोकळेपणाने बोलू शकेल, सेक्सचं निरीक्षण करण्याची परवानगी मिळू शकेल अशी एकच जागा डॉक्टर मास्टरला दिसली, ती म्हणजे वेश्यागृह. या लेखाचा आणि ‘मास्टर्स ऑफ सेक्स’ या मालिकेचा ओपनिंग सीन तो होता. विल्ल्यम मास्टर वेश्येच्या सेक्सचं दाराच्या फटीतून हातात घड्याळ, टॉर्च, नोटपॅड घेऊन निरीक्षण करतो आहे.
४
2009 साली थॉमस मेअर याने ‘Masters of Sex : Life and times of William Master and Verginia Johnson, – Couple who taught america how to love’ हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकावर आधारीत 2013 साली ‘मास्टर्स ऑफ सेक्स’ ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. या मालिकेचे 4 सिझन आहेत, पहिल्या 3 सिझन्समध्ये 12 एपिसोड आणि शेवटच्या सिझनमध्ये 10 एपिसोड असे एकूण एकेका तासाचे 46 एपिसोड असलेली ही मालिका आहे. थॉमस मेअर याने व्हर्जिनिया जॉन्सन हिच्याबरोबर अनेकदा बसून, तिच्या प्रदीर्घ मुलाखती घेऊन हे त्यांचं चरित्र लिहिलं आहे. मुळात हे पुस्तक अतिशय सविस्तर असल्यामुळे मास्टर्स आणि जॉन्सन यांचं संशोधन, त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि ते अजून कलात्मक करण्यासाठी घेतलेलं स्वातंत्र्य हे सगळंच मालिकेमध्ये खूप सविस्तरपणे आलेलं आहे.
ज्या वेश्येचं निरीक्षण करत करत मास्टर्सचा अभ्यास सुरू झालेला असतो, ती त्याला अत्यंत मोलाचा एक सल्ला देते. मानवी लैंगिक व्यवहारांच्या दरम्यान शरीरामध्ये काय बदल घडतात याचा जर अभ्यास करायचा असेल, मुळात सेक्सचा अभ्यास करायचा असेल तर स्त्रीचा दृष्टीकोन अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अभ्यास एकांगी राहील. ते त्याला पटतं.
स्प्रिंगफिल्डमधली एक अत्यंत महत्त्वाकांक्षी मुलगी, स्प्रिंगफिल्डसारख्या लहान गावात फार भवितव्य नाही म्हणून बाहेर पडते, सेंट लुईसला येते. थोडं फार शाळेत शिकायचा प्रयत्न करते, पण शाळेचं सर्टिफिकेट तिच्या नशिबी नव्हतं, ते पुढे सुद्धा आयुष्यात कधीही मिळालं नाही. पण अजिबात अल्पसंतुष्ट नसणारी आणि जबरदस्त महत्त्वाकांक्षी असणारी व्हर्जिनिया जॉन्सन सेक्रेटरी म्हणून विल्ल्यम मास्टर्सच्या हॉस्पिटलमध्ये कामाला येते. हे 1953 साल. आधुनिक जगाला धक्का देणारा एक अभ्यास आता सुरू होतो. प्रत्यक्ष सेक्रेटरी म्हणून काम सुरू करण्याच्या आधी व्हर्जिनियाची दोन लग्न झालेली असतात. पाहिलं लग्न केवळ दोन दिवस टिकलेलं असतं, दुसर्या नवर्यापासून व्हर्जिनियाला एक मुलगा आणि एक मुलगी झालेले असतात. अशी दोन मुलांची घटस्फोटीत आई कामाच्या शोधात वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये येते.
अशा प्रकारच्या अभ्यासासाठी एक स्त्री बरोबर असणं हे का महत्त्वाचं होतं, याचं उत्तर आपल्याला मिळतंच. पण त्यामध्येसुद्धा व्हर्जिनियाच का योग्य होती हे सुद्धा आपल्याला लक्षात येत जातं. दोन लग्न झालेली, दोन मुलं असलेली व्हर्जिनिया स्वतःचा विचार करणारी होती. केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षा वेगळी पण शारीरिक सुखाच्या कल्पना सुद्धा व्हर्जिनियाच्या अतिशय स्पष्ट आणि ठाम होत्या. जे निष्कर्ष मास्टर्स आणि जॉन्सन यांनी नंतर अभ्यास, निरीक्षणं, मुलाखती यांनी सिद्ध केले त्यापैकी एक म्हणजे सेक्समध्ये स्त्री ही प्रधान असते. त्यावेळेपर्यंतचा पुरुषसत्ताक मानसिकतेतून निर्माण झालेला समज असा होता की सेक्समध्ये प्रधान पुरुष असतो. व्हर्जिनिया अभ्यासाच्या आधी सुद्धा स्वतःला सेक्समधून काय हवं आहे, हे ठामपणे मागणारी होती. ते साथीदाराकडून न मिळालं तर स्वतः मिळवणारी होती. खरं म्हणजे आग्रही होती.
ज्या अनेक गोष्ट मास्टर्स आणि जॉन्सन यांनी अभ्यासातून सिद्ध केल्या त्यापैकी एक म्हणजे सेक्सच्या संपूर्ण अनुभवाच्या बाबतीत पुरुष हा कायम परावलंबी आहे, स्त्री ही नाही. स्त्री ही पुरुषाविना, एकटी संपूर्ण सेक्सचा अनुभव घेऊ शकते. याची कारणं अनेक असतील, पुरुष सेक्सच्या बाबतीत परावलंबी आहे. केवळ हस्तमैथुन करून पुरुष संपूर्ण अनुभव कधीही मिळवू शकत नाही, पण केवळ हस्तमैथून करून स्त्री सेक्सचा संपूर्ण अनुभव मिळवू शकते. ही गोष्ट व्हर्जिनियाला अभ्यास, निरीक्षण, पुरावे, ग्राफ्स, प्रत्यक्ष चित्रण यांच्या आधी माहिती होती. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात तशी वागत होती.
म्हणून मास्टर्सच्या या अभ्यासाला स्त्रीचा दृष्टिकोन आवश्यक होता, पण जी स्त्री वैयक्तिक आयुष्यात आपल्या सुखाच्या कल्पनेबद्दल आग्रही आहे, अशीच स्त्री या अभ्यासाच्या पुर्णत्वासाठी गरजेची होती. ही मास्टर्सला आधी सेक्रेटरी म्हणून आणि नंतर सह-संशोधक म्हणून मिळाली. अमेरिकेत अत्यंत नावाजलेला आणि यशस्वी प्रसूतीतज्ज्ञ आणि वंध्यत्व चिकित्सा तज्ञ म्हणून विल्ल्यम मास्टर्सचं नाव असतंच. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये विल्ल्यम मास्टर प्रॅक्टिस करत असतो. त्याच्याच ऑफिसमध्ये हा नवीन अभ्यास सुरू होतो. काचेच्या पलीकडे या अभ्यासात आपलं सहभाग नोंदण्यासाठी तयार असलेले लोकं सेक्स करणार, त्यांच्या मेंदू, हृदय, हात, पाय, पोट इत्यादी ठिकाणी इसीजीच्या वायर लावून सेक्सच्या दरम्यान कोणता अवयव कसा प्रतिसाद देतो हे नोंदवून ठेवण्यासाठी इसीजी मशीन, आणि काचेच्या अलीकडे हातात घड्याळ घेऊन मास्टर आणि जॉन्सन त्याचं निरीक्षण करणार. प्रत्यक्ष सेक्सच्या आधी सहभाग नोंदवायला आलेल्यांकडून काही उत्तरं नोंदवून घेतली जात असत. त्याची एक सविस्तर प्रश्नावली या दोघांनी तयार केली होती. त्यामध्ये लैंगिक पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न होते. साधारण पहिला अनुभव केव्हा आला, कसा आला, त्याला तुमची सहमती होती का, की सहमतीशिवाय झाला; इत्यादी.
वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर सेक्स करण्यासाठी या अभ्यासामध्ये सहभागींना सुचवण्यात आलं होतं, जेणेकरून वेगळ्या आणि अपरिचित अनुभवला शरीर कसं प्रतिसाद देतं हे पाहण्यासाठी. सुरवातीला कोणाबरोबरही सेक्सला तयार होऊ शकतील अशा फक्त वेश्याच होत्या. त्यामुळे या अभ्यासाचा सुरवातीचा भाग वेश्यांच्या सेक्सचं निरीक्षण करण्याचा होता. पण जसाजसा शब्द पसरत गेला आणि वॉशिंग्टन विद्यापीठाच्या चार भिंतींच्या आड असा एक विलक्षण अभ्यास सुरू आहे हे लोकांना कळायला लागलं तेव्हा सर्व प्रकारच्या पार्श्वभूमी असलेले लोकं सहभाग नोंदवण्यासाठी येऊ लागले.
५
त्यामध्ये काही प्रसंग चित्तथरारक आहेत. हा अभ्यास म्हणजे नेमका काय आहे, हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आलेल्या स्त्रिया आणि त्यांना आधीच्या प्रश्नावलीतील उत्तरं देण्यात निर्माण होणार्या समस्या, ऐकल्या की आपल्याला 50 च्या दशकातली अमेरिका कशी होती याचा अंदाज येतो. बायबलमधल्या कल्पनेप्रमाणे 6 महिने केवळ एकत्र झोपूनही मुलगा होत नाही, समलिंगी जाणीवा पुरेश्या विकसित न झाल्याने येणार्या समस्या. कित्येक मध्यमवयीन महिला अशा होत्या की ज्यांना एकदाही ऑरगॅझमचा अनुभवच आलेला नाही. ऑरगॅझम म्हणजे काय, असं विचारणार्याही महिला समोर येत होत्या. आपल्या साथीदाराचा स्टॅमिना पुरेसा वेळ टिकत नाही, ही समस्या तर खूप सामान्य होती. मुलींमध्ये सेक्सची सामान्यापेक्षा जास्त निर्माण होणारी इच्छा, त्याने निर्माण होणारी अनावश्यक गर्भधरणेची समस्या, त्याने स्वतः संपवण्यापर्यंत गेलेली मजल. जसं जमेल तसं, जसं पचेल तसं या सगळ्या समस्यांचं निराकरण करत मास्टर्स आणि जॉन्सन शरीराचा प्रतिसाद मोजत होते.
मास्टर्स आणि जॉन्सन यांचं पाहिलं पुस्तक 1966 साली प्रकाशित झालं. प्रकाशित झाल्याच्या दिवशी अमेरिकेत त्याच्या 15 हजार प्रती खपल्या होत्या, आणि पुढच्या सहा महिन्यात Human Sexual Response या पुस्तकाच्या अडीच लाख प्रती विकल्या गेल्या होत्या. या पुस्तकासाठी मास्टर्स आणि जॉन्सन यांनी एकून 700 लोकांच्या 10 हजार ऑरगॅझमच्या सायकल्सचं निरीक्षण केलं होतं. या सगळ्याची सविस्तर आकडेवारी त्यांच्या या पुस्तकात आहे. पण या प्रचंड मोठ्या माहितीच्या आधारे त्यांनी मांडलेला निष्कर्ष असा होता की, सेक्सला शरीराचा प्रतिसाद चार टप्प्यांमध्ये येतो. पहिली पातळी आहे ‘अराउजल’ किंवा एक्साईटमेंट फेज, म्हणजे शरीर सेक्सला तयार होणे. दुसरी ‘प्लाटू’ फेज. तिसरी प्रत्यक्ष ‘ऑरगॅझम’ आणि चौथी ‘रेसोल्यूशन’. सेक्स करणार्या माणसाची शाररिक पार्श्वभूमी कितीही भिन्न असली तरी त्याचा सेक्स याच चार टप्प्यांतूनच प्रवास करतो. हे चार टप्पे म्हणजे शरिराच्या प्रतिसादाचा वैज्ञानिक आलेख आहे.
मास्टर्स आणि जॉन्सनच्या अभ्यासातून आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे स्त्री ही मल्टीऑरगॅझमिक असते. हे समजून घेण्यासाठी थोडं अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे. ऑरगॅझम हा सेक्समधला सर्वोच्च टप्पा असतो. सेक्सचा ग्राफ ‘एक्साईटमेंट’ या फेजपाशी सुरू होतो, तो वाढत वाढत ऑरगॅझमपर्यंत वर जातो आणि नंतर खाली उतरतो. ऑरगॅझमच्या वेळी सर्व शरीराचा प्रतिसाद हा टोकाचा, आक्रमक असतो. केवळ हृदयाचे ठोके वाढलेले असतात असं नव्हे, तर गळ्याचे स्नायू, पायाचे स्नायू, पाठीचे स्नायू सगळेच त्याच्या परमोच्च टोकाला असतात. सेक्सच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते पुन्हा हळूहळू पूर्वपदाला येतात. पूर्वपदाला येण्याचा प्रवास सुद्धा काही सेकंद किंवा एखादं मिनिटभर सुरू असतो. पुरुषाला ऑरगॅझमचा अनुभव घेण्यासाठी या चार टप्प्यांतून प्रवास करावा लागतो, पण स्त्रीला मात्र रेसोल्युशनच्या फेजमध्ये पाच ते आठ सेकंद थांबून पुन्हा एकदा ऑरगॅझमची फेज गाठता येते. पुरुषाप्रमाणे तिला रेसोल्युशन नंतर पुन्हा एक्साईटमेंटच्या फेजला यावं लागत नाही. आणि असं स्त्री एक्साईटमेंटच्या फेजला न येता 5-6 वेळा सुद्धा ऑरगॅझमच्या फेजला जाऊन येऊ शकते. यामुळेच तिला पुरुषाशिवाय सेक्सचा संपूर्ण अनुभव घेता येतो. (या दोन्हींचे ग्राफ दाखवले आहेत. ते दोन्ही ग्राफ मास्टर्स आणि जॉन्सनच्या मूळ पुस्तकातले आहेत.)
प्रत्यक्ष निरीक्षण आणि शरीराला जोडलेल्या वायर्स यांच्या आधारे मास्टर्स आणि जॉन्सन यांनी पुरुषजातीला हादरवून टाकणारे निष्कर्ष काढले. ‘आकारा’मुळे फार फरक पडत नाही, हा असाच एक निष्कर्श. स्त्रीची क्षमता बाळाचं डोकं सामावून घेण्याइतकी असते, तिथे पुरुषाच्या विशिष्ट अवयवाचा आकार कितीही मोठा असला तरी फरक पडत नाही. पुरुष जितका आकार त्यात टाकेल तितका आनंदाने सामावून घेण्याची क्षमता स्त्रीची असते, हे मास्टर्स आणि जॉन्सन यांनी अभ्यासाअंती मांडलं. आपल्या साथीदाराचा स्टॅमिना अपुरा पडतो, ही स्त्रियांची खूप मोठी समस्या आहे. शिवाय सेक्समध्ये राम उरला नाही, अशी सुद्धा मानसिक अवस्था येऊ शकते. मास्टरचं एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं होतं, तो म्हणाला होता की, ‘इंटरेस्ट असेल आणि इंटरेस्टिंग पार्टनर असेल तर वयाच्या नव्वदीपर्यंत ही सेक्स करता येतो.’ पण इंटरेस्ट आणि इंटरेस्टिंग हे दोन शब्द अत्यंत मोलाचे आहेत. मास्टरला स्वतःला वंध्यत्वाची समस्या पुढे निर्माण होते. ती निवारण्यासाठी म्हणून मास्टर्स आणि जॉन्सन स्वतःवर काही प्रयोग करतात. आधीच्याही सगळ्या अभ्यासात त्यांनी प्रत्यक्ष सेक्स करून हे निष्कर्ष स्वतः सिद्ध करून पहिले होतेच. पण मास्टरच्या वंध्यत्त्वाची समस्या सोडवण्यासाठी ते स्वतःजे प्रयोग करतात ते विलक्षण आहेत. त्यातून सिद्ध झालेल्या पद्धती वापरून अमेरिकेतील अनेक जोडपी सुखी आयुष्य जगू शकली आहेत. त्या दोन आठवड्याच्या थेरपीमध्ये केले जाणारे उपाय त्यातून पुरुषाचा वाढत जाणारा इंटरेस्ट आणि अंतिमतः दूर होणारं वंध्यत्त्व, हे सगळं विलक्षण होतं.
जॉन्सनचं अगदी सुरवातीपासून हे ठाम मत होतं की, यशस्वी वैवाहिक आयुष्य जगायचं असेल तर नवरा-बायकोमध्ये समाधानी सेक्स असला पाहिजे. भारतामध्ये या विषयाचा टॅबूच आहे, हे जाणीवेच्या कक्षेत आलं नाही तरी नेणीवेच्या पातळीला बदल होत असतात. विवाहातला किंवा आयुष्यातला सेक्स जर व्यवस्थित नसेल तर माणूस रागीट होतो, निराश होतो, मनावर अनावश्यक ताण घेऊन वावरतो. जाणीव नसल्यामुळे असं वाटू शकतं की याला अन्य कारणं आहेत, पण समाधानी सेक्स नाही हे यामागचं खूप महत्त्वाचं कारण आहे. आणि आता हे मास्टर्स आणि जॉन्सनपासून अनेक मानसशास्त्रज्ञांनीही सिद्ध केलेलं आहे.
मास्टर्स आणि जॉन्सन यांनी सुखी वैवाहिक जीवनासाठी हा अभ्यास किती मोलाचा आहे, हे कायम मांडलं. त्यांनी आपल्या कामाचा, अभ्यासाचा फोकस कायम वैवाहिक आयुष्य अजून सुखी, आनंदी, समाधानी कसं करता येईल, असा ठेवला. मास्टर्स आणि जॉन्सनचा अभ्यास विकृत आहे, असा आरोप करून त्यांना वॉशिंग्टन विद्यापीठातून हाकलून देण्यात आलं. मग त्या दोघांनी स्वतःची संस्था उभी करून हा अभ्यास पूर्ण केला, प्रकाशित केला, प्रसिद्धीचं सर्वोच्च टोक म्हणजे मास्टर्स आणि जॉन्सन यांना ‘टाईम’ मासिकाच्या कव्हरवर फोटो आला, आणि एक दीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यानंतर आपली चूक लक्षात येऊन वॉशिंग्टन विद्यापीठात त्यांना एका व्याख्यानासाठी पाचारण करण्यात आलं. व्याख्यान झाल्यावर एका श्रोत्याने मास्टरला प्रश्न विचारला की, “”Human sexual response या पुस्तकात Love, प्रेम हा शब्द एकदाही आलेला नाही, तुम्ही सेक्स आणि प्रेम वेगळं काढू इच्छिता का?” मास्टर त्यावर उत्तर देताना न्यूटन आणि गुरुत्वाकर्षणाचं उदाहरण देतो. न्यूटनच्या आधीसुद्धा गुरुत्वाकर्षण होतंच. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला नाही, गुरुत्वाकर्षणाच्या बलाचं गणित न्यूटनने शोधून काढलं. त्याप्रमाणे प्रेम आहेच, ते व्यक्त करण्याचं एक महत्त्वाचं मध्यम सेक्स आहे, आम्ही त्याचं गणित शोधायचा प्रयत्न करतो आहोत. मास्टर्स आणि जॉन्सन यांचं सगळं ज्ञान हे अनुभवावर आधारित होतं. त्यामुळे त्यात खरेपणा होता.
६
मास्टरचं व्हर्जिनियावर खूप प्रेम होतं. पण मास्टरचं लग्न झालेलं होतं. त्याला मान्य नसतानाही त्याला दोन मुलं असतात. पण मास्टर्सनी त्याचं व्हर्जिनियावरचं प्रेम आपल्या मनात 20 पेक्षा जास्त काळ जपून ठेवलं. 1971 साली आधीच्या बायकोला घटस्फोट देऊन मास्टर्सनी व्हर्जिनियाशी लग्न केलं. मास्टर्सची आधीची बायको, लिबी, तिला मास्टर्सच्या कामापेक्षा कुटुंब, घर, मुलं, संसार यात जास्त रस होता. मास्टर्स कामावर इतर कशाहीपेक्षा जास्त प्रेम करणारा होता. पण त्याचं लिबीवर प्रेम असतं. पण कामावर प्रेम करणारी, आग्रही असणारी, महत्त्वाकांक्षी असणारी स्त्री आयुष्यात आली तेव्हा मास्टर कौटुंबिक जाळ्यात अडकला. त्याचं व्हर्जिनियावर प्रेम तो व्यक्त करू शकत नाही, आणि लिबीवर तसं प्रेम करता येत नाही, या स्थितीमध्ये मास्टरनी वीस वर्षं काढली.
आयुष्यातले चढउतार मास्टर्सच्याही आयुष्यात होते. पण हा सगळा अभ्यासाचा डोंगर या दोघांनी मिळून उभा केला कारण व्हर्जिनिया होती. व्हर्जिनिया नसती तर एकतर हा अभ्यास अपूर्ण रहिला असता. एकांगी राहिला असता. मास्टर्स अंतर्मुख स्वभावाचा होता. माणसांचा सहवास त्याला अप्रिय होता. किंवा एकांतात, आपल्या जवळच्या माणसाशी बोलण्यात, वेळ घालवण्यात त्याला बरं वाटे. व्हर्जिनिया तशी नव्हती. ती गप्पिष्ट होती. लोकांशी बोलायची, आणि लोकांना बोलतं करायची त्याच्याकडे खास जादू होती. अनेक अवघडलेपण निर्माण करणारे प्रश्न त्यांच्या प्रश्नावलीमध्ये होते, पण त्यांची उत्तरं देताना लोकांना कधी अवघडलेपण वाटलं नाही कारण समोर व्हर्जिनिया होती. मास्टर्सनी या अभ्यासाचा प्रस्ताव जेव्हा विद्यापीठाच्या कमिटीसमोर ठेवला तेव्हा त्याचं आणि व्हर्जिनियाचं भांडण झालेलं होतं. पण तरीसुद्धा तिचं अभ्यासातलं योगदान लक्षात घेऊन मास्टर्सनी तिचं नाव सहसंशोधक म्हणून त्या प्रस्तावावर घातलं होतं.
चाळीस वर्ष मास्टर्स आणि जॉन्सन माणसाच्या लैंगिक व्यवहारांचा अभ्यास करत होते. चाळीस वर्षात पारंपरिक रूढी आणि समजुतींना तडे देण्याचं काम मास्टर्स आणि जॉन्सन यांनी केलं. ते समलिंगी संबंधांवर बोलले, लैंगिक मर्यादांवर बोलले, लैंगिक समस्या निवारणासाठी त्यांनी स्वतःच्या अनुभवातून उपचारपद्धती शोधून काढली. 1966 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या पहिल्या पुस्तकाने अमेरिकेत सुरू असलेल्या लैंगिक क्रांतीला प्रचंड इंधन मिळालं. मास्टर्स आणि जॉन्सन यांच्या अभ्यासाच्या दरम्यानच अमेरिकेत मार्गारेट सँगर या डॉक्टरने संततिनियमनचं एक उपकरण शोधून काढलं होतं. तिच्या त्या उपकरणाने आणि मास्टर्स आणि जॉन्सनच्या अभ्यासाने सेक्स हा आयुष्यभर भोगावा लागेल असा परिणाम न होऊ देता करण्यासारखा आहे, हे ही अमेरिकेला लक्षात आलं. सेक्स म्हणजे आपत्य हे समीकरण मोडलं. सेक्सचा आनंद घेता येतो. तो अनुभवसंपन्न असू शकतो, तो जास्तीतजास्त वैविध्यपूर्ण व्हावा म्हणून प्रयत्न करता येऊ शकतात, या सगळ्याची जाणीव अमेरिकेला आणि नंतर जगाला होत गेली. यांच्यापूर्वी सुद्धा लोकं असा सेक्स करत होतेच, पण आता त्याला अनैतिक म्हणण्याची काही गरज नाही, हे लोकांना लक्षात आलं. मास्टर्स आणि जॉन्सन यांचं सर्वात मोठं योगदान त्यामुळे हे आहे की, सेक्स ही शाररीक क्रिया आहे, त्यात भावना मोलाच्या आहेतच, पण भावनांशिवायही तो सेक्स करता येतो हे त्यांनी जगाला शिकवलं. तोपर्यंत प्राणीसदृश्य होणार्या सेक्सला त्यांनी मानवीय पातळीवर आणलं. ज्याच्या पुस्तकावर ही मास्टर्स ऑफ सेक्स ही मालिका तयार झाली त्याने आणि अमेरिकेतल्या अनेकांनी या दोघांचं वर्णन ‘अमेरिकेला प्रेम कसं करावं हे शिकवणारे दोघंजणं’ असं केलं आहे. हास्य हे मनाच्या मोकळेपणाचं लक्षण आहे, सेक्स हे शरीराचं हास्य आहे, ते शरीराला आपण मिळवून दिलं पाहिजे, हे अमेरिकेला पटवून सांगितलं मास्टर्स आणि जॉन्सन यांनी. जशी भूक, झोप या शरीराच्या गरजा आहेत, तसंच निरोगी, आनंदी, समाधानी आयुष्यासाठी शरीराचं हास्य तितकंच मोलाचं आहे. ते नाकारण्यामध्ये काहीही हाशील नाही.
No comments:
Post a Comment