बारावीनंतर आयुष्याला वेगळं वळण लागत होतं. बारावी सायन्स सोडून मुद्दाम आर्ट्सला प्रवेश घेतला वगैरे. त्यामुळे जुने मित्र, जुन्या सवयी असं सगळंच बदलत होतं. ट्रेकिंगचं सवय मात्र तशीच होती. नवीन मित्र झाले आणि मित्र झाले याची कारणंच समान आवडीनिवडीत होती. एकूण ओळखी झाल्याच्या पंधरा दिवसांतच ट्रेकचं नियोजन ठरलं. पहिली सेमिस्टर संपत होती. सेमिस्टरनंतर दिवाळीच्या सुट्ट्या. तेव्हा सुट्ट्यांच्या आधी एका मुक्कामाचा ट्रेक करून येऊन सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं, असं ठरवून आम्ही ‘राजगड’चं नियोजन केलं.
आम्ही महाराष्ट्राच्या सहा दिशांचे सहा जण होतो. एक होता चंद्रपूरचा, एक होता यवतमाळचा, एक होता कोल्हापूर, अहमदनगरचा एक होता अलीबागचा आणि पुण्याचा मी. चंद्रपूरच्या आणि यवतमाळच्या मित्रांची ट्रेकिंगची पार्श्वभूमीच नव्हती. कोल्हापूरचा मित्र एखाद-दुसऱ्या ट्रेकला पूर्वी गेला असेल. एकूण आमच्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेक केलेला असा मीच होतो. आणि माझी तेव्हाची ट्रेकिंगचा काउंट २० च्या पुढे गेला नसता. असा अनुभव संपन्न लीडर आमच्याग्रुपला मिळालेला होता. राजगड हा माझ्याही आवडीचा ट्रेक आणि सगळे बिगीनर ट्रेकर्स लोहगड, सिंहगड, रायगड, राजगड, तोरणा हेच किल्ले पहिले निवडतात. मी राजगडला या ट्रेकपूर्वी चार-पाच वेळा तरी गेलेला होतो. त्यामुळे राजगडवर जाण्याच्या दोन वाटा मला अगदी व्यवस्थित माहिती होत्या. शिवाय ज्या मार्गाने कोणी फारसे जात नाहीत, पण वाटा आहेत अशा सुद्धा एक-दोन वाटा मला इकडचं तिकडचं वाचून, ऐकून माहिती होत्या. आम्ही ट्रेकिंगमध्येही बिगीनर आणि सगळेच बॅचलर, त्यामुळे कमीतकमी खर्चात ट्रेक झाला पाहिजे अशीच तयारी. आम्ही एसटीने, घरून डबे घेऊन स्वारगेटला जमा झालो.
माझ्यालेखी जो माणूस दुसऱ्या माणसासमोर मोकळेपणाने शिव्या देऊ शकेल आणि समोरच्याला त्या शिव्यांच काही वाटणार नाही असे संबंध तयार होतील त्याला मैत्री म्हणायची, असं होतं. आमच्या सहा जणांच्या एकमेकांशी तेव्हढ्याही ओळखी नव्हत्या. एका क्लासला आम्ही एकत्र होतो. सगळेच स्पर्धा परिक्षांसाठी पुण्यात आलेले, एवढंच आमच्यात समान होतं. आम्ही एकमेकांसमोर तोपर्यंत कधी शिव्या दिलेल्या नव्हत्या. अजून एकमेकांची सिक्रेट्स आम्हाला माहिती नव्हती. तसं बरंचस कळायचं होतं. त्याच्याआधी आम्ही क्लासचा एकत्र ट्रेक केला होता, पण तेव्हा क्लासमधली सगळी मुलं एकत्र होती. त्यामुळे त्या ट्रेकला मैत्री होण्याच्या संदर्भात तसा काही अर्थ नव्हता, कारण सगळे जण अजून आपपल्या कम्फर्टझोन होते. हा राजगडचा ट्रेक त्यामानाने फक्त ६ जणांचा आणि म्हणून जास्त स्पेसिफिक होता. असे लहान ट्रेक या दृष्टीने महत्त्वाचे असतात.
राजगड असा पसरलेला आहे. पद्मावती मंदिराच्या बाजूला जी पायवाट दिसते आहे त्यावरून शक्यतो ट्रेकर्स जातात. ती पायवाट गुंजवणे गावात उतरते. |
ट्रेकिंगमध्ये बिगीनर असल्यामुळे अवजड आणि बेढब आकाराच्या बॅगा त्यामध्ये किल्ल्यावर जाऊन मॅगी बनवायची म्हणून घेतलेलं सामान. झोपायची व्यवस्था. पाण्याच्या मोठ्या मोठ्या बाटल्या. पायात जीन्स, अंगात हाफ स्लीव्हचा टीशर्त असल्या वेशात आम्ही राजगड चढायला निघालो होतो. सकाळच्या एसटीने गुंजवणे गाठून आम्ही चढायला सुरवात केली. जे सगळ्या हौशी ट्रेकर्सचं होतं तेच आमचं पण सुरु झालं. गप्पा. कोणी कोरडी भेळ बरोबर आणलेली, कोणी काही कोणी काही. मग भेळ खाल्ली म्हणून पाणी प्यायला थांबलं पाहिजे वगैरे. असे सगळे सोपोस्कार करत अगदी निवांत आम्ही किल्ला चढत होतो. तसे दिवस थंडीचे होते, त्यामुळे सकाळचा उन्हाचा तडाख बसत नव्हता. महिना-पंधरा दिवसांच्या ओळखीमध्ये मग एखाद्याला आवडणारी अमुक मुलगी त्याचे किस्से वगैरे सांगणं सुरू होतं. मला सुद्धा बाबांनी प्रथमच डिजिटल कॅमेरा घेऊन जायला परवानगी दिली होती, त्यामुळे फोटो काढत, आलेला फोटो व्यवस्थित नाही, जास्त ब्लर झाला, जास्त झूम झाला वगैरे सगळे समान्य सोपोस्कार सुरु होते.
राजगडला जे कोण कोण गेले असतील त्यांना माहिती असेल की सामान्यतः दोन वाटांनी ट्रेकर्स किल्ल्यावर जातात. एक चोर दरवाजा, आणि दुसरा पाली दरवाजा. चोर दरवाजा गुंजवणे गावात उतरून चढायला सुरवात केली तर लागतो. पाली दरवाज्यासाठी भोसलेवाडी मार्गे यावं लागतं. पण एसटीने जाणारे शक्यतो गुंजवण्यात उतरून चोर दरवाज्यानेच जातात. गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत भोरच्या भाटघर धरणामधून नावेतून काही प्रवास करून सुवेळा माचीवरून किल्ल्यात प्रवेश करता येतो असंही लिहिलं आहे. आणि गोनीदा तसे गेलेले आहेत. हे मी वाचलेलं होतं. पण या सगळ्यातला सर्वात सोप्पा पण वेळखाऊ रस्ता चोर दरवाज्याचाच. आम्ही मजलदरमजल करीत साधारण दुपारच्या बारा-सव्वाबाराच्या दरम्यान चोर दरवाज्यापासून पंधरा मिनीटांवर पोहोचलो. जिथून थोडे अवघड टप्पे सुरू होतात असा तो भाग पार केला की चोर दरवाज्यच्या छोट्या खिडकीतून पद्मावती तलावाच्या बाजूने वर जायचं, इतका सोप्पा रस्ता शिल्लक राहिला होता. बाकीचे सगळे आपापल्या गप्पांत, चेष्टेत गुंतले होते. कोणाचं काही खाणं सुरू होतं. आणि त्या ठिकाणापर्यंत आम्ही सगळे येऊन पोहोचलो. माझ्या डोक्यात मात्र राजगड किल्ल्याचा एक फोटो सतत येत होता. तो फोटो उद्धव ठाकरे यांनी आपल्या ‘महाराष्ट्र देशा’ या पुस्तकात दिलेला आहे. आम्ही उभे होतो तिथून काही अंतरावर किल्ल्यात जायचा एक दरवाजा आहे असं मला त्या फोटोमध्ये पहिल्याचं आठवत होतं.
पद्मावती मंदिर, त्याच्या बाजूला असलेला पद्मावती तलाव आणि त्याला लागून असणारा चोर दरवाजा. निळी लाईन म्हणजे आम्ही वाट बदलून ज्या वाटेने गेलो ती वाट. आणि लाल 'यु' म्हणजे गुंजवणे दरवाजा. |
माझ्याशिवाय बाकीचे अगदी पहिल्यांदाक राजगडवर येत होते त्यामुळे तो रस्ता आणि दरवाजा कोणालाही माहिती असणं शक्यच नव्हतं. आणि मलाही तो रस्ता केवळ ‘महाराष्ट्र देशा’ या पुस्तकात पाहूनच माहिती होता. एरवी कोणाच्या बोलण्यात त्या दरवाज्याचा उल्लेख नव्हता की कोणाच्या लेखनातला माझ्या वाचनात आला नव्हता. चोर दरवाजा नेमका कुठे आहे याची इतर कोणालाही कल्पना न देता म्हणालो, की आपल्याला आज थोड्या वेगळ्या रस्त्याने जायचं आहे.
आणि आम्ही रस्ता बदलला. जिथून केवळ पंधरा मिनिटांवर चोर दरवाजा होता तो रस्ता बदलून आम्ही डावीकडे वळलो. कोणाच्याही बोलण्यात न आलेला, मी काहीही न वाचलेला, काहीही न गेलेला रस्ता पाहण्यासाठी आम्ही निघालो. आणि सुमारे सव्वाबारा वाजता आम्ही त्या वाटेने जायला सुरवात केली. प्रचंड वाढलेलं गवत, खास जळण म्हणून ती आखूड झाडं, जी सगळ्या किल्ल्यांवर विपुल प्रमाणत असतात ती झाडं. अजून ती तशी हिरवी होती. कारण पावसाला नुकताच संपला होता. असा तो अनोळखी रस्ता पार करत आम्ही चाललो होतो. आता उजव्या हाताला किल्ला आणि डाव्या हाताला किमान दिड हजार फूट दरी, अशा त्या वाटेने आम्ही चाललो होतो. उजव्या हाताचा किल्ला डोळ्यांना दिसत होता, पण त्यात शिरायचा रस्ता अजून खूप पुढे होता. नेमक्या ज्या ठिकाणाहून आम्ही आमचा रस्ता बदलला त्या ठिकाणाहून तो दरवाजा दिसत होता. पण तिथून वेळेचा आणि अंतराचा अंदाज मला आलेला नव्हता. बाकीच्यांना यायचा प्रश्नच नव्हता. शिवाय त्या वाटेने कोणी नियमित जात नसल्यामुळे ती वाट रुळलेलीही नव्हती. म्हणजे आम्हाला माहित नसलेली वाट शोधात जायचं होतं. आणि धेय्य अंधुकस आठवत होतं. पण सुरवातीचा तासभर तरी याचं कशाचाही गांभीर्य मी माझ्याशिवाय इतर कोणालाही कळू दिलेलं नव्हतं. पण उजव्या हाताला किल्ला दिसतोय आणि आता गेले अडीच-तीन तास आपण चालतो आहोत. राजगड कोणत्याही वाटेने गेलो तरी इतका वेळ लागत नाही, एवढी माहिती सगळ्यांनाच होती. तासभराच्या पायपीटीनंतर एकेकाला शंका यायला लागली. मग विचारणा सुरू झाली. मग मी एकेकाका माझं नियोजन सांगू लागलो.
शेवटी, पाच-सव्वापाचच्या दरम्यान आमच्यापैकी एकाला बांधून काढलेला पायऱ्या दिसल्या. त्या पायऱ्या जिथे संपत होत्या तिथे पूर्ण बांधून काढलेला दरवाजा होता. आम्ही त्या दरवाज्याच्या बाजूला बुरुज असतात त्यावर जाऊन बसलो. रेंज मिळेल तसे सगळ्यांनी आपापल्या घरी फोन केले. जो रस्ता पार करायला केवळ पंधरा मिनिटं लागणार होती, तो पार करायला आम्ही पाच तास लावले. ते पाच तास अतिशय रोमांचक होते एवढं मात्र नक्की. त्या पाच तासात आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. आमच्यापैकी प्रत्येकजण शिव्या देऊ शकतो, हे आम्हाला सगळ्यांना त्या पाच तासांत कळलं. तो रस्ता इतका बिकट होता, की त्याला तसा रस्ता म्हणणं ही चुकीचच होईल. गुढग्याएवढं वाढलेलं आणि पिवळं पडलेलं गवत एका हातात धरायचं आणि पुढे पाऊल टाकायचं अशी कसरत आम्ही खूप वेळ केली. आम्ही जे हलके होतो ते तेवढ्या आधारावर सहज पुढे जाऊ शकत होतो. पण एक मित्र जो तसा नव्हता त्याला मात्र फार त्रास झाला. त्याने मला फार शिव्या दिल्या. यानेच आम्ही त्या दरवाज्याजवळ पोहोचल्यावर त्याच्या आईला फोन करून सुखरूप असल्याचं कळवलं होतं. एका ठिकाणी मात्र या सगळ्याचा कहर झाला. असं गवत धरून पुढे जाताना त्याच्या पायाखालून एक मोठा दगड सुटला. तो त्या दगडावरून सुखरूपपणे पुढे गेला, पण तो जो दगड सुटला तो पुढे किमान चाळीस-पन्नास सेकंद आम्हाला ऐकू येत होता. सगळ्यांच्या डोक्यात एक विचार एका वेळेला येऊन गेला. दगडाच्या ऐवजी आपण असतो तर… तिथून पुढे एक कोरडा पडलेला धबधबा होता. तिथे बसून आम्ही कोरडी भेळ खात होतो तेव्हा तो म्हणाला की, ‘मी इथेच राहतो आज. उद्या खाली जाताना तुम्ही मला घेऊन जा. इथून पुढे माझ्याच्याने येणं होणार नाही.’ पण तसं काही झालं नाही. तो पुढे आलाच.
इथे आहे तो गुंजवणे दरवाजा. उद्धव ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र देशा' पुस्तकातील फोटो. |
या दरवाज्याचं नाव आहे 'गुंजवणे दरवाजा.' चोर दरवाजा नावाप्रमाणेच किल्ल्याचा मुख्य दरवाजा नाही. तसे अनेक चोर दरवाजे सुवेळा आणि संजीवनी माचीवर आहेत. पण ते मुख्य दरवाजे नाहीत. मुख्य दरवाजा म्हणजे भोसले वाडीतून वर लागणारा पाली दरवाजा आणि गुंजवणे गावातून येणारा म्हणून गुंजवणे दरवाजा. अनेकांना गुंजवणे दरवाजा म्हणून चोर दरवाजाच डोळ्यासमोर येतो. पण बालेकिल्ल्याच्या दरवाज्याच्या बरोबर खाली हा दरवाजा आहे. पद्मावती माचीकडून सुवेळा माचीकडे जाताना जो रस्ता लागतो त्या रस्त्यावर पण वात सोडून थोडा खाली हा दरवाजा आहे. अनेक वर्षं खूप तुरळक वर्दळ असल्यामुळे तो जाण्यासाठी अवघड बनला आहे. झाडी आणि झुडपं खूप वाढली आहेत. दरवाज्यात गाळ खूप साठला आहे.
ट्रेकिंग ही पेशन्सची परीक्षा असते. आणि असे ट्रेक तर हमखास तुमचे पेशन्स वाढवतात. ट्रेकच्या त्या चार-पाच तासात आम्हाला आमच्या सगळ्यांच्या पुरेपूर ओळखी झाल्या. आयुष्याभर सांगण्यासाठी एक अफलातून किस्सा झाला. या ट्रेकमध्ये तसे खूप किस्से घडले.
पण बाकीचं फिरणं तसं नेहमीचच होतं.
No comments:
Post a Comment