Wednesday, 15 July 2020

'केशवराज'च्या मंदिरातली रम्य (?) रात्र!



आदल्या रात्री संगमेश्वराच्या त्या प्राचीन मंदिरात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. जो कार्यक्रम ऐकण्यासाठी मी किमान दोन-तीन महिने नियोजन करत होतो तो मी कसाबसा दहा-पंधरा मिनिटं ऐकला आणि तिथेच झोपून गेलो. देवरुखच्या ज्या मित्राकडे मी मुक्कामाला जाणार होतो त्याने मग मला उठवलं, आणि त्याच्या कारमध्ये नेऊन झोपवलं. माझ्या चेहेऱ्यावरून लक्षात येत होतं की मी किती दमलो होतो. रात्री साडे अकराच्या दरम्यान कार्यक्रम संपला. पुण्यातून निघताना मी नियोजन असं केलं होतं की, देवरुखला मुक्काम करायचा आणि सकाळी लवकर उठून दापोलीला जायचं. दापोलीच्या आसपासची जवळजवळ पाच-सहा ठिकाणं मी पहायची असं ठरवून गेलो होतो. पण आदल्या दिवशीच्या प्रचंड दमणूकीमुळे मी सकाळी लवकर उठूच शकलो नाही. झोप पूर्ण होऊन उठायलाच मला साडेनऊ वाजले. मित्राच्याही घरी प्रथमच गेलो होतो त्यामुळे लगेच निघणंही शक्य नव्हतं. थोडं उशिरा दापोलीसाठी निघू असं मनातच मी ठरवलं. त्याच्या घरीच नाश्ता करून नियोजित वेळेपेक्षा बराच उशिरामी देवरुखहून निघालो. माझी गाडी संगमेश्वरलाच होती. मग मित्राबरोबर त्याच्या गाडीवरून मी संगमेश्वरला आलो, तिथून तो परत गेला मी पुढे निघालो. 

संगमेश्वर ते दापोली अंतर जवळजवळ शंभर किलोमीटरचं होतं. मी संगमेश्वरहूनच इतक्या उशिरा निघालो की ठरवलेल्या पाच-सहा ठिकाणांपैकी एखादं जरी पाहून झालं तरी मी खुश झालो असतो. पण खेडलाच पोहोचायला दोन-अडीच झाले होते बहुतेक. अनेक वर्षांपूर्वी मी एकदा दापोलीला आई-बाबांबरोबर आलो होतो. त्यावेळी हर्णे, कर्दे, आंजर्ले, कड्यावरचा गणपती, हर्णे किल्ला वगैरे परिसर पहिला होता. पण तो मला अजिबात आठवत नव्हता. शिवाय त्यावेळी आम्ही कारने गेलो होतो आणि ज्यावेळी आपण ड्राईव्ह करत नसतो त्यावेळी रस्त्यांकडे आपलं शक्यतो लक्ष जात नाही. कोणतीकोणती गावं आपण पार करतो आहोत. रस्ते कसे आहेत, हॉटेल्स वगैरे आहेत का नाही याचं भान आपण जर गाडी चालवत नसू तर आपल्याला येत नाही. त्यामुळे मी स्वतः गाडी चालवत या भागांत प्रथमच फिरत होतो. गेल्या खेपेला काय काय पाहिलं होतं हे पूर्णतः विस्मृतीत गेलं होतं. ते एका अर्थी बरंही होतं. फार वेळ न लावता मी थेट आधी प्रथम कोळथरेला जायचं ठरवलं. या किनाऱ्यांची मी फक्त नावं ऐकून होतो. दापोलीहून कोळथरेला जाण्याच्या वाटेवर अनेक ठिकाणं होती, जी तिथेजाईपर्यंत मला माहिती नव्हती. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘बुरोंडी’ हे गाव. माझ्या कोकणाबद्दलच्या सगळ्या कल्पना या प्रत्यक्ष त्या भागात फिरून कमी आणि वाचलेल्या पुस्तकांतून अधिक तयार झाल्या आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे लेखक म्हणजे श्री. ना. पेंडसे. ‘दापोली’ आणि परिसर म्हणजे पेंडसे यांचा हक्काचा परिसर. पेंडस्यांच्या कितीतरी कादंबऱ्या या भागाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आहेत. गारंबीचा बापू, राधा, यशोदा, रथचक्र, तुंबडचे खोत, हद्दपार. या सगळ्या कादंबऱ्यात दापोली, गारंबी, आसूद, बुरोंडी, खेड, दाभोळ ही नावं सतत येत असतात. ते मी पुस्तकात अनेकदा वाचलं होतं. पण ‘कोळथरे’ला जाताता प्रत्यक्ष ‘बुरोंडी’ गावाची पाटी मी वाचली तेव्हा या सगळ्या कादंबऱ्या, त्यातली या गावाच्या अवतीभोवती घडलेले प्रसंग, व्यक्ती माझ्या नजरे समोरून तरळून गेल्या. 

बुरोंडीमध्ये फिरताना मला जाणीव झाली की हा सगळा तोच परिसर आहे, ही तीच माती आहे जिच्यातून पेंडसे यांनी अनेक मौल्यवान रत्न शोधून काढली आहेत. ‘तुंबाड’सुद्धा बुरोंडीपासून फार लांब नाही. पण माझ्या दिवसाच्या गणितात ‘तुंबाड’ बसू शकलं नसतं. दापोलीमध्ये एका दिवसचा मुक्काम करून मला लगेच पुण्याला निघायचं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा निवांत वेळ काढून या भागांत येण्याचा निश्चय करून मी निघालो. ते ‘कोळथरे’ला पोहोचलो. संपूर्ण किनाऱ्यावर मी एकटाच! निवांत काही वेळ तिथे फिरलो. अजून संध्याकाळ झाली नव्हती. ऊन अजून तसं तीव्र होतं. कोळथरेहून निघालो, लाटघरला आलो. तिथेही तसंच. निरवतेचीही भीती वाटावी इतकी शांतता. तिथे काही वेळ थांबलो. परत येताना तामसतीर्थ म्हणून एक अफलातून ठिकाण आहे. पृथ्वीवर उभ्या असलेल्या परशुरामाची एक विशाल मूर्ती तिथे आहे. त्याच्या आसपास प्रचंड जंगल आहे. एकूणच परिसर खूप रम्य आहे. 

परत येताना पुन्हा एकदा बुरोंडीमध्ये थांबलो. काही फोटो काढले. दरम्यान मध्ये कुठेतरी थांबून वडापाव-मिसळ असं काही तरी खाल्लं. कारण माझ्या डोक्यात जिथे मुक्काम करायचा अशी कल्पना तयार होत होती तिथे खायला काहीही मिळणार नाही हे मला माहिती होतं. पुण्यातून निघताना काय काय बघायचं अशी जी यादी मी तयार केली होती त्यात दापोलीपासून जवळ असलेल्या पन्हाळेकाजीच्या लेणी होत्या, असूद म्हणजे गारंबी हे गाव होतं. गारंबीमध्ये अनेकदा उल्लेख असलेलं व्याघ्रेश्वराचं प्राचीन मंदीर होतं आणि ‘केशवराजा’चं मंदिर होतं. त्यापैकी पन्हाळेकाजीच्या लेणी दापोलीपासून पंचवीसएक किलोमीटर लांब होत्या. आणि कोळथरे, तमासतीर्थ, लाटघर वगैरे पाहून परत दापोलीपर्यंत यायला बराच वेळ लागला. अंधार पडलेला होता. आणि आदल्या दिवशी मला वाटतं पाऊसही पडून गेलेला होता. त्यामुळे वातावरणात गारठा होता. म्हणून मी विचार केला की आता अजून पंचवीस किलोमीटरचा प्रवास करायचा आणि मानवी वस्तीपासून लांब असलेल्या पन्हाळेकाजीच्या लेणींत मुक्काम करायचा म्हणजे खूपच रिक्सी होती. मानवी वस्तीपासून खूप लांब गेल्यावर काय होतं हे मी कालच्याच रात्री चांगलंच अनुभवलं होतं. शिवाय लेणीत रात्री मुक्कम करायची कल्पना अगदीच नवीन आणि out of the blue नव्हती. राजमाचीच्या पलीकडे कर्जतच्या दिशेला असलेल्या कोंडणेच्या लेणींमध्ये मी अनेकदा मुक्काम केलेला आहे. एक-दोन वेळेला तर तुफान पावसातही भिजत भिजत रात्रीच्या वेळी लेणीत पोहोचून तिथे झोपलो आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने ती बाब फार धोकादायक नव्हती. शिवाय लेणींत झोपण्याचा अनुभव असल्यामुळे यावेळी मी विचार केला की या वेळी काहीतरी नवीन करू. जर मुक्काम पन्हाळेकाजीमध्ये करायचा नसेल तर दुसरा पर्याय माझ्यामनात होता तो केशवराज मंदिराचा. 

पुण्यातून निघताना मी ज्या ज्या ठिकाणांची यादी केली होती त्यातलं एकही ठिकाण मी याच्यापूर्वी पाहिलेलं नव्हतं. तमासतीर्थ किंवा लाटघरचे मी किमान फोटोतरी पाहिलेले होते. पण ‘केशवराज’ आणि असूद जवळचा व्याघ्रेश्र्वर यांची मी फक्त वर्णनं ऐकलेली होती. त्यामुळे केवळ शब्दांच्या भरोशावर मी माझ्या डोक्यात कल्पना करत होतो. 

(गारंबीच्या बापूमधील सुप्रसिद्ध 'पूल')
तमासतीर्थ, मिसळ-वाडापाव, पुन्हा दापोली असं सगळं करून असूदपर्यंत यायला मला रात्रीचे साडे-आठ तरी झाले. असूद हे गाव अतिशय रम्य गाव आहे. दापोलीहून जो रस्ता हर्णे बंदराकडे जातो त्याला समांतर एक रस्ता असूदकडे उतरतो. डोंगर उतारावर नारळी आणि पोफळीच्या जंगलात लहानलहान घरं असं या गावाचं स्वरूप आहे. घरांच्या शेजारून पाण्यासाठी काढलेले पाट वाहत जातात. अगदी शंभरएक वस्तीचं हे गाव अतिशय रम्य आहे. दाबकेवाडीतली लोकं अतिशय प्रेमळ आहेत. असूदचा डोंगर आणि पलीकडचा डोंगर यांच्यामधून एक नदी वाहत जाते. ‘गारंबीच्या बापू’मध्ये किंवा ‘यशोदा’मध्ये ज्या नदीवरच्या बांधावरून गुरव आणि गावकऱ्यांमध्ये वाद होतात ती नदी म्हणजे हीच असूदच्या पलीकडून जी वाहत जाते तीच नदी. असूदचा डोंगर आपण उतरत जातो, दोन्ही बाजूला उंचच उंच नारळाची सुपारीची झाडं आहेत. शिवाय फणस, आंबा तर आहेतच. त्यातून उतरण्यासाठी दगडी पायऱ्या केल्या आहेत. त्या उतरत आपण त्या नदीवरच्या पुलाजवळ येतो. पूर्वी तिथे लाकडी साकव होता, आता तिथे जास्त भक्कम असा सिमेंटचा पूल बांधला आहे. पण पूल म्हंटल्यावर आपल्या डोक्यात जे चित्र उभं राहील तसा हा पूल नाही. एकावेळी कसाबसा एक माणूस त्यावरून पलीकडे जाऊ शकेल एवढाच तो पूल आहे. आजूबाजूला तुफान जंगल आणि पुलाच्या खालून खळखळत जाणारी ती नदी. 

पुलाच्या पलीकडे पुन्हा डोंगर चढण्यासाठी दगडी पायऱ्या केल्या आहेत. अशा साधारण दीडशे-दोनशे पायऱ्या आहेत. त्याही तुफान जंगलातून आपल्याला पुढे घेऊन जातात. पण यावेळी मात्र मानवी वस्ती अजिबात लागत नाही. पुलाच्या अलीकडे असूद गाव संपतं. पलीकडे फक्त जंगल आहे. रात्रीच्या त्या अंधारात मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात मी ती पायवाट तुडवत पुढे जात होतो. गो.नी.दांनी त्यांच्या आयुष्यभराच्या अगणित प्रवासात राजमाचीचा एक अनुभव वेगळा लिहिला आहे. ते म्हणतात फक्त राजमाचीला निघालो असताना एकदा असं झालं होतं की अमानवी शक्तीचे भास झाले होते. अर्थात ते भास होते. मलाही आपल्याबरोबर कोणीतरी चालतं आहे असा भास होत होता. पण असे रात्री-अपरात्री अनेक ट्रेक केलेले आहेत, त्यामुळे असे भास ही नवीन गोष्ट नाही. शिवाय गोनीदांना आला तसा अनुभव आपल्यालाही यावा अशी इच्छा असल्यामुळे सुद्धा असे भास होत असतील. पण एक मात्र आहे, की अंधार प्रचंड होता. जंगलातलीच वाट होती, त्यामुळे किडे, पक्षी क्वचित प्रसंगी एखादं माकड, कोल्हा यांचे आवाज येत होतेच. कितीही भीतीदायक वातावरण असलं तरी तो अनुभव म्हणून अमूल्य आहे. आयुष्यात मी असूदहून रात्री केशवराजच्या मंदिराकडे एकट्याने केलेला प्रवास विसरणार नाही. जंगलाच्या गराड्यातून क्वचितप्रसंगी स्वच्छ,मोकळं काळभोर आकाश दिसत होतं, त्यात लखलखणाऱ्या चांदण्या दिसत होत्या. सोबतीला शांततेचा आवाज होता आणि झाडांच्या शेजारून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज होता, जंगलाचा म्हणून एक विशिष्ट आवाज असतो. असं एकूण रम्य, अतिशय रम्य वातावरण होतं. 

दीड-दोनशे पायऱ्या चढून थोडासा दमलेल्या अवस्थेतच मी मंदिरापर्यंत आलो. पण दमल्यामुळे आलेल्या घामावर फुंकर घालायचं काम जंगलातून येणारी थंड वाऱ्याची झुळूक करत होती. 

(सौजन्य - दर्या फिरस्ती वेबसाईट)

मंदिराची रचना नेमकी कशी आहे, हे ज्यांनी मंदिर पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी सांगणं आवश्यक आहे. पुलाच्या पुढे डोंगर चढण्यासाठी असलेल्या दीड-दोनशे पायऱ्या पार केल्यावर आपण एका मैदानावर येतो. तिथे डोंगराच्या बाजूला तोंड करून मंदिर आहे. मंदिराला एक दगडी तटबंदी आहे. तटबंदीच्या बाहेर एक मोठं झाड आहे, त्याला पार आहे. डोंगर उताराच्या बाजूला तटबंदी जिथे संपते तिथे पत्र्याच्या शेडमध्ये काही देवाच्या मूर्ती आहेत. मंदिर प्राचीन असलं तरी जीर्णोद्धारामध्ये त्याचं प्राचीन रूप आता पूर्ण बदलून गेलं आहे. आता पूर्ण आधुनिक रूप मंदिराचं सहज लक्षात येतं. मंदिराच्या गाभाऱ्याला फक्त समोर एक लहानसा दरवाजा आहे, बाकी पूर्ण गाभारा बंद आहे, पण मंदिराचा सभामंडप पूर्ण उघडा आहे. कशाबसे दोन बाजूला दोन एकेक फुटी कठडे आहेत, बाकी सभामंडप पूर्ण खुला आहे. डोंगराच्या बाजूने एक पाण्याचा पाट काढला आहे, त्याला एक गोमुख बसवलेलं आहे, त्यातून बारा महिने तेरा काळ पाणी वाहात असतं. ते पाणी साठवण्यासाठी एक दगडी बदली गोमुखाच्या खाली आहे. अर्थात कितीही वर्णन केलं तरी नेमकं स्वरूप प्रत्यक्ष ते पहिल्याशिवाय कळणार नाही. तरी अंदाज यावा म्हणून मी काही फोटो दाखवतो. 

माझ्याजवळ माझी मोठी ट्रेकिंगची सॅक होती. आणि बरोबर मी स्लीपिंग बॅगही घेतलेली होती. अंधार तर पडलेला होताच. त्या दीड-दोनशे पायऱ्या चढून वर आलो. त्या तटबंदीपर्यंत आलो. बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये काही मूर्ती होत्या त्यांच्या समोर एक पणती तेवत होती. चांदण्याशिवाय त्या भागात तेवढाच काय तो उजेड होता. बाकी अंधार अंधार! खरं म्हणजे बाहेर शूज काढून आत जाणं अपेक्षित होतं. पण इतक्या जंगलात इतक्या अंधारात शूज बाहेर ठेवणं म्हणजे किड्या-सापांसाठी मुक्कामाची सोय करून देण्यासारखं असतं. शूज तसेच पायात ठेवून तटबंदीच्या आत शिरलो. कठड्यावर बसलो. कठड्याच्या आतल्या बाजूला सॅक ठेवली. तिथे शूज काढून ठेवले. गोमुखातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज शांततेच्या आवाजाची सोबत करत होता. कठड्याच्या आतल्या बाजूला मी टेकून बसलो. पण जास्त वेळ अंधारात बघण्याची सुद्धा हिम्मत होत नव्हती. स्लीपिंग बॅग उघडली. आणि त्यात शिरलो. हवेत गारवा होताच. स्लीपिंग बॅगची चेन तोंडापर्यंत लावून घेतली. डोक्याच्यावर सॅक ठेवली. 

मला अनेकदा भूतांची स्वप्न पडतात. मला भूतांची भीती कमी पण भुतांच्या स्वप्नांची भीती जास्त वाटते. अर्थात आजच्या दिवसभरात सुद्धा मी भरपूर दमलो होतो त्यामुळे स्वप्न पडेल याची शक्यता कमी होती. तरी सुद्धा रिक्स नको म्हणून मी कानात हेडफोन्स अडकवले, भीमसेन जोशींचा अनेकांतला एक अप्रतिम ट्रॅक म्हणजे ‘मालकंस’ लावला, आणि डोळे मिटले. एकूण रम्य वातावरण, गार वारा, शांतता, दोनशे पायऱ्या चढून आणि दिवसभराच्या प्रवासाने दमलो होतो त्यामुळे झोप येण्याची फार वाट बघावी लागलीच नाही. ती लगेच आलीच! 

पहाटे दोनच्या दरम्यान जरा वारा सुटला. पत्र्याच्या शेडमधल्या दिव्याची सुद्धा फडफड सुरू होती. अचानक सुटलेल्या वाऱ्याच्या आवाजाने मला जाग आली. आणि बहुतेक पहिली झोप झाली होती. जाग आली तेव्हा मला लक्षात आलं की हेडफोनमध्ये अजून गाणी सुरू आहेत. स्लीपिंग बॅगमध्येच कुठेतरी पडलेला मोबाईल मी हाताने चाचपडला, गाणी बंद केली. गाणी बंद केली तशी माझ्या लक्षात आलं, की तटबंदीच्या बाहेर, पत्र्याच्या शेड जवळ कोणीतरी गुणगुणतं आहे. मी ज्या कठड्याला आतल्या बाजूने टेकून झोपलो होतो ती जागा मंदिराच्या बाहेर उभं राहून कोणालाही दिसणार नाही अशी होती. शिवाय रात्रीच्या अंधारात, काळ्या स्लीपिंग बॅगमध्ये झोपलेला मी तर जवळ येऊन पहिल्याशिवाय दिसलो नसतो. पण गुणगुणण्याच्या आवाजाने मात्र माझा भीतीचा मीटर उडायला लागला. अचानक मी हालचाल करणं बंद केलं. करणार माझी हालचाल किंवा माझा आवाज या दोन गोष्टींमुळेच माझं तिथलं अस्तित्व लक्षात आलं असतं. वाऱ्याच्या झुळुकीमुळे किंवा तेल संपल्यामुळे पण त्या भागात जळणारा एकमेव प्रकाशाचा स्त्रोत बंद झाला होता. काळ्या कभिन्न दगडामध्ये उभी असलेली केशवराजाची मूर्ती तशीच स्थब्ध होती. पण त्या सगळ्या स्तब्धतेला छेद देणारा एक आवाज अक्षरशः काळीज चिरत होता. त्या केशवराजाच्या मंदिराच्या तटबंदी पासून येणारी गुणगुण मी आयुष्यभर विसरणार नाही. 


त्या आवाजाने आणि त्याहून जास्त त्या काळ्या, शांत रात्री माझ्या शिवाय दुसऱ्या माणसाच्या अस्तित्वाची शक्यता जास्त भीतीदायक होती. अनेकदा रात्री अपरात्री ट्रेक केलेले आहेत. रात्री-अपरात्री किल्ल्यांच्या दगडी तटबंदीवर जाऊन चांदण्यात बसलेलो आहे. कधी गाणी म्हणत, कधी शांत. कधी एकटा कधी, मित्रांबरोबर! रात्री-अपरात्री बाईकवरून वाट्टेल तसे, वाट्टेल तिथे फिरलो आहे. पण ती गुणगुण आठवली की अजूनही अंगावर काटा उभा राहतो. 

कठड्याच्या आतल्या बाजूला मी अंग चोरून बसलो होतो. स्लीपिंग बॅगमध्येच होतो. डोक्याशी सॅक होती. पण माझी झोप गेली. ती गुणगुण आता अधिक भीतीदायक वाटू लागली. मनात मनात वाट्टेल ते विचार येत होते. पण उठून तो आवाज नेमका कुठून येतो आहे ते पहायची हिम्मत होईना. त्यावेळी मी बराच धार्मिकही होतो. मी राम नामाचा जप सुरू केला. मनातल्या मनात रामरक्षा म्हणायला सुरवात, रामरक्षा म्हणून झाली तशी अथर्वशीर्ष म्हंटलं. पुन्हा एकदा रामनामच सुरू केलं. पण भीतीचा अंश जास्त होता. त्यावर राम किंवा गणपती दोघंही काहीही करू शकले नाहीत. बहुदा मी केशवराजाच्या मंदिरात बसून रामाची आणि गणपतीची आठवण काढत होतो म्हणून असेल. पण भीतीवर कोणताही उपाय कामी येईना. पुन्हा हेडफोन कानात लावून गाणी सुरु करणं हा एक उपाय होता. पण मोबाईल सुरू करणं म्हणजे त्याचा प्रकाश सुद्धा सुरू होणं, आणि प्रकाश सुरू झाला तर कोणीतरी कठड्याच्या जवळ आहे हे सहज कोणाच्याही लक्षात आणून देणं. काहीही उपाय सुचेना. आणि गुणगुणणंही थांबेना. माझे डोळे उघडे होते, पण अंधारात दिसत काहीच नव्हतं. मला जाग येऊन दहा मिनिटं झाली, वीस मिनिटं झाली. पाउण तास झाला दोन तास झाले. झोपही परत येईना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती गुणगुण थांबेना. सलग दोन तास ती गुणगुण सुरू होती. पण साधारण तास-सव्वा तासानंतर त्याची सवय झाली. माझी सुद्धा स्तब्ध पडून राहायची तयारी झाली. पुढे-पुढे भीतीही कमी झाली. 

(गर्द झाडीमध्ये बसलेला केशवराज, या फोटोमध्ये ती तटबंदी आणि पत्र्याची शेड दिसू शकेल)

थोडी गुंगी येते आहे, असं वाटेवाटेपर्यंत ती गुणगुण वाढत गेली. मी ज्या कठड्याला आतल्या बाजूने टेकून होतो त्या कठड्याच्या पलीकडच्या बाजूने आता ती गुणगुण मला ऐकू यायला लागली. आधी किमान तो आवाज दहा-बारा फुटांवरून येत होता. आता तो आवाज अगदी एका फुटावर येऊन थांबला होता. स्लीपिंग बॅगमध्ये मला घामाच्या धारा लागल्या होत्या. आता तर जराशी जरी हालचाल झाली तरी लक्षात येणार, हे जाणवून मी अजून लाकडासारखा स्थिर झालो. डोळे गच्च मिटून घेतले. श्वास तर इतक्या जोरजोरात येत-जात होते, हृदयाचे ठोके मला एकदम स्वच्छपणे ऐकू येत होते. पण हलायची सोय नव्हती. 

पण तो आवाज तिथून हलला नाही. आधीचे दोन तास पत्राच्या शेड जवळून आवाज येत होता. नंतरचे दोन तास तो आवाज माझ्यापासून अगदी एक फुटावरून येत होता. पण जशी आधी आवाजाची सवय झाली तशी जवळून येणाऱ्या आवाजाचीही सवय झाली. भीती अजिबात कमी झाली नाही. पण आपल्याला या अस्तित्वापासुन काही धोका नाही, असं वाटायला लागलं. तसाच स्तब्ध पडून राहलो. हा खेळ सकाळचे सहा-सव्वासहा पर्यंत चालू होता.

दोन वाजता जो आवाज सुरू झाला ते जवळजवळ सव्वासहापर्यंत सुरू होता. त्यानंतर तो आवाज हळूहळू कमी होत गेला. वाऱ्याच्या झुळुकीबरोबर विरत गेला. आणि मलाही झोप लागत गेली. नेहमीप्रमाणे सव्वा सात वाजता मोबाईलचा गजर वाजला. पण तोपर्यंत बाहेर उजाडून आलं होतं. तरीही अत्यंत सावधपणेच मी उठलो. संपूर्ण परिसरात कोणीही नव्हतं. पण उजेडामुळे खूप आधार मिळाला. सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसत असल्यामुळे आता भीती वाटत नव्हती. स्लीपिंग बॅग आवरली. ती सॅकमध्ये भरली. शूज घातले. गोमुखातून येणाऱ्या पाण्याने तोंड धुतलं. तोडं पाणी प्यालो. आणि केशवराजाचं दर्शन घेतलं. काल रात्री अंधारात मी केशवराजाच्या मंदिरात आलो होतो, पण दर्शन घ्यायचं राहून गेलं होतं. त्याचं दर्शन घेतलं. रात्री झालेल्या महाभारतातून माझी सुटका केली म्हणून त्याचे आभार मानले. 

जंगलातल्या पक्षांनी आपला दिवस सुरू केला होता. एकून वातावरणाला जाग येत होती. आता कसली भीती नव्हती. रात्री ज्या ट्यूनची गुणगुण मी ऐकली होती तीच गुणगुणत मी पायऱ्या उतरायला लागलो. ज्या ट्यूनने रात्री आसमंत आठवलं होतं, त्याची आता भीती उरली नव्हती. गुणगुणत, फोटो काढत, मी एकेक पायरी उतरत खाली आलो. पुलाच्या या काठावर मी उभा राहिलो, त्या परिसराचा एक पॅनरोमा फोटो काढावा म्हणून कॅमेरा पॅन करत करत सगळा परिसर कव्हर करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं, की आपल्या उजव्या हाताला दहा फुटांवर एक स्मशान आहे!   


(माझ्या बाबांनी केलेलं केशवराज मंदिराचं पेटिंग)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

केशवराज मंदिर परिसरावर काही उत्तम ब्लॉग्स उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींच्या लिंक मुद्दाम इथे देतो.
१. दर्या फिरस्ती -

२. तालुका दापोली - Vloghttps://www.youtube.com/watch?v=WS7VMCnpd74

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....