#एक_दिवस_एक_गाणं
मित्र सांगत होता...
बंगलोरला शिफ्ट झालो. थोडा स्थिरस्थावर झालो. पंचवीस वर्षाच्या आयुष्यात प्रथमच पुणे सोडून, घर सोडून, कम्फर्ट झोन सोडून, मित्र सोडून दुसऱ्या शहरात जात होतो. बंगलोरमधली टीमसुद्धा तशी लहानच होती. CEO मिळून ५ जणांची आमची टीम. त्यामध्ये एक बंगाली, एक बिहारी, एक छत्तीसगढी, एक गुजराती आणि एक मी. इंदिरानगरमध्ये आमचं ऑफिस आणि माझ्या मुक्कामाचं ठिकाण केंगेरी मेट्रो स्टेशनच्या जवळ होतं. रोजचा सुमारे पाऊण तासाचा मेट्रोचा प्रवास होत असे. पण नवीन शहर, नवीन मित्र, नवीन जॉब या सगळ्याची हळू हळू सवय होत होती. इंदिरानगरमध्ये हॉटेल्स आणि कॅफेजबद्दल बोलायला नको इतकी चैन आहे. मी त्यामध्ये एक बुकशॉप शोधलं. ऑफिस झालं की तिथे जाऊन बसत असे. बुक शॉपबरोबर एक बारही सापडला. तिथे काम करणारे काही वेटर्स मराठी होते. या दोन गोष्टी सापडल्यानंतर मग संध्याकाळ कधी कंटाळवाणी वाटली नाही. मग शेवटची मेट्रो पकडण्याच्या दृष्टीने वेळ बहुतेकवेळा बुक शॉपमध्ये पण काही वेळा बारमध्ये सुद्धा वेळ काढायचा. शेवटची मेट्रो पकडून मुक्कामी यायचं असं रुटीन बसलं.
मित्र सांगत होता...
एका रात्री एक-दोन बियर झाल्यानंतर मेट्रोतून घरी येत होतो. बंगलोरचं आल्हाददायक वातावरण, कार्ल्सबर्गची चव, कमी गर्दीची मेट्रो, समोरच्या बेंचवर बसलेलं एक कपल, तो तिला समजावत होता, तिचा ऐकायचा मूड नव्हता, असा सगळा माहोल बनला होता. मेट्रोच्या दारात एक मुलगा कदाचित लॉन्ग डिस्टन्स रिलेशनमध्ये असावा, तो तिच्याशी बोलत होता. त्याला आणि तिलाही बोलायला एकमेकांचा मेट्रोचा प्रवास इतकाच वेळ मिळत असणार. असा प्रत्येकच जण आपापल्या विश्वात.
पुढे तो म्हणाला,
तुझी आठवण आली म्हणून फोन केला. आपण बरेच दिवसात बसलो नाही. मैफल जमली नाही. गझल ऐकल्या नाहीत. मनसोक्त हसलो नाही. मनसोक्त रडलोही नाही. रोजची मेट्रो पकडायची, ऑफिसला पोचायचं, लॅपटॉप उघडून काम करायचा. बॉसला खुश करण्यासाठी, इयरली रिपोर्टमध्ये दोन मुद्दे आपल्याला अनुकूल यावेत म्हणून, क्लायंटला खुश करायचं म्हणून जास्तीत जास्त कल्पक होण्याचा प्रयत्न करायचा. काहीवेळा जमतं, काहीवेळा जमत नाही. आयुष्याच्या मंथली सब्स्क्रिप्शनसाठीची धावपळ सुरु ठेवायची. पण अशी वेळ कशामुळे आली की मला बंगलोरला यावं लागलं. आज क्लायंट खुश झाला, आज काहीतरी अफाट सुचलं, आज अनेक दिवसांनी ‘हर इक बात पे कहते हो तुम’ ही गालिबची गज़ल परत ऐकली. आज ‘कर रहां था ग़म-ए-जहाँ का हिसाब, आज तुम याद बेहिसाब आये’ मध्ये लागलेला मेंहदी हसन साहेबांचा सूर अशी काही जखम करून गेला की सांगता येत नाही. हे सगळं आपण फोनवरूनच बोलणार का? आपण पुण्यात होतो तेव्हा छोट्या छोट्या आनंदाच्या आणि मोठ्या कठीण क्षणांमध्ये खूप जवळ होतो. आज दोन वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला, पण आपण भेटलो नाही. इथे हे सगळं सांगायला आणि ते ऐकायला माझ्या PG मधला तेलंगणमधला तेलगू मुलगा आहे. त्याला हिंदी-मराठी कळतंच नाही.
तो गद्य बोलत होता. मला सज्जाद अलीचे शब्द आठवत होते. ‘जे रावी विच पाणी कोई नहीं, ते अपनी कहानी कोई नहीं, जे संग बेलिया कोई नहीं, ते किसी नू सुनाणी कोई नहीं.’ सज्जाद अली थेम्सच्या काठावर चालतोय आणि त्याला लक्षात येतं की ही नदी कितीही सुंदर, ऐतिहासिक आणि प्रवाही असली तरी हिला रावीची सर नाही. मी माझ्या आयुष्यातला संघर्ष, यशाचे क्षण, झालेली जखम किंवा आनंद, जसा रावीशी बोलत होतो, तसा हिच्याशी नाही बोलता येते. अशी परिस्थिती का आली की मला त्या रावीचा काठ सोडून इतक्या लांब यावं लागलं? ‘एह कैसी मजबूरी हो गई, के सजना तू दूरी हो गई, ते वेलेयां दे नाल वाग दी, एह जिंद कदों पूरी हो गई, बेगानेया दी राह छोड के, मैं अपनी मुहर मोड़ लान’
मित्राचं, ‘सगळं आपण फोनवरूनच बोलणार का?’ आणि सज्जाद अलीच्या ‘एह कैसी मजबूरी हो गई, के सजना तू दूरी हो गई’ यात मला बरंच साम्य वाटलं. हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे अजून एका दुसऱ्या मित्राचा फोन आला होता,
तो म्हणत होता..
आपण वर्ष-दीड वर्षांपूर्वी घरी बसलो होतो. अलेक्सावर लागलेली गाणी ऐकत होतो. तेव्हा बहुदा ओल्ड मॉंक होती. विषयाला अनेक फाटे फुटत गेले रात्री १० वाजता ‘पतित तू पावना’पाशी मैफल सुरु झाली होती. पुढे वेगवेगळी वळणं आली. त्यामध्ये सावरकरांचा बाजीप्रभू देशपांड्यांवरचा पोवाडा झाला, सादगी तो हमारी झालं, कृष्ण की चेतावनी झालं, हे सुरांनो चंद्र व्हा झालं. मग मी तुला म्हणालो ‘संथ वाहते कृष्णामाई’ गा! त्या दिवशी तू कृष्णामाईचं वर्णन गात होतास आणि मला आठवत होतं वाई, मेणवली, नाना फडणवीसांचा वाडा, माहुली, शाहू महाराज, ताराराणी, पानिपत, विश्वासराव, कृष्णामाईच्या पाण्यावर मोठे झालेला सातारा, सांगली, ऊस, उभी राहिलेली दुमजली घरं, घरासमोरच्या स्कॉर्पियो आणि फॉर्च्युनर! ‘सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वाळवूनि नेई रानी, आळशास ही व्हावी कैसी गंगा फलदायी?’, ‘आळशास ही व्हावी कैसी गंगा फलदायी?’ त्या दिवशीसुद्धा आणि त्यानंतर आपण आयुष्याच्या मंथली सब्स्क्रिप्शनसाठी धावपळ करणार नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे रोजचा संघर्ष होता. रोज नवीन आव्हान होतं. रोज पैशाची अडचण होती. रोज घरच्यांचे टोमणे होते. जुळत आलेलं लग्न मोडलं होतं. पण माझा संघर्ष प्रामाणिक आहे, तो मोलाचा आहे, तो खूप शिकवणारा आहे हे सांगायला आणि मनापासून ऐकून घ्यायला ती कृष्णामाई माझ्या शेजारी आहे.
मित्र सांगत होता,
तू कितीही म्हणालास की ‘तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही’, पण तसं नाहीये. ती ऐकून घेते. आवेग अनावर होऊन ती किनाऱ्याला येऊन धडकते. ती प्रतिसाद देते. ती याची आठवण करून देते की पानिपतनंतर सगळं संपलेलं असताना साताऱ्यातले महादजी शिंदे जाऊन दिल्लीवर झेंडा फडकावून येतात. आळशी माणसाला यश मिळणार नाही. निराश माणसाला यश मिळणार नाही, हताश माणसाला यश मिळणार नाही. मला या कृष्णामाईचा आधार वाटतो.
सज्जाद अलीचा ‘जे एथो कदी रावी लंग जावे, हयाते पंजाबी बण जावे, मैं बेड़िया हज़ार तोड़ लाँ, मै पाणी चो साह निचोड़ लाँ’ हे हे म्हणतानाच आवेग मला आज समाजाला. घरातल्या तीन खुर्च्या रिकाम्या आहेत. पुन्हा एकदा बंगलोरचा मित्र आणि साताऱ्याच्या मित्राला एकत्र घेऊन बसावं लागेल. कारण ‘रावी’ आणि ‘संथ वाहते कृष्णामाई’ची पारायणं करायची आहेत.
('रावी'ची लिंक - https://www.youtube.com/watch?v=3QoT9CfJXbM&list=RD3QoT9CfJXbM&start_radio=1 )
© मुकुल रणभोर