Thursday, 5 March 2026

मुस्लिम रिव्हायव्हलिस्ट मुव्हमेंट इन नॉर्दन इंडिया इन द सिक्स्टीन्थ अँड सेव्हन्टीन्थ सेन्क्युरी

भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासामधील सत्तरीच्या दशक हे अनेक अर्थांनी जागतिक इतिहासतातही ऐतिहासिक ठरले. सर्व इस्लामी जगामध्ये तोपर्यंत असलेली सेक्युलर डेमोक्रॅटिक सरकारे मोडून पडत होती, त्याची सुरवात गामल अब्दुल नासरच्या पडावापासून इजिप्तमध्ये सुरु झाली. त्याचा परिपोष आपल्याला इराणमध्ये घडलेली इस्लामी क्रांती १९७९ मध्ये दिसतो. ‘स्त्री’ला समाजात असणारे समान अधिकार काढून घेतले जात होते, बुरखा किंवा हिजाब पुन्हा येत होता, शरिया पुन्हा एकदा अमलात येणे सुरु झाले होते. परंतु जगाच्या दृष्टीने एकमेवाद्वितीय अशी घटना भारतात घडत होती ती म्हणजे इस्लाममधील आधुनिकतावादी हमीद दलवाई यांच्या पुढाकारातून निर्माण झालेली ‘मुस्लिम सत्यशोधक चळवळ.’ भारतामध्येही मुलतत्ववादी इस्लामिक चळवळी निर्माण झाल्याच, परंतु हमीद दलवाई यांच्या प्रेरणेने अनेक मुस्लिम लेखकांनी आधुनिकतेची कास धरून इस्लामचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न सुरु केला. मुस्लिम सत्यशोधक समाजासमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता मुसलमान समाजामध्ये मध्ययुगीन धर्मांधता सोडून आधुनिक सेक्युलर मूल्यांचे बीजारोपण कसे करता येईल. त्याचबरोबर जगभर जोर धरत असलेल्या रिव्हायव्हलिस्ट चळवळीच्या मुळाशी कोणती कारणं आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न याच काळात सय्यद अथर अब्बास रिझवी भारतात करत होते. या त्यांच्या प्रयत्नातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘मुस्लिम रिव्हायव्हलिस्ट मुव्हमेंट इन नॉर्दन इंडिया इन द सिक्स्टीन्थ अँड सेव्हन्टीन्थ सेन्क्युरी.’


मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे इतिहासकार म्हणजे सय्यद अथर अब्बास रिझवी यांनी हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सर्वच घटनांवर अतिशय सविस्तर आणि ससंदर्भ लिखाण केलेलं आहे. त्यामध्ये ‘अबुल फजलच्या विशेष संदर्भात, अकबराच्या कारकिर्दीतील मुस्लिमांचा धार्मिक आणि बौद्धिक इतिहास’, ‘हिस्टरी ऑफ सुफीझम इन इंडिया (२ खंड)’ ‘शाह वली-अल्लाह आणि त्यांचा काळ: अठराव्या शतकातील इस्लाम, राजकारण आणि भारतातील समाजाचा अभ्यास’, ‘शाह अब्द अल-अझीझ: puritanism, sectarian polemics and Jihad’, ‘भारतातील इस्ना-अशरी शियांचा सामाजिक-बौद्धिक इतिहास’ या ग्रंथांचा समावेश आहे. रिझवी यांचे वैशिष्ट्य म्हणजे मध्ययुगीन, तत्कालीन विश्वसनीय प्राथमिक साधनांच्या आणि मूळ हस्तलिखितांच्या आधारे केलेलं शास्त्रीय इतिहास लेखन. त्यांच्या सर्वच ग्रंथामध्ये आपल्याला आपल्याला प्राथमिक संदर्भग्रंथाच्या मोठ्या याद्या, तळटीपा, त्यांचे संदर्भ आणि स्पष्टीकरण अत्यंत अभ्यासू पद्धतीने केलेलं दिसेल. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अलिगड मुस्लिम विद्यापीठातून केली. रिझवी हे प्रोफेसर मोहम्मद हबीब यांचे आवडते विद्यार्थी होते आणि त्यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात सूफीवादावर लेखन करून केली. नंतर त्यांना जम्मू आणि काश्मीर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आणि उत्तर प्रदेश सरकारने स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाच्या प्रकल्पाचे सचिव म्हणूनही नियुक्त केले. त्यांनी १९६२-६२ दरम्यान लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमध्ये संशोधन सहकारी म्हणून काम केले आणि १९६९ मध्ये त्याच संस्थेत फेलो होते.

भारताच्या मध्ययुगात सम्राट अकबर आणि दारा शुकोह यांच्या रूपाने आपल्याला हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाच्या एका प्रयत्नांचे एक उदाहरण दिसते. पण अकबराच्या उदारमतवादी धोरणांचा तात्विक आणि वैचारिक पराभव करणारा एक वर्ग आपल्याला सोळाव्या आणि सतराव्या शतकात निर्माण झालेला दिसतो. सोळाव्या शतकात निर्माण झालेली ‘महादवि’ चळवळ, त्यांनतर निर्माण झालेली ‘शेख अहमद सरहिंदी’ यांची विचारधारा आणि त्या विचारधारेचा जहाँगीर, शाहजहान आणि औरंगजेब यांच्यावर झालेला परिणाम हा घटक इतिहासकारांनी दुर्लक्षिलेला दिसतो. शेख अहमद सरहिंदी यांच्याबरोबर सुरु झालेल्या पुनरुत्थानवादी परंपरेचा परिपोष नंतर शहा-वली उल्लाह, शेख अब्दुल अझीझ, जमाल-उद दिन अफगाणी, सय्यद अहमद बरेलवी, सर सय्यद अहमद, मौलाना अबुल कलाम आझाद, कवी मुहम्मद इकबाल या सर्व महत्त्वाच्या भारतीय मुसलमानांवर पडलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा सरहिंदी हा आधुनिक भारताच्या दृष्टीने आणि भविष्यातील संभाव्य मुस्लिम रिव्हायव्हलिस्ट मुव्हमेंटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताच्या फाळणीचे एक कारण या ऐतिहासिक प्रवाहामध्ये आहे याकडे अनेक इतिहासकारांनी दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु त्या दुर्लक्षित प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न रिझवी यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून केलेला दिसतो.

‘मुस्लिम रिव्हायव्हलिस्ट मुव्हमेंट इन नॉर्दन इंडिया’ या रिझवी यांच्या ग्रंथाला जेष्ठ इतिहासकार आणि रिझवी यांचे गुरु मुहम्मद हबीब यांच्या प्रस्तावना आहे. मुहम्मद हबीब यांनी ‘रिझवी हे आणि सांप्रदायिक पूर्वग्रह न ठेवता, पारंपरिक मुस्लिम लोकमताची फिकीर न करता संशोधन करणारे इतिहासकार आहेत. अप्रकाशित साधनांचा त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे; त्यांचा दृष्टिकोन सहिष्णु आहे परंतु टीकात्मक आहे; आणि त्या काळातील धार्मिक आणि गूढ चळवळींचे (मुख्यतः सुफी) एक अतिशय संपूर्ण आणि (माझ्या नम्र मते) योग्य चित्र पुस्तकातून समोर येते.’ अशा शब्दात गौरव केला आहे. अर्थात या पुस्तकाच्या पानापानांतून आपल्यालाही याचा प्रत्यय येतो.

पहिल्या प्रकरणामध्ये तेराव्या ते सोळाव्या शतकातील भारतातील सुफी परंपरेचा आढावा घेतला आहे. साधारणतः सुफी संप्रदायातील सर्व प्रवाह हे मान्य करतात की सुफीवादाची सुरवात मुहम्मद पैगंबर यांच्यापासून सुरु होते. त्यासाठी कुराणातील काही आयतींचासुद्धा संदर्भ दिला जातो (कुराण १८:३५, ५०:१६, ५१:२१-२२). मुहम्मद पैगंबर यांनी ‘सुफी’ म्हणजे ‘गूढ’ किंवा ‘दिव्य’ ज्ञान इस्लाममधील चौथे खलिफा अली यांना दिले असे मानले जाते. यांच्यानंतर हसन बारी, बसरा शहरातील राबिया अल-अदवियाह आणि इब्राहिम बिन अधम हे सुफीझमचे प्रणेते म्हणून गणले जातात. एन्साय्क्लोपीडिया ऑफ इस्लाममध्ये या व्यक्तींबद्दल सविस्तर टिपणे आहेत, रिझवी यांनी तीच उद्घृत करून सुरवातीच्या काळातील सुफीझमचे स्वरूप मांडले आहे. आपल्याला असे दिसून येईल की कुराणमधील अल्लाहची संकल्पना, त्याच्याप्रति संपूर्ण समर्पण, अल्लाहची भक्ती, अल्लाहबद्दलची गूढता आणि व्यक्तीमधील धार्मिक शुद्धता हे सुफीझमचे प्राथमिक स्वरूप होते. भारताबरोबर इस्लामचा जसा जसा संपर्क येत गेला तसा तसा गूढवादी, अध्यात्मिक शुद्धीसाठी अल्लाहची भक्ती करणाऱ्या सुफी परंपरेतील लोकांशी सुद्धा भारतीयांचा संपर्क येऊ लागला. रिझवी यांनी अली बिन उस्मान अल-जुलाबी अल हुजवीरी यांच्या ‘कश्फ उल-महजूब’या ग्रंथाचा उल्लेख केला आहे. ते लिहितात की ‘कश्फ उल-महजूब’या ग्रंथाच्या रचनेच्या पूर्वी भारतातील सुफी सुमारे १२ पंथांमध्ये विभागले होते आणि ते पंथ त्यांच्या गुरूंच्या नावाने ओळखले जात असत. पण नंतर इब्न अराबीच्या उदयापर्यंत ‘कश्फ उल-महजूब’ हा ग्रंथ भारतातील सुफीझमचा आद्य ग्रंथ म्हणून वाचला जात होता. लाहोरमध्ये या ग्रंथाची निर्मित झाली, त्याचे लेखक अली बिन उस्मान अल-जुलाबी अल हुजवीरी यांच्यावर त्या भागातील हिंदू आणि बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव पडला होता, असे मानण्यास जागा आहे. त्याचबरोबर इतर काही प्रभावी व्यक्तींच्या सुफीझमसंदर्भातील साहित्यामुळे उत्तर भारताच्या या भागात सुफीझमचा अधिक प्रसार झाला असे आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सुफीझममधील गूढवादी, अल्लाहच्या भक्तीची विशिष्ट पद्धत (समा) याचे आकर्षण सामान्य जनतेला होते, असेही आपल्याला दिसून येते. गुढ़वादाबरोबर सनाई, अत्तार, इराक़ी, रूमी इत्यादींच्या काव्यचेही आकर्षण जनतेला होते. गज़नीचा राहणारा अब्दुल मजदुद्दीन सनाईबद्दल रिज़वी यांनी लिहिले आहे की, “Sanai of Ghazna was a poet of strong pantheistic tendencies and a deep humanitarian outlook. He remained a target of criticism for the orthodox and the theologians of Ghazni throughout his life; they left no stone unturned in getting him and his monumental work Hadigat ul-Hagigah condemned.”

असे मानायला जागा आहे की सुफी तत्वज्ञानावर हिंदू आणि बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे. इस्लामच्या स्थापनेपूर्वीपासून अरब व्यापाऱ्यांचा भारताशी संपर्क होता. इस्लामच्या स्थापनेनंतर अब्बासी खिलाफत म्हणजे तेराव्या शतकापर्यंत इस्लाम ही ज्ञानाची, ज्ञानाच्या देवाणघेवाणीची भूमी होती. अर्थातच याचा कुठेही स्पष्टपणे उल्लेख नाही किंवा कोणत्याही सुफी परंपरेने हे मान्य केलेलं दिसत नाही की हिंदू किंवा बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव सुफी तत्वज्ञानावर आहे.

राजकीय क्षेत्रात घडणाऱ्या गोष्टींचा सुद्धा सुफीझमवर परिणाम झालेला दिसतो. त्याचा आढावा सुद्धा रिझवी यांनी पहिल्या प्रकरणामध्ये घेतला आहे. भारतामध्ये स्थापित झालेल्या इस्लामी राज्यव्यवस्थेसमोर एक नवीन समस्या उभी राहिली होती. भारतातील बहुसंख्य मुस्लिम हे धर्मांतरित असलेले पूर्वाश्रमीचे हिंदूच होते. धर्मांतर करून मुसलमान झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या जातीय जाणिवा दूर झाल्या नाहीत. त्याचबरोबर धर्मांतरित न झालेला सुद्धा समाज खूप मोठ्या प्रमाणावर होता. भाषिक आक्रमकतेशिवाय आग्रहाने मूलतत्त्ववादाची मागणी करणाऱ्या सूफींसाठी ही अडचणीची स्थिती निर्माण झाली होती. कारण इस्लामी राज्यकर्त्याला १००% शरिया कायद्याची अंमलबजावणी करता येत नव्हती. याबद्दल रिझवी लिहितात, हळूहळू भारतातील मुस्लिम लोकसंख्या विविध विदेशी वंशांच्या नागरिकांपासून आणि स्थानिक मुसलमानांपासून (बहुतेक हिंदू धर्मातून धर्मांतरित) तयार होऊ लागली. तुर्कांनी आपली वंशीय ओळख जपण्यासाठी स्थानिक मुसलमानांबद्दल, विशेषतः खालच्या वर्गातील लोकांविषयी, पूर्वग्रह बाळगला. या वांशिक पूर्वग्रहाच्या पार्श्वभूमीवर, भारतामध्ये सुरुवातीच्या तुर्क सुलतानांनी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेले इस्लामी बंधुत्वाचे तत्त्व, जातीयतेने विभागलेल्या हिंदू समाजात फारसा उत्साह निर्माण करू शकले नाही. दुसरीकडे, तुर्क आणि अफगाणांचा जमाती पातळीवर आधारित समाजव्यवस्थेचा पाया भारतासारख्या विस्तीर्ण देशात हळूहळू ढासळू लागला, आणि नैतिक मूल्यांमध्ये गोंधळ व अधोगती आढळून आली. शरियतचे कायदे लागू करणे हे भारतात एक गंभीर प्रश्न म्हणून उभे राहिले, कारण हे कायदे मुख्यतः मुस्लिमबहुल समाजाच्या संदर्भात विकसित झाले होते. उलेमांना आणि सत्ताधाऱ्यांना या संदर्भात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. इज्तिहादचे (स्वतंत्र विवेकाच्या आधारे कायद्याची मांडणी) दरवाजे आधीच बंद झाले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना शरियतचे कठोर पालन न करता झवाबित (राज्यकायदे) तयार करावे लागले, असे झिया उद्दीन बरनी यांनी नमूद केले आहे.

या प्रकारच्या तडजोडीमुळे आणि भौतिक सुखांकडे अधिक आकर्षित झाल्याच्या कारणामुळे सुफी आणि उलेमा यांच्यातील तीव्र संघर्ष आपल्याला पुढच्या पानांमध्ये वाचायला मिळतो. साधारणतः १० शतकापासून ते सरहिंदीच्या काळापर्यंत भौतिक सुखोपभोगांसाठी इस्लामी तत्वे बाजूला ठेवणाऱ्या राज्यकर्ते, उलेमा यांच्यावर सर्व सूफींनी कठोर टीका केल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सुफी व्यक्तिमत्वांची आणि त्यांच्या साहित्याचाही परामर्श रिझवी यांनी घेतला आहे. त्यामध्ये अजमेरच्या मोईनुद्दीन चिस्ती, निजामुद्दीन औलिया, काझी हमीदुद्दीन नागौरी, शेख फरीदुद्दीन गंज ए शकर, शेख नासिर उद्द्दीन चिराघ, सिमनानी आणि अशा अनेकांची चरित्रे रिझवी यांनी मांडलेली आहेत. त्याचबरोबर भारतातील महत्त्वाचे सुफी पंथ (चिस्ती, सुऱ्हावर्दी, नक्शबंदी, शत्तरी) यांच्या तात्विक भूमिकांमधील फरकही रिझवी यांनी मांडून दाखवला आहे. तत्कालीन इस्लामी राज्यकर्त्ते उदा. सुलतान इल्तुतमिश, मुहम्मद घुरी, सुलतान अलाउद्दीन खिलजी इत्यादी सर्वांचेच सूफींबरोबर चांगले संबंध होते. याबद्दलही रिझवी यांनी सविस्तर लिहिलेला आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांनी पृथ्वीराज चौहान इस्लामच्या तलवारीच्या हातून मारला जाईल अशी भविष्यवाणी केली होती. त्यानुसार मुहम्मद घोरीच्या हातून तो मारला गेल्यानंतर सुलतान मुहम्मद घोरी मोईनुद्दीन चिस्तीला भेटायला गेला होता, तो प्रसंग रिझवी यांनी लिहिला आहे. अर्थात ‘हिस्टरी ऑफ सुफीझम इन इंडियाच्या’ पहिल्या खंडात हा प्रसंग सविस्तर आहे. परंतु मोईनुद्दीन चिस्ती बरोबरच या काळातले सर्वच सुफी मूलतत्त्ववादी होते, राज्यकर्त्या वर्गावर त्यांचा प्रभाव होता, ही गोष्ट या प्रसंगातून ठळकपणे जाणवते. सर्व सूफींच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला दिसून येईल की ‘सर्व ज्ञान कुराण आणि हदीसमधून प्राप्त होऊ शकतं’ याबद्दल कोणाच्याही लिखाणात दुमत नाही.

सुफीझमच्या दृष्टीने महत्त्वाचा माणूस म्हणजे इब्न अराबी, इब्न अराबीने ‘वहदत अल-वूजूद’ या संकल्पनेवर केलेल्या लिखाणाचा सविस्तर उहापोह रिझवी यांनी ‘सुफीझम इन इंडिया’ या प्रकरणात केला आहे. ‘वहदत अल-वजुद’ हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ "अस्तित्वाचे एकत्व" असा होतो, जो इस्लामिक गूढवाद (सूफीवाद) मधील एक तात्विक संकल्पना आहे जी असे मानते की फक्त एकच वास्तव आहे, जे देव आहे. या दृष्टिकोनानुसार, सर्व सृष्टी ही या एकाच दैवी अस्तित्वाचे प्रकटीकरण किंवा प्रतिबिंब आहे आणि प्राण्यांचे स्पष्ट वेगळेपण हा एक भ्रम आहे, कारण फक्त देवच खरोखर अस्तित्वात आहे. असे मानले जाते की ‘वहदत अल-वूजूद’ या तत्वावर अद्वैत वेदांताचा प्रभाव आहे. परंतु भारतातील आणि भारताबाहेरील सुद्धा सूफींनी अराबीच्या ‘वहदत अल-वूजूद’ या कल्पनेचा तीव्र विरोध केलेला दिसून येईल. आला-उद्दीन सिमनानी या सुफी विचारवंताने आपल्या ‘इक्बालिया’ या ग्रंथात इब्न अराबीच्या ‘वहदत अल-वूजूद’ या तत्वावर कथित टीका केलेली रिझवी यांनी उद्घृत केलेली आहे. ‘इक्बालिया’ या ग्रंथात इब्न अराबी म्हणतो ‘सूफींच्या कर्तव्यांमध्ये इस्लामचा प्रचारक आणि इस्लामचा मिशनरी’ या गोष्टींचा न टाळता येण्याइतका समावेश आहे. एक महत्त्वाचे निरीक्षण रिझवी यांनी नोंदवले आहे. भारतात भक्ती चळवळीच्या प्रभावामुळे सामान्य मुसलमानांमध्ये ‘राम आणि रहीम’ यांच्यात भेद न करण्याची भावना बळावली होती. एकमेवाद्वितीय अल्लाहला हिंदू परंपरांमधील देवाच्या नावाने पुकारण्याची सामान्य मुसलमानांमध्ये पद्धत पडली होती. त्याच्याविरुद्ध सूफींनी लिखाण केल्याचे रिझवी यांनी नोंदवले आहे. हिंदू पद्धतीप्रमाणे मुस्लिम समाजही आनंदोत्त्वाच्या आतषबाजी करू लागला होता त्याच्याविरोधातही सूफींनी लिखाण केले आहे. त्याचा परिणाम असा झाला की फिरोझ शहा तुघलकाने या प्रकारच्या कृत्यांवर कायदेशीर बंदी घालण्याचा हुकूम काढला होता. त्याचाही उल्लेख रिझवी यांनी केला आहे. परंतु तात्विक पातळीवर हिंदू-मुस्लिम तत्वज्ञानातील सामान मुद्दे शोधून काढण्याची सूफींची धडपड आणि त्याला मुलतत्ववादी सूफींनी केलेला विरोध याबद्दल या दुसऱ्या प्रकरणामध्ये सविस्तर विश्लेषण आहे.

या प्रकरणाच्या शेवटी रिझवी यांनी असे मत नोंदवले आहे की ‘१५ व्या शतकातील हिंदुस्थानात प्रांतिक सरकारांनी शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं. भक्ती चळवळीने त्याला जोर दिला आणि त्यामुळे सांस्कृतिक, सामाजिक समंजस व्यवहाराला त्यामुळे चालना मिळाली. परंतु मुघल सत्तेत आल्यानंतर सूफींच्या ‘सहअस्तित्वाच्या’ प्रयत्नांना खीळ बसली, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्ष अधिक तीव्र बनला आणि पुनरुथ्थानवादी चळवळींना जोर मिळाला.’ हे रिझवी यांचे मत विसंगत आहे. रिझवी यांनीच तात्विकपातळीवर ‘सहअस्तित्वाचा’ प्रयत्न करणाऱ्या सूफींना राजकीय क्षेत्राकडून झालेल्या तीव्र विरोधाची अनेक उदाहरणे दिलेली आहेत.

या नंतरचे प्रकरण ‘महदवि चळवळी’ विषयी आहे. प्रकरणाच्या सुरवातीलाच इब्न खालदूनच्या ‘मुकादमा’ या ग्रंथातील ‘महदी’ या संकल्पनेचा अर्थ रिझवी यांनी दिलेला आहे. ते लिहितात “प्रत्येक युगात मुस्लिमांना हे सर्वज्ञात (आणि सामान्यतः स्वीकारलेले) आहे की, अंतकाळात (पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या) कुटुंबातील एक पुरूष नक्कीच प्रकट होईल, जो धर्माला बळकटी देईल आणि न्यायाचा विजय मिळवेल. मुस्लिम त्याचे अनुसरण करतील आणि तो मुस्लिम राज्यावर वर्चस्व मिळवेल. त्याला महदी म्हटले जाईल. त्याच्या अनुसरणात, ख्रिस्तविरोधी प्रकट होईल, त्यानंतरच्या सर्व चिन्हांसह (न्यायाचा दिवस), जसे की सहीहमध्ये स्थापित केले आहे. (महदीच्या) नंतर, ईसा (येशू) अवतरतील आणि ख्रिस्तविरोधीला मारतील. किंवा, येशू महदीसह अवतरतील आणि त्याला (ख्रिस्तविरोधीला) मारण्यास मदत करतील आणि त्याला त्याच्या प्रार्थनेत नेता बनवतील." असा ‘महदी’ कोण याची चर्चा इस्लामी विचारविश्वामध्ये सतत सुरु असते.

जौनपूरला जन्माला आलेल्या सैय्यद मुहम्मद याचे सविस्तर चरित्र रिझवी यांनी दिलेले आहे. सरहिंदीच्या आधी भारतात ‘महदी’ चळवळीतील सय्यद मुहम्मद हे नाव महत्त्वाचे आहे. पैगंबरांना ज्या प्रमाणे दैवी आवाज येत असत त्याप्रमाणेच सैय्यद मुहम्मद यालाही येत असत असे मानले जाते. रिझवी यांनी एक प्रसंग नोंदवलेला आहे. सुलतान हुसेन शारकी याला सुद्धा सैय्यद मुहम्मद बद्दल आकर्षण वाटू लागले. सुलतान हुसेन शारकी याने सुलतान मुहम्मदचे शिष्यत्व पत्करले. पुढे गौरचा हिंदू राजा दलपत याच्याशी झालेल्या युद्धाचा प्रसंग रिझवी यांनी दिलेला आहे. काही समकालीन दस्तैवजांमध्ये या युद्धाची तुलना प्रेषितांच्या बद्रच्या युद्धाबरोबर केलेली आहे कारण सैय्यद मुहम्मद याच्याबरोबर केवळ ३१२ सैनिक होते, तरीही त्याच्या तुकडीचा विजय झाला अशी नोंद आहे. रिझवी असे लिहितात की सैय्यद मुहम्मद यांनी कोणत्याही नव्या धर्माची स्थापना केली नाही पण अल्लाहने ‘महदी’ला पृथ्वीवर पाठवण्याचे कारण इस्लामचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देणे हेच होते. सैय्यद मुहम्मद यानी असा फतवाही काढलेला होता की जे ‘सैय्यद मुहम्मद हाच महदी आहे’ हे मनानंर नाहीत त्यांना काफिर म्हणून गणले जावे आणि अशा मुसलमानांवरही जिझिया लागू करावा. ‘महदवि’ दस्तऐवजांनुसार सैय्यद मुहम्मद यांनी पुन्हा एकदा १४९८ मध्ये अहमदाबाद येथे आपण ‘महदी’ असल्याची घोषणा केली. गुजरात सोडल्यानंतर सैय्यद मुहम्मद काही दिवस दौलताबाद (देवगिरी) येथे राहिला, खुलताबाद येथील काही कबरींना त्यांनी भेट दिली. त्यानंतर मलिक अहमद निजाम शाह पहिला याची त्याने भेट घेतली. नंतर अहमदनगर येथील त्याच्या भेटीमध्ये मलिक अहमद नाझीम शाह याचीही त्याने भेट घेतली. रिझवी यांनी सैय्यद मुहम्मद याच्याबद्दलचे मौलाना अबुल कलाम आझाद यांचे मत नोंदवले आहे. अकबराच्या काळापूर्वी भारतीय इस्लाममध्ये अस्वस्थता, भ्रष्टाचार, भौतिक सुखोपभोगांचा वाढलेला प्रभाव या काळात सैय्यद मुहम्मद यांनी ‘शरियत’च्या पुनःस्थापनेसाठी किती प्रभावी काम केलं याबद्दलचा कौतुक केलं आहे. इथे ‘शरिया’चा अर्थ इस्लामच्या पुनःस्थापनेसाठी असा अर्थ आहे.

महदवि चळवळ भारतभर पसरली आणि सुमारे शंभर वर्षापर्यंत प्रभावी राहिली. या शंभर वर्षाच्या काळात भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी आपण ‘महदी’ असल्याचा दावा केला. त्याचा थोडक्यात आढावा रिझवी यांनी ‘महदवि डायरीज’ या प्रकारांमध्ये घेतला आहे.

या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे प्रकरण आहे ‘मुजादिद अल्फ इ सानी’ म्हणजे ‘शेख अहमद सरहिंदी’ याने पुनरुथ्थानासाठी केलेले प्रयत्न. साडेचारशे पानाच्या पुस्तकातली सव्वाशेहुन अधिक पाने रिझवी यांनी ‘शेख अहमद सरहिंदी’ याच्यावर खर्च केली आहेत. त्याचे कारणही महत्त्वाचे आहे. हिंदू मुस्लिम सहअस्तित्वाचा प्रयत्न करणारा एक मुघल सम्राट अकबराच्या रूपाने दिल्लीच्या सत्तेवर बसला. अकबर इस्लामपासून दूर चालला असल्याची अनेक उदाहरणे घडत होती. त्याचा ‘दिन-ए-इलाही’चा प्रयत्न किंवा सर्व धारांच्या लोकांना एकत्र बसून धर्मावर चर्चा करण्यासाठी तयार झालेला ‘इबादत खाना’ इत्यादी. भक्ती चळवळीमुळे इस्लामच्या मूळ विचारांवर हिंदू संस्कृतीचा वाढत चाललेला प्रभाव या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी सहस्त्रकात जन्माला आलेला सर्वात महत्त्वाचा माणूस म्हणून सरहिंदीचा उल्लेख केला जातो. सरहिंदीचा जहांगीर, औरंगजेब इथपासून शहा वलिउल्लाह, सय्यद अहमद बरेलवी, अब्दुल अझीज पुढे मुहम्मद इकबाल, सर सय्यद अहमद खान, मौलाना अबुल कलाम आझाद या सगळ्यांना प्रेरणा देणारा माणूस म्हणजे सरहिंदी. आधुनिक भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्यासमोरची एक महत्त्वाची अडचण म्हणजे सरहिंदी. भारतातील इस्लाममध्ये आधुनिकता येऊ शकली नाही याच कारणही सरहिंदी. या सरहिंदीचा अभ्यास मध्ययुगीन इतिहासकारांकडून दुर्लक्षित राहिलेला आहे.

सरहिंदीच्या पत्रांचा संग्रह ‘मक्तुबात ए इमाम रब्बानी’ या नावाने दोन खंडात केलेला आहे. तो सरहिंदीच्या अभ्यासाचा सर्वात मोठा स्रोत आहे. रिझवी यांनी मुळातील फारसी पत्रे संदर्भ म्हणून वापरली आहेत. रिझवी यांनी लिहिले आहे की “(सरहिंदीच्या) पूर्वजांप्रमाणे सरहिंदीने शांत आणि मावळ आयुष्य न जगता आपले विचार शाही दरबारापर्यंत पोहोचवण्याचा अतिशय काटेकोर प्रयत्न केला.” अकबराच्या काळात हिंदूंना मिळालेली धार्मिक मोकळीक, आणि त्यामुळे इस्लामच्या शुद्धतेवर झालेला विपरीत परिणाम हे सरहिंदीच्या अधिक आक्रमक होण्याचे मुख्य कारण होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा संदर्भ देत रिझवी लिहितात की मौलाना आझाद यांनी मूलतत्त्ववादी यांच्याबरोबर राष्ट्रवादी मुसलमानांनी सरहिंदीकडे नायकाच्या रूपाने पाहिले. मूलतत्त्ववादी असे मानतात की सरहिंदीमुळे जहांगीरच्या ‘सर्वसामावेशकते’पासून इस्लाम दूर राहिला आणि मुघल सत्ता टिकली याचे कारण सरहिंदी हेच आहे. आपल्या वडिलांची ‘सर्वसमावेशक’ धोरणं सुरु ठेवण्याचा जहांगीराचा मानस होता असे रिझवी लिहितात. त्यासाठी ‘तुझुक ए जहांगिरी’ मधील एक संदर्भ रिझवी यांनी दिला आहे, ते लिहितात, ‘सक्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करून घेण्यावर जहांगीरने त्यांच्या कारकिर्दीच्या ६व्या वर्षात एका शाही आदेशानुसार बंदी घातली होती.’ सरहिंदीच्या राजकीय पत्रांची ही अशी पार्श्वभूमी आहे.

सरहिंदीच्या या पत्रांच्या तारखा निश्चित माहिती नसल्या तरीही इतर संदर्भांवरून त्यांचा काळ ठरवता येतो. त्याच्या पत्रात असा उल्लेख आहे की “आज, इस्लामला प्रतिबंध करणाऱ्याचा (म्हणजे अकबराचा) अंत झाल्याची आणि इस्लामच्या राजाची (म्हणजे जहांगीराची) गादीवर झालेल्या विराजमानतेची आनंदवार्ता उंच-नीच सर्वांच्या कानावर पोहोचल्यावर, मुसलमानांनी राजाला मदत व सहकार्य करणे, तसेच शरीयतीचे (म्हणजे इस्लामचे) नियम प्रस्थापित करण्यासाठी आणि धर्म बळकट करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणे हे आपले कर्तव्य मानले आहे.” या प्रकरणामध्ये अशीही पत्रं रिझवी यांनी दिलेली आहेत ज्यामध्ये ‘अकबराची’ दिशाभूल करणाऱ्या ‘मार्गभ्रष्ट’ अशा उलेमा आणि सूफींवरही सरहिंदीने टीका केलेली आहे. आणि त्यामुळे सरहिंदीने जहांगीरचा निकटवर्तीय असलेल्या बाबा फरीदला लिहिलेल्या एका पत्रात याचा उल्लेख आहे की ‘इस्लामवर अढळ निष्ठा’ असणाऱ्या कोणातरी एकाच व्यक्तीला जहांगीरच्या सल्लागार नेमावे, त्यानंतरच्या पत्रात सरहिंदीने ‘काफिर’ आणि ‘शिया’ यांना अपमानास्पद वागवले पाहिजे यांचा आग्रह केला आहे.

जहांगीरच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षात शेख फरीद बुखारी याची पंजाब सुभ्याचा सुभेदार म्हणून नेमणूक झाल्यानंतर सरहिंदीने शेख बाबा फरीदला लिहिलेलं एक पत्रं महत्त्वाचे आहे. त्या पत्रामध्ये सरहिंदीने इस्लामच्या कथित गलितगात्र स्थितीचे वर्णन करून बाबा फरीदला आग्रह केला आहे की काफिरांना कुत्र्याप्रमाणे वागवलं पाहिजे. कुफ्र आणि इस्लाम हे परस्पर विरोधी आहेत, आणि इस्लामचा सन्मान हा काफ़िरांच्या अपमानावर अवलंबून आहे. सरहिंदीने बाबा फरीदला असा सल्ला दिला आहे की काही मुस्लिम अलीम्सना काफ़िरांचा जाहीर अपमाना करण्यासाठी आणि शरियाचा प्रचार करण्यासाठी नेमावे.

शेख बाबा फरीद प्रमाणेच खान ए आझम मिर्झा अझीझ कोका हा असाच एक माणूस आहे ज्याला सरहिंदीने लिहिलेली पत्रे महत्त्वाची आहेत. एका पत्रात सरहिंदीने इस्लामच्या भूतकाळातील अपमानास्पद स्थितीबद्दल निराशा व्यक्त केली आहे. सरहिंदी असे लिहितो की, “काफिर खूप उघडपपणे इस्लामचा आणि मुसलमानांचा अपमान करत आहेत. ते (म्हणजे काफिर) रस्ते आणि बाजारांमध्ये अत्यंत उघडपणे कुफ्रचे सण साजरे करत आहेत. आणि असे स्वातंत्र्य इस्लामला नाही.” तो हेही लिहितो की “मुहम्मदाच्या धर्माबद्दलचा शत्रुभाव पूर्वीच्या काळात (बहुदा अकबराच्या) खूप तीव्र होता, परंतु वर्तमान काळामध्ये ते शत्रुत्व कमी झालेले दिसते आहे.” असे शत्रुत्व कमी झालेले असले तरीही तो तत्कालीन शासनाला अत्यंत सावध राहायला सांगतो आहे. इस्लामचे पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करून, गरज पडेल तिथे बळाने केले पाहिजे, असेही सरहिंदीने लिहिले आहे.

एका पत्रामध्ये सरहिंदीने लिहिले आहे की, इस्लामच्या राज्यामध्ये एकही काफिर नोकरीला असता काम नये, इतकेच नव्हे तर इस्लामच्या राजधानीमधेही कोणी काफिर असता काम नये. आणि शरियाच्या तत्वानुसार काफिरांचा सर्व प्रकारचा अपमान आणि अवहेलना केली पाहिजे असेही तो लिहितो. काफ़िरांचा पेहेराव आणि मुसलमानांचा पेहराव सारखा असता कामा नये. कुफ्रचे सगळे सण बंदिस्त ठिकाणी साजरे केले पाहिजेत. शासनाची ही जबाबदारी आहे की काफ़िरांना मुसलमानांपेक्षा खालच्या दर्जाची वागणूक मिळेल.

सरहिंदीने मिर्झा फतउल्ला खान हकीम याला लिहिलेली पत्रे तात्विक चर्चात्मक आहेत. त्यातल्या एका पत्रामध्ये सरहिंदीने इस्लामच्या त्र्याहत्तर गटांपैकी सुन्नी हा गटच सर्वोच्च असल्याचे लिहिले आहे. सरहिंदीने कयामतका दिनचं महत्त्व या पत्रामध्ये सांगितले आहे. आणि सुन्नी हा एकच पंथ असा आहे की जो कयामत का दिनचे महत्त्व अधोरेखित करतो. याच पत्रामध्ये सरहिंदीने शिया, खारीजी, मुताझिल्स या सर्व पंथांची कठोर टीका केली आहे. बिगर-मुसलमानांनी जिझिया भरलाच पाहिजे, त्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दलची सरहिंदीची अनेक पत्रे उपब्लध आहेत. परंतु त्याहून एक महत्त्वाचे पत्रं रिझवी यांनी दिले आहे, त्यामध्ये सरहिंदी म्हणतो की ‘गोहत्या बंदीचा निर्णय आधीच्या शासनाने घेतला यांचे कारण मुसलमानांची हिंदूंबरोबरची जवळीक जास्त वाढली होती. त्यामुळे गोहत्या करण्यासाठी शासनाने परवानगी देणे हे जिझियाच्या अंबलबजावणीपेक्षा महत्त्वाचे आहे.’ त्याच्या एका पत्रात सरहिंदी लिहितो की “भारतामध्ये गोहत्या करणे हे अत्यंत पवित्र इस्लामी कृत्य आहे. काफिर एकवेळ जिझिया द्यायला कबुल होतील परंतु गोहत्येला ते कधीही परवानगी देणार नाहीत.” त्यावरून रिझवी यांनी असे मत नोंदविले आहे की केवळ इस्लामच्या अधिपत्याखाली हिंदूंना आणणे सरहिंदीला पसंत नव्हते, बिगर-मुस्लिमांचा समूळ नायनाट हेच त्याचे उद्दिष्ट होते.

प्रसिद्ध कवी रुमीचा प्रभाव, भक्ती चळवळीचा प्रभाव यामुळे एका कवीने असे लिहिले की राम, कृष्ण आणि अल्लाह ही एकाच ईश्वराची वेगवेगळी नावे आहेत. त्यावर कठोर टीका करताना सरहिंदीने लिहिले की, ‘राम, कृष्ण आणि त्यांचे (हिंदूंचे) बाकी देव हे त्याची (अल्लाहच्या हातून निर्माण झालेल्या) नीचतम निर्मिती आहे. रामाचा जन्म आई-वडिलांपासून झाला, लक्ष्मणाचा तो भाऊ होता, सीतेचा पती होता. राम जिथे स्वतःच्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही तिथे तो सामान्य लोकांचा काय सांभाळ करू शकणार?’ सरहिंदी पुढे लिहितो, “आपल्या बुद्धीचा चांगला वापर करा, आणि यांची पूजा करणं बंद करा.” सरहिंदी म्हणतो की ‘राम आणि रहीम हे एकच आहेत असे मानणे हा उच्चतम विनोद आहे.’ सरहिंदीने तत्वज्ञानाचा अभ्यास आणि मुताझिल आणि त्याच्या अनुयायांच्यावरही कठोर टीका केली आहे.

इतिहासाचा प्रवाह असे सांगतो की अकबराच्या आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये इस्लाममध्ये गैर-इस्लामिक प्रथा प्रचलित झाल्यामुळे इस्लामला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी शेख अहमद सरहिंदीचा जन्म झाला. परंतु इस्लामच्याही एका गटामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु होते. रिझवी यांनी या प्रयत्नांवर एक प्रकरण खर्ची घातले आहे. ‘सतराव्या शतकातील पँथीइझम आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रयत्न’ या प्रकरणामध्ये मुख्यतः दारा-शुकोहच्या निमित्ताने झालेले ‘हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाचे प्रयत्न’ याबद्दल सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. त्यामध्ये इस्लामी तत्वज्ञानावर पडलेला पंचमहाभूतांचा, अद्वैती विचाराचा, भक्ती चळवळीचा, उपनिषदांतील तत्वज्ञान यांचा उहापोह केलेला आहे. दारा-शुकोहच्या प्रयत्नातून झालेल्या उपनिषद, रामायण यांच्या फारसी अनुवादाचाही सविस्तर परामर्श रिझवी यांनी घेतलेला आहे. इस्लामच्या मूळ तत्वांच्या विसंगत जाणाऱ्या ‘ईश्वराशी एकरूप होण्याच्या’ कल्पनेबद्दलही सूफींचे साहित्य याबद्दलही चर्चा या प्रकरणामध्ये आहे. शरीफ या सुफीने योग्य वशिष्ठचा अनुवाद जहांगीराला अर्पण केल्याचा उल्लेख रिझवी यांनी केला आहे. हिंदू देवतांमध्ये इस्लामी प्रथेतील देवदूतांचे गुणधर्म शोधण्याचा सूफींच्या प्रयत्नाबद्दलही यामध्ये उहापोह केलेला आहे.

भारताचे दुर्दैव असे की इतिहासाचा प्रवाह हा कायम शेख अहमद सरहिंदी, त्यानंतर औरंगजेब, त्यानंतर शहा वलिउल्लाह, शाह अब्दुल अझीझ, सय्यद अहमद बरेलवी आणि पुढे भारताच्या फाळणीकडे गेला. भारताचे दुर्दैव असे की अकबर, अबुल फाझल, दारा शुकोह यांच्या परंपरेतून सहअस्तित्वाचा प्रयत्न करणारे मुस्लिम नेते भारतात झाले नाहीत. प्रबोधनाची परंपरा पुनःपुन्हा खंडित होण्याचा इस्लामचा इतिहास राहिला आहे. प्रबोधनाचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लिम नेत्यांना बाजूला सारून पुनःपुनः अधिक मुलतत्ववादी नेते निर्माण करण्यावर इस्लामचा भर राहिलेला दिसतो.

भविष्यातील हिंदू-मुस्लिम प्रश्न तेव्हाच संपेल जेव्हा भारतीय मुस्लिम आपले आदर्श बदलतील. त्यासाठीचा भरपूर ऐतिहासिक ऐवज रिझवी यांनी या पुस्तकात आपल्याला दिला आहे. मुसलमानांनी ठरवायचे आहे की आदर्श औरंगजेबाचा इस्लाम हा ठेवायचा की दारा-शुकोहचा सहअस्तिवाची परवानगी देणारा इस्लाम अंगिकारायचा!

(पूर्वप्रसिद्धी - नवभारत, फेब्रुवारी २०२६)

© मुकुल रणभोर

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....