Saturday, 25 July 2015

कुरुंदकरांचा वारसा – प्रा. शेषराव मोरे


नरहर कुरुंदकर या ऋषीला आम्ही पाहू शकलो नाही याचं दु:ख बाळगायचं 
 की शेषराव मोरे यांचा जिव्हाळ्याचा  परिचय लाभला याचा आनंद मानायचा? 
ही गुरु शिष्य परंपरा  सुरू राहिली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे.



स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि त्यांच्या विचारांचा संपूर्ण वेगळा अन्वयार्थ लावणारी दोन पुस्तक माझ्या वाचनात आली. ‘सावरकरांच्या समाजकारणाचे अंतरंग’ आणि ‘सावरकरांचा बुद्धीवाद आणि हिंदुत्ववाद’ हे दोन्हीही मूळ विषय जड आहेत. एकतर बुद्धीवाद आणि हिंदुत्ववाद एकत्र कसं असू शकतं? पण हा प्रश्न नंतरचा आहे. ते पुस्तक वाचताना कळलं की कोणत्यातरी मूळ पुस्तकांच्या ह्या संक्षिप्त आवृत्ती आहेत. अभ्यासाची पद्धत म्हणून ही शिस्त होती की वरवरचं काही वाचायचं नाही, खोलात शिरून वाचायचं. ‘शेषराव मोरे’ हा माणूस असा परिचयात आला. दोन सावरकरांच्या पुस्तकांच्या निमित्तानं परिचयात आलेला हा माणूस ते नांदेडला मोरे सरांच्या घरी माझ्या खांद्यावर हात टाकून फाळणीसारख्या गहन विषयावर चर्चा करणारा माणूस. हा प्रवास मोठा विलोभनीय होता. मोरे सर आम्हाला नावानी ओळखतात, आणि इतक्या जवळच्या परिचयातला हा प्रचंड माणूस आज विश्व  साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला आहे. अंदमान येथे होणाऱ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शेषराव मोरे सरांपेक्षा दुसऱ्या  माणसाचं नाही ह्या सारखा आनंद नाही.
शेषराव मोरे सरांच्या व्यासंगाचा आणि बुद्धीवादाचा सर्व वारसा हा नरहर कुरुंदकरांचा आहे. हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण मोरे यांच्यावर तितकेच संस्कार पु. ग. सहस्रबुद्धे यांचेसुद्धा आहेत. याचा अर्थ असा आहे की मुळातले संस्कार हे प्रचंड व्यासंगाचे, बुद्धीवादाचे आहेत. तर्कशास्त्र, विवेकनिष्ठा यांची लेबलं लावून मिरवण्याची समाजवाद्याप्रमाणे पु. ग. सहस्रबुद्धे यांनाही गरज वाटत नव्हती. तशीच ती शेषराव मोरे यांनाही वाटत नाही. कुरुंदकर विचारांनी समाजवादी होते. सहस्रबुद्धे विचारानी हिंदुत्वनिष्ठ होते. या दोघांच्याही विचारांची अडचण मोरे यांना कधीही वाटली नाही. कुरुंदकरांच्या हिंदुत्वाबद्दलच्या विचारांवर मोरे सरांनी टीकाही केलेली आहे. गुरु मानला म्हणून त्याचा भक्त होण्याची गरज नसते. एक जबरदस्त शब्द मी अभ्यासाच्या काळात शिकलो. मी - तो म्हणजे ‘चिकीत्सक भक्तीभाव.’ भक्ती असावी पण ती अंध नसावी, चिकित्सा करण्याची तयारी ठेवून भक्ती ठेवता येते. दुसऱ्या बाजूला चिकित्सक आहे म्हणून कोणाचाच मुलाहिजा ठेवत नाही. याचीही गरज नाही असा ‘चिकित्सक भाविक’ म्हणजे शेषराव मोरे आहेत.
काही कारणांनी मी नांदेडला गेलो होतो. शेषराव मोरे यांच्याशी परिचय झाला तेव्हा मला कुरुंदकर अजिबात माहिती नव्हते. पण आम्ही शेषराव मोरे यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. शेषराव मोरे यांचं घर म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. वाचनाचं / पुस्तकांचं वेड असणाऱ्या माणसांसाठी ते  घर म्हणजे गंगा आहे. घराचं सुसंस्कृत पण ओळखण्याची एक पद्धत मला सरांनी शाळेत सांगितली होती. शाळेतले सर म्हणायचे की एक वेळ घरी देवघर नसलं तरी चालेल पण घरात पुस्तकं किती यावरून घराचं सुसंस्कृतपण ओळखायचं असतं. मोरे सरांच्या घराच्या भींतीच दिसत नाहीत. सर्व भिंती फक्त पुस्तकांच्या कपाटांनी भरलेल्या आहेत. त्या कपाटांमध्ये पुस्तकांव्यतिरिक्त काहीही नाही. बहुसंख्य हिंदू ज्या बाबतीत अडाणी आहेत. तसं असण्यात ते धन्यता मानतात अशा फक्त ‘इस्लाम’ या विषयावरची मोरे सरांकडे साडेपाचशेपेक्षा जास्त पुस्तकं आहेत. मोरे सरांनी लिहिलेली पुस्तकं नंतर वाचू! पण त्यांच्या घरातली पुस्तकं. घरी पुस्तकं बाजूला काढून बसायला जागा करावी लागते. ती पुस्तकं पाहून झाल्यावर त्यांनी आम्हाला त्यांची अभ्यास करायची पद्धत सांगितली. ‘आपण काय विवेकानंद नाही की एक पुस्तक आपल्याला एका वाचनात कळेल. त्यामुळे एक पुस्तक मी किमान तीन वेळेला वाचतो. अशा वाचनानीच तुम्हाला Between the lines लक्षात येतात. ते एका वाचनाने लक्षात येत नाही.’ असं फक्त गांधीजींनी आणि काँग्रेसने अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाच्या शेवटी साडेतीनशे पुस्तकांची सूची आहे. संदर्भग्रंथ सूची. व्यासंग म्हणजे काय असतं? याच्यापेक्षा वेगळं काय असतं. माझ्या मनात कुरुंदकर आणि शेषराव मोरे यांच्यासाठी सतत एकच उपमा येते. हे दोघंही आधुनिक भारतातले ऋषी आहेत. ज्यांनी मूर्तीमधला देव मानला नाही. त्यांनी केवळ व्यासंग केला. केवळ नवीन विचार देऊन ते थांबले नाहीत. मुळातून विचार करावा कसा हे सांगणारे दोन आचार्य. कुरुंदकर आणि मोरे. विचारांची झिंग ज्या माणसांना चढली आहे त्यांनी एकदा तरी या दोघांच्या वाटेला जावं.
कुरुंदकरांना आयुष्य फार मिळालं नाही. त्यांची उणीव मोरे यांनी निश्चित भरून काढली आहे. कुरुंदकरांच्या सर्व विषयांची अधिक खोलातली मांडणी म्हणजे मोरे यांचे विषय आहेत. मला तर वाटतं की कुरुंदकरांचं फक्त जागर - शेषराव मोरे आहेत. कुरुंदकरांचं इस्लाम आणि भारतातला सेक्युलॅरिझम याबद्दलचा जागरमधला लेख म्हणजे मोरे यांचं ‘मुस्लिम मनाचा शोध’ ज्या एका विषयावर संपूर्ण भारतात प्रचंड चर्चा झालीच पाहिजे. असा हा विषय आहे. ‘इस्लामचा अभ्यास’ गेली हजार वर्षं या देशावर इस्लामचं राज्य होतं. इतका दीर्घकाळ या देशात मुसलमान राहत आहेत तरीसुद्धा आपल्याला इस्लाम म्हणजे काय हे कळलं का? नाही कळलं? नाही कळलं! या सतत होणाऱ्या आक्रमणाचा अर्थ आम्हाला नाहीच कळला म्हणून आम्ही सतत हजार वर्ष हारत गेलो. आम्ही इस्लाम म्हणजे काय? त्याची समाजव्यवस्था कशी आहे, त्याचं राजकारण कसं आहे कुराण म्हणजे काय? हादिस म्हणजे काय? शरिया म्हणजे काय? हे आम्हाला माहिती नाही आणि तरी आम्ही एकोप्याने राहू हा आग्रह चुकीचा आहे. ‘इस्लाम’ प्रथमत: आपण समजून घ्यावा आणि आपल्याला नीट समजल्यावर इतरांना समजून सांगावा ही स्पष्ट भूमिका ‘मुस्लिम मनाचा शोध’ घेण्यामागची आहे. असा इस्लाम तुम्हाला समजल्यानंतर सेक्युलॅरिझमची मूळ व्याख्या काय याची चर्चा ‘मुस्लिम मनाचा शोध’मध्ये आहे.
आपण मूळ विषयालाच हात घालूया ‘मुस्लिम मनाचा शोध’ चं वेगळेपण काय आहे? हिंदुत्ववादी इस्लामच्या विरोधातच फक्त बोलतात. समाजवादी आणि मुसलमान केवळ इस्लामच्या बाजूने बोलतात. या दोघांच्याही बोलण्यात कधीच न येणारा असा काही इस्लाम आहे जो कधीच सांगितला जात नाही, हिंदूत्ववादी सांगतात तो इस्लाम केवळ धर्मांध, हिंस्त्र, आक्रमक आणि समाजवादी आणि मुसलमान सांगतात तो अहिंसक, प्रेमळ, सहिष्णु असा इस्लाम मुळातला प्रश्‍न आहे की या दोन्हीही परस्परविरोधी गोष्टी एकावेळेला कशा काय अस्तित्वात असू शकतात? तर अस्तित्वात आहेत.
महम्मद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना मक्केमध्ये केली. सुरुवातीची अनेक वर्षं फार थोडे अनुयायी होते आणि ह्या काळातल्या कुराणमधल्या आयातींमध्ये परधर्मसहिष्णुता, अहिंसा ही तत्त्व निश्चित आहेत. पुढे इस्लामच्या प्रसाराला अडथळा येतो आहे या कारणामुळे महंमद पैगंबर आपल्या थोड्या अनुयायांसह मदिनेला गेले. ‘हिजरत’ करून मग मदिना काळ सुरू होतो. या काळातल्या आयाती थोड्या आक्रमक होतात. इस्लामच्या दृष्टीने मक्केपेक्षा मदिनेत जास्त अनुयायी मिळाले ताकद वाढली आणि म्हणून आक्रमकपणा वाढला. आयातींमध्ये फरक आला. पैगंबर मदिनेहून पुन्हा मक्केला आहे. भरपूर अनुयायी आणि ताकद घेऊन ते मक्केत आले आणि अहिंसा सहिष्णुता संपली. पुन्हा मक्केत आल्यानंतर पैगंबरांनी स्वत:च्या हातांनी कारागृहातल्या साडेतीनशे मूर्ती फोडल्याचे पुरावे आहेत. सर्वच प्रकारच्या आयाती कुराणात आहे. कोण कोणत्या आयाती मनात यावर त्याचा ‘आक्रमकपणा’ अवलंबून आहे.
एका हिंदू माणसानी परधर्माचा इतका विस्तृत अभ्यास करून इतका समतोल ग्रंथ निर्माण करणं हे आश्चर्य आहे. मुस्लिम मनाचा शोधमध्ये काढलेले निष्कर्ष भारतातल्या मुसलमानांनीसुद्धा गौरवलेले आहेत. मुस्लिम पंडितांनी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना मूळ ग्रंथाइतकीच वाचनीय आहे. मुस्लिम मनाचा शोध चा पुढचा भाग म्हणावा असा ग्रंथ म्हणजे ‘चार आदर्श खलिफा’. या विषयावर तर स्वतंत्र अभ्यासपूर्ण ग्रंथ संपूर्ण भारतात कोणीच लिहिला नाही. कुराण आणि हादिस इतकीच मुसलमानांना प्रेरणा देणारी दुसरी गोष्ट म्हणजे चार आदर्श खलिफांचा काळ तो इस्लामच्या इतिहासातला सुवर्णकाळ मानला जातो.
केवळ इस्लामच्या अभ्यासासाठी शेषराव मोरे ‘उर्दू’ शिकले. कुराण आणि हादिसच्या विस्तृत आणि गहन अभ्यासासाठी अरबी लिपी शिकले. या गोष्टी वाचताना टिळकांची सतत आठवण येत राहते. गीतारहस्याच्या लिखाणासाठी टिळक मंडालेमध्ये पाली, ब्राह्मी, जर्मन इत्यादी भाषा शिकले. व्यासंग याला म्हणतात. या प्रचंड व्यासंगाचा परिणाम म्हणजे मोरे यांच्या इस्लामवरच्या निष्कर्षांना संपूर्ण भारतात कोणीही आव्हान देऊ शकलेले नाहीत. यासारखीच गोष्ट ‘अखंड भारत का नाकारला?’ ची आहे. केवळ राज्यघटना आणि कायद्याचा अभ्यास असावा यासाठी मोरे यांनी एल्.एल्.बी. केलं. त्या अभ्यासातून पडलेले काही निवडक मूलभूत प्रश्न घेऊन त्यांनी अभ्यास सुरू केला आणि अचानक एक दिवस महाराष्ट्रात ‘फाळणी’ आवश्यकच होती! या विषयावर चर्चा सुरू झाल्या. ‘मुस्लिम मनाचा शोध’ प्रमाणे ‘अखंड भारत’ मधल्या निष्कर्षांना भारतात कोणीही  चॅलेंज करू शकलेलं नाही. यामागचं मुख्य कारण व्यासंगात तर आहेच. पण प्रत्येक वाक्याला पुरावे द्यायची त्यांची जी पद्धत आहे त्यामुळे त्यांना विरोध करणारे निर्माणच होत नाहीत. एकेका वाक्याला दहा दहा पुरावे ते देतात. त्यांची व्याख्यानं ऐकण्याची वेळ कधी आली तरी भाषणाचं स्वरूप तेच असतं. भाषण सुरू केल्यावर ते म्हणतील की पुढे जे जे सांगीन ते माझे विचार नाहीत ते खुद्द बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. पुस्तकाचे नाव, आवृत्ती, त्याचा पान क्रमांक इत्यादी सर्व तपशिलांसह ते पुरावे देतात. अशाला कोण विरोध करेल? कसा विरोध करेल?
ज्याप्रमाणे इस्लाम आणि फाळणी त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची त्यांनी सर्वस्वी वेगळे तर्कशुद्ध, शास्त्रीय निकष काढले आहेत. जे बाबासाहेब कालपर्यंत दलितांचे, बहुजनांचे नेते होते, राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्या विशेषणांमध्ये अचानक राष्ट्रवादी बाबासाहेब आंबेडकर या विशेषणाची भर पडली. आंबेडकरांइतके राष्ट्रवादी सावरकरसुद्धा नव्हते. १८५७ हा उठाव आहे की स्वातंत्र्यसमर आहे की जिहाद आहे, या विषयात स्वत: सावरकरही चुकले आहेत हे सांगण्याची बौद्धिक ताकद सध्या महाराष्ट्रात फक्त शेषराव मोरे यांच्याकडे आहे. त्यांचे १८५७ बद्दलचे निष्कर्ष असेच वेगळे आहेत. त्यांचे सावरकरांबद्दलचे निष्कर्ष असेच वेगळे आहेत. हिंदूत्वाबद्दल, हिंदूधर्माबद्दल, सेक्युलॅरिझमबद्दल महाराष्ट्रातील जातीय तेढ याबद्दल आणि ब्राह्मण द्वेष पुरोगामित्वाला बाधक ठरले का याबद्दलही! या सर्व निष्कर्षांची बिजे आपल्याला कुरुंदकरांच्या लेखनात दिसतात इस्लामप्रमाणे काश्मीर प्रश्नावरही त्यांचे विचार असेच परखड आणि तर्कशुद्ध आहेत.
सावरकरांच्या दोन मूळ पुस्तकांप्रमाणेच मोरे सरांनी, काश्मीर प्रश्‍नावर पुस्तक १९९५ साली लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या निर्मितीसाठी मोरे १९९४-९५ साली काश्मीरचा दौरा करून आले. दिल्ली विद्यापीठ, काश्मीर विद्यापीठ, संसदेचे प्रचंड ग्रंथालय येथून त्यांनी काश्मीर प्रश्‍नाचा अभ्यास केला. तर दर शुक्रवारी लाल किल्ल्यासमोर भरणारी पुस्तकांची दुकानं यातून दुर्मिळ दुर्मिळ ग्रंथ विकत आणून त्यांचा सखोल आणि चिकीत्सक अभ्यास करून काश्मीर एक शापित नंदनवन हे त्यांनी लिहिलं. काही वेळेला हे पुस्तक ‘अराष्ट्रीय’ वाटतं पण लेखन करताना जे सत्य असेल ते सांगितलंच पाहिजे, हे तत्त्व आहे. काश्मीरवरचा भारताचा दावा बेकायदेशीर आहे का अशी शंका उत्पन्न व्हावी  असा एकूण पुस्तकाचा सूर आहे. पण पुन्हा एकदा व्यासंग हा गुण त्यातूनही घेण्यासारखा आहे. या पुस्तकाचे निष्कर्ष बाकीच्या सर्व पुस्तकांप्रमाणेच सर्वस्वी भिन्न आणि वेगळे आहेत. या पुस्तकाच्या निमित्त बरीच उलट- सुलट चर्चा झाली पण अजून पर्यंत कोणीही त्यातील निष्कर्ष खोडून काढू शकलेलं नाही.
भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ मिळालं अचानक त्यांच्या पुस्तकांचा खप वाढला. ‘कोसला’ या एका पुस्तकाच्या एका दिवसात ५०० पेक्षा जास्त प्रति एकट्या पुण्यात खपल्या तोच मान आता शेषराव मोरे यांनाही मिळावा त्यांचीही पुस्तक भरपूर वाचली जावी त्या निमित्ताने एक सुसंस्कृत आणि बौद्धिक चर्चा महाराष्ट्रात पुन्हा सुरू व्हावी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे! साहित्य क्षेत्राला आणि रसिकांना चांगले दिवस आले असं म्हणायला हरकत नाही.
व. पु. काळे एकदा म्हटले होते की प्रत्येक पिढी एक भाग्य घेऊन जन्माला येते. त्याचबरोबर आपल्या जन्माच्या आधीच्या काही आनंदाला ती मुकलेली असते. नरहर कुरुंदकर या ऋषीला आम्ही पाहू शकलो नाही याचं दु:ख बाळगायचं की शेषराव मोरे यांचा जिव्हाळ्याचा परिचय लाभला याचा आनंद मानायचा? ही गुरु शिष्य परंपरा सुरू राहिली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे.
लेखकाची पुस्तके१) मुस्लिम मनाचा शोध२) काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?
३) प्रेषितांनंतरचे चार आदर्श खलिफा४) सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास५) सावरकरांचा बुद्धीवाद : एक चिकित्सक अभ्यास६) १८५७ चा जिहाद७) काश्मीर : एक शापीत नंदनवन८) अप्रिय पण (भाग १ व २)
९) विचार कलह (भाग १ व २)
१०) बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार

Thursday, 7 May 2015

ब्राह्मण - ब्राह्मणेतर संघर्ष, संघर्षाचा बळी - समर्थ रामदास - भाग - २

समर्थ रामदास - संत तुकाराम - छत्रपती शिवाजी महाराज 

चिखलफेख हा शब्द सुद्धा छोटा वाटावा इतकी गलिच्छ टीका रामदास स्वामींवर होते. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, रामदास स्वामी - शिवाजी महाराज भेटीचे कोणतेही पुरावे नाहीत. उलट एक पत्रात स्वामी राजांना 'प्रसंग नसता लिहिले | माफ केले पाहिजे' असं म्हणतात याचा अर्थ रामदास स्वामींचे कोणतेतरी गंभीर गुन्हे असले पाहिजेत आणि म्हणून रामदास स्वामींच्या अस्तित्वाची महाराजांच्या इतिहासात गरज नाही अश्या प्रकारचा 'प्रती इतिहास' हल्ली जोमात आहे. तुकाराम महाराज आणि शिवाजी राजे यांची भेट झाल्याचा (बनावट) पुरावा ब्रिगेड आणि तत्सम गटांकडून दिला जातो. तुकाराम महाराजच शिवाजी राजांचे गुरु होते हेही मोठमोठ्यानी सांगितला जातं. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा ऐतिहासिक समकालीन विश्वसनीय पुरावा उपलब्ध आहे, पण समजा शिवाजी महाराज  आणि समर्थ रामदास यांची भेट झाली नसती तरी त्यामुळे दोघांच्याही मुल्यामापानामध्ये काय फरक पडतो? भेट झाली नाही म्हंटल तरी रामदास स्वामी कुठेतरी कमी पडले असा त्याचा अर्थ होत नाही. १६७२ साली रामदास स्वामींच राजांना पत्र आहे आणि प्रत्यक्ष भेट १६७६ मध्ये झालेली आहे. ती भेट कधीच झाली नसती तरी त्यांनी काय फरक पडला असता? फरक पडतो यांनी कि शिवाजी रामदास भेटीमध्ये शिवाजीला देण्यासारख रामदास स्वामींकडे काय होत? रामदास स्वामींकडे शिवाजी राजांना देण्यासारखा काहीतरी होता हे जर मान्य केला तर प्रत्यक्ष भेट झली किंवा नही हा मुद्धा निकालात निघतो. 

समकालीन दस्त ऐवजांमध्ये शिवाजी रामदास भेटीचे जसे पुरावे आहे तसे आज पर्यंत झालेल्या संशोधनामध्ये महाराष्ट्रातील सामाकालीन पुराव्यांमध्ये शिवाजी राजे आणि संत तुकाराम यांच्या प्रत्यक्ष भेटीचे पुरावे नाहीत. पण मूळ मुद्धा तोच आहे. अशी प्रत्यक्ष भेट झाली नाही म्हणून तुकारामाच्या मूल्यमापनात कमीपणा राहतो असं काही मानायचं कारण नाही. समजा हि भेट झाली असती तर तुकारामांनी शिवाजीला काय सांगितल असत? तुकाराम म्हाराजांच साहित्य रामदास किंवा एकनाथ महाराजांप्रमाणे स्वराज्याच्या कल्पनेनी झपाटलेल्याचे साहित्य आहे का? एक 'पायीकांचे अभंग' जर सोडले तर तुकारामांचं सर्व साहित्य मोक्ष, भक्ती यांनीच भरलेलं आहे. तुकाराम महाराजंचे प्रपंचाविषयीचे विचार सर्वाना माहिती आहेत. तरीही पुन्हा हे काही तुकाराम महाराजांचं कमीपण नाहीये. 

प्रत्यक्ष भेट झाली असती तर रामदास स्वामींनी शिवाजी राजांना काय सांगितलं असत? आणि तुकाराम महाराजांनी काय सागितलं असतं? आणि ते सांगणं शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला पूरक राहिलं असत का? 

या मुद्द्याचं अतिशय योग्य विश्लेषण श्री. म. माटे यांनी आपल्या 'श्री रामदास स्वामी यांचे प्रपंचविज्ञान' या प्रबंधात केला आहे. शिवाजी राजांना वैराग्याची ओढ होती, अश्या एक वैराग्याच्या क्षणी शिवाजी राजांनी तुकाराम महाराजांना लिहिले कि, 'मला आपले शिष्य करून घ्या' यावर तुकाराम महाराजांनी कळवले कि, 'मी तुला जवळ करणे योग्य होणार नाही.' आपल्या सानिध्यात शिवाजीच्या आयुष्याचा जीवनहेतू करपून जाईल हे तुकाराम महाराजांना कळत होतं. गृहस्थाश्रमाबद्दल तुकाराम महाराजांचे काय मत आहे हे सर्वाना माहिती आहे. अशावेळी आपणहून एक माणूस गृहस्थाश्रम सोडून आपण सांगितलेल्या मार्गांनी येऊ म्हणतोय हे काळात असताना शिवाजीचं जीवनधेय्य काय आहे हे ओळखून त्याला आपल्यापासून दूर ठेवणेच योग्य होईल हा विवेक तुकाराम महाराजांनी दाखविला हे तुकारामांचं मोठेपण आहे. अशाच एका वैराग्याच्या क्षणी शिवाजी राजांनी धन-दौलत, घोडे असं तुकारामांना पाठवलं, ते तुकाराम महाराजांनी  सन्मानपूर्वक परत पाठवलं. ''आम्ही काय दर्शनीय आहोत का? माझे अंग धुळीने माखलेले आणि चिरण्या पडलेले आहे तुमच्याचानी बघवणार नाही. या पालखीला आणि हत्ती घोड्यानाही मी शोभणार नाही'' असाही एक पत्र उपलब्ध आहे. या पत्राच्या सत्यतेविषयी शंका आहे. तुकारामांनी नुसते, मी तुझा गुरु नाहीं असे म्हंटले नाही तर शिवाजीला रामादासांची वाटही तुकाराम महाराजांनीच दाखविली असाही श्री. म. माटे म्हणतात. माटे यांच्या पुस्तकात तुकाराम आणि रामदास  यांची भेट झाल्याचाही पुरावा देण्यात आला आहे. तुकाराम महाराज चाफाळास गेले होते, रामदास देहु येथे गेले होते. अशी माटे यांनी लिहिलेलं आहे. 

गुरु-शिष्यांची किंवा मूळ प्रेरणा सारख्या असलेल्या दोन माणसांच्या प्रत्यक्ष भेटी झाल्याच पाहिजेत याची काहीही गरज नाही. नरहर कुरुंदकर यांनी एका भाषणात म्हंटल होता कि गांधीजींच्या किंवा डॉ. आंबेडकरांच्या शब्दावर विश्वास ठेवून लाखो माणसं चळवळीत उतरली त्या सर्वांची गांधीजींशी किंवा आंबेडकरांशी प्रत्यक्ष भेट झाली होती असं मानायचं काही कारण नाही. मूळ संबंध प्रेरणांचा असतो, तोच मुद्दा शिवाजी महाराज-संत तुकाराम- समर्थ रामदास यांचा लागू आहे. 

रामदास स्वामींवरचे मुख्य आक्षेप - 

रामदास स्वामींवर होणाऱ्या मुख्य एक-दोन आक्षेपांवर आज लक्ष देऊया. या आक्षेपांची मुख्य कारणं फक्त जातीयतावादामुळे भ्रष्ट झालेल्या मेंदूंत आहेत. केवळ ब्राह्मण जातीत जमाल आहे म्हणून रामदास स्वामींवर कोणत्या पातळीवर जाऊन टीका होते ते जरा बघा. हि टीका शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान करते आहे. प्रती इतिहासकार मां. म. देशमुख यांची अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. ती पुण्यात केवळ 'साधना साप्ताहिकाच्या' ग्रंथालयात मला पहायला मिळाली. (हा योगायोग आहे का?) त्यात देशमुख म्हणतात कि लग्नाच्या बोहोल्यावरून पळून जाणारा माणूस आठ स्त्रियांशी लग्न करणाऱ्या माणसाचं गुरु कसा असू शकेल, गुरूने शिष्यपेक्षा जास्त लग्न केलेली असली पाहिजेत. हा विनोद नाही. हा मा. म. देशमुख नागपूर ला एका कॉलेजमध्ये इतिहासाचा विभागप्रमुख आहे. लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेल्यामुले एका स्त्रीचं आयुष्य संपूर्ण बरबाद झालं, धड ती विधवा नाही, तिचा पुन्हा विवाह होऊ शकत नाही अशा अवस्थेत ती आयुष्यभर राहिली, म्हणून रामदास आदर्श असू शकत नाही. हा मी विनोद सांगत नाही. देशमुखांच्या पुस्तकात आहे हे. बोहोल्यावरून पळून गेलेला रामदास आदर्श असू शकत नाही हे रामदास स्वामींचा मूल्यमापन आहे का?  कोणत्याही पुरुषानी लग्नाच्या समयी आपल्या पत्नीला असं वचन दिलेलं असत कि दुखाच्या प्रसंगी साथ सोडणार नाही तसं वाचन शिवाजी राजनीही सईबाईंना दिलेलं असणार. हा प्रश्न फक्त वैदिक संस्कारांचा नाही. हा नैतीकतेचाही प्रश्न आहे. पण अफझलखानाशी लढायला जाताना सईबाई आजारी असतात, आणि मोहिमेवर असताना त्यांचा मृत्यू होतो. ह्या प्रसंगी देशमुखांच्या दृष्टीने  शिवाजी राजांनी सईबाईंवर अन्याय केला नाही का? रामदास स्वामी लग्नाच्या आधीच पळून गेले गौतम बुद्ध मध्यरात्री स्वतःचा मुलगा आणि लग्नाची बायको या दोघांनीही सोडून गेलेला आहे. हे काय माणसांचे मूल्यमापन करण्याचे मुद्दे आहेत का? दुर्दैव असं आहे कि हे महाशय प्राध्यापक होते, किती पिढ्यांना असा इतिहास शिकवला गेला असेल देव जाणे. 

असाच अजून एक विनोदी, तितकाच वेदनादायक आक्षेप मला या देशमुखांच्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळाला. ते म्हणातात कि रामदास स्वामींनी शिवाजी राजांकडे उपभोगासाठी स्त्रियांची मागणी केली. शिवाजी राजांनी आठ स्त्रियांची व्यवस्था केली आणि  म्हंटले कि यातून एकीची निवड करा. त्यावर रामदासांनी आठही स्त्रियांची मागणी केली, आणि राजांनी ती पुरवली.
यात प्राध्यापकांच्या हे लक्षात आलं नाही का कि आपण रामदासांवर टीका करण्याच्या नादात आपण शिवाजी राजांना दलाल केलत?? ह्या प्रकारचा विचार कोणताही मराठी माणूस करू शकत नाही. पण हे प्राध्यापक महाराष्ट्राला असं शिकवत आहेत. 

समारोप -  

महाराष्ट्रात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दोन्हीही पक्ष वैयक्तिक मालमत्तेची दावेदारी असल्यासारखं गेले १०० वर्ष हा वाद लढात आहेत. पूर्वी कदाचित त्याला बौद्धिक आधार असेलही आज हा लढा केवळ जातीद्वेष, जातीभेद एवढाच शिल्लक आहे. त्याचा बौद्धिक पाया पार ढासळला आहे. हा रस्ता केवळ विनाशाकडे जातो. हा वाद चुकीच्या पायावर उभा आहे. हा वाद संपलाच पाहिजे. रोज फेसबुक वर प्रचंड आक्रमक चिखलफेक पहायला मिळते याचा अर्थ मला असा दिसतो कि ब्रिगेडी संघटना विष पेरण्यात यशस्वी झाल्या आहेत. हि बाब अतिशय गंभीर आहे. फुले, शाहू, आंबेडकरांनाही चळवळीच हे आक्रमक स्वरूप मान्य झालं नसतं. आपल्या राष्ट्रपुरुषांच्या धेय्यवादाचा पहिला पराभव आपण अनुयायांची केला.          


संदर्भ -

१. श्री रामदास स्वामींचे प्रपंच विज्ञान - श्री. म. माटे - कॉंन्टिनेंटल प्रकाशन 
२. छत्रपती शिवाजी महारज जीवन रहस्य - नरहर कुरुंदकर - देशमुख आणि कंपनी 
३. श्रीमान योगी या ग्रंथाची प्रस्तावना - नरहर कुरुंदकर  

Monday, 27 April 2015

ब्राह्मण - ब्राह्मणेतर संघर्ष, संघर्षाचा बळी - समर्थ रामदास - भाग - १

साधारणपणे असं म्हंटल जातं कि महत्मा फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक चळवळीच रुपांतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामध्ये झालं. आपण सुरु केलेल्या सामाजिक, आर्थिक समतेच्या लढ्याचं रुपांतर अशा जातीय वादामध्ये व्हावं असं फुल्यांना कधीच वाटलं नसेल. पण ते झालं. महाराष्ट्रातल्या सर्व पुरोगामी संघटनाची या वादाला ब्राह्मणेतरांच्या बाजूनी सहानुभूती असते असं, म्हणणं फार वावगं ठरणार नाही. किमान पुरोगामी संघटना आपली लढाई विचारांनी असल्याचं प्रतिपादन करतात, तसं गेल्या काही वर्षात वातावरण राहिलेलं नाही. ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद हा गेल्या काही वर्षात विचारांची लढाई राहिलेला नाही. मूलनिवासी, ब्रिगेडी, मराठा सेवा संघ प्रणीत संघटनांनी ह्या वादाला जबरदस्त आक्रमक रूप दिलं आहे, खतपाणी घातलं आहे. ह्या आक्रमक वादाला वैचारिक पाठबळ देणारे इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ सुद्धा विपुल प्रमाणात आहेत. ह्या संघर्षाच एक रूप शिवाजी रामदास ह्या मुद्द्यावर येतं. विचारांची लढाई विचारांनी व्हावी असं म्हणणाऱ्या संघटनांकडून अतिशय गलिच्छ शब्दात रामदासांवर टीका होत असते. पातळी सोडून टीका सुरु आहे. ह्या वादाला काही वैचारिक पायबंद घालण्याचा हा प्रयत्न आहे. (सर्व ठिकाणी केलेला एकेरी उल्लेख त्या व्यक्तीबद्दलचा अनादर किंवा द्वेष व्यक्त करतोय असं चुकूनही समजू नये)

संघर्षाच कारण काय? 

रामदास शिवाजीचा गुरु होता का नव्हता हा वाद नेमका कधी सुरु झाला, हे कोणालाही माहिती नाही. कोणी सुरु केला हेही कोणाला माहिती नाही. इतिहासनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले काही रामदासपंथीय लोकांनी शिवाजीच्या सर्व कार्यामागे रामदास उभे होते असं प्रतिपद साधारणपणे १८ व्या शतकाच्या मध्ये केलं. रामदास स्वामी शिवाजी राजांचे राजकीय, आर्थिक गुरु होते असं प्रतिपद केलं गेलं. हे रामदासपंथीय कोण होते, त्याचं ऐतिहासिक योगदान काय होतं, त्याचं कर्तृत्व काय होतं. त्यांनी नाव काय होती, हे सुद्धा कोणीही लक्षात ठेवलेलं नाही. कोणालाही त्याची गरज वाटलेली नाही. रामदासपंथीय म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यानंतर जवळ जवळ १०० वर्ष वाद सुरु आहे. हि गोष्ट अगदी खरी आहे कि ह्या भूमिकेमुळे शिवाजी हा कर्तृत्वशून्य राजा ठरतो. हे ऐतिहासिकदृष्ट्या शिवाजीच योग्य मूल्यमापन होणार नाही. 

संघर्षाचं मूळ अस्तित्व आहे का?

संपूर्ण ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद हा एक अज्ञानावर उभा आहे. एक चुकीची गोष्ट घडली असं दोघेहीजण गृहित धरतात, आणि घडलं ते बरोबर असं एकाच म्हणणं आणि घडलं ते चुकीच असं दुसऱ्याचं म्हणणं. ब्राह्मणेतरांचं म्हणणं असतं कि ब्राह्मण समाजानी सर्व ज्ञान आपल्याकडे कोंडून ठेवलं. त्यामुळे सर्व समाज अज्ञानामध्ये पडला आणि म्हणून ब्राह्मणांचा द्वेष केला तर ते समर्थनीय आहे. दुसऱ्या बाजूला ब्राह्मणांनाही असं वाटतं कि जगातल्या सर्व ज्ञानाचे आपण धनी आहे. सर्व ज्ञान खरच फक्त आपल्यकडे आहे. सर्व ज्ञान ब्राह्मणांकडे आहे हेच मुळात अज्ञान आहे हे दोघेही जण गृहीत धरून भांडत आहेत. कोणीही असा  विचार केला नाही कि कोंडून ठेवायला ब्राह्मणांकडे कोणतं ज्ञान होतं. आधुनिक शेतीच ज्ञान होत का? कलांच ज्ञान होता का? विज्ञान तंत्राज्ञानच ज्ञान होता का? देशाचं संरक्षण कसं करावं हे ज्ञान होता का? अंतरराष्ट्रीय राजकारणाचा ज्ञान होतं का? आधुनिक अर्थशास्त्राच ज्ञान होता का? ब्राह्मणांनी कोंडून ठेवलेलं ज्ञान श्राद्धपक्षाच आणि लग्न मुंजीत आणि सत्यनारायणाच्या पूजेत मंत्र कोणते म्हणायचे हे जे ज्ञान आहे तेवढ आणि तेवढच ज्ञान ब्राह्मणांनी कोंडून ठेवलं होता. हे कोंडून ठेवलेलं ज्ञान कोणत्याही संघर्षाशिवाय त्यांनी समाजाला उघडं करून दिलं असत, तर आमच्या समाजाची मानसिक गुलामगिरी दूर करण जस अवघड गेलं असत. ब्राह्मणवर्ग हे ज्ञान सहजासहजी  उघडं करून द्यायला  अनुकूल  नव्हता म्हणून महाराष्ट्रात प्रबोधनाची सुरवात झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद हा मुळात चुकीच्या मुद्द्यावर उभं आहे. चुकीचा मुद्दा बरोबर आहे असं गृहीत धरून दोन्हीही पक्ष कित्येक वर्ष भांडत आहेत. जो संघर्ष मुळात अस्तित्वात असण्याचं कारण नाही, तो संघर्ष जाणूनबुजून सुरु ठेवलं जातो आहे. दोन्हीही बाजूनी. 

'एतद्देषीयांच राज्य असावं' हि मूळ प्रेरणा -

हिंदुंच राज्य या ऐवजी आपण एतद्देशियाचं राज्य असं म्हणूया. या देशावर राज्य करत असलेली परकी राज्यव्यवस्था नष्ट व्हावी आणि एतद्देशीय परंपरांच रक्षण करणारी राज्यव्यवस्था निर्माण व्हावी आणि राज्यकर्ता व्हावी हि मूळ प्रेरणा संत एकनाथ महाराजांची आहे. एतद्देशियाचं राज्य निर्माण व्हावं हि भूमिका शिवाजी राजांच्यापूर्वी महाराष्ट्रात फक्त एकनाथ महाराजांची. बाकीचे सर्व संथ भक्ती, मोक्ष अर्थात निवृत्तीमार्गी होते. एकनाथ महाराजांनंतर प्रवृत्तीमार्गी अध्यात्म सांगणारे दुसरे संत रामदास आहेत. रामदास स्वामींच वाड़मय हिंदूराष्ट्राच्या प्रेरणेनी झपाटलेल वाड़मय आहे. सुखद योगायोग हा कि रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज एकमेकांना समकालीन आहे. समान भूमिका घेऊन राजे उभे राहिलेले आहेत. तू हिंदू धर्माच्या प्रेरणेचे राज्य निर्माण कर असं रामदास स्वामी शिवाजीला कधीही सांगायला गेले नाहीत. शिवाजी राजेही रामदासांना मी हिंदुंच राज्य निर्माण करू का हे विचारायला गेले नाहीत. दोघांचही धेय्य समान होतं, ते एकमेकांना समजून देण्याची गरज नव्हती. हे ध्येय जनतेला समजून देण्याची गरज होती. हे उदात्त ध्येय जनतेला समजवून देण्याच काम रामदास स्वामी करत होते का नाही हि खरा महत्वाचा मुद्दा आहे. ते शिवाजी राजांचे गुरु होते किंवा नव्हते हा गौण मुद्दा आहे. 

कर्तृत्वाच्या भिन्न कक्षा - 

अज्ञात रामदासीपंथीयांनी मांडलेल्या भूमुकेचा एक अर्थ असा निघतो कि प्रत्यक्ष राजकारणाचे धडे शिवाजी राजांनी समर्थ रामदास स्वामींकडून घेतले. व्यावहारिक राजाकारणाची इतकी मोठी तज्ञता जर रामादासांकडे होती, तर त्यांनीच राज्य निर्माण का केला नाही? या भूमिकेमुळे शिवाजीचं कर्तृत्व शून्यवत ठरत. रामदासीपंथीयांनी केलेली हि वैचारिक गफलत आहे असं माझं मत आहे. लढावं केव्हा, कुठे, लढताना पवित्रे कोणते घ्यावेत, गनिमी काव्यांनी लढाव कि प्रत्यक्ष मैदानात ह्याचा तज्ज्ञ शिवाजीच होता ह्याचा तज्ज्ञ काही रामदास  नव्हता. पण लढावं कश्यासाठी याचा तज्ज्ञ रामदास होता. एतद्देशियाचं राज्य यावं हि प्रेरणा जनतेत निर्माण करण्याच काम महाराष्ट्रीय संतांच होता ते काम फक्त रामदासांनीच केलं. या दोघांच्याही कर्तृत्वाच्या कक्षा वेगवेगळ्या आहेत. एकानी दुसऱ्यावर अधिकार सांगण्याच काही कारण नाही. ह्या परस्परपूरक अशा कक्षा आहे. 

एतद्देशीयांच राज्य निर्माण झालं पाहिजे हि प्रेरणा जनतेत निर्माण करण्याची गरज होती. हि प्रेपणा शिवाजीला समजून देण्याची गरज नव्हती. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे १६७२ सालचं रामदास स्वामींच शिवाजीला लिहिलेलं पत्र. दोघांनाही एकमेकांच कर्तृत्व माहिती होताच कि, तरीसुद्धा इतक्या अलंकारिक भाषेत रामदासांनी शिवाजीला पत्र लिहिल्याची काय गरज होती? आणि तू श्रीमंत योगी आहेस, तू पुण्यवंत आहेस,
नीतिवंत आहेस, तू जाणता राजा आहेस हे सांगून रामदासांनी काय मिळवलं? ह्या पत्राकडे आपण वेगळ्या नजरेनी पहिला पाहिजे. रामदासांनी हे पत्र केवळ शिवाजीला लिहिलेला नाही, तर आपलं साहित्य जिथे जिथे वाचलं जातं अश्या महाराष्ट्रीय लोकांसाठी लिहिलेलं हे पत्र आहे. हे लोकांना समजावून देण्याची गरज होती कि तो रायगडावर जो राजा राज्य करतोय तो जाणता राजा आहे, तो पुण्यवंत आहे, नीतिवंत आहे, तो परमेश्वरी अवतार आहे. मुद्दा एवढाचं आहे कि दोघांच्या कर्तृत्वाच्या मर्यादा भिन्न आहेत, त्या परस्पर पूरक अश्या कक्षा आहे. त्यासाठी गुरु किंवा शिष्य असण्याचं काही कारण नाही. त्यासाठी प्रत्यक्ष भेट होण्याचाही कारण नाही.
( क्रमशः)

http://mukulranbhor.blogspot.in/2015/05/blog-post.html
या लिंक वर पुढचा भाग वाचा...

    

Sunday, 5 April 2015

बनगरवाडीचा लेखक...!!

व्यंकटेश माडगुळकर ( ५ एप्रिल, १९२७ ते २८ ऑगस्ट २००१ )
          मी वाचन सुरु केल्यानंतर पहिल्या उत्साहात खूप पुस्तकं वाचली. ख्युप म्हणजे बरीच पुस्तकं वाचली. अक्षरशः एका दिवसात चारचाराशे- पाचपाचशे पानाची पुस्तकं मी संपवली आहेत. तो उत्साह आता कुठे गेलं कळत नाही. असंच एक दिवसात मी एका बैठकीत 'बनगरवाडी' हे पुस्तक वाचून काढलं होतं. जी अनेक पुस्तकं कायम लक्षात राहतात त्यापैकी बनगरवाडी हे आहे. मल वाटत नाही कि ती कादंबरी वाचताना लागलेला वेळ आणि मिळालेला आनंद कधी विसरला जाईल. सगळं आयुष्य लहानपणापासून शहरात गेलेलं आहे. आणि बनगरवाडीची सगळी गोष्ट त्या ग्रामीण भाषेत आहे. त्यामुळे सुरवातीला ती भाषा आणि ते जीवन अनभिज्ञ वाटत राहतं. पुस्तकातल्या जीवनामध्ये जो जिवंतपणा आहे तसाच आपल्या रोजच्या जगण्यातही आहे. त्यामुळे त्या कथेशी आणि रोजच्या जगण्याशी कधीच तुटकपणा मला जाणवलं नाही. जितक्या प्रकारचे माणसांचे स्वभाव शहरात बघायला मिळतात तितक्याच किंबहुना जास्त प्रकारचे खेड्यात दिसतात. जास्त वैविध्य खेड्यांमध्ये दिसतं. ते कुठून दिसतं? ते व्यंकटेश माडगुळकरांच्या गोष्टींमधून दिसतं. ते बनगरवाडीमध्ये दिसतं. 
                    दोन लेखक आहेत, ज्यांच्या आयुष्याबद्दल मला कायम कुतूहल वाटत आलेलं आहे. एक व्यंकटेश माडगुळकर आणि दुसरे आहे गो. नी. दांडेकर. कुतूहल वाटायचा कारण म्हणजे दोघांमध्ये बरच साम्य आहे. दोघेहीजण स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्यासाठी म्हणून घर सोडून पळून गेले. दोघेही वयाच्या सुमारे १३-१४ व्या वर्षी पळून गेले. दोघांच्याही बाबतीत घडलेलं पुढचं नाट्य म्हणजे चळवळ अचानक थांबली. आणि अपयशी हातानी घरी कसं जायचं म्हणून दोघांनीही घरी जाण टाळलं. दोघांचाही शालेय शिक्षण चवथी-पाचवीपर्यंतच झालेलं आहे. पण दोघांच्याही लेखनाला ज्ञानपीठ मिळावं अशी प्रतिभा दोघांकडेही आहे, दुर्दैवाने अजून मिळालेलं नाही. मला असं वाटत राहतं कि इथून पुढे गोनीदांच्यापेक्षा माडगुळकरयाचं आयुष्य जास्त आवघड होतं. गोनीदा एखाद्या साधुसारखे महाराष्ट्रभर भटकत राहिले. नर्मदा परिक्रमावगैरे पण केली. पण मुद्दा असा आहे कि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न देवानी आपल्याकडे घेतलं किंवा गोनीदांनी तो देवावर सोपवला. आणि अनंत प्रकारचे अनुभव घेत ते फिरत राहिले. त्या भ्रमंतीच्या काळातले सर्व प्रकारचे अनुभव त्यांना ज्ञानपीठापर्यंत घेऊन जातील. ( मरणोत्तर ज्ञानपीठ देतात का हे माहिती नाही! पण ह्या दोघानाही तो मिळावा ) व्यंकटेश माडगुळकरांच आयुष्य जास्त अवघड अश्यासाठी होतं कि त्यांना त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आपलेआपण सोडवायचा होता. हि स्वेच्छेने स्वीकारलेली फकिरी मोठी अजब गोष्ट असते. अंती समाधान देणारी, आरंभी अनंत कष्ट आणि यातना देणारी. अशी खुशीची फकिरी या दोघांनीही आनंदानी स्वीकारली होती. पुन्हा या दोघांचाही वैशिष्ट्य असं कि दोघांनीही पोटाचा प्रश्न सुटावा म्हणून लेखनाला सुरवात केलेली आहे. सुदैवानी 'आपण लेखक कसे झालो?' हे दोघांनीही सविस्तर लिहून ठेवलेलं आहे. माडगुळकरांनी 'प्रवास : एका लेखकाचा' मध्ये लिहिलंय कि, पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा काही कळत नव्हतं. कोणतीही शैक्षणिक पदवी नव्हती, त्यामुळे नोकरीची अपेक्षा नव्हती. नाही म्हणायला पैसे कमवायचे दोन मार्ग समोर होते. चार रोघोट्या मारणं, चार अक्षरं लिहिणं! ते जमत होतं. पैशाचा प्रश्न सुटावा म्हणून कोणी लेखनाकडे वाळू शकतो यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. आपल्याला इतरांपेक्षा वेगळे काही अनुभव आलेत. वाचनामुळे आपल्याला असं काही कळल आहे जे इतरांना सहजी कळणार नाही अश्या गोष्टी लोकांना सांगाव्यात म्हणून माणसं लिहितात अशी माझी अजूनही समजूत आहे. त्यांच्या समोर पैसे मिळवणे हा दुय्यम हेतू असतो, असं मला अजूनही वाटतं. 
                    लेखकानी माण, आटपाडी, जत, माडगूळ या वैराण प्रदेशात चैतन्य ओतलं. हा सगळा परिसर माझ्या आजोबांच्या आणि बाबांच्या परिचयाचा आहे. सततचा दुष्काळ आणि त्यातून घडलेली माणसं हाच माडगुळकरांच्या गोष्टींचा मुख्य विषय आहे. त्या गोष्टी वाचताना बाबा सारख सांगतात कि हि वाडी मी पाहिलीये बर का! ती गावाची वेस, ते गावठाण, तो आठवड्याचा बाजार, ते मारुतीचं मंदिर, तो गावातला मुख्य पार. अश्या स्वभावाची माणसं. जे बाबांनी पाहिलेलं आहे तेच माडगुळकरांनी कागदावर लिहिलेलं आहे. लेखक म्हणून लेखकाचं योगदान काय आहे, जे अनुभव आलेत ते ( आवश्यक तिथे काही बदलांसह ) कागदावर लिहिणं. आपण घेतलेले अनुभव समोर वाचताना जो काय आनंद होतो तो मी बाबांच्या चेहऱ्यावर नेहमी बघतो. श्री. ना. पेंडसे यांनी सांगितलं होतं, ''कि मी कोकण सोडून बाहेर येणार नाही. प्रत्येक घर म्हणजे एका कादंबरीचा विषय आहे कोकणात. एखादा महाकवीची प्रतिभा असलेला कवी जर कोकणात येऊन राहिला तर या प्रदेशावर एक महाकाव्य सुद्धा तयार होऊ शकतं." जे कोकणाच्या बाबतीत तेचा सर्व प्रदेशांना लागू आहे. लेखक लिहितो हेच लेखकाचं वेगळेपण आणि मोठेपण आहे. 
                    नेहमीच लेखकांनी उभ्या केलेल्या पात्रांमध्ये आपल्याला स्वतः चे अनुभव दिसतील असं नाही, आणि तशी गरजाही नाही. लेखक एक धर्मा रामोशी बघतो. तो आणि त्याची बायको लेखकाच्या घरी काम करत असतात. अचानक बरेच दिवस एकता धर्माचा फक्त कामाला येतो. ती घराबाहेरही पडलेली दिसत नाही. आजारी वगैरे असेल म्हणून लेखक सोडून देतो. एक दिवस जुनं झालेलं, वापरत नसलेलं एक धोतर तो धर्माला देऊन टाकतो. आणि दुसऱ्याचा दिवशी धर्माची बायको ते धोतर नेसून घराबाहेर पडते. त्यानंतर कळतं कि बायको आजारी वगेरे नसून नेसायला घरात काही नाही म्हणून दाराआड बंद राहते. असे अनुभव दरवेळेला आपल्याला आले असतील असं नाही, पण माणसाच्या संवेदना जाग्या ठेवायला हे अनुभव किती उपयोगाचे आहेत. आवेग सहन न झाल्यानं डोळ्यातून पाणी येणं हा अनुभव शहरी जीवनातून बहुतेक नाहीसा झाला असावा. असा फक्त धर्मा रामोशीच नव्हे तर 'माणदेशी माणसे' मधील प्रत्येक माणूस हलवून टाकल्याशिवाय राहात नाही. या व्यवहारी जगात असे अनेक धर्मा रामोशी कागदावर उतरवण्याचा आणि त्यायोगे संवेदना टिकवून ठेवण्याचा किती मोठं काम माडगुळकर करत आहेत. 
                    आजोबा होते तेव्हा सांगायचे कि ४८ च्या दंगली मध्ये आपलं पूर्वीचं कडेगावातलं घर लोकांनी जळालं होतं. गुन्हा एकच होता कि आम्ही ब्राह्मण होतो आणि गांधीजींची हत्या एका ब्राह्मणाच्या हातून झाली. ज्यांना आम्ही शेजारी म्हणत होतो. जे अडीनडीला हक्कानी मदत मागायला येत होते, आणि मदत करायलाही येत होते त्यांच्यात हातून 'शेजारधर्म' पळाला गेला. कडेगावला कधी विषय निघाला तर अजूनही पिकलेली तोंडं सांगतात कि ७ दिवस तुमचा वाडा जळत होता. ह्या दंगलींचा कादंबरीमय वृतांत म्हणजे 'वावटळ.' पुढचे शब्द प्रत्यक्ष वावटळ मधले आहेत- "आपल्या घरांना लागून असलेली घरं, अडीनडीला आपली मदत घेणारी, आपल्याला मदत करणारी आपल्याच गावातली हि माणसं आपली शत्रू होतील असे त्यांना कधी वाटले नव्हते. त्यांच्यापासून आपल्याल धोका आहे, हि जाणीव त्यांना आज पहिल्याप्रथम होत होती. हा धक्का अगदी अनपेक्षित होता. त्यांनी ती मंडळी मुळापासून कलली होती. कधी नव्हे ते त्यांना वाटत होते कि, आपण अनाथ आहोत. आपले असे म्हणायला कोणी नाही. केव्हा काय होईल याचा नेम नाही!' 'ज्या शब्दात आजोबा दंगलीची गोष्ट सांगतात त्याच भाषेत नावं बदलून माडगुळकर गोष्ट सांगतात.  लेखक लेखक म्हणतात तो यालाच.
                    मी स्वतः ला एक बौद्धिक शिस्त लावण्याच्या प्रयत्नात आहे. ज्या दिवशी मराठी साहित्यिकाची जयंती किंवा पुण्यतिथी असेल त्या दिवशी त्या साहित्यिकाचं काहीतरी वाचायचं आणि त्यावर स्वतः काहीतरी लिहायचं. तसं आज व्यंकटेश माडगुळकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त हे लिखाण झालेलं आहे. उगाच समीक्षा वगैरे अवघड शब्द न वापरता जे काय आपल्याला आवडलं, ते इतरांना सांगावं. इतरांनीही त्याचा आनंद घ्यावं इतकी साधी भूमिका आहे. 

Monday, 16 February 2015

निषेधच केला पाहिजे!!!!

          आम्ही कितीही हिंदुत्ववादी असलो आणि कितीही कम्युनिस्ट विरोधी असलो तरीही जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच आहे. विरोधी मताचा संपूर्ण आदर हे तर हिंदू विचाराचं सर्वात महत्वाच तत्व आहे. विरोध कितीही असला तरी तो विरोधकच संपवणे हि आमची संस्कृती कधीच नव्हती आणि पुढेही कधीच नसेल.  (आम्ही नथुराम गोडसे ला सर्व हिंदूंचा प्रतिनिधी मनात नाही, आणि गांधीजींच्या हत्येच समर्थनही करत नाही ). विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे हे आम्ही पाळतो. वैयक्तिक मी कॉ. पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावर ३ लिख लिहिले आहेत. ते पूर्ण वाचून त्याच्यावर मला कोणाच कम्युनिस्टांची प्रतिक्रिया आली नाही. पण आज हा आजचा विषय नाही. पानसरे आणि त्यांच्या पत्नी यांची ताब्यात आज जास्त महत्वाची आहे.


          हा हल्ला हिंदुत्ववादी संघटनांनी केला असेल तर शिक्षा हि झालीच पाहिजे. पण किमान कायद्यावर विश्वास ठेवा, सरकारवर विश्वास नसला तरी चालेल, तो प्रत्येकाचा हक्क आहे. पण अफझल गुरूला फाशी मिळायला ९ वर्ष लागली, कसाबला फाशी व्हायला ६ वर्ष लागली हे काय हिंदुत्व वाद्यांच कारस्थान नव्हता ना! भारतात ती प्रक्रियाच संथ आहे. (पुन्हा दाभोळकर यांच्या हत्येचा सुगाव लागायला उशीर होतोय याचा काय मी समर्थक नाही, त्याचा आम्हा हिंदुत्ववादी लोकांना पण त्रासाच होतो). दाभोलकरांच्या वेळेलाही हत्या झाली हे चुकीचंच, पण काही वेळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे कृत्य नथुरामच्या विचारांनी झालेलं आहे असं म्हंटल होत. आताही काही कम्युनिस्ट लोकांच्या सेम प्रतिक्रिया मी फेसबुक वर पहिल्या. वाईटातल्या वाईट संदर्भात हिंदूंचा उच्चार हा भारतातला सेक्युलॅरीझम आहे. आम्हीही तुमच्यासारखी पातळी सोडून, विवेक वा-यावर सोडून  विधान करायची म्हंटली तर असाही अंदाज निघू शकतो कि कोणीतरी कम्युनिस्टच चळवळीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी असे हल्ले करतो आहे. असं आम्ही म्हणणार नाही. आम्हाला आमचा विवेक सोडायचा नाही. जे स्वतःला विवेकवादी म्हणवतात त्यांनी किमान असा उथळपणा करू नये. पुराव्याशिवाय बोलू नये.   

          अजून एक महत्वाचा मुद्धा म्हणजे नथुराम गोडसे हा काय सर्व हिंदूंचा प्रतिनिधी मानता का तुम्ही ( कम्युनिस्ट ) ? विरोधकाला संपवलं या नावाखाली दरवेळेला एकच नथुरामचं उदाहरण तुम्ही देता. गांधीजींची हत्या झाली आणि महाराष्ट्रात हिंदूंची आणि मुख्यतः ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली  तेव्हा सावरकरांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितल कि आता हि वेळ अशी आहे कि तेव्हा आपण उलटा हात उचलायचा नाहीये, लोकांचा राग समजून घ्या आणि सहन करा!  सावरकरांनी आम्हाला शिकवलंय कि ह्या वेळी उलटा हात उचलायचा नाही. नाही तर आम्ही पण माओ आणि स्टालिन चे दाखले देऊ शकतो ना? विरोधकांना संपवणं हि सवय हिंदूंची नाही कधीच नव्हती.

          कायद्यांनी स्थापन झालेल्या संस्थांवरही तुमचा विश्वास नसेल तर अप्रत्यक्षरीत्या तुमचा संविधानावर विश्वास नाही असा अर्थ होतो त्याचा. किमान पोलीस खात्यावर विश्वास ठेवा, न्यायालयांवर विश्वास ठेवा.


           कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्हीपण निषेधाच करत आहोत. कोणत्याही पुराव्याशिवाय दर वेळेला आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका.

Wednesday, 14 January 2015

भारत एक है..!! ( जम्मू आणि काश्मीर अभ्यास दौरा ) भाग - २

इतिहास :-         

          मला कोणत्याही देशप्रश्नाची हि अपरिहार्यता वाटते कि त्याच्या इतिहासात शिरावाच लागतं. जो वाद काश्मीर मध्ये आणि पाकिस्तानातही सुरु असतो कि इतिहास कुठून सुरु होतो? काश्मीर मधले फुटीरतावादी गट, पाकिस्तानवादी गट काश्मीरचा इतिहास इसवीसनाच्या ८ व्या शतकापासून मानतात. म्हणजे इस्लामच आक्रमण. ज्यांना फक्त विषच पसरवायचं असत ते ८ व्या शतकाच्या आधीचा इतिहास मान्य करत नाहीत. जो इतिहास गौतम बुद्धाचा आहे, सिंधू संस्कृतीचा आहे, तक्षशीला आणि नालंदा चा आहे. या सर्वांचा वारसा भारत अभिमानाने सांगतो, पाकिस्तान सांगत नाही. भौगोलिकदृष्ट्या नालंदा आणि तक्षशीला आताच्या पाकिस्तानमध्ये असले, पूर्ण सिंधु संस्कृती पाकिस्तानात असेल तरी त्याचा वारसा भारत सांगतो, पाकिस्तान वारसा सांगतो तो फक्त बिन कासीम, घोरी, तुघलक यांचा. काश्मीर मधले सुद्धा पाकिस्तानधार्जिणे जे गट आहेत ते हीच भाषा बोलतात. या मध्ये एक आश्चर्यकारक अपवाद सांगावाच लागेल तो म्हणजे Jammu Kashmir Liberation Front (JKLF) चा आताचा नेता 'यासीन मलिक' ला मात्र हे मान्य नाही. तो आझाद काश्मीर ची मागणी करतो पण काश्मीर चा ५००० वर्षाचा इतिहास मान्य करतो. यासीन मलिक हे मान्य करतो कि चार वेळा वेगळ्या वेगळ्या धर्माचं प्रभुत्व होतं. 
          काश्मीर हा शब्द 'कश्यप' आणि 'मिहीर' या दोन वैदिक ऋषींच्या नावाच्या अपभ्रंशातून आलेला आहे, असं सांगितला जातं. म्हणजे कधीतरी पूर्वी वैदिक संस्कृती काश्मीर मध्ये प्रचलित होत. वैदिक संस्कृतीतून निर्माण झालेल्या कर्मकांडाला आणि जातीव्यवस्थेला उत्तर म्हणून निघालेल्या गौतम बुद्धाचाही प्रभाव जम्मू काश्मीर वर दिसतो. अगदी अलीकडे काही कॅथॉलिक अभ्यासकांनी मांडलाय कि ख्रिश्चन धर्माची स्थापन करण्यापूर्वी जिझस भारतात येऊ राहिला होता आणि योग साधनेचा आणि बौद्ध विचारच त्यांनी अभ्यास केला. श्रीनगरजवळ बौद्ध आश्रम होता तिथे राहून जिझस ने हा सर्व अभ्यास केला मग तो पुन्हा मध्यपूर्वेत गेलं आणि मग त्यांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. मुद्द्याची गोष्ट अशी कि काश्मीरवरचा बौद्ध धर्मचा प्रभाव. पण आठव्या शतकामध्ये विज्ञाननिष्ठ अद्वैत वेदांताचा विचार घेऊन संपूर्ण भारत विचारांनी जिंकत आद्य शंकराचार्य काश्मीर पर्यंत पोचले. त्या श्रीनगर मध्ये शंकराचार्यांनी काही काळ साधना केली. त्याचं खूप सुंदर मंदिर श्रीनगर मध्ये आहे. काही फुटीरतावादी लोकांचा प्रयत्न सुरु आहे कि त्या जागेचा नाव बदलून 'तख्ते- सुलेमान' करायचं. पण म्हणजे हिंदू धर्माचं विचार काश्मीर मध्ये पुनः पोचला. त्यानंतर आला इस्लाम. पण जे जगात कुठेही घडलं नाही ते काश्मीर मध्ये घडलं. इथे तो इस्लाम चा विचार वेदांत आणि बौद्ध विचारातून काश्मीर मध्ये पसरला. त्यामुळे मुलतत्ववादाची लागण त्या इस्लाम ला नाही. काश्मीर मधला इस्लाम हा सुफी विचार सांगतो. तो सुफी विचार वेदांताशी सुसंगत आहे. तो सहिष्णू आहे. इस्लाम आणि सहिष्णू एका वेळी म्हणणं खर तर विरोधाभास आहे. पण काश्मीर मध्ये खरच इस्लाम सहिष्णू आहे. तात्पर्य काय कि ह्या प्रदेशावर कोणत्याच धर्माचा राक्षसी आक्रमण झालं नाही. इस्लामच्या नावावर जे अत्याचार जगात सर्वत्र झाले ते काश्मीर मध्ये पाहायला मिळत नाहीत. आता आधुनिक काळात काही शक्ती मुलतत्वावाद पेरण्याचा प्रयत्न करतात. पण काश्मीर चा तो वारसा नाही. याचा परिणाम असा झाला आहे कि काश्मिरी माणूस खूप प्रेमळ, नम्र, दयाळू आहे. तो चार शांततामय धार्मिक आक्रमणाचा परिणाम आहे. सगळीकडेच पेटीत एक सडका आंबा असतो, तसा तो काश्मीर मध्ये पण आहे. तो काश्मीर ला नासवतो आहे. 
शंकराचार्य मंदिर श्रीनगर
          मुघल राजे सुट्टीला काश्मीर मध्ये जात असत हे आपल्याला माहिती असेल म्हणजे काश्मीर हा पण मुघल साम्राज्याचा भाग होता. नंतर तो शिखांकडे गेलं. १८४९ च्या दरम्यान त्यावेळच्या आशियातला सर्वात बलाढ्य राजा महाराज रणजितसिंग. महाराजा रणजितसिंग आणि ब्रिटीश यांच्यात सतलज चा करार झालं होता. सतलज नदी हि सीमा. सतलजच्या दक्षिणेला रणजितसिंहानी यायचा नाही, सतलजच्या पूर्वेला ब्रिटीशानी जायचं नाही. महाराज रणजितसिंग यांचा मृत्यू १८४९. त्यानंतर जम्मू काश्मीर हा भाग डोग्र समाजाचा राजा, राजा गुलाबसिंग यांनी ब्रिटिशांच्याकडून ७० लाख रुपायाल विकत घेतला. तिथपासून पुढे डोग्र राजे जम्मू काश्मीर वर राज्य करत होते. काश्मीर वरच्या शिखांच्या आणि डोग्रा राजांच्या राजवटीला काश्मीर मधले स्थानिक, आणि मुख्यतः मुस्लीम इतिहासकार Aline Rule असं संबोधतात. जणू ब्रिटीश बाहेरून कुठून तरी आले आणि इथे राज्य केलं, त्याप्रमाणे शीख आणि डोग्रा बाहेरून आले आणि इथे राज्य केलं. भारताच्या स्वातंत्र चळवळीच्या काळात म्हणजे १९२७ साली महाराज हरिसिंग सत्तेवर आला तो स्वातंत्र्य मिळेपर्यंत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काश्मीर चा काही वाटा नाही असं म्हणव लागेल, कारण सरते शेवटी ते होता संस्थान. काश्मीर भारतातील इतर संस्थानापेक्षा वेगळ होता. कारण पूर्ण भारतातील हे एकमेव संस्थान होतं कि जिथे बहुसंख्य लोकसंख्या धर्मानी मुस्लीम होती, आणि राजा 'हिंदू' होता. हा हिंदू राजा संस्थानामधली सर्व महत्वाची पद देताना पक्षपात करत होता. तो बहुसंख्य पडे हिंदुनच देत असे. १९२९-३० मध्ये अलिगढ विद्यापीठातून M. Sc. पर्यंत शिक्षण झालेला एक मुलगा शिक्षण पूर्ण करून पुन्हा काश्मीर मध्येच गेलं. तिथे गेल्यावर त्या मुलाच्या लक्षात आलं कि राजा हिंदू मुसलमानांमध्ये भेद करतो आहे. आपलं उच्च शिक्षण झालेलं असूनही जर आपल्याला काम मिळताना त्रास होत असेल तर अशिक्षित लोकांना काय हाल सोसावे लागतं असतील. म्हणून त्या मुलाने मुख्यतः मुसलमानाच्या न्याय्य हक्कांसाठी एक चळवळ उभी केली. त्या मुलगा म्हणजे 'शेर-ऐ-काश्मीर' (काश्मीरचा वाघ) शेख अब्दुल्ला. या चळवळीचे दोन मुख्य हेतू होते. पहिला मुसलमानाच्या न्याय्य हक्कासाठी हिंदू राज्य उलथवून टाकणे आणि दुसर आणि माझ्या मते सर्वात महत्वाचं  स्वतंत्र काश्मीर राज्य स्थापन करणे. या चळवळीला संघटनेचा पाया मिळावा, ताकद मिळावी म्हणून शेख अब्दुल्लांनी 'मुस्लीम कॉन्फरन्स' (मुस्लीम कॉन्फरन्सचच नंतर भारतीय नेत्यांच्या आग्रहामुळे नॅशनल कॉन्फरन्स करण्यात आलं.)
          ३१ सालातल्या जुलै महिन्यात हे मुस्लीम कॉन्फरन्स चे लोकं श्रीनगर मधल्या सुप्रसिद्ध लाल चौकात आंदोलन करत असताना राजाच्या पोलिसांनी निशस्र लोकांवर गोळीबार केला. हा गोळीबार आणि जालियानवाला बागेत झालेला गोळीबार सारखाच होता असं काही लोकांच म्हणणं आहे. १३ जुलै १९३१ साली लाल चौकात झालेल्या या गोळीबाराने आंदोलन आणखी तीव्र झालं. भारतात ज्या प्रमाणे 'भारत छोडे' सुरु होती त्याच प्रमाणे काश्मीर मध्ये 'काश्मीर छोडो' सुरु होती. काश्मीर च्या स्वातंत्र्यासाठी आणि कदाचित गांधीजिंप्रमाणे त्याचा एकमेवाद्वितीय नेता होता शेख अब्दुल्ला. कदाचित आझाद काश्मीर चा राष्ट्रपिता.            


     

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....