माझ्या १० वी पर्यंत मी आणि माझे आई बाबा सर्वांना सांगायचो की मला पुस्तकं वाचायला आवडत नाहीत. मी तर तोंड वर करून (मोठ्या अभिमानानी) सांगायचो. क्रमिक पुस्तकं सक्तीने वाचावीच लागतात म्हणून पर्याय नव्हता. पण बाकी अवांतर म्हणावं असं मी काहीही वाचलं नव्हतं. आजोबांची धार्मिक पुस्तकं घरी होती मात्र, पण त्यांना हात लावण्याचं माझं काही धाडस झालं नाही. आई-बाबांना सुहास शिरवळकर, बाबा कदम, गो.नी.दा., व्यंकटेश माडगुळकर वगैरे वाचायची ‘आवड’ होती. परंतु ते ग्रंथालयातून आणून वाचायचे. त्यामुळे घरी संग्रही फार पुस्तके नव्हती. सांगलीचे संभाजी भिडे गुरुजी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाची जनावृत्ती काढून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते शिवचरित्र नेलं. त्या ‘जनआवृत्तीच्या’ २ प्रती माझ्या घरी होत्या. मला आठवतय एकदा पाचवीत किंवा सहावीत मी ते वाचायला सुरवात केली आणि पुन्हा ठेवून दिलं. पण नंतर अनेकदा त्या पुस्तकात प्रसंगानुरूप जेष्ठ चित्रकार ‘दिनानाथ दलाल’ यांनी चित्र काढलेली आहेत. ती अनेकदा मी बघत असे. त्या चित्रांच्या खाली मराठी, संस्कृतमध्ये एक एक ओळ आहे, त्या सुद्धा माझ्या पाठ झाल्या होत्या. अनेकदा रात्री मी भारावून जाऊन ती चित्र बघत असे, आई बाबा झोपून जात आणि मी चित्र बघत आणि ‘त्या’ ओळी वाचत बसलेला असे. त्यामध्ये किती वेळ जातो हे लक्षात येत नसे. माझा आवांतर वाचनाचा तो पहिला अनुभव. पण त्याच्याशिवाय मी काही वाचत नसे. आईचा खूप आग्रह असायचा की वाचलं पाहिजे, पण माझा नाही.
१० वीची परीक्षा झाली. आठवी-नववी मध्ये मी NCC मध्ये होतो, त्यामुळे पुढे जाऊन NDA मध्ये जायचं असं माझं स्वप्न होतं. त्याचा जबरदस्त अभ्यास करायचा असतो. खरं म्हणजे NDA १२वी नंतर असते. पण NDA च्या परीक्षेची तयारी करून घेणारी एक संस्था नाशिकला आहे, ‘सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट’ त्याची एक परीक्षा १०वी नंतर असते. त्याचा अभ्यास करायला मी माझ्या आत्याकडे ठाण्याला गेलेलो. त्यावेळी माझा मोठा आत्येभाऊ संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. तो एक दिवस मला आठवतो आहे. त्या दिवशी रात्री अंथरुणावर पडून तो माझ्याशी बोलत होता. तो त्याची स्वप्न माला सांगत होता. त्याची इच्छा होती की आपण पाच भावंडानी मिळून भविष्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या’ नावानी एक शिष्यवृत्ती सुरु करायची. ती शिष्यवृत्ती केवळ ब्राह्मणेतरांना असेल. याचं कारण आज ब्राह्मणेतरांमध्ये सावरकरांबद्दल खूप राग आहे. या महान क्रांतिकारकाबद्दल खूप अप्रीती आहे, ती दूर करायची असेल तर ब्राह्मणेतरांना ‘सावरकरांच्याच’ नावाने शिष्यवृत्ती द्यायची, म्हणजे त्यांच्या मनात असलेला सावरकरांविषयीचा द्वेष कमी होईल. त्याचंप्रमाणे एक अभ्यासिका सुरु करायची. किमान ५०० ब्राह्मणेतर मुलं एकावेळेला अभ्यास करू शकतील अशी प्रशस्त. दादा मला सांगत होता की ब्राह्मणेतरांना शिक्षणाच्या संधी आपण द्यायच्या त्या ‘सावरकरांच्या’ नावानी. दादा आणि मी त्यारात्री खूप वेळ बोलत होतो, तो ज्या तळमळीने बोलत होता त्यानी मी हलून गेलो. ‘सावरकर’ म्हणजे काय आहे, हे मला माहिती नव्हतं तोपर्यंत. केवळ समुद्रात मारलेली उडी, ‘सागरा प्राण तळमळला’ याच्या पलीकडे मला सावरकर माहिती नव्हते. दादाच्या संग्रही बरीच पुस्तकं होती. बरीचशी इंग्लिश होती. पण त्यामध्ये मला एक सावरकरांचं चरित्र सापडलं. ते लिहिलं होतं ‘धनंजय कीर’ यांनी. ते मी वाचायला सुरवात केली. पण एका विशिष्ट परीक्षेच्या अभ्यासाला मी गेलेलो असल्यामुळे दादाला ते ‘अवांतर’ वाचन आवडत नव्हतं. म्हणू मी लपवून वाचू लागलो. आणि सातशे पेक्षा जास्त पानांचे ते चरित्र मी ५ दिवसात वाचून काढल. दादा रात्री झोपला की मी उठून ते वाचत असे. दादाच्या बोलण्याचा तो परिणाम होता. खरं तर त्यामुळेच मला वाचनाची गोडी लागली. ती परीक्षा माझी ५ मार्कांनी राहिली. पण मी वाचनाची आवड मात्र घेऊन आलो.
पुन्हा पुण्यात आल्यावर मी ‘राजा
शिवछत्रपती’, ‘श्रीमान योगी’, ‘पानिपत’, ‘महानायक’, ‘संभाजी’, ‘माझे सत्याचे
प्रयोग’, कान्होजी अंग्रे’, ‘द ब्रेडविनर’, ‘परवाना’, ‘शौझिया’, ‘चेतन भगतची सर्व’,
‘शहेनशहा’, ‘चंद्रमुखी’, ‘राऊ’, ‘स्वामी’, ‘छावा’, ‘झुंज’, ‘बनगरवाडी’, ‘मिशन
काश्मीर’, ‘पांगिरा’, ‘आय डेअर’, ‘दुर्गभ्रमणगाथा’, ‘शाळा’, वाघरू आणि त्या तिथे
रुखातळी’, ‘रारंग ढांग’, ‘पु.ल. देशपांडे यांची सर्व’ ‘वी.ग. कानिटकर यांनी सर्व’
इतकी पुस्तकं साधारण ६ महिन्यात वाचून काढली. मध्ये मध्ये सुहास शिरवळकर, व.पु हे
होतेच. ही सर्व पुस्तकं मला सहज उपलब्ध होणारी होती. जवळ एक लायब्ररी होती. तीचं
सभासदत्व घेऊन टाकलं. (तिथे एक सुंदर मुलगी काम करायची, तिच्यावर लाईन मारता यावी
म्हणून तर मी सारखा तिथे जायचो आणि नवीन पुस्तकं घेऊन यायचो. अर्थात ते पूर्ण
करायची वाचून). तेव्हा माझा १० वीचा ‘निकाल’ लागला. आणि ११ वी ला ‘सायन्स’ला मी
प्रवेश घेतला. तो प्रवेश घेताना माझ्या गाठीशी इतकी पुस्तकं वाचून झालेली होती. ११-१२
वी च्या वर्षात कॉलेजमध्ये लक्ष लागावं असं काहीही नव्हतं. ‘कॉलेज लाइफ सारख्या’
अंधश्रद्धांनाही तिथे जागा नव्हती. मित्रसुद्धा फारसे कोणी नव्हते. जे होते
त्यांची विश्व वेगळी होती. आणि मी वेगळ्याच विश्वात होतो. मग मन गुंताव्ण्यासाठी
मी अजून वाचायला लागलो. त्या कॉलेजच्या दोन वर्षात मात्र मी खूप वाचलं.
प्रा. शिवाजीराव भोसले यांची
व्याख्यानं ऐकली, राम शेवाळकर यांची व्याख्यानं ऐकली. ती जवळजवळ पाठ झाली,
इतक्यावेळा ऐकली. अविनाश धर्माधिकारीयांनी व्याख्यानं तर खूप वेळा ऐकली. ऐकल्यामुळे
वाचनाचं सुद्धा विश्व खूप वाढतं. वक्ते त्यांनी वाचलेली पुस्तकं सांगतात, त्यातले
संदर्भ देतात. शिवाजीराव भोसले यांच्या ‘विवेकानंद’ यांच्यावरील व्याख्यानात
त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे. ते (म्हणजे भोसले) स.प.
महाविद्यालयात ‘तत्त्वज्ञान’ हा विषय शिकायला होते. त्यांना ‘तत्त्वज्ञान’ हा विषय
प्रा. सोनोपंत दांडेकर शिकवायला होते. सोनोपंत दांडेकरांनी पहिल्याच तासाला
सांगितलं की ‘तत्त्वज्ञान हा विषय जर तुम्हाला खऱ्या अर्थाने अभ्यासायचा असेल तर
केवळ प्रस्थावना म्हणून तुम्ही समग्र विवेकानंद वाचलं पाहिजे’. ‘समग्र विवेकानंद’
म्हणजे मराठीमध्ये १० खंड आहेत. विवेकानंदांचं सर्व साहित्य त्या १० खंडात आहे.
तोपर्यंत मी माझा माझा ग्रंथ संग्रह सुरु केला होता. आणि आता मला ते ‘समग्र विवेकानंद’
हवं होतं. तर माझ्या वाढदिवसाला माझ्या मावशीने ते समग्र विवेकानंद मला गिफ्ट
म्हणून दिले. अविनाश धर्माधिकारी सरांच्या ‘शाहू राजांवरील’ व्याख्यानात सरांनी
मराठ्यांच्या इतिहासाचे वर्णन केले आहे. त्यामध्ये भारताचा इतिहास पहिल्यांदा कोणी
लिहिला हे सांगताना सर सांगतात की सर्व ब्रिटीश अधिकारी आपल्या जबाबदारीवर इतिहास
संशोधनाचे काम करत होते. मराठ्यांचा एकमेव समग्र इतिहास लिहिणारे भारतीय म्हणजे ‘रियासतकार
गो.स. सरदेसाई’ त्यांनी ‘मराठी रियासत’, ब्रिटीश रियासत’ आणि ‘मुसलमानी रियासत’
असे मिळून १२ खंड लिहिले आहेत. सर सांगितलेल्या कादंबऱ्यांमध्ये अनेक कादंबऱ्यांच्या
शेवटी संदर्भ ग्रंथ दिले आहेत. त्यात मी पहिल्यांदा ‘इतिहासाचार्य राजवाडे’ याचं
नाव वाचलं. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने म्हणून २२ पेक्षा जास्त खंड
प्रकाशित केले आहेत. त्या संदर्भ ग्रंथांमध्ये सेतू माधवराव पगडी, नरहर कुरुंदकर,
ग.ह. खरे, व.सी. बेंद्रे वगैरे नावं मी ऐकली. एक पुस्तकं वाचताना आपल्याला
त्याच्या पुढची किमान १०-१५ पुस्तकं दिसत असतात. त्या एका पुस्तकानी पुढची ‘वाचायची’
लिस्ट तयार होते असा माझा अनुभव आहे.
सुरवातीचे माझे वाचन बहुदा कादंबरी,
कथा, कविता, निबंध या स्वरूपाचे होते. त्यातून केवळ वाचनाची सवय लागली. पण डिग्रीच्या
पहिल्यावर्षी माझा जेव्हा ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ करणाऱ्या मुलांशी संपर्क आला
तेव्हा लक्षात आलं, आपण जे काही वाचलं आहे, त्याचा इथे काहीच उपयोग दिसत नाही. पण
वाचनाची आवड होती, हा एक प्लस पॉईंट होता. मग ‘ललित’ वाचन थोडं मागं पडलं. आता
जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी वाचायचं होतं, आता विचार कसा करायचा हे
शिकण्यासाठी वाचायचं होतं. आता अभ्यास कसा करायचा हे शिकण्यासाठी वाचायचं होतं.
साहजिकच वाचनाचे विषय बदलतात. माझे दोन मित्र आणि मी तिघे जण एकाच वेळी ‘भारताच्या
फाळणीचा’ अभ्यास करत होतो. त्यासाठी ‘वि.ग. कानिटकर’ यांनी लिहिलेलं ‘फाळणी :
युगांतापूर्वीचा काळोख’ हे आम्ही वाचलं. त्याचवेळी शेषराव मोरे यांचा ‘अखंड भारत
का नाकारला?’ हा ग्रंथही प्रकाशित झाला होता, आणि त्याचं त्यावेळी वसंत व्याख्यानमालेत
‘फाळणी’ या विषयावर व्याख्यानं सुद्धा झालं होतं. फाळणी बद्दलचा एक नवीन विचार
आम्हाला काळात होता. त्यापूर्वी मोरे यांची ‘सावरकरांवरील’ दोन पुस्तकं आम्ही
त्यांना फोन करून मागवून घेतली होती. (आता त्या दोन्ही पुस्तकांच्या संक्षिप्त
आवृत्या उपलब्ध आहे, म्हणून मूळ आवृत्ती मिळावी म्हणून त्यांच्याशी फोन करून आम्ही
बोललो होतो) ‘अखंड भारत...’ वाचण्यापूर्वी ती सावरकरांवरील दोन्ही मूळ पुस्तकं
आम्ही वाचली होती. त्याबरोबर फाळणीशी संबंधित अजून काही पुस्तकं मी वाचत होतो.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी नांदेडला माझ्या मित्राकडे गेलो होतो. त्यावेळी शेषराव
मोरे सर नांदेड मध्ये होते. आम्ही त्यांना भेटलो. ‘अखंड भारत का नाकारला?’ हा
संपूर्ण ग्रंथ त्यांनी आम्हाला समजावून सांगितला. ‘पानिपत, १८७५ चा लढा, काँग्रेसची
स्थापना, अलिगढ विद्यापीठ’ वगैरे सर्व त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. आम्ही
त्यांच्या घरी तीन तासापेक्षा जास्त वेळ होतो तेव्हा. त्यानंतर पुण्याला आल्यावर
मी दीड दिवसात सातशे पेक्षा जास्त पानांचा हा ‘अखंड भारत का नाकारला?’ हे ग्रंथ
वाचून काढला. दोन दिवसापूर्वी प्रत्यक्ष लेखाकडून ते सर्व आम्ही ऐकलं होतं.
नांदेडची ती ट्रीप ही माझ्यासाठी
खूप महत्वाची होती. त्या ट्रीप वरून परत आल्यानंतर मी एका आठवड्यात ‘महात्मा फुले’
याचं ‘धनंजय कीर’ यांनी लिहिलेलं चरित्र, ‘अखंड भारत का नाकारला?’, सावरकरांचे ‘हिंदुत्व’,
आणि व्यंकटेश माडगुळकर याचं ‘नागझिरा’ अशी चार पुस्तकं वाचली होती. तो ‘मोरे सरांचा’
प्रभाव होता. त्या पहिल्या भेटीमध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास कसा करायचा असतो हे
मला लक्षात आलं. म्हणजे मी पाहिलं. अखंड भारत का नाकारला? हा ग्रंथ लिहिण्यासाठी
मोरे सरांनी साडेतीनशे पेक्षा जास्त ग्रंथ वाचले आहेत. एकेका वाक्याला ते दहा-बारा
पुरावे देतात. त्यांनी आम्हाला सांगितलं की, ‘आपण विवेकानंद नाही की एका वाचनात
पुस्तकं कळेल. मी एक पुस्तकं किमान तीन वेळा वाचतो. त्यानंतरच तुम्हाला between the
lines कळायला लागतात.’ मग नांदेडहून पुण्याला आल्यावर मोरेसरांची सर्व पुस्तकं मी
महिन्याभरात वाचून काढली. त्यामध्ये एकाला दहा नव्हे एकाला शंभर पुढची पुस्तकं कळत
होती. मोरेसरांकडून पु.ग. सहस्त्रबुद्धे आणि नरहर कुरुंदकर ही नावं मी ऐकली. हे
दोघेही आधुनिक महाराष्ट्राचे वैचारिक गुरु म्हणता येतील. कुरुंदकर अनेक कारणानी
प्रसिद्धीमध्ये राहिले, त्यामानाने सहस्त्रबुद्धे हे महाराष्ट्रात तितके प्रसिद्ध
नाहीत. पण कोणत्याही गोष्टीचा विचार कसा करायचा असतो हे या लोकांनीच महाराष्ट्राला
शिकवलं आहे. खर म्हणजे जागतिक पातळीची बुद्धिमत्ता आणि व्यासंग या तिघांचाही आहे,
पण तिघांनीही मुख्यतः लेखन मराठीतून केलं. कुरुंदकर यांच्याबरोबर श्री.म. माटे हे
आले. या सर्वांचे उपलब्ध सर्व साहित्य वाचल्यानंतर आपण पाण्यात जास्तच खोल जाऊ
लागतो.
निनाद बेडेकर यांच्याशी आमचे चांगेल
संबंध होते. मी अनेकदा त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलेलो आहे. तो माणूस म्हणजे
चालता बोलता ज्ञानकोश होता. अनेक भाषांमध्ये पारंगत, इतिहासतज्ञ तर आहेतच. पण
लावणीचा इतिहास, मराठी ललित साहित्याचा जबरदस्त अभ्यास. मराठी भाषेचा अभ्यास.
ज्ञानेश्वरी, गीता यांचा जबरदस्त अभ्यास त्यांचा होता. आपलं खूप मोठं दुर्दैव आहे
की ते आता आपल्यात नाहीत, आणि त्यांनी त्यांच्याकडे ‘मराठ्यांच्या इतिहासावर’
असलेल्या जबरदस्त माहितीचा उपयोग करून काहीही लिहून ठेवलं नाही. आता त्याची भाषणेच
फक्त उपलब्ध आहेत. पण त्यांच्याकडून ‘बाळशास्त्री हरदास’, ‘आचार्य अत्रे’ यांच्या
अनेक गोष्टी आम्ही ऐकल्या. कवी भूषणाचे छंद ऐकले. त्यांच्या डोक्यात ‘शिवाजी
राजांच्या व्यवस्थापन कौशल्यावर’ लिहायचे मनात होते. शिवाजी महाराज आग्र्याहून
सुटल्यानंतर पुण्याला पोचेपर्यंतच्या काळाचे काही दुर्मिळ ‘कागद’, काही पत्र
त्यांना मिळाली होती. त्याच्या आधारावर एक कादंबरी लिहायचे त्याच्या मनात होते. पण
ते राहूनच गेलं.
शिवाजीराव भोसले यांच्या एका
व्याख्यानात ‘चांगली पुस्तकं विकत घेण्याची सवय चांगली असते’ असं एक वाक्य आहे.
तेवढं मी श्रद्धेनी जपतो आहे. आज माझ्या वैयक्तिक संग्रहात १५०० च्या वर पुस्तके
आहेत. आणि पुढच्या किमान तीनशे पुस्तकांची नावं तयार आहेत, की पैसे मिळाले की विकत
आणायची. कोणतं एक पुस्तकं मला सर्वात जास्त आवडलं असं सांगता येत नाही. खूप विचार
करूनही एक सांगता येत नाही.
मी मुद्दाम काही पुस्तकांबद्दल
सांगणार आहे. ती माझी अनेकदा वाचून झाली आहेत, पुढेही मी अनेकदा वाचू शकतो.
त्यामध्ये गो.नी दांडेकर यांची अनेक आहेत. पण ‘स्मरणगाथा’ ‘दुर्गभ्रमणगाथा’, ‘कुणा
एकाची भ्रमणगाथा’ ही दांडेकरांची आहेत. एखादामाणूस गडकिल्ल्यांवर प्रेम करतो
म्हणजे नक्की काय करतो? त्याची या भूमीवर श्रद्धा आहे म्हणजे काय आहे? किल्ले कसे
फिरायचे असतात, काय बघायचं असतं? ‘दुर्गभ्रमणगाथा’ वाचा म्हणजे कळेल. कारण जे काय
म्हणायचं आहे ते त्यांनी त्यामध्ये म्हणून ठेवलंय. त्याच्याउपर आपण काही म्हणू नये
हेच चांगलं. श्री.ना. पेंडसे याचं ‘तुंबाडचे खोत हे आहे. तुंबाड या गावात खोतकी ही
पद्धत सुरु झाली, ती ४ पिढ्यांपूर्वी. एक कर्तृत्ववान माणूस ‘खोत’ कुटुंबात
निर्माण होतो आणि पुढे फक्त वाताहत. शिवाजी राजांनी एका ब्राह्मणाला दान म्हणून ते
गाव दिलेलं असतं इथपासून त्या घरातील एका माणसावर गणाधी हत्येचा आरोप होतो
इथपर्यंत या कादंबरीचा काळ आहे. कादंबरी दोन खंडात आहेत. आणि ‘तुंबाड’ या
नावाशिवाय सर्व काल्पनिक आहे. ४-५ पिढ्या लेखकानी आपल्या प्रतिभेतून उभ्या केल्या
आहेत. शंभर पेक्षा जास्त पत्र यामध्ये आहेत. आणि काळाचा प्रचंड पट आपल्यासमोर उभा
राहतो. ‘तुंबाडचे खोत’ जागतिक कीर्तीची कादंबरी आहे. नरहर कुरुंदकर यांनी मनुस्मृतीवर लिहिलेलं पुस्तकं
आहे. हिंदू धर्माचा कंटाळा येऊन आणि जातीव्यवस्थेबद्दलचा राग म्हणून डॉ. आंबेडकर
यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले, असा माझा समज होता. पण राग पाच हजार
वर्षाच्या परंपरेबद्दल नसून, आज त्या धर्माच्या नावानी अनेक जण त्या अस्पृश्यतेचं
समर्थन करतात. त्याला विरोध म्हणून पाच हजार वर्षाचे प्रतिक असलेलं एक धार्मिक
पुस्तक जाळलं, असा नवीनच निष्कर्ष कुरुंदकरांनी मांडला. अर्थात तो मांडताना
त्याच्या मागचा प्रचंड व्यासंग सहज लक्षात येतो. व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी
आहे. विवेकानंदांचे ‘आदर्श शिक्षण’ अविनाश धर्माधिकारी यांची ‘अस्वस्थ दशकाची
डायरी’ आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेली ‘हिंदुधर्म समीक्षा’ आहे.
अर्थात ‘राजा शिवछत्रपती’ आहे.
हल्ली माझी अवस्था पैसे नसलेल्या
बेवड्यासारखी झाली आहे, खूप पुस्तकं विकत घ्यायची आहेत (बेवडा – खूप दारू प्यायची
आहे पण पैसे नाहीत) पण एकदम ते उपलब्ध होत नाहीत.
माणूस
कम्युनिस्ट असुदे, हिंदुत्ववादी असुदे, नास्तिक असुदे किंवा कोणीही नसूदे, त्याचा
व्यासंग आहे का? आणि दुसरी गोष्ट त्या व्यासंगाने बनलेलं मत त्याने प्रामाणिकपणे
बनवलं आहे का? प्रामाणिकपणाचा अभव असेल तर व्यासंग बहुतेकवेळा कमी पडला आहे, असं
म्हणता येईल. जो माणूस पुस्तकावर प्रेम करतो तो अप्रामाणिक असू शकणार नाही अशी
माझी धारणा आहे.
मला लोकांच्या व्यासंगाचं कौतुक आहे.
घरात पुस्तकांची संख्या किती आहे यावरून घराचं शहाणपण मी ओळखतो असं आमचे सर
म्हणायचे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल घटना लिहिली, मनुस्मृती जाळली, इस्लामची
चिकित्सा केली याबद्दल आदर आहेच. पण जास्त आदर ४०,००० पेक्षा जास्त ग्रंथ
त्यांच्या संग्रही होते याचा आहे. रा.ची. ढेरे – घरी ६० हजार पुस्तकं होती म्हणे.
निनाद बेडेकर – घरी १० हजार पुस्तकं, शेषराव मोरे – नांदेडच्या घराच्या हॉलच्या
चारही भिंती फक्त पुस्तकं! म्हणून माणसाचे विचार कोणते या पेक्षा ते विचार किती
वचनानी तयार झाले आहेत, हे माझ्या आदराच कारण आहे. आता शेषराव मोरे घ्या. मोरे
सरांशी अनेकदा बोलण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. खूप वेळ त्यांच्या नांदेडच्या
घरी गेलो आहे, पुण्यात असतात तेव्हा तर त्यांची भेट मिळतेच. अनेक जण टीका करतील कि
एकांगी लिहिलंय, आर्थिक प्रश्नाच अभाव आहे वगैरे. पण टीका करणाऱ्या अनेकांना हे
माहिती नाही कि त्यांची अभ्यासाची पद्धत काय आहे. कधी त्यांना प्रत्यक्ष भेटायची
वेळ आली तर मुद्दाम हे विचार, ‘कि सर तुमची अभ्यासाची पद्धत काय आहे?’ ते सांगतील.
दहावीत असताना गुरुजींकडून सावरकरांची
गोष्ट ऐकली. ब्राह्मण नसलेल्या एक शिक्षकाकडून ब्राह्मण सावरकरांची स्तुती ऐकून
मोरे सर चकित झाले. म्हणून आपण ते सावरकर’ समजून घेऊ म्हणून अभ्यासाला लागले. मोरे
सर सांगतात, वेळ जातो म्हणून गेल्या अनेक वर्षात एकही लग्नाला गेलो नाही, मुंज
नाही, श्राद्ध सुद्धा नाही. मोरे सरांनी स्वतःच्या आई वडिलांचं सुद्धा श्राद्ध केल
नाहीये. रोज चार तास झोप, दोन तास बाकीची कामं, उरलेलं १८ तास फक्त वाचन. अशी जवळ
जवळ ३०-३२ वर्ष आयुष्याची. मोरे सर सांगतात सावरकर यांच्यावर क्वचित एखादं पुस्तक
असेल जे वाचनातून सुटलं असेल. पण शक्यतो असं झालेलं नाही. मुंबईला ‘सावरकर सदन’
मध्ये दोन अडीच लाख पत्र आहे. काही सावरकरांनी लिहिलेली, काही त्यांना आलेली. मोरे
सरांनी सगळी वाचलेली आहेत. ३२ वर्षाच्या व्यासंगातून ते जेव्हा बोलतात लिहितात
तेव्हा त्याला किमंत मिळू नये हो कोणता न्याय? बर त्यांच्यावर टीका करा, शिव्या
द्या, लेबलं लावा, पण ३२ वर्षाचा व्यासंग चॅलेंज करू नका. ‘गोळवलकर गुरुजी’ –
गुरुजींनी मनूच समर्थन केलं, हिंदू राष्ट्र पाहिजे म्हंटले सगळं बोगस, निराधार
होतं. गुरुजी चुकले हे माझं मत आहे, ठाम मत आहे! पण गुरुजींनी स्वतःच्या हातानी
लिहिलेली जवळ जवळ ३५,००० पत्र उपलब्ध आहेत. अनुयायांना लिहिलेली, प्रचारकांना
लिहिलेली इत्यादी. ३५,००० पत्रात गुरुजींनी एकही शुद्धलेखनाची चूक केलेली नाही.
वाक्य पुन्हा वाचा. ३५ हजार पत्रात एकही शुद्धलेखनाची चूक नाही. ही गोष्ट कौतुक
करण्यासारखी आहे कि नाही? माणूस व्यासंगावरून जोखावा असं माझं त्यामुळे मत बनलं
आहे. गजानन मेहेंदळे घ्या! एकदा बोलताना म्हणाले होते कि ‘वयाची २५ वर्ष फक्त
वाचनात घालवली. आणि विषय कोणता फक्त शिवाजी. वाचनाला सुरवात केल्यानंतर पहिली २५
वर्ष पेन हातात घेतला नाही. फक्त वाचलं. आणि आता वयाची ४० वर्ष शिवचरित्रावर वाचलं
नाही असा दिवस गेला नाही असं सांगतात.’ माझं प्रेम त्या ४० वर्षाच्या मेहनतीला
आहे. शिवचरित्रात त्यांनी मत काय मांडलं आहे हा प्रश्न नंतरचा आहे. किंवा कमी
महत्वाचा आहे. तुम्ही ४० वर्षाच्या मेहनतीकडे दुर्लक्ष कसं करू शकता?
मला मूळ पुस्तकापेक्षा पुस्तकाच्या
शेवटी असणारी एक तर संदर्भ ग्रंथांची यादी किंवा अधिक वाचनासाठीची यादी याचं जास्त
आकर्षण आहे.
महान नाटकार शेक्सपिअर यांची आज
पुण्यतिथी आहे, म्हणून आज जागतिक पुस्तक दिन जगभरात साजरा होतो आहे. पण माझ्यासाठी
पुस्तक दिन हा रोज आहे. मी हा दिवस रोज साजरा करतो. आज शेक्सपिअरमुळे ते व्यक्त
करण्याची संधी मिळते आहे. अजून एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, मला पुस्तकाला आई –बाबा
कधीही नाही म्हंटले नाहीत. मी मागितले तेव्हा आणि मागितले तेवढे पैसे त्यांनी मला (कसेही
Adjust करून) दिले. मध्यंतरी एकदा माझ्याकडच्या पुस्तकांची मी एकूण किमत काढली
होती ती दीडलाखाच्या वर जाते. एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात दीडलाखापेक्षा
जास्त किमतीची पुस्तकं हे मलाच कधीकधी स्वप्नवत वाटत. पण ते खर आहे.
No comments:
Post a Comment