Thursday, 14 April 2022

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन । १९७५ कऱ्हाड । संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत । अध्यक्षीय भाषण

आज आपणापुढं उभं राहताना माझं मन फार संकोचून गेलं आहे. ज्यांच्या लेखनातून मला खूप स्फूर्ती मिळाली, त्या
इतिहासाचार्य राजवाड्यांचं स्मरण मला उत्कटपणे होत आहे. इतिहास-संशोधन तर राहू द्याच, पण भाषा, व्याकरण आणि साहित्य यांची सखोल जाण असणारा लेखक राजवाड्यांच्या काळी कुणिही नव्हता. अजूनही त्या कसाला उतरेल असा कुणी मला तरी दिसत नाही. त्या राजवाड्यांना या संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं नाही ही महाराष्ट्र सारस्वताच्या इतिहासातली एक बोलकी घटना आहे. महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या इतिहासातील ती फार मोठी हानी आहे असंच नव्हे; तर हा महाराष्ट्राच्या साहित्याभिरुचीला लागलेला कायमचा कलंकच आहे असं मला तर वाटतंच, पण कुणिही अभ्यासू साहित्यप्रेमिकाला तसंच वाटेल अशी माझी खात्री आहे. राजवाड्यांची ही कथा, तर बिचार्‍या चिं. वि. जोश्यांची स्थिती तर काय वर्णावी?


मंडळी, मी बोलते आहे ते दोषदिग्दर्शन म्हणून नव्हे, तर खरोखर पोटात ढवळतं म्हणून सांगते आहे. राजवाड्यांचं महाराष्ट्रावर अपार ऋण आहे. त्यांची चोखंदळ दृष्टी नि निःस्पृह वृत्ती मला नेहमीच प्रेरक ठरली आहे. त्याचप्रमाणे चिं. वि. जोशी यांचा प्रसंगनिष्ठ निरोगी विनोद कुणाला आवडत नाही? चिमणरावानं कुणाला जिंकलं नाही? पण मला पाली भाषेचे, बौद्ध वाङ्मयाचे अभ्यासक म्हणून ते आठवतात. त्यांचं जातककथांचं लहानसंच आहे, पण त्यात निखळ भाषांतराचा उत्कृष्ट नमुना आढळतो. मला तो फार उपयोगी पडला. असे हे दोन थोर साहित्यसेवक ज्या पदावर चढले नाहीत, त्या पायरीवर पाऊल ठेवताना मला संकोच वाटतो आहे.

परंतु गतगोष्टीबद्द्ल पश्चात्ताप करण्यापेक्षा आपल्या हाती काही नाही, हे ही तितकंच खरं आहे. म्हणून या दोघांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांसमक्ष मी अत्यंत आदरानं आणि कृतज्ञतेनं स्मरण करते. राजवाड्यांचं स्मरण करताना ‘चारित्र्ये तुझिया तुझ्यासम जगा लाभोत संशोधक’ असे एक मुकुंदराय कवी यांनी त्यांना उद्देशून जे उद्गार काढले आहेत, ते म्हटल्याशिवाय माझ्याच्यानं राहवत नाही. राजवाड्यांचं स्मरण एवढ्यासाठी मी प्रामुख्यानं करते की, राजवाडेच काय ते ग्रंथांचं कार्य निःसंदिग्धपणे सांगून गेले. एकाच वाक्यात त्यांनी सांगितलं की ‘ग्रंथसमूह हे समाजसुख आहे.’ सूत्रासारखंच हे वाक्य आहे. सूत्राइतकंच विश्वव्यापकही आहे. ठाण्याच्या ग्रंथसंग्रहालयात त्यांनी भाषण केलं, त्यातलं हे सूत्र. राजवाडे विचार करीत तेव्हा एखादा लहान मानवगण त्यांच्या डोळ्यांपुढे नसे. सबंध समाज ते कालाच्या विशिष्ट पार्श्वभूमीवर पाहू शकत असत. ‘ग्रंथ हे समाजसुख आहेत’ असं ते म्हणतात, तेव्हा त्यांना समाजाचं निरोगीपण, तृप्त भाव, विचारक्षमता आणि रसरशीतपणा अभिप्रेत असतो. ग्रंथ हे आपले गुरू आहेत, हे अनेकांनी सांगितलं. ग्रंथ हे मित्र आहेत, हे वाक्यही आता शिळं झालं आहे. पण ‘ग्रंथ हे समाजसुखं आहेत’ ही उक्ती कालबाह्य ठरणार नाही. कारण राजवाडेच त्याचं स्पष्टीकरण असं करतात की “ग्रंथ वाचल्याने मनुष्य विचार करू लागतो. विचारांचा खल झाल्यावर आचार बनतात व नंतर समाजाचे पाऊल पुढे पडते.”

राजवाड्यांना त्यांच्याकाळी जे विद्वान केवळ इंग्रजीत लिहीत, त्यांचा राग येई. ते म्हणतात की डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग हे पाश्चात्यांच्या तोडीचे, पण त्यांनी मराठीत लिहिलं नाही. (भांडारकरांची धर्मपर व्याख्यानं तेवढी मराठीत झाली, पण त्यांचा उल्लेख राजवाड्यांनी केला नाही.) राजवाड्यांचं म्हणणं असं की “त्यांनी जर मराठीत लिहिले असते तर भाषांतररूपाने ते परकीयांना कळते. जरा वेळ मात्र लागतो.” ते पुढे म्हणतात की, “आमचे राष्ट्र आहे. आमचा समाज आहे. आम्हास काही काम करायचे आहे, हा अभिमान धरून कल्पक पुरुष निघाला तर त्यास हा सगळ्या गोष्टी समजतील. त्यास त्रास पडेल; खायला मिळायचे नाही; आगगाडीत धक्के खावे लागतील, तरी पण ज्ञानमार्गात तो मोठा पुरुष होईल व त्यामुळे राष्ट्राचे हित होईल. परकी भाषेत केलेले कार्य चिरकालाचे नाही. केशवचंद्र सेन, राममोहन रॉय ही मंडळी आमच्या देशात व्हावी पण स्वभाषेत होऊ नयेत हे दुर्दैव नव्हे काय? मान-अपमान, लहानसहान गरजा ह्यांची पर्वा न करिता ज्या समाजात आपण उपजलो आहो त्याची भाषा आहे हे लक्षात धरून तिच्याद्वारे आपण असे दाखविले पाहिजे की आम्हांस विचार करण्याची ताकद आहे. जो कोणी असा तयार होईल त्यास ग्रंथसंग्रहालयासारख्या संस्था पाहिजे आहेत; नुसत्या पैशाने कार्य होतेच असे नाही. इंग्लंडातही कादंबर्‍याशिवाय इतर ग्रंथ लिहिणार्‍यास अन्नाची मोताद आहे. अशांचे अन्न ब्रिटिश म्युझियम असून तिच्या जोरावरच ते काम करतात.”

ज्ञानवंताच्या खर्‍या भुकेचं हे जे राजवाड्यांनी वर्णन केलं, ते मराठी साहित्यात अजोड असंच आहे. यावेळी मला स्वतःला एक उदाहरण आठवतं आहे ते सांगते. डॉक्टर केतकर वारल्यावर शीलावतीबाईंची काय अवस्था होती हे सांगायला नकोच. मुंबई विद्यापिठाच्या ग्रंथालयात मी त्यावेळी बसत असे. शीलावतीबाई आपल्या छोट्या मुलीला घेऊन त्या खोलीतच भाषांतराचं काम करायच्या. त्या मला म्हणाल्या, “भुकेनं नि विवंचनेनं डोकं फिरून जाऊ नये म्हणून मी ग्रंथालयात वाचायची नि कामं करायची सवय लावून घेतली आहे.”

उपाशीपोटी अधाशासारखं वाचन करणार्‍या साने गुरुजींचंही उदाहरण आपल्या सर्वांना माहित नाही असं नाही. विद्येची उपासना करणार्‍यानं कंगाल असावं असं कुणी म्हणणार नाही. पण विचार हे फार प्रखर असतात. सत्याची बूज राखणं हे विचारवंताचं ब्रीद असतं. सत्य सांगताना अनेकांच्या रोषाला बळी पडण्याचे प्रसंग अशांना येतात. वृद्धापकाळी बर्ट्रांड रसेल यांनाही तुरुंगवास भोगावा लागला हे सर्वश्रुतच आहे. तेव्हा उद्याचं समाजहित लक्षात घेऊन आज झगडणं विचारवंताला आपोआपच प्राप्त होतं. तीच त्याची कसोटी असते. तेव्हा आर्थिक स्वास्थ्याला विचारचंत कधी मुकेल याचा नेम नसतो.

राजवाड्यांनी आपल्या काळातल्या ज्ञानाच्या क्षेत्रातल्या परिस्थितीचा सूक्ष्म विचार केला होता. पारतंत्र्याच्या त्या काळी त्यांनी विचारवंताला कर्तव्याची जाणीव दिली. स्वत्वाची ओळख करून दिली. किंबुहना स्वत्व नसलं तर तेजच नाही ही जाण त्यांनी समाजाला नव्यानंं करून द्यायचा प्रयत्न केला. होय, तोही प्रयत्नच. कारण जे हे त्यांचे बोल कुठल्याही काळी विचारवंतांच्या उपयोगी पडावेत, त्यांचंच नेकमं विस्मरण आम्हाला घडलेलं आहे. तेव्हा त्यांचे ते अतुल समर्थ बोल आपल्यापुढे सदर करते:

हा कोंबट प्रकार महाराष्ट्रातील दमल्याभागल्या उच्च लोकांचा व उदार मनाच्या सरकाराचा झाला. परंतु सरकाराच्या मानभावी कळकळीवर भिस्त न ठेविता व महाराष्ट्रातील उच्च मंडळींच्या पूर्ववयातील अनास्थेकडे दुर्लक्ष न करिता, आपल्याला आपले कर्तव्य यथाशक्ती बजावले पाहिजे. त्याची हलगर्जींपणाने आपण हेळसांद केली तर पुढील पिढीचे अभिश्राप आपल्याला घ्यावे लागतील आणि आपल्या कर्तव्यशून्यतेबद्द्ल व मनाच्या दुबळेपणाबद्द्ल इहलोकी आपला विशेष बोज न राहता परलोकी आपल्याला झाडा द्यावा लागेल. दुनिया आबादीआबाद असतानाही मनुष्याला आपल्या कर्तव्याला जपावे लागते. मग सर्व बाजूने कालचक्र फिरले असता, राष्ट्रातले एकोनएक लोक देशोधडीला लागले असता, उलट्या काळजाच्या शत्रूने सर्वतोपरी नागवले असता, मतलबी लोकांच्या गोड बोलण्याला उच्च मंडळी भुलून गेली असता, परकीय मंडळींनी सुचविलेल्या अश्रुतपूर्व विषयांची निष्फल वाटाघाट करण्यात सर्व लोक गुंग होऊन गेले असता निष्काम बुद्धीने व एकतानतेचे कर्तव्य बजाविण्याची आवश्यकता विशेषच असते हे निर्विवाद आहे. अशा वेळी लहानसहान संकटांना भिऊन जाऊन किंवा जुजबी व अल्पकालीन फायद्याकडे नजर देऊन, जो मनुष्य कर्तव्याला विसरेल त्याने आत्मघात केला एवढेच नव्हे तर देशघात केला असेही होईल.

ह्यावर कोणी असा प्रश्न विचारील की, हे असे खडतर कर्तव्य तरी कोणते? तर ते स्वत्वरक्षण होय, असे आम्ही उत्तर करतो. हे स्वत्व म्हणजे काय? तर ते फार मिश्रणस्वरूपी आहे. त्यात देशाचा, भाषेचा, धर्माच, आचाराचा, विचाराचा, विकाराचा, गोत्राचा, हवेचा, पूर्ववृत्तचा, सुधारणेचा व खोडींचा अंतर्भाव होतो. ह्या सर्व गोष्ती हजारो वर्षांच्या अनुभवांचे फल होत. ‘भाषांतर’ मासिकाच्या दुसर्‍या वर्षांच्या आरंभीच्या अंकात राजवाड्यांनी हे उद्गार काढले आहेत. त्यात त्यांनी भाषेचा प्रामुख्याने विचार केला आहे. ते म्हणतात: भाषा ही समाजाचे बंधन आहे. भाषा ही विचाराचे वाहन आहे. भाषा ही धर्मांचे पुरस्करण आहे. भाषेशिवाय मनुष्यप्राणी संभवत नाही. भाषा व मनुष्य ह्या दोन वस्तूंचे सामान्याधिकरण आहे. ह्या ईश्वरी देणगीच्या द्वारे एकमेकांची सुखदुःखे आपण एकमेकांस कळवितो. ही मायादेवी उच्चनिच जे जे स्वरूप धारण करील त्या त्या प्रमाणे उच्चनीच विकारांची मोहिनी मनुष्यमात्रावर पडते. सर्व मानवी शक्तता हिच्या कृपाकताक्षावर अवलंबून आहे. उदार विचारांचे अंकुर या अमृतवल्लीलाच तेवढे फुटतात. हित्या अभावी सर्वत्र स्तबधता व शून्यता राज्य करते. ह्या देवतेची मनोभावेकरून आराधना केली असता सर्व काही प्राप्त होते व वर सांगितलेले बहुरूपी जे स्वत्व त्याचेही रक्षण होते. मंडळी, राजवाड्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोचवण्यात मला जो आनंद वाटतो आहे, तो कसा सांगावा? राजावाडे ज्याला स्वत्व म्हणतात, त्याला आज अस्मिता म्हणतात.

ऐंशी वर्षांपूर्वी राजवाड्यांनी मांडलेले विचार आजही ताजे वाटत्तात, याचं कारण समाजप्रवाहांची ओळख त्यांना स्वतःच्या अनुभवांनीच झाली होती. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती पडताळून पाहताना आपल्याला असं आढळून येतं की पारतंत्र्याच्या त्या काळात लेखकाला जेवढी प्रतिष्ठा होती, तेवढी नंतर राहिलेली नाही. सुरक्षिततेचा आभास निर्माण झाला. पैसा जास्त मिळतो. सरकारदरबारी मानाची स्थानं, पारितोषिकं मिळतात, किताबही मिळतात. पण वैचारिक क्षेत्रात, जनमानसात लेखकांना अधिकारित्व राहिलेले नाही. कारण या परिस्थितीत स्वत्वाची कसोटी लेखकाला स्वतःलाच आवश्यक वाटत नाही. स्वातंत्र्यानंतर कल्पकतेला व साहित्यगुणांना वास्तविक फार मोठा उठाव मिळायला हवा. जनतासंपर्काची साधनं आता अधिक प्रमाणात उपलब्ध झाली. परंतु यातून जनतेच्या अभिरूचीचा विविध अंगांनी विकास करून नवनवी कला व ज्ञानक्षेत्रं यांचा वाढ्ता परिचय लोकांना घडवण्यासाठी, स्वतःची प्रतिभा आणि ज्ञानमान वाढविण्यासाठी झटण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अनेक थोर लेखकांनी व विचारवंतांनी रेडिओ, टीव्ही व इतर जनता-माध्यमांचा वापर करताना त्यासाठी काही मूल्यं, कसोट्या नि मानदंड यांचा त्याग करणं अपरिहार्य आहे अशी समजूत करून घेऊन, स्वतःची मूळ पातळी मात्र गमावलेली आढळते. ज्या यंत्रणेत सुधारणा घडविण्यासाठी प्रारंभी हे सज्ज झाले होते, तिचेच दास झाले. अमेरिकेतदेखील हे दृश्य दिसतं असं मेल्विन टूमिनसारखे विचारवंत सांगतात. मग आमची स्थिती तर काय वर्णावी?

सांगण्याचा हेतू काय की, माणसाची स्वत्वाची स्वतःच ठरवलेली कसोटी असल्याशिवाय सर्वसामान्य लोकांच्या नाममात्र कसोट्यांवर भिस्त ठेवून लौकिक यश कितीही पदरात पडलं, तरी त्यामुळे त्या तथाकथित विचारवंतांला भविष्यकाळाचं निदान करणं जमत नाही. भविष्यकाळात बघण्याची दृष्टी असल्याशिवाय कुठलीही मानवी समस्या खर्‍या रीतीनं आकलन करणंही शक्य नसतं. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी, आपला व समाजाचा अभिमान व अस्मिता टिकवण्यासाठी संघर्षमय इतिहासाच्या अनुषंगानंच बुद्धीजीवी माणसं वर्तमान परिस्थितीचं वास्तवदर्शन घेऊ शकतात, आणि आपला रास्त अभिमान कायम राखू शकतात. ‘स्वतःच्या लायकीची जाणिवतेची आपली खरी सुरक्षितता असते’ हे टूमिनचं वाक्यदेखील या संदर्भात विसरता येत नाही. लेखकाचं समाजाच्या जडणी-घडणीत काय स्थान आहे हे त्याच्या अस्मितेवर आणि त्याचं समाजमनाशी ते ताद्रुप्य घडतं, त्यावरच अवलंबून असतं. पंचवीसतीस वर्षांपूर्वी लेखक हा एकप्रकारे वैचारिक अधिष्ठाता समजला जात असे. नेत्याचं भाग्य त्याला लाभत असे. खांडेकर, फडके वगैरेंंच्या सभांना राजकीय सभांसारखीच गर्दी व शान असे. पण आता हे मानबिंदू ढळल्याचं दिसतं. लेखकाच्या पुस्तकापेक्षाही रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रं यांतून होणारं  त्याचं दर्शन अधिक महत्वाचं गणलं जाऊ लागलं आहे. ही सार्वजनिक माध्यमं त्यांचं-त्यांचं तंत्र लेखकाला आत्मसात करायला लावीत आहेत. तत्काळ धनप्राप्ती, प्रसिद्धी आणि प्रसार यांना लेखकही सहज वश होतो आणि निखळ लेखनाचं जुनं तंत्र बाजूला ठेवून तो इतर प्रसंगही या तंत्रांच्या चौकटीतच फार खोलवर न जाता, त्यांच्या विषयाच्या व आशयाच्या मर्यादा जणू त्याच दूरवर परिणाम करणार्‍या आहेत असा समज करून घेऊन चुरचुरीत भाषा, थोडी करूणा, थोडा विनोद, माहितीची अपुरे तुकडे वगैरेंचा एक रंगीन आकृतीबंध निर्माण करून लोकांचं रंजन करतो. त्याच्या अविष्काराचं सूत्रच बदलतं. त्याची भूमिका विचारवंतापेक्षा, कलावंतापेक्षा रंजकाची होऊन बसते. लोकही मग रंजनालाच प्राधान्य देतात. साहित्यिकाच्या ज्या सभांना गर्दी होते, ती त्याच्या गमतीच्या मालमसाल्यासाठी होते. कथाकथनाच्या गर्दीवरूनही साहित्याचे निकष कळावेत. यावरून मी कथेला तुच्छ मानते असं कुणी समजू नये. कथाकथनात रंजक, ठरीव कथांनाच अग्रक्रम मिळतो म्हणून गर्दी होते.

अशा परिस्थितीत साहित्य ही श्रेष्ठ कला राहात नाही. ती दुय्यम दर्जाची कला होते, नव्हे झालीच आहे असं पॉल गुडमन म्हणतात ते काही खोटं नाही. साहित्याला दुय्यम कलेचं स्थान येऊ न देण्याचं एक रहस्य आहे, ते म्हणजे लेखकाचं लोकांची बोलीभाषा आत्मसात करण्याचं कसब. अभिव्यक्तीची नवी घडण. बोलभाषा सदैव आस्तित्वात असते, आणि बोलीभाषेतले प्रयोग वाङ्मयाला ताजेपणा आणतात आणि संवादसूत्र साधतात. मराठीत व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव वगैरे अनेक लेखकांना जे यश मिळालं, ते याच बोलभाषेच्या आत्मसातीकरणामुळे.

या परिस्थितीत स्वतःच्या इमानाला जापणार्‍या विचारवंताची स्वतःला या लोकप्रिय माध्यमाच्या करवी सत्तास्पर्धेकडे खेचू न दिल्यामुळे काय स्थिती होते, ती ‘लोकांचा पाठिंबा नसलेल्या मूठभर विद्वानांना विचारतो कोण?’ अशा बिरूदानंही होते. पण हे खरं नाही. या मूठभरांचाच वचक सत्ताधार्‍यांना वाटतो. सेन्सॉरशिपची नियंत्रण कडक बनतात ती ज्यांना लोकप्रियता नाही त्यांनाच वचक बसावा म्हणूनच ना?

उदाहरण मार्क्सचंच घेऊ. तो जिवंत होता, आपले विचार सांगत होता, त्या वेळी मूठभर विचारी लोक सोडल्यास बाकी कुणी त्याचं कौतुक करीत नव्हतं. तरीही मार्क्सच्या विचारांची धास्ती वाटली म्हणून जर्मन शासनानं त्याला हद्दपार केलं. परंतु लोकशाही असलेल्या इंग्लंडात त्यानं आपल्या सिद्धांतावर भरपूर लिखाण करून त्याचा प्रचार केला, तरी ब्रिटिश शासनाला त्यापासून आपल्याला धोका आहे असं वाटलं नाही. त्याला लोकप्रियता लाभली नव्हती. त्याच्या प्रेतयात्रेला अवघे बाराच लोक होते. परंतु तो मेल्यावर जेव्हा त्याचे विचार देशोदेशी रुजू होऊ लागले, तेव्हा इंग्लंडातही त्यच्या विचारांबद्द्ल धास्ती उत्पन्न झाली आणि मार्क्सवाद्यांवर शासनाची अवकृपा झाली. म्हणून ज्या ज्या विचारवंतांवर असं शासकीय नियंत्रण येतं, ते त्यांचा लोकांत आदर आहे म्हणूनच येतं हे उघड आहे. साहित्याचा पाया म्हणजे जाणीव. शंकराचार्यांनी शास्त्राच गुण ‘ज्ञापकता’ म्हणून सांगितला आहे. तीच ज्ञापकता म्हणजे जाणीव साहित्यालाही लागू आहे.

साहित्याचे दोन भाग असतात : अभ्यासू लेखन आणि ललित लेखन. अभ्यासू लेखनात चेतन मन जागता पहारा ठेवून असतं, तर ललित साहित्यात स्वप्नभूमी तळातून वर आल्यासारखी वाटते. कल्पना, विचार, स्मृती व भान या सार्‍यांचं रसायन होऊनच ललित लेखनाची निर्मिती होते. त्या निर्मितीचा केवळ भावनेशीच नव्हे तर देहाशी व आगच्यामागच्या जीवनाशीही घनिष्ठ संबंध असतो. कारण हेच अनुभवाचं अधिष्ठान असतं. अनुभव जेवढा बलिष्ठ, तेवढा त्याचा अविष्कार समर्थ होतो. तो अधेमधेच तुटला तर दुबळा होतो. लेखकाची खरी कमाई म्हणजे ललित लेखन तयार होत असताना येणारा उल्हास, व्यावहारिक पातळीवरचा ताण आणि मनाला शांत करणारी दमणूक. अशा अविष्काराचा संबंध कुठल्याही ऐहिक सिद्धीशी नसतो, हेच लेखकाचं परमभाग्य आहे. व्यवहाराशी अविष्काराची सांगड पडली की लेखन उणावतं आणि लेखकही घसरू लागतो.

कवितेप्रमाणेच ललित लेखनाला भाववृत्तीत डूब घेण्याची आवश्यकता असते. किंबहुना, भाववृत्ती नसेल तर सृजनाचा अंकुर उगवणारच नाही. प्रिती, मृत्यु, प्रत्यक्ष जीवन आणि सृष्टीचा विराट पसारा यांच्यातल्या अबोल रहस्यांची बोचणी लागल्यावाचून भाववृती जागी होत नाही. ही बोचणी सांभाळायची असेल तर अनेक व्यावहारिक व्यवधानं खड्यासारखी बाजूला टाकावी लागतात. एकदा भाववृत्तीनं मनाचा कबजा घेतला की मग तिच्यात सांगीप्रमाणं लेखकाला चालणं पडतं व पडावं. आधी जे  तंत्र आत्मसात करू म्हणतो, ते प्रत्यक्षात क्वचितच घडतं. पण अंतःचक्षूनं जे पाह्यलं, मनानं जे अनुभवलं, त्यांचं एकीकरण झालं की एक वेगळंच तंत्र त्यातून साकारतं. हा रूपबंध ज्याचा त्याचा वेगळा असतो.

साहित्याची मूळ प्रेरणा ज्ञापकता असते, यातच माणसाच्या आपल्या मनाशी होणार्‍या तादात्म्यातलं संवादसूत्र आलं. ‘काया-वाचा-मने’ या आपल्याला परिचित अशा शब्दप्रयोगातच या संवादसूत्राचं रहस्य दडलेलं आहे. माणूस प्रथम स्वतःशी सुसंगत झाला नाही, तर तो कुणाशीच सुसंगत होत नाही. त्याचा संवाद इतरांशी पण जुळत नाही. संवादाला प्रारंभ स्वतःपासूनच होतो. लेखन करतानाही लेखक अलिप्त दृष्टीनं स्वतःकडे व स्वतःच्या कृतीकडे पाहू शकला, तरच त्याच्या उक्तीला प्रत्ययकारिता येते. अशा लेखकातच वाचकही असा सुप्तपणे सतत वसत असतो. बाकीचे मूर्त वाचकदेखील या मूळ वाचकाचीच प्रतिरूपं असतात. हा मूर्त वाचकच साहित्याची सिद्धी-असिद्धी ठरवतो. ती लेखकानं ठरवायची नसते. वाचकही लेखकाप्रमाणंच साहित्यकृती घडवतो अशी माझी श्रद्धा आहे.

लेखक-वाचकातल्या संवादामुळेच वाल्मीकीचा शोक आपलाही शोक होतो. त्याचा श्लोकदेखील आपलाच असतो. ‘रामायण’ हे नाव आपल्या कृतीला दिलं तरी ‘न हि रामस्य चरितंम, सीतायाश्चरितं त्विदम्’ असं तो आपल्याला सांगतो. ते आपण मानतो. ‘सीतायना’ ऐवजी ‘रामायण’च नाव आपण पत्करतो. संवादाच्या आधारावर हवी तेवढी रामायणं रचली जातात नि ती सारीच तोलाची ठरतात. वाल्मीकीनं वाङ्मयाच्या फलश्रुतीचे आणखी एक प्रात्यक्षिक आपल्यापुढं उभं केलं आहे. भविष्यकालीन घटना त्यानं मांडली आहे. पुढे ती प्रत्यक्ष घटनाच झाली. भविष्यात पाहण्याची दृष्टी सृजनशील लेखकाला किती आवश्यक असते हे कुठलाही सिद्धांत न मांडता, साहित्यिक क्रियाप्रकियांचा घोळ न घालता आपल्याला फार प्राचीनकाळीच रामायणाच्या बाबतीत घडलेलं दिसतं. वाङ्मयात मिथ उर्फ पुराणकथा किंवा दंतकथा घडवण्याची शक्ती ज्या प्रमाणात जास्त व सतत चालू असते, त्या प्रमाणात ते वाङ्मय व पर्यायानं तो समाजही अधिक समर्थ आणि प्रवाही आणि जिवंत बनतो. या पुराकथांच्या निर्माणात माणसाची कल्पकता, प्रतिकप्रियता, त्याच्या आवडीनिवडी, त्याचे आदर्श आणि त्याची कलात्मक अभिरूचीही व्यक्त होत असते. या पुराकथाही एका ठशाच्या नसतात. त्यांचे रूपबंधही सारखे नसतात. काही कथात्मक असतात, तर काही प्रथात्मक असतात, तर काही संकल्पनात्मक असतात. उदाहणार्थ, रामाची कथा आहे, चातुर्वण्य ही प्रथा आहे आणि प्रारब्ध ही संकल्पना आहे. पुराकथेमुळे, मिथमुळे जीवनातला विस्कळीतपणा जातो, जीवनात सुसूत्रता येते. मिथमुळे समाजातल्या घटकांचं सहज सुसंघटन होतं. आचारविचारांना दिशा लागते. परंतु दैवतकथा किंवा मिथ ही माणसाला जखडून टाकते. ज्या समजुतीमुळं माणसाची पूर्वी मुक्तता झालेली असते, तीच त्याला अवजड होऊ लागते. उदाहरणार्थ, रामराज्य, चातुर्वर्ण्य या कल्पना आया बदलत्या जाणिवांमुळे कालबाह्य झालेल्या आहेत. माणसाचं जीवन तर पुढेपुढेच जातं. त्याचं मनदेखील नवे अनुभव घेत असतं. त्याच्या मानसिक नि आत्मिक गरजा उत्तरोत्तर अधिक मूर्त स्वरूप घेतात नव्या प्रेरणा जुन्या प्रतीकांना नि समजुतींना छेद देतात. नि मग आपोआपच हे नव्या प्रेरणांनी भरलेलं मन नवी प्रतीकं नि कल्पकथा बनवूं लागतं. त्या कथाही अशाच आग्रही असतात. कधी जुन्या कथांत नवा अर्थ भरला जतो. उदाहरणार्थ, फ्रॉइडनं इडिपसच्या कथेला दिलेला नवा संदर्भ. चातुर्वर्ण्याची जागा नव्या काल्पनिक संपूर्ण मानवी समतेच्या कल्पनेनं घेतलेली आहे. जुन्या पठडीप्रमाणे जगातल्या सर्व आदिवासी जमातींच्या मूळ नावांचा अर्थ ‘माणूस’ असा आहे. आणि आपली जात हीच मानवंशाची मूळ जात अशी दृढ कल्पना आहे. जेव्हा ख्रिस्ती, हिंदू वगैरे समाजात हे लोक शिरताअ, तेव्हा त्यांची मनोभूमी विस्कळीत होते. एकतर ते जातीव्यवस्थेचा इन्कार करून आपल्या जुन्या कल्पनांना सार्वत्रिक रूप देऊ पाहतात किंवा आपापल्या समाजाची पुराकथाकल्पनाची शक्तीही गमावून बसतात. विज्ञानानंही अनेक कल्पकथा पुरवलेल्या आहेत. उदाहरणार्थ, डार्विनचा माकडाचा माणूस होतो या सिद्धांतातला लुप्त झालेल दुवा. ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर ही एकोणिसाव्या शतकातल्या अर्थशास्त्रज्ञांची श्रद्धा. गोर्‍या माणसाचं ओझं ही कल्पना. सांगायचा मुद्दा असा की कल्पकथा किंवा मिथ दुहेरी काम करते. ती नव्या, येऊ घातलेल्या जीवनाची सूचना देते, त्याला आशय पुरवते. पण जुनी झालेली कल्पकथा जीवन ठोकळेबाज करते.

विचारवंत आणि साहित्यिक जुन्या कल्पकथा मोडतात नि नव्या घडवतात देखील. याच कल्पकथांतून म्हणी, गाणी, प्रथा यांचं गुंतागुंतीचं भव्य शिल्प सर्व भाषांच्या आणि बोलींच्या समाजात सदैव आढळून येतं. उदाहरणार्थ, हिंदू माणूस स्वतःकडे बघताना नकळत आपण राम व्हावं असं चिंतीत असतो. एकबाणी, एकवचनी नि एकपत्नी राम हाच आदर्श असतो. बायकांपुढे आपण सीतासावित्री व्हावं हाच आदर्श असतो. बौद्धांना बोधिसत्व आधार देतो.
माणूस स्वतःसाठी आणि दुसर्‍यासाठी अनेक भूमिका धारण करतो. माणसाचं अस्तित्व अनेकपदरी आहे. ते खुलं आहे, अनिर्बंध आहे. माणूस दुसर्‍याच्या भूमिकेत स्वतःला पाहू शकतो. जड वस्तू व प्राणी यांचं आस्तित्व त्यांच्यापुरतं आणि बंदिस्त असतं. तिथं देहाचंच आस्तित्व असतं माणसाला जबाबदारी घेता येते, तशी ती टाळताही येते. पण तिथंही त्याला निर्णय घ्यावा लागतो. निर्णयशक्तीचा वापर करण्यातच माणसाची खरी पारख असते. ज्या कल्पकतेनं पूर्वी जीवनाला अर्थ दिलेला असतो, तीच कल्पकथा माणसाचा कोंडमारादेखील करते. ती मोडल्याशिवाय कुठ्लंच नवनिर्माण होत नाही. पण कल्पकथा ही माणसाला संपूर्ण वेढून टाकणारी असते. ती दूर करता येत नाही. तरी ती मोडून अगर तिला नवा अर्थ विचारवंत अगर कलावंत प्राप्त करून देत असतो आणि सामुदायिक आणि वैयक्तिक जीवनाला नवी प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो. पण कल्पकथेचं निर्माण ठरवून येत नाही. जीवन स्वयंप्रेरणेनं, असतं तसं सहज जगल्यानंच ती घडते. अमुक एक गोष्ट तू लिही, असेच विचार मांड, असंच परिस्थितीचं चित्रण कर, असं लेखकाला सांगणं बरोबर नाही. पीनलकोडप्रमाणे साहित्याला नियमबद्ध करणं नुसतं हास्यास्पदच नाही, तर धोकादायकदेखील आहे. कवची प्राणी असतात. त्यांची वाढ जास्त झाली की कवच गळून पडतं. पण माणसाची मानसिक वा अनिर्बंध असल्यानं त्याला ही कवचं धोरण आखून काढून टाकावी लागतात. अनिर्बंध सुरक्षितता कल्पिण्याची शक्ती माणसात असते. तिच्यापायीच तो असुरक्षितपणाचं आव्हानही स्वीकारतो, धोक्याचं जीवन पत्करतो आणि भावी सुखाची चित्रं रेखाटतो. या कल्पनेतेतूनच रोमँटिसिझम येतो. खरा रोमँटिसिझम स्वागतार्ह असतो. नकली रोमँटिसिझम आपल्याकडच्या लिखाणात फार आढळ्तो. पण नकली रोमँटिसिझम किंवा तशीच कल्पनारंजित साहित्यकृती वगैरे जीवनातल्या समस्यांसाठी खोट्याच उतार्‍यांचं सूत्रचालन करतात. पण वास्तव ते वास्तव. स्वप्नरंजन आपणा सार्‍यांनाच अतिशय प्रिय असतं. पण ते प्रिय असलं तरी इष्ट नव्हे. त्यात फार मोठा धोका आहे. हा धोका स्वप्नरंजनाच्या पूर्ण आहारी जाण्याचा आहे. वास्तव शोधण्यात खरं आश्वासन असतं. कारण वास्तवाला मार्यादांचं बंधन असतं आणि त्या मर्यादांचं भान आपण राखतो. अतिस्वप्नरंजन शेवटी भयकारक ठरतं. कारण त्याला मर्यादाच माहीत नाहीत. ऐतिहासिक व चरित्रात्मक वाङ्मयात त्याचा पडताळा येतो. काही माणसं भूतकाळात रमतात, तर काही वर्तमानातच असतात. या दोघांनाही भविष्यात संचार करण्याची ताकद नसते. अशांचे विचार एकांगी बनतात. भूत, वर्तमान नि भविष्य या तिन्हींतही संचार करण्याचं सामर्थ्य रोमँटिसिझममधून येतं. अद्याप हा प्रकार आपल्याकडे रूढ झाला नाही.

ललित साहित्याचा जो प्रभाव माणसाच्या मनावर होतो, त्याचं कारण त्यातल्या आशयाला असणारे अनेक स्तर, अनेक पदर, त्याची अनेकविध स्पंदनं. हे स्तर,पदर, स्पंदनं त्या त्या माणसाशी त्याच्या त्याच्या भाषेत त्याच्या त्याच्या भावनांत बोलतात. त्याला सुजाण करतात. त्याला आतून घडवतात. इथे आशय शब्दाची फोड करायला  हवी. आशय म्हणजे विषय नव्हे. माझ्या कवितेचा विषय झाड असेल, पण आशय कदाचित् माणसाचं नित्यनिरंतर एकटेपण असेल. कदाचित् कधीही आणि कशालाही हार न जाणारी त्याची जिद्द, त्याची जबर हिंमत असेल. हा आशय मोकळा असावा लागतो. पण त्यासाठी तो सांगणारा कवी, कादंबरीकार, कलावंत मोकळा ठेवावा लागतो. हा आशय केवळ संदेश झाला किंवा ठाम आणि निश्चित आदेश झाला तर कवी संपतोच, पण ज्याच्या कवितांतून भावी पिढ्या घडणार असतात, त्या पिढ्याही संपतात. प्रत्येक कलाकृती म्हणजे आशय आणि आकार यांचा लग्नबंध. मात्र यावरून या आधुनिक केवळ वीसपंचवीस वर्षांची, प्रामुख्यानं स्पेंगलरनं वर्णन केलेली आधुनिक संस्कृतीची भ्रामकता व स्खलनशीलता दाखवण्यासाठी व तिच्यातून बाहेर पडण्यासाठी विविध समस्यांचा विचार करून मानवाचं भवितव्य सुघटित होईल, या हेतूनं लिहिलं गेलेलं वाङ्मय हे रामायणाच्या पातळीवरचं आहे असं कोणी समजू नये. रामायणातील भवितव्याची जाण देशकालाला भेदून जाणारी, दैवतकथेची सर्वत्र प्रेरणी करणारी आहे. आधुनिक कादंबरीतूनदेखील काही ठिकाणी मिथचा आश्रय केला जातो. युलिसिसप्रमाणं. पण दैवतकथेची तर्कातीत व तरीही सुसंगत पातळी तिला लाभत नाही. पौराणिक वाङ्मयात रामायण ही या दृष्टीनं अजोड कृती आहे.

लेखक जेव्हा त्या त्या काळाचा मागोवा घेऊन अधिकारितेनं लिहितो, तेव्हा पुढल्यांना त्यातल्या कालिकतेतून सिद्ध झालेल्या प्रत्ययांचा पडताळा येतो. विसाव्या शतकांतल्या लेखकांत युरोपमध्ये बरीच हिंसकता, वैफल्य आलेलं दिसतं त्याचं कारण ह्या काळाच्या वाढत्या मानसशास्त्रीय, भौतिक व सामाजिक शास्त्रांच्या ज्ञानाबरोबर लेखकांच्या मनातले मागच्या परंपरेतून आलेले कृत्रिम बंधही फुटले. मनात नवे प्रवाह खेळू लागले. चिंतनाला व भावनांना नवी आव्हानं आली. त्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यांनी लिहिलं. म्हणून आता आपल्याला अमुक एक लेखक जे लिहितो ते त्याच्या काळात जे प्रवाह होते त्यांच्या जाणिवेपोटीच लिहितो हे पटतं. आपल्याकडचं उदाहरण जयवंत दळवींच्या ‘संध्याछाया’चंच घेऊ. त्यातलं म्हातारं जोडपं पारंपरिक भावनांचं प्रतीक आहे. त्यांना घरगड्याजवळ बोलावंसं वाटतं. पण तो बोलत नाही. यंत्रासारखं काम करून चालता होतो. पुढे येऊ घातलेल्या भावनाहीन पण कार्यक्षम यांत्रिक संस्कृतीचंच प्रतीक तो आहे.

साहित्यनिर्मिती व परिस्थिती यांच्याबाबतीत अन्नदाशंकर राय यांचं एक विधान लक्षात घेण्याजोगं आहे. ते म्हणतात : अमुक एका विशिष्ट परिस्थितीत आपण हजर असायला हवं असं वाटलं की आपण लिहितो. आपण लेखक असल्यानं आपली हजेरी म्हणजेच लिखाण. अन्नदाशंकर आणखी असंही म्हणतात की, कठीण परिस्थितीत कलावंत किंवा साहित्यिक हा गर्भार बाईसारखा असतो. बाहेर काय वाटेल ते येवो, त्यानं आपला गर्भ जपावा. अर्थात लेखकाची निर्मिती किती खोलवरून येते, ती बाहेर पडायला काय कष्ट पडतात आणि ती बाहेर आल्यावर वाचक आपली भर टाकून तिला पुरता आकार कसा देतो - हीच साहित्यनिर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. याशिवाय अन्य बाह्य संबंध व बंधनं ही केवळ साहित्यबाह्य आहेत असं नव्हे, तर ती संपूर्णपणे गैरलागूही आहेत.  

कथासाहित्याचा आविष्कार द्वंद्वात्मक असतो. त्यातले रूपबंध असे : ताण आला की मागून शैथिल्य येतं, वेदनेमागून तिचं निराकरण येतं, भीती आली की पण किंवा आव्हान आलंच, वैषयिक क्षोभ आला की वासनातृप्ती आलीच, दुःखामागून सांत्वन येतंच. या जोड्यातलं जे अतूट नातं असतं, त्यातूनच आकृतिबंध निर्माण होत असतात. मानवी भावनांत विकास आणि स्थगन, प्रवाहीाणा आणि साचीवपणा, संघर्ष, गति आणि बंदिस्तपणा, अकस्मात आलेली उत्तेजकता, स्वप्निल शैथिल्य, सुख नाही नि दुःखही नाही अशी बधीरता - पण त्यातही दोन्ही अवस्थांत कुठंतरी असणारी मात्र माणसाला जे जे भावतं आहे ते क्षणिक असलं तरी थोर आहे आणि हे सारंच्या सारं अनंत काळापर्यंत माणसापासून कायम निघूनच जाणार आहे, ही जाण आवश्यक असते. ‘संयोगा विप्रयोगान्ताः’ म्हणतात ते हेच.

अवतीभवती अनावश्यक गोष्टींचं अस्ताव्यस्त कोठार भरलेलं असतं. त्यातून आपल्याला हव्या त्या प्रसंगासाठी आवश्यक तेवढाच भाग घेऊन बाकीचा छाटून टाकणं हीच लेखकाची किमया असते. प्रसंग जितका कमी रेखांत पण परिणामकारक दाखवता येईल, तितकं लेखकाचं यश महनीय ठरतं. या विवेचनाची मुख्य गरज अशी की कलात्मक आविष्कार जाणिवेच्या अनेक पातळ्यांना स्पर्शून जात असतो. कलात्मकतेची संवादशीलता ती किती स्तरांवर पोचू शकते यावरच अवलंबून असते.

गेल्या जागतिक युद्धानंतर एका नव्याच जीवनसंघर्षाचा अनुभव बर्‍याच लेखकांना आला. हा संघर्ष मनोमय आहे. त्यात सुसंगत वाटणार्‍या जीवनातील विसंगतीच मानवी मन पाहू लागतं. एका जीवनसमस्येचं स्वरूप आकलन करू पाहतं. ती समस्या म्हणजे सध्याच्या जगात जगभर तरूणांना जाणवणारी प्रखर शून्यमनस्कता. पाश्चात्य राष्ट्रांत दोन महायुद्धांचा परिपाक म्हणजे विज्ञानाची बेसुमार वाढ आणि त्याबरोबर व्यक्तिमात्राला आपलं केंद्र हरवल्याची प्रखर जाणीव. मानची आस्तित्वाचं मूल्य हरवल्याची वेदना व निष्फळता. प्रेम, निर्मळ व्यवहार, आर्थिक प्रामाणिकपणा, कशावर तरी निष्ठा ही  जुनी मूल्यं माणसाला आशान्वित करीत राहतातच. त्यांनीत तो काहीकाळ तरारतो, थरारतो. पण वाट्याला येते ती केंद्र हरवलेल्या वीराट मानवसमूहांच्या भ्रांत क्रियाप्रक्रियांतून उद्भवलेली भकास जाग. हा माणूस कुठल्याही देशातला असो, संस्कृतीतला असो- त्याच्या आस्तित्वाचा परिघ केंद्र गमावलेल्या चाकोरीचा असतो. तिथ उत्कटता असते, हर्षाची नि उदासिनतेची गती असते ती आधुनिक जीवनाच्या स्पर्धामय वेगाची. तो वेग माणसाला धावायला लावतो. केंद्र असणारा माणूस त्या वेगाला आकार देतो, विकास हुडकतो. पण हे अल्पकाळ. त्या जीव घेणार्‍या वेगात केंद्रच हुकतं. माणूस धापा टाकतो. पूर्वीची नियतीची जागा आता या मानवग्रासी वेगानं घेतली आहे. या धावपळीत विजयी वीरदेखील केंद्र हरवल्यानं अपेशीच असतात. मानवी मन अस्वस्थ असतं. ते स्वतःला चकवतं, दुसर्‍याला चकवतं, नि मग वंचनेलाही विटतं. नाहीतर ते क्षणप्रेमी बनतं. क्षणाक्षणात भरलेल्या अलगालग सुह्खाच्या गोळ्या गिळून ते उत्तेजित होऊन जगतं.

धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि लैंगिक व्यवहार हे माणसाच्या मनाच्या शुद्धाशुद्धतेवर अवलंबून असतात. माणूस हाच सर्व व्यवहारांचा निर्माता, साक्षी आणि निर्णायकदेखील असतो. सर्व सुसंगत-विसंगत जीवनानुभवांना वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर एकत्र आणताना ही भूमिका एक आकार देत असते. जितका हा आकार स्वच्छंद, तितकी नीतीची जाण तरल आणि सर्वस्पर्शी बनत जाते. कारण इथं आता मूल्य जन्म घेत असतं. मूल्य हे विचारांच्या जगात फार महत्त्वाचं असतं. कारण त्याच्याशी तर व्यक्तीच्या व समूहाच्या अनुभवाचं सूत्र अनुस्यूत असतं. मूल्य हे भावनांची लय साधतं, विचारांचा तोल राखतं आणि माणसाच्या व्यक्तिगत कृतिउक्तींतूनदेखील त्याच्या समाजाच्या स्थितीगतीचं दिग्दर्शन करू शकतं.

या संमेलनाचे एक पूर्वीचे अध्यक्ष औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी होते. राजेरजवाडे अध्यक्ष कसले? हा सूर पुष्कळदा ऐकू येतो. आणि त्यात वावगं नाही. परंतु आताही त्यांच्या कर्तृत्वाची छाननी कधी निसटून जाते. याच राजेसाहेबांनी अखेरच्या काळात आपलं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी राजघराण्यातली मुलं का बिघडतात त्याचं अतिशय उघडंनागडं दर्शन केलं होतं. पंचवीसतीस वर्षांपूर्वी तर असं लिहिणं म्हणजे परम अश्लील होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यातले असंबद्ध उतारे वृत्तपत्रांत अत्यंत कुटाळकीच्या स्वरूपात इतस्ततः अवतरले. त्याचा परिणाम ते पुस्तक कायमचे जप्त होण्यात झाला.

मी ते पुस्तक वाचलेलं आहे. सत्य परिस्थितीचं वास्तव व विदारक दर्शन त्यात आहे. परंतु लोकांच्या भावना चाळवण्यासाठी जी चावट पुस्तकं लिहिली जातात, त्यात राजेसाहेबांच्या या कृतीची गणना करणं अन्यायाचं होईल. त्या लेखनात लेखनाची शिस्त आणि शैली नसली तरी पोटतिडीक आहे आणि चित्रकला, इतिहास वगैरे विषयांत गती असलेल्या , सामाजिक प्रगतीची जाणीव असलेल्या एका पुरुषानं स्वतःच्या अनुभवांचं व विचारांचं आलेखन करण्यासाठी ते लिहिलेलं आहे. लोकांच्या मनाला उबग आणतील, हादरा देतील व स्वतःची सामाजिक प्रतिष्ठाही उणावेल असं प्रामाणिक लेखन एखाद्या संस्थानिकानं करणं ही मूळातच एक प्रचंड घटना होती. लहान संस्थानिकांच्या जीवनात असणारे ताणतणावे इथं दिग्दर्शित होतात. कला, न्याय, शरीराचं आरोग्य या विषयांत प्राण ओतून काही घडावं यासाठी धडपडणार्‍या या राजानं स्वतःच्या आयुष्यातलं भलंबुरं न लपवताना आपलं जीवन झाडामाडासारखं जनतेपुढं ठेवलं. बालमानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राजकारणाचे अभ्यासक यांनाही हा वृत्तांत उपयुक्त असाच होता. पण आमचे अपसमज आडवे आले. मानीव सोवळेपणाला तो प्रामाणिक आलेख बळी पडला. अश्लीलतेचा भयंकर बभ्रा झाला. आणि या पुस्तकावर बंदी आली ती अजून उठली नाही.

या गोष्टीचा मी उल्लेख केला तो अशासाठी की, इतक्या त्रयस्थ वृत्तीनं आत्मचरित्र सहसा कुणी लिहीत नाही. समाजाला त्यामुळे बोध व्हावा ही तळमळदेखील क्वचितच आढळते. आपल्याकडची आत्मचरित्रं बहुशः एकांगी व आत्मविसंगत असतात. पुष्कळांची शैली चांगली असते. पण शैली म्हणजे सत्य नव्हे. राजकारणी पुरुषदेखील आत्मचरित्र लिहिताना प्रामाणिकपणा पाळीत नाहीत. त्यांच्यात दृष्टीचाही अभाव अनेकदा आढळतो. आपण कसे घडलो, आपल्याला आपल्या त्रुटीमुळे अगर बाह्य परिस्थितीमुळे काय भोगावं लागलं, ते ते सांगत नाहीत. त्यांच्यात न्यायीपणाच आढळत नाही. स्वतःची प्रतिमा घडवण्यासाठीच लोक झटत असतात. अपवाद फक्त गांधींचा. आता राजेरजवाडे उरलेले नाहीत. परिस्थितीत बदल झालेला आहे. लैंगिक गोष्टींकडे पुष्कळच सामंजस्यानं पाहिलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ह्या पुस्तकाचं पुनर्मुद्रण प्रौंढांसाठी होणं आवश्यक आहे. एकेकाळी अश्लीलतेचं बळी झालेलं हवलॉक एलिसचं ‘सायकॉलॉजी ऑफ सेक्स’ हे सप्तखंडात्मक पुस्तक आज अगदीच मंद, मर्यादांतर्गत वाटतं. फ्रॉईड वाचून आता कुणाला धक्का बसत नाही. हा काळाचा महिमा आहे. कारण विज्ञानयुगात ज्ञानाच्या कक्षा अपरिहार्यपणे वाढल्या आहेत. एखाद्या कृतीला अश्लील म्हणून किंवा अन्य साहित्येतर कारणांनी  त्याज्य ठरवलं व तिच्याशी संबंधीत असलेल्या व्यक्तींना शासन करून ती कृती लोकांच्या दृष्टीआड करून तिच्याविषयी भल्याभल्यांनी बोभाट केल्यानं ती त्याज्य होते असं नाही. कालाचा निर्णय नेहमी बदलत असतो. याचं उत्कृष्ट उदाहरण पाश्चात्य कादंबरीकार जेम्स जॉइस ह्याच्या कादंबर्‍यांचंच आहे. ‘गटार’ म्हणून सज्जनांनीही त्याकाळी वर्णिलेली ‘युलिसिस’ ही त्याची कादंबरी प्रथम मार्गारेट अँडरसन या संपादिकेनं अमेरिकेत ‘लिटल रिव्ह्यू’त प्रसिद्ध केली. खटला, दंड वगैरेंना ती कचरली नाही. यानंतर टीकाकारांचंच नव्हे तर लोकमतदेखील पालटलं. आज जोसेफ कँबेल हे अतिशय गंभीर लेखन करणारे विद्वान आपल्या ‘मिथ्स टु लिव बाय’ या ग्रंथात म्हणतात की, विसाव्या शतकातला सर्वांत प्रतिभाशाली लेखक जेस्म जॉइस असून त्याला नोबेल प्राईज मिळालं नाही. 1930 साली त्याची ‘फिनेगन्स वेक’ ही कादंबरी अनाकलनीय म्हणून निकालात काढण्यात आली. पण त्या कादंबरीची सहीसही भ्रष्ट नक्कल करणार्‍या ‘द स्किन ऑफ द टीथ’ या कादंबरीबद्द्ल थॉर्नटन वाइल्डर या लेखकाला मात्र पुलित्झर प्राईज मिळालं.

याबाबतीत राजवाड्यांची साक्षदेखील महत्त्वाची ठरते. ‘कादंबरी या निबंधात ते म्हणतात : जाज्जवल्य मनोवृत्तीशिवाय कादंबरी होणार नाही. कादंबरीकाराने समाजाची इच्छा काय आहे ते समजून घेतले पाहिजे; त्याचे स्वरूप जाणले पाहिजे. कादंबरीकार आपल्या कामाला जारीने लागला की, लहान मुलांना पशुपक्ष्यांच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात तो युक्ती व साहस ह्यांचे बीजरोपण करील; स्त्रीजनांना संसारसुखाची गुरुकिल्ली पटवील; तरुणांना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे रहस्य कळवील; आणि वृद्धांना आयुष्याच्या इतिकर्तव्यतेचे दिग्दर्शन करील; आणि इतकेही करून ते कसे व केव्हा केले हे कोणाला समजून देणार नाही. अशी या मयासुराची करणी आहे. युधिष्ठिराप्रमाणे ती ज्या लोकांना साधली ते लोक धन्य होत. राजवाडे कादंबरीकाराला कुठलाही अविषय नाही याबद्द्ल सांगताना, समाजातील नीतीने, वर्तनाने, विचाराने, राहणीने व दारिद्-याने गलिच्छ असा जो भाग त्याचे प्रदर्शन करणे सत्कादंबरीकाराचे काम नव्हे. असा सामान्य समज सांगून ते म्हणतात की, परंतु असा समज निसर्गाच्या विरूद्ध आहे. उजेड आणि अंधार, ईश्वर आणि सैतान, चांगले आणि वाईट, सद्गुण आणि दुर्गुण ह्या जोड्या ब्रम्ह्याने सृष्टीच्या प्रारंभापासूनच निर्माण केल्या आहेत. त्यांपैकी एकीचा निषेध कोमल मनाच्या कादंबरीकारांनी केला म्हणजे ती नाहीशीच होते असे थोडेच आहे? डोळे गच्च मिटून धरले म्हणून अस्वल अंगावर चालून यावयाचे थोडेच राहते? तेव्हा समाजातील हा जो पतीत भाग आहे, त्याच्या स्थितीचे प्रदर्शन करणे हे प्रत्येक कादंबरीकाराने आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे. श्रीमंतीत अंध झालेल्या राष्ट्रातील कादंबरीकारांना तसे वाटले तर खुशाल वाटो. परंतु हिंदुस्थानातील व महाराष्ट्रातील कादंबरीकारांना तसे वाटून परिणाम लागावयाचा नाही. ह्या देशातील दारिद्-याने गांजलेल्या, रोगाने पिडलेल्या, विद्येने मागसलेल्या सामान्य जनसमूहाचा कैवार सहृदयतेचे मूर्तीमंत पुतळे जे कादंबरीकार त्यांनी घेतला नाही तर दुसरा कोण घेईल? लोकांची खरी स्थिती लोकांच्या मनात यथास्थित बिंबविण्याला कादंबरी-सारखे दुसरे साधन नाही.

कादंबरीत अद्याप संविधानाला महत्त्व आहे. संविधानात काहीतरी मूलाधार-प्रसंग असतात किती आद्य प्रकार किंवा आ़कृतीबंध संभवतात? जर्मन कवी गटेनं असे प्रकार एकंदरीत छत्तीसच असतात असं नमूद केल्याचं आर्थर कोइस्लर ‘अ‍ॅक्ट ऑफ क्रिएशन’ या ग्रंथात  सांगतात व ते आपल्याला मान्य असल्याचंही काही उदाहरणं देऊन सांगतात. या मूलबंधाच्याच विविध पर्यायांची आवर्तनं अद्यापही कादंबरीत आढळतात. कादंबरी अजून त्यापलीकडे गेलेली नाही असं मत त्यांनी नमूद केलं आहे. हे बर्‍याच प्रमाणात खरं असलं तरी आधुनिक कादंबरी आता संविधानकाच्या साच्यातून सुटण्याचा प्रयत्न करते आहे यात शंका नाही.

शिष्ट किंवा प्रमाण अगर लेख्य भाषा हीच काय ती सौंदर्यपूर्ण व अभिव्यक्तीसाठी उचित भाषा आणि बोलीभाषा अगर ग्रामीण भाषा ही अभिव्यक्तीला कमीपणा आणणारी भाषा- असं आजही काही संस्थांच्या व्यासपीठांवरून बोललं जातं, ते पाहून आश्चर्य वाटतं. शिष्ट भाषा व बोलीभाषांचं अभिसरण साहित्यिक वातावरणाला पोषक आहे, मारक नाही. अशिष्ट भाषेचं शिष्टीकरन कसं होतं ते डॉक्टर केतकरांनी पूर्वीच सांगितलं आहे. पण शिष्ट भाषादेखील सदैव बदलत असते. चिपळूणकरांचं मराठी त्याकाळी अत्यंत सुंदर होतं. पण आज ते पुरं पडणार नाही व तेवढ आकर्षकही वाटत नाही. पोषाखाप्रमाणे भाषादेखील सतत बदलत असते. बदल हाच भाषेचा स्वाभाविक धर्म आहे. भाषा अनुभवाला अनुसरते आणि अनुभव तर सतत वेगवेगळ्या रूपांत येत असतो.

परंतु शिष्टाचाराप्रमाणे शिष्ट अगर प्रमाणित भाषा उचलण्याकडेच लोकांचा कल असतो. बोलभाषेत कितीही लिहलं आणि प्रमाणित भाषेनं लोकभाषा कितीही आत्मसात् केली तरी जिथं असंदिग्ध, विदग्ध आणि शास्त्रीय अभिव्यक्ती लागते, तिथं प्रमाणित भाषाच काय ती उपयुक्त होते व ती टिकूनही राहते. शास्त्रीय वाङ्मय तर याच भाषेवर जगभर अवलंबून आहे. त्याला पर्याय नाही. लोकांच्या ज्ञानाची कक्षा वाढते तसं प्रमाणित वाङ्मय लोकांना दूरचं किंवा सोवळं वाटत नाही. शास्त्रकाराला तर काहीच परकं नसतं. नाटक, कथाकादंबर्‍या व कवितांत मात्र बोलभाषेचा वापर अधिक वास्तवपूर्ण व प्रत्ययकारी होतो यात शंका नाही. परंतु एवढं मात्र खरं की, भाषेचे हे दोन स्तर परस्परपूरक आहेत. विज्ञान आणि साहित्य यांचे संबंध अतूट असायला हवेत. कारण विज्ञाअन नवी क्षितिजं स्पर्शीत आहे आणि सर्व तर्‍हेच्या साहित्यात नवी क्षितिजं यावीत ही आजची प्रथमिक गरज आहे. मानवाच्या भवितव्याची चाहूल या जाणिवेतूनच लागायची आहे. धर्मात श्रद्धा मूलभूत असते. धर्मानं आजवरच्या साहित्याला प्रेरणा दिली आहे. त्याची जागा विज्ञान घेईल काय असं अनेकांना वाटतं. पण तसं पाहिलं तर विज्ञानातदेखील श्रद्धा असतेच. विज्ञानाचा हेतू श्रद्धामयता नसतो हे खरं असलं तरी सत्यावाचून धर्म, कला, विज्ञान नाही-तसंच साहित्यही नाही. विज्ञानात वैश्विक दृष्टी अभिप्रेत असते. ते प्रासंगिक व प्रादेशिक नसतं. साहित्यात भाषाच ठरीव लोकसमूहाछी प्रातिनिधिक असल्यानं ते सदैव प्रादेशिक पोषाख घालून बसलेलं दिसतं. पण त्यातली ती मर्यादा त्याच्यातल्या वैश्विक दृष्टी ठेवून लेखन करतो, तोवर ते लेखन योग्य दिशेनंच वाटचाल करतं व योग्य तो परिणाम साधू शकतं.

विज्ञानाच्या विकासाबरोबर मानवाच्या अहंकराला हादरे बसू लागले. कोपर्निकसनं प्रथम आपल्याला जाणीव करून दिली की, मानव काही विश्वाचं केंद्र नव्हे. दुसरा हादरा मानावाचा अनुल्लंघनीय पाशवी अविष्कार दाखवून डार्विननं दिला. मानवाचं आस्तित्व भविष्यकाळी लोप पावण्याचा संभव असल्याचं त्यानं दाखवन दिलं. आणि फ्रॉइडनं तर जबरदस्त तडाखा हाणला. मानवी अहंकाराला त्यानं दाखवून दिलं की, ‘बाबा, ज्या मनोभूमित तू राहतोस, तिच्यात क्षणोक्षणी घडणार्‍या गतिशील हालचालींचं-ज्या हालचालींवर तुझी नियती अवलंबून आहे-तुला यत्किंचितदेखील ज्ञान नाही.’

तेव्हापासून माणूस आपले मनोव्यापात भयग्रस्त होऊन तपासू लागला. ही भाराक्रांत अवस्था पाश्चात्य कादंबरी-वाङ्मयात फ्रॉइडमुळेच आविर्भूत झाली. एकोणिसाव्या शतकातल्या कादंबरीशी नव्या कादंबरीचं कुठंच जुळत नाही. तसं पाहिलं तर ही नवी कादंबरी जुन्या ठसठसीत कादंबर्‍यांप्रमाने मनोरंजक नसते. तिला संविधान नसतं. विश्लेषण मात्र भरपूर असतं. ह्या कादंबरीच्या मानसशास्त्रीय बैठकीमुळे सवंग लोकप्रियता हे बाह्य मूल्य आपोआपच  तिच्यापासून दूर राहू लागलं. आणि काही अस्वस्थतेचा शोध घेणार्‍यांनाच तिच्यातलं मूल्य ओळखता येऊ लागलं. आपल्याकडेही केंद्र हरवलेल्या माणसाची चित्रण आता कुठं सुरू होऊ लागली आहेत. भाऊ पाध्ये, चिं. त्र्यं खानोलकर, जयवंत दळवी वगैरे लेखक असा प्रयत्न करताहेत. पण जून त्यांच्या कृती यशस्वी होण्याइतकं सामर्थ्य त्यांच्यात आलेलं नाही. अनेक लेखक जेव्हा नव्या प्रवाहात स्वतःला  झोकतात, तेव्हा एखाद्यालाच कालांतरानं सिद्धी प्राप्त होते. कारण मनुष्य काय आहे आणि मानव्य अंगी येणं म्हणजे काय आहे हे दोन प्रश्न, विल्यम सॅडलर ‘एक्झिस्टन्स अँड लव’ या ग्रंथात म्हणतात त्याप्रमाणे, आताच्या लेखकांपुढे येत राहतात. सामाजिक मानसशास्त्राच्या आधारे आता आपण मानवप्राणी आणि त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट यांचा विचार करायला उद्युक्त होत आहोत.

माणसा-माणसांतले परस्परसंबंध, क्रिया-प्रतिक्रिया, प्रेरणा आणि उद्गार यांच्यातली नवी नाती आपण नव्यानंच हुडकतो आहोत. तत्त्वज्ञानदेखील एक शास्त्रच आहे. मानवाच्या ध्येयसृष्टीविषयी, त्याच्या वैयक्तिक आणि समष्टियुक्त जीवनातल्या सुसंगती आणि विसंगतींबद्दल  हे शास्त्र आपल्याला नव्या वाटा दाखवतं आहे.

नवी क्षितिजं निर्माण करण्याची आत्यंतिक गरज आज विज्ञान आपल्याला पटवून देतं आहे. कुठल्याही लेखकाला आपापल्या विषयाचं शास्त्रीय आकलन काही प्रमाणात तरी असल्याशिवाय त्याचं आज निभणार नाही. वैज्ञानिक कथाकादंबर्‍यांची आज नितांत गरज आहे. दि. बा. मोकाशी, नारायण धारप वगैरेंनी अशा स्वरूपाच्या काही कथा दिल्या आहेत. त्या सद्यःपरिस्थितीत आपण स्वीकारतोच आहोत आणि असे प्रयत्नही होतील तेवढे व्हायलाच हवेत. परंतु मराठीत वैज्ञानिक कथेचं खरंखुरं क्षितिज जर कुणी प्रथमच खोललं असेल तर ते डॉक्टर जयंत नारळीकरांनी. ते स्वतः विश्वविख्यात वैज्ञानिक आहेत. त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांना मनःपूर्वक यश चिंतिते. ‘द इल्यूजन’मध्ये डेव्हिड काउटे म्हणतात, “आजच्या लेखनाचं वैशिष्ट्य हे की उद्गारपूर्व अनुभव, ‘मी’-च्या जाणिवेपूर्वीचा अनुभव शब्दांकित करण्याचा प्रयत्न. ‘मी’ला आपल्या साक्षित्वाची अगर भावनांची जाणीव होण्यापूर्वीचा हा क्षण असतो.” दुर्बोधता इथं अटळ असते. आक्षेप येण्याचा संभवही खूप असतो. रंजकतेपासून हे साहित्य दूर असतं.

पण वास्तवाची पकड ते सोडीत नाही. वास्तव म्हणजे काय तर तपशिलातला सत्यपणा, आणि प्रातिनिधिक आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगातलं सत्य चित्रण. हे करायचं तर लेखकाचा मानसशास्त्राशी चांगलाच परिचय हवा. कथाकादंबरी वाङ्मयात-अगर चरित्रलेखनातही-पात्रांचे व्यवसायानुसार व स्वभावानुसार ठसेच बनत असतात. विसाव्या शतकात दुभंग अगर भग्न व्यक्ती दाखवण्याची प्रथा बळावलेली आहे, यात शंका नाही. माणूस माणसाला कणाकणांनी हुडकतो आहे. नि समग्र मानव त्याला आढळत नाही. पूर्ण मानव कसा असावा याची कल्पना नसली तरी त्याला अपेक्षा त्याला आहे. मग पुरातन काळातले आदर्श तो घेतो, त्यांत नवे नमुने करतो. कधी लहान आणि अपवादांनीच गांजलेल्या लहानांनाच तो मोठं परिमाण देतो किंवा चक्क अ-नायक उभे करतो. भग्न व्यक्तित्वाचे ठसे आपल्या कथाकादंबर्‍यांत नुकते नुकतेच रुजू घातले आहेत. खानोलकरांची सर्वच पात्रं लैंगिक विकृतीनं पछाडलेली आढळतात. या पात्रांतल्या विकृती निसर्गनिर्मित असतात. जयवंत दळवींची पात्रं अनेकदा परिस्थिती-निर्मित असतात. ‘स्वगत’ ही कादंबरी त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आता तर त्यांनी सार्‍या अर्धवट अगर पूर्ण वेड्यांच्याच दुःखपूर्ण जाणिवा-नेणिवा रेखाटल्या आहे. विजय तेंडूलकर आपल्या नाटकांत लैंगिक हिंसाचार दाखवतात. अर्थात ह्या कुठल्याही कृतींना अद्याप ते-ते माणसाचे उत्कृष्ट नमुने बनवून कथेला समाधानकारक कलाकृतीचं स्वरूप देता आलेलं नाही. अजून आमचे लेखक चाचपडत चालले आहेत. असे नमुने कलापूर्ण करायला कालावधी लागतो, व सामुदायिक जाणदेखील लागते. ‘मला प्रेमकथा लिहिता आली नाही, कारण प्रेमाची भाषा अद्याप मराठीत घटलेली नाही’ असं डॉक्टर केतकर म्हणायचे. सराईत दृष्टीखेरीज निर्मिती होत नाही हे सत्य आहे. परंतु काही स्वभाववैशिष्ट्यांबद्द्ल या मंडळींचा अंदाज चांगलाच लागला आहे यात शंका नाही.

पण राजकीय कादंबरीत मात्र अद्यापि कामगार चळवळीखेरीज दुसरं कथानक क्वचितच येतं. स्वतंत्रपणे राजकारणाचं शास्त्र जाणल्याखेरीज आणि अशा जटिल पार्श्वभूमीवर राजकारण्याचं चित्र रेखाटताना त्याच्या स्वभावचा केंद्रबिंदू कुठला, हे अद्याप आमच्या कादंबरीकाराला अगर नाटककाराला व्यवस्थित उमगलेलं दिसत नाही. पाश्चात्य कादंबरीत ते तंत्र बरोबर बसून गेलं आहे. मानसशास्त्राची गहन प्रमेयं तिथल्या लेखकांनी अवगत केल्यानं त्यांना राजकारणी पात्राची उभारणी तिथल्या पार्श्वभूमीवर मुक्तपणे रंगवता येते.

अँथनी स्टोर यांनी ‘द डायनॉमिक्स ऑफ क्रिएशन’ मध्ये अशा माणसाची मनोभूमी विशद केली आहे ती अशी : महत्त्वाकांक्षी माणसं असतात त्यांना कामाशिवाय घटकाभरदेखील राहता येत नाही. त्यांना रिलॅक्सेशन माहीतच नसतं. त्यांना वैयक्तिक संबंधांकडे लक्ष द्यायलाही फावत नाही. कलावंतापेक्षा मुत्सद्दी आणि उद्योगपती यांच्यात या प्रवृत्ती अधिक असतात असं सायकिअ‍ॅट्रिस्ट्सना आढळून आलं आहे...राजकारणी पुरुष जागा असलेला सर्व वेळ कार्यात व्यग्र असतो...ज्यांना सारा वेळ काम करीत रहायची मानसिक गरज असते, त्यांना राजकारणाचं जीवन आदर्श असतं. राजकारणी माणसं अंतर्गत सुरक्षिततेच्या जाणिवेमुळेच सत्ता काबीज करायला बघतात. व्यक्तिगत संबंधांतून पोसलं जाणारं आत्मभान बाजूला सारून त्याच्याजागी ते बाह्य कार्यव्यापृततेचा वापर करतात.

आता आपल्याकडे राजकारणी पुरुषाच्या या मुख्य वैशिष्ट्याचीच जाण नसल्यामुळे अगर असल्यास ती प्रकट करणं सोयिचं नसल्यामुळे ,शिवाजी, माधवराव पेशवे ते टिळक यांच्यापर्यंत केवळ ढोबळ व्यक्तिपूजेसाठी कादंबरीनिर्मिती झाली आहे. राजकीय हालचालींचा व व्यक्तींचा यथातथ्य मागोवा घेणार्‍या चरित्रात्मक वाङ्मयाची आपल्याकडे वाण आहे. तरी आता ती भरून निघण्याची सुचिन्हं कुठं कुठं दिसत आहेत. उदाहरण वि. श्री. जोशी यांनी लिहिलेया वासुदेव बळवंत व चाफेकर बंधूंच्या चरित्रांचंच आहे. आता कुठल्याही कादंबरीकाराला लेखन करायला हा कालखंड उपलब्ध झाला आहे. राजकीय व्यक्तीच्या चित्रणाकडे वरील शास्त्रपूत दृष्टिकोनातून पाहिल्यास आता राजकीय माणसाचा असा नमुनाही सद्यःपरिस्थितीत लेखनावर बंधनं आलेली असताना लेखकाला करता येत नाही. राजकारणाच्या चर्चेची समस्त दालनंच बंद झाल्यावर व्यक्तिचित्रण कुठलं? डोळ्यांसमोर घडणार्‍या घटनांना आम्ही साहित्यबद्ध करू शकत नाही. साहित्याची ही अपरिमित हानी आहे. आधी विसावं शतक मागच्या सर्व शतकांपेक्षा मानवाला अधिक उत्तेजित करणारं, क्षोभांनी भरलेलं शतक आहे. ज्ञानाची क्षितिजं हरघडी रूंदावताहेत. हिंसाही वाढते आहे. जग एकत्रित होऊ पाहतं आहे आणि देशांची शकलंही पडताहेत. त्याचे परिपाक डोळ्यांसमोर आहेत. पण त्यांचं वर्णन सत्ताधीशांच्या केवळ गुणगौरवाखेरीज आपल्याला करता येत नाही. ही अपरिमित हानी आहे. आत्ताच कुठं आमचा लेखक विविध क्षेत्रांतल्या लहानमोठ्या घटना व व्यक्ती यांना अपुर्‍या ज्ञानानं का होईना पण चापसून पाहू लागला होता. राजकारणाला हात घालावा असं आता आताच कुणाच्या क्वचित मनात येत होतं. गंभीर वृत्तीनं राजकारण्यांकडे बघावं हे कुतूहल निर्भर होतं. त्याच सुमारास बंधनं आली की विचारांचा ओघच खंडित होतो. नुकतंच ऐकलं की विजय तेंडूलकर व जयवंत दळवी यांची  राजकीय समस्यांना किंचित स्पर्श करणारी नाटकं अडकून पडली आहेत.

मानवाला अनेक दुःख भोगावी लागतात. अनेकांची दुःखी मुकी पण खोल असतात. त्यांचा वाचा देणं हेच साहित्यिकांचं कार्य असं काम म्हणतो. परंतु आपल्याकडे साहित्यिकांनी अशा प्रचंड दुःखांना वाचा पुरवली नाही. त्यांना वाचा दिली ती महात्मा गांधींनी व तीही राजकीय पार्श्वभूमीवर. तेव्हापासून आमच्याकडे राजकारण आणि साहित्य ह्यांचं कार्य अतूट झालं आहे. म्हणूनच साहित्य हे आता राजकारणापासून तोडता यायचं नाही. परस्परसंबंध व सामंजस्य हे दोन गुण अशा साहित्याचं व्यवछेदक लक्षण समजले पाहिजेत.

तेव्हा सांगायचा मुद्दा असा की, भारतातल्या लेखकाला जगण्यासारखी परिस्थिती अजून आलेली नाही बहुसंख्य लेखकांना जगण्यासाठी दुसरे साहित्येतर उद्योग करणं भाग पडतं. हे तर मोठंच बंधन त्यांच्यावर कायमचं आहेच. ते पत्करल्यावर आपल्या चिमुकल्या विश्वात त्यानं आणखी काही बंधनं लादून घेणं उचित नाही. तसं झालं तर त्यांच्या अस्तित्वाचाच लोप होईल. मराठी लेखकांना मी काय संदेश देणार? संदेश तर दरिद्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पूर्वीच दिलेला आहे. शिवाजी महाराजांसारख्या लोकोत्तर राजानं भेटीला या असं म्हटलं तेव्हा त्यांनी जे म्हटलं, तोच संदेश आम्ही शिरोधार्य मानावा -

तुम्हांपाशी आम्ही येऊनियां काय।
वृथा सीण आहे चालण्याचा॥

सतराव्या शतकात तुकाराम महाराजांनी सांगितले त्याच तर्‍हेचे विचार विसाव्या शतकातदेखील उमटल्याशिवाय राहिलेले नाहीत. पण त्यांची दिशा वेगळी आहे. मानवी सामाजिक प्रतिष्ठा माणसाच्या कामी येत नाही, थोरामोठ्यांपुढे धावून माणसाला फारसं गाठता येत नाही, असा अनुभव आधुनिक विचारवंतांनी घेतला आहे. आता तुकारामासारखा संदेश देणं लेखकाला परवडणारं नाही, नीत्शेनं मानवाचं एकटेपण अटळ आहे हा शोकसूचक सूर काढला.त्याचेच सादपडसाद माणसाच्या एकलेपणाच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीत उमटलेले दिसतात. पूर्णपुरुष कृष्ण आज आम्हाला उपयोगी पडायचा नाही हे मी याच अर्थानं म्हटलं होतं. हा माणूस कितीही गुणी असला तरी त्याची धडपड त्याचं एकटेपण घालवू शकत नाही. मानसशास्त्रज्ञांनी माणसाच्य मनाचे जे गूढ खेळ आहेत, ते याच पार्श्वभूमीवर चितारलेले आहेत. आधुनिक लेखक माणूस इतका हिंस्त्र, दुबळा स्खलनशील का दाखवतात-या प्रश्नाचं उत्तर या पार्श्वभूमीतच सापडतं.

शोकात्मतेच्या अटळतेचा भाव आधुनिक वाङ्मयाचं एक प्राणभूत तत्त्वच झालेलं आहे. हे निर्मितीचं बीज आहे. माणसाच्या नियतीतच विनाश आहे ही दुःखपूर्ण जाणीव हाच विसाव्या शतकातल्या साहित्याचा स्थायी भाव आहे. या स्थायी भावामुळे माणूस अलिप्त आहे आणि तो स्वतःची धरणा मूल्यमापनासाठी वापरतो हे दिसून येतं. रवींद्रनाथांनीदेखील ‘एकला चलो रे’ असं म्हटलं आहे, ते उगीच नव्हे.

या सर्वांतून एक गोष्ट प्रतीत होते ती अशी की जो निर्माणकार आहे, त्याला निर्मितीसाठी एकटंच जाणं प्राप्त होतं. त्याची व्यथा, वेदना, शोक सारं काही त्यालाच सोसावं लागतं. जीवनातल्या संकटांबरोबर झुंजताना तडजोड त्यानं केली तर कदाचित् भौतिक स्वास्थ्य त्याला मिळेल. कदाचित् मानसिक निर्धास्तपणा मिळेल. पण निर्मिती कोंडून त्याला सुख निश्चित मिळणार नाही आणि मोठ्या श्रेयाला तो मुकेल. पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचीच हानी तो करील.

(साहित्य संमेलनाच्या स्त्री अध्यक्षांच्या भाषणांवर एक पुस्तक काढण्याचा माझा विचार होता. सर्वात प्रथम हा मान मिळालेल्या लेखिका म्हणजे कुसुमावती देशपांडे, त्यानंतर दुर्गा भागवत, विजया राजाध्यक्ष, शांत शेळके आणि अरुणा ढेरे यांना हा मान मिळालेला आहे. शांता शेळके यांचं भाषण सुद्धा असंच अप्रतिम आहे. आळंदी येथे झालेल्या संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाषण केलं होतं. पण आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर खूप गाजलेल्या १९७५ सालच्या कऱ्हाड येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून दुर्गा बाईंनी केलेलं भाषण अभूतपुर्व आहे. मराठी लेखकांना कायम मार्गदर्शक ठरेल असं हे भाषण आहे. हे भाषण आणि विनय हर्डीकर यांचा 'सुमारांची सद्दी' हा लेख वाचल्यानंतर माझं असं मत बनलं आहे की कोणाही नवोदित लेखकाने काहीही लिखाण करण्याच्या आधी हे दोन दस्तऐवज कायम समोर ठेवले पाहिजेत, इतकं मोलाचं हे भाषण आहे.) 

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....