इस्लाममध्ये अल्लाहने पृथ्वीवर सत्य धर्माचा संदेश देऊन पाठवले असे प्रेषित अनेक होऊन गेले. काही ठिकणी ही संख्या १ लाख २४ हजार आहे, असंही आलेलं आहे. आदामपासून ही प्रेषितांची मालिका सुरू होते. सेमेटिक परंपरेतला पहिला धर्म म्हणजे ज्यू आणि त्यांचा प्रेषीत मोझेस, त्याचा इस्लामी, अरबी, पर्शियन उच्चार 'मुसा' असा होतो. ज्यू किंवा ख्रिश्चन यांनी सांगितलेली प्रेषितांची परंपरा इस्लामने मान्य केलेली आहेत. कुराणमध्ये यातील अनेक मुहम्मदाच्या पूर्वीच्या प्रेषितांच्या कथा आलेल्या आहेत. मुहम्मदाच्या पूर्वीच्या पप्रेषितांच्या कथा ओल्ड टेस्टॅमेंट आणि न्यू टेस्टॅमेंटमध्ये आलेल्या आहेत, पण मुहम्मद पैगंबर आणि इस्लामच्या स्थापनेच्या पूर्वीच्या काळाला इस्लाम अंधाराचा, अज्ञानाचा काळ मानतो. त्यामुळे मुसलमान पूर्व प्रेषितांच्या कथाही सांगताना कुराणच प्रमाण मानतात. त्यापैकी आपण आधीच्या भागात ओझरता उल्लेख ज्याचा केला तो प्रेषित नोहा, याची अजून एक गोष्ट या लेखात आपण बघणार आहोत.
तबरीच्या इतिहासाचा दुसरा खंड प्रेषित अब्राहम याच्याविषयी आहे. प्रेषित अब्राहम याचे वडील मूर्तिपूजक होते. त्यामुळे अल्लाहच्या आज्ञेनुसार अब्राहमचा आपल्या वडिलांशी झालेला संघर्ष दुसऱ्या खंडात आहेत. शिवाय प्राचीन इराणमधील काही राजसत्तांचा ओझरता इतिहास तबरी आपल्याला सांगतो. या काळात अरेबिया, इराण आणि इस्रायलचा परदेश यांना महत्त्व प्राप्त झालं. त्या भागात राज्य केलेलं महान राजे, त्यांच्या कारकिर्दी तबरी सांगतो. शिवाय प्रेषित नोहा याच्या अनेक गोष्टी तबरीने या भागात सांगितल्या आहेत. त्यापैकी एक प्राचीन इराणमधील राजा 'अल दहहाक' याच्या गोष्टीत भारताचा संदर्भ येतो. आणि नंतर प्रेषित नोहाच्या गोष्टीत भारताचा पुन्हा एकदा संदर्भ येतो.
दंतकथा असं सांगते की राजा 'अल दहहाक' याने हजार वर्ष राज्य केलं. इस्लामी इतिहासात अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं शहर म्हणजे कूफा. या कूफाच्या उत्तरेला 'सवाद'या नार्स शहराच्या जवळच्या गावात राज्य करत होता. दंतकथेनुसूयार तो पृथ्वीचा अधिपती होता. पण वृत्तीने क्रूर आणि तऱ्हेवाईक होता. आणि असं मानतात की 'खांबाला जाळून मारणे किंवा खांबाला बांधून मारणे' याची सुरवात या राजाने केली. हा असा पहिला राजा झाला त्याने स्वतःला अनेक पदव्या लावून घ्यायला प्रारंभ केला. नाणी सुद्धा प्रथम या राजाने पडायला सुरवात केली, असं तबरी आपल्याला सांगतो. कथा असं सांगते की त्याच्या दोन्ही खांद्यांना मोठी जखम झाली होती, आणि त्याच्या त्याला असह्य वेदना होत असत. त्या वेदना कमी होण्यासाठी त्याला कोणीतरी मानवी मेंदूचं तेल लावयला सांगितलं होता. म्हणून तो रोज दोन माणसं मारून त्यांच्या मेंदूपासून तेल काढून त्या जखमेवर लावत असे. असा हा क्रूर आणि विकृत राजा प्रेषित अब्राहमच्या काळात राज्य करत होता. तबरी लिहितो की हा अल-दहहाक प्रेषित अब्राहमचा मालक होता. आणि अब्राहमच्या एकेश्वरवादाला दहहाकचा विरोध होता, म्हणून दहहाक त्याला जाळून मारण्याच्या विचारात होता. पण अल्लाह सर्व काही जाणत असल्याने ती आपत्ती टाळली.
अल दहहाकच्या पूर्वी जमशेद नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या अनेक मुलांपैकी एक म्हणजे जाफरीद्धुन याने 'अल-दहहाक'च्या राजधानीवर हल्ला करून ती ताब्यात घेतली. आणि अल-दहहाकला ती बातमी कळली म्हणून तो पुन्हा राजधानीकडे जाऊ लागला. पण अल्लाहयावेळी जाफरीद्धुनच्या पाठीमागे उभा राहिला, त्यामुळे दहहाकचा पराजय झाला. जाफरीद्धुन याने त्याला अटक केलं आणि धनबावनंदच्या पर्वतावर नेऊन ठेवलं. पर्शियन लोकं असं मानतात की 'दहहाक' अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्या धनबावनंदच्या पर्वतावर आहे. पण यात भारताचा संदर्भ कुठे आला? तर तबरी दंतकथेच्या आधारे आपल्याला असं सांगतो की ज्या वेळी अफारीद्धुनने दहहाकच्या राजधानीवर हल्ला केला त्यावेळी दहहाक भारतात होता. तबरी आपल्याला हे सांगत नाही की दहहाक भारतात कोणत्या उद्देशाने आला होता? कुठे आला होता? किती दिवस आला होता? फक्त तबरी एवढेच सांगतो की, एकेश्वरवादाचा अल्लाहचा संदेश घेऊन आलेल्या प्रेषित अब्राहमला जीवे मारण्याचा विचार करणारा 'दहहाक' अल्लाहच्या नियोजनाप्रमाणे मारला गेला. त्याच्याआधी तो भारतात आला होता.
तबरीने त्याच्या इतिहासात प्रेषित नोहाची सांगितलेली गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. अल्लाहने कुराणद्वारे मानवाला हे सांगितलं आहे, 'की प्रेषित नोहायाच्या मुलांना अमरत्वाचं वरदान मी दिलं आहे.' त्या प्रेषित नोहाच्या मुलांची आणि त्यांच्या मुलांची ही गोष्ट तबरी आपल्याला सांगतो. सेमेटिक परंपरेनुसार त्यावेळी ज्ञात जगामधल्या अनेक वंशांची निर्मित कशी कशी व कोणापासून झाली, याच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी ही एक कथा तबरी सांगतो. प्रेषित नोहाला चार मुलं झाली. शाम, हाम, याम आणि हेफेथ. यापैकी पहिली तीन मुलं आणि हेफेथ ही मुलगी. नोहाच्या शाम या मुळापासून पुढे अरब, पर्शियन आणि ग्रीक हे वंश निर्माण झाले. हाम पासून निग्रो वंश सुरु झाला. हेफेथपासून तुर्की आणि तुर्कांपासून पुढे निर्माण झालेलं वंश सुरु झाले.
याच्या पुढची वंशवेल खूप गुंतागुंतीची आहे. पण बाकीचा तपशिलात फार न शिरता मुद्द्याचा तेवढा भाग मी सांगतो. तबरीने मात्र अतिशय खोलात हे वंशवेल समजवून सांगितली आहे. नोहाचा मुलगा हामला पुढे ३ मुलं झाली. आणि हेफेथ या नोहाच्या मुलीला पुढे ७ मुलं झाली. हामच्या एका मुलाचं हेफेथच्या एका नातीशी लग्न झालं. त्या नातीचं नाव बाताविल. या बताविलपासून हामला जी मुलं झाली त्यांच्यापासून पुढे एबीसीनियन, सिंधी आणि भारतीय वंश निर्माण झाले असं तबरी सांगतो. पुढे ईजिप्शियन, सुदानीयन वगैरे वंशांच्या सुद्धा कथा तबरी सांगतो.
या वंशांच्या निर्मितीच्या कथांच्या अनेक वेगवेगळ्या आवृत्त्या पुढे येत राहतात. पण त्या कथांमध्ये फक्त मुलगा हामचा होता की हेफेथचा होता? मुलगा होता की मुलगी होती एवढेच बदल होत जातात. बाकी मूळ कथा तीच राहते. या कथांमधून तबरी आणि इस्लामी परंपरा हे सांगू इच्छितात की मुळात सर्व मानव हा प्रेषित नोहा पासून निर्माण झालेला आहे, त्या अर्थाने तो जन्माला येतो तेव्हा मुसलमानच असतो. नंतर त्याच्यावर बिगर इस्लामी संस्कार होतात त्यामुळे तो मुसलमान राहत नाही.
पुढे एका कथेत प्रत्यक्ष अल्लाह प्रेषित मोझेसला वंशांच्या उत्पत्तीच्या कथा सांगतो. ती कथा एका हदीसमार्फत आपल्यापर्यंत येते ती अशी की, "अरे मोझेस तू, तुझे लोक, बेटावर राहणारे लोक आणि दूरच्या प्रदेशात राहणारे लोक हे सगळे नोहाचा मुलगा शामपासून निर्माण झालेले आहेत. अरब, पर्शियन, सिंधी, नाबातियन्स, भारतीय हे सगळे नोहाचा मुलगा शामचे वंशज आहेत."
आधीच्या गोष्टीमध्ये दहहाकला सत्तेवरून हाकलून देऊन अन्यायी सत्ता उलथवून टाकणारा जाफरीद्धुन याने पुढे अनेक वर्ष राज्य केले. पण जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याच्या तीन मुलांमध्ये गाडीवर कोणी बसायचं यावरून वाद होतील, असं त्याला वाटलं. त्यामुळे आपल्या राज्याचे त्यानेच तीन भाग केले. आणि ते तीन भाग तीन मुलांमध्ये वाटून दिले. पण त्याची सविस्तर कथा तबरी आपल्याला सांगतो. त्याने जमिनीवर तीन बाण आखले. आणि प्रत्येक बाणाला आपल्या राज्याचा एक भाग नेमून दिला. त्याच्या मुलांनी अंदाजाने एक एक बाण निवडला, त्याप्रमाणे ठरलेले राज्य त्यांना मिळाले. पहिला मुलगा सर्म याला बायझंटाईन आणि त्याच्या पूर्वेचा प्रदेश मिळाला. दुसरा मुलगा 'टुज' याला तुर्कस्थान आणि चीनचा प्रदेश मिळाला. आणि शेवटचा मुलगा 'इराज' याला इराक आणि भारताचा प्रदेश मिळाला. तीन मुलांना राज्याचे तीन भाग करून देऊन जाफरीद्धुन मरून गेला.
No comments:
Post a Comment