Monday, 26 April 2021

अल-तबरीच्या लिखाणातील भारत - (लेख ३) - प्राचीन इराणी राजा आणि प्रेषित नोहा


इस्लाममध्ये अल्लाहने पृथ्वीवर सत्य धर्माचा संदेश देऊन पाठवले असे प्रेषित अनेक होऊन गेले. काही ठिकणी ही संख्या १ लाख २४ हजार आहे, असंही आलेलं आहे. आदामपासून ही प्रेषितांची मालिका सुरू होते. सेमेटिक परंपरेतला पहिला धर्म म्हणजे ज्यू आणि त्यांचा प्रेषीत मोझेस, त्याचा इस्लामी, अरबी, पर्शियन उच्चार 'मुसा' असा होतो. ज्यू किंवा ख्रिश्चन यांनी सांगितलेली प्रेषितांची परंपरा इस्लामने मान्य केलेली आहेत. कुराणमध्ये यातील अनेक मुहम्मदाच्या पूर्वीच्या प्रेषितांच्या कथा आलेल्या आहेत. मुहम्मदाच्या पूर्वीच्या पप्रेषितांच्या कथा ओल्ड टेस्टॅमेंट आणि न्यू टेस्टॅमेंटमध्ये आलेल्या आहेत, पण मुहम्मद पैगंबर आणि इस्लामच्या स्थापनेच्या पूर्वीच्या काळाला इस्लाम अंधाराचा, अज्ञानाचा काळ मानतो. त्यामुळे मुसलमान पूर्व प्रेषितांच्या कथाही सांगताना कुराणच प्रमाण मानतात. त्यापैकी आपण आधीच्या भागात ओझरता उल्लेख ज्याचा केला तो प्रेषित नोहा, याची अजून एक गोष्ट या लेखात आपण बघणार आहोत. 

तबरीच्या इतिहासाचा दुसरा खंड प्रेषित अब्राहम याच्याविषयी आहे. प्रेषित अब्राहम याचे वडील मूर्तिपूजक होते. त्यामुळे अल्लाहच्या आज्ञेनुसार अब्राहमचा आपल्या वडिलांशी झालेला संघर्ष दुसऱ्या खंडात आहेत. शिवाय प्राचीन इराणमधील काही राजसत्तांचा ओझरता इतिहास तबरी आपल्याला सांगतो. या काळात अरेबिया, इराण आणि इस्रायलचा परदेश यांना महत्त्व प्राप्त झालं. त्या भागात राज्य केलेलं महान राजे, त्यांच्या कारकिर्दी तबरी सांगतो. शिवाय प्रेषित नोहा याच्या अनेक गोष्टी तबरीने या भागात सांगितल्या आहेत. त्यापैकी एक प्राचीन इराणमधील राजा 'अल दहहाक' याच्या गोष्टीत भारताचा संदर्भ येतो. आणि नंतर प्रेषित नोहाच्या गोष्टीत भारताचा पुन्हा एकदा संदर्भ येतो.        

दंतकथा असं सांगते की राजा 'अल दहहाक' याने हजार वर्ष राज्य केलं. इस्लामी इतिहासात अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं शहर म्हणजे कूफा. या कूफाच्या उत्तरेला 'सवाद'या नार्स शहराच्या जवळच्या गावात राज्य करत होता. दंतकथेनुसूयार तो पृथ्वीचा अधिपती होता. पण वृत्तीने क्रूर आणि तऱ्हेवाईक होता. आणि असं मानतात की 'खांबाला जाळून मारणे किंवा खांबाला बांधून मारणे' याची सुरवात या राजाने केली. हा असा पहिला राजा झाला त्याने स्वतःला अनेक पदव्या लावून घ्यायला प्रारंभ केला. नाणी सुद्धा प्रथम या राजाने पडायला सुरवात केली, असं तबरी आपल्याला सांगतो. कथा असं सांगते की त्याच्या दोन्ही खांद्यांना मोठी जखम झाली होती, आणि त्याच्या त्याला असह्य वेदना होत असत. त्या वेदना कमी होण्यासाठी त्याला कोणीतरी मानवी मेंदूचं तेल लावयला सांगितलं होता. म्हणून तो रोज दोन माणसं मारून त्यांच्या मेंदूपासून तेल काढून त्या जखमेवर लावत असे. असा हा क्रूर आणि विकृत राजा प्रेषित अब्राहमच्या काळात राज्य करत होता. तबरी लिहितो की हा अल-दहहाक प्रेषित अब्राहमचा मालक होता. आणि अब्राहमच्या एकेश्वरवादाला दहहाकचा विरोध होता, म्हणून दहहाक त्याला जाळून मारण्याच्या विचारात होता. पण अल्लाह सर्व काही जाणत असल्याने ती आपत्ती टाळली. 



अल दहहाकच्या पूर्वी जमशेद नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या अनेक मुलांपैकी एक म्हणजे जाफरीद्धुन याने 'अल-दहहाक'च्या राजधानीवर हल्ला करून ती ताब्यात घेतली. आणि अल-दहहाकला ती बातमी कळली म्हणून तो पुन्हा राजधानीकडे जाऊ लागला. पण अल्लाहयावेळी जाफरीद्धुनच्या पाठीमागे उभा राहिला, त्यामुळे दहहाकचा पराजय झाला. जाफरीद्धुन याने त्याला अटक केलं आणि धनबावनंदच्या पर्वतावर नेऊन ठेवलं. पर्शियन लोकं असं मानतात की 'दहहाक' अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्या धनबावनंदच्या पर्वतावर आहे. पण यात भारताचा संदर्भ कुठे आला? तर तबरी दंतकथेच्या आधारे आपल्याला असं सांगतो की ज्या वेळी अफारीद्धुनने दहहाकच्या राजधानीवर हल्ला केला त्यावेळी दहहाक भारतात होता. तबरी आपल्याला हे सांगत नाही की दहहाक भारतात कोणत्या उद्देशाने आला होता? कुठे आला होता? किती दिवस आला होता? फक्त तबरी एवढेच सांगतो की, एकेश्वरवादाचा अल्लाहचा संदेश घेऊन आलेल्या प्रेषित अब्राहमला जीवे मारण्याचा विचार करणारा 'दहहाक' अल्लाहच्या नियोजनाप्रमाणे मारला गेला. त्याच्याआधी तो भारतात आला होता. 

तबरीने त्याच्या इतिहासात प्रेषित नोहाची सांगितलेली गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. अल्लाहने कुराणद्वारे मानवाला हे सांगितलं आहे, 'की प्रेषित नोहायाच्या मुलांना अमरत्वाचं वरदान मी दिलं आहे.' त्या प्रेषित नोहाच्या मुलांची आणि त्यांच्या मुलांची ही गोष्ट तबरी आपल्याला सांगतो. सेमेटिक परंपरेनुसार त्यावेळी ज्ञात जगामधल्या अनेक वंशांची निर्मित कशी कशी व कोणापासून झाली, याच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी ही एक कथा तबरी सांगतो. प्रेषित नोहाला चार मुलं झाली. शाम, हाम, याम आणि हेफेथ. यापैकी पहिली तीन मुलं आणि हेफेथ ही मुलगी. नोहाच्या शाम या मुळापासून पुढे अरब, पर्शियन आणि ग्रीक हे वंश निर्माण झाले. हाम पासून निग्रो वंश सुरु झाला. हेफेथपासून तुर्की आणि तुर्कांपासून पुढे निर्माण झालेलं वंश सुरु झाले. 

याच्या पुढची वंशवेल खूप गुंतागुंतीची आहे. पण बाकीचा तपशिलात फार न शिरता मुद्द्याचा तेवढा भाग मी सांगतो. तबरीने मात्र अतिशय खोलात हे वंशवेल समजवून  सांगितली आहे. नोहाचा मुलगा हामला पुढे ३ मुलं झाली. आणि हेफेथ या नोहाच्या मुलीला पुढे ७ मुलं झाली. हामच्या एका मुलाचं हेफेथच्या एका नातीशी लग्न झालं. त्या नातीचं नाव बाताविल. या बताविलपासून हामला जी मुलं झाली त्यांच्यापासून पुढे एबीसीनियन, सिंधी आणि भारतीय वंश निर्माण झाले असं तबरी सांगतो. पुढे ईजिप्शियन, सुदानीयन वगैरे वंशांच्या सुद्धा कथा तबरी सांगतो. 

या वंशांच्या निर्मितीच्या कथांच्या अनेक वेगवेगळ्या आवृत्त्या पुढे येत राहतात. पण त्या कथांमध्ये फक्त मुलगा हामचा होता की हेफेथचा होता? मुलगा होता की मुलगी होती एवढेच बदल होत जातात. बाकी मूळ कथा तीच राहते. या कथांमधून तबरी आणि इस्लामी परंपरा हे सांगू इच्छितात की मुळात सर्व मानव हा प्रेषित नोहा पासून निर्माण झालेला आहे, त्या अर्थाने तो जन्माला येतो तेव्हा मुसलमानच असतो. नंतर त्याच्यावर बिगर इस्लामी संस्कार होतात त्यामुळे तो मुसलमान राहत नाही.

पुढे एका कथेत प्रत्यक्ष अल्लाह प्रेषित मोझेसला वंशांच्या उत्पत्तीच्या कथा सांगतो. ती कथा एका हदीसमार्फत आपल्यापर्यंत येते ती अशी की, "अरे मोझेस तू, तुझे लोक, बेटावर राहणारे लोक आणि दूरच्या प्रदेशात राहणारे लोक हे सगळे नोहाचा मुलगा शामपासून निर्माण झालेले आहेत. अरब, पर्शियन, सिंधी, नाबातियन्स, भारतीय हे सगळे नोहाचा मुलगा शामचे वंशज आहेत."

आधीच्या गोष्टीमध्ये दहहाकला सत्तेवरून हाकलून देऊन अन्यायी सत्ता उलथवून टाकणारा जाफरीद्धुन याने पुढे अनेक वर्ष राज्य केले. पण जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याच्या तीन मुलांमध्ये गाडीवर कोणी बसायचं यावरून वाद होतील, असं त्याला वाटलं. त्यामुळे आपल्या राज्याचे त्यानेच तीन भाग केले. आणि ते तीन भाग तीन मुलांमध्ये वाटून दिले. पण त्याची सविस्तर कथा तबरी आपल्याला सांगतो. त्याने जमिनीवर तीन बाण आखले. आणि प्रत्येक बाणाला आपल्या राज्याचा एक भाग नेमून दिला. त्याच्या मुलांनी अंदाजाने एक एक बाण निवडला, त्याप्रमाणे ठरलेले राज्य त्यांना मिळाले. पहिला मुलगा सर्म याला बायझंटाईन आणि त्याच्या पूर्वेचा प्रदेश मिळाला. दुसरा मुलगा 'टुज' याला तुर्कस्थान आणि चीनचा प्रदेश मिळाला. आणि शेवटचा मुलगा 'इराज' याला इराक आणि भारताचा प्रदेश मिळाला. तीन मुलांना राज्याचे तीन भाग करून देऊन जाफरीद्धुन मरून गेला.  


Sunday, 25 April 2021

अल-तबरीच्या लिखाणातील भारत - (लेख २) - आदाम आणि इव्ह आणि नोहाज आर्क


या अल-तबरीने लिहिलेल्या 'तारीख-अल-तबरी' म्हणजे 'तबरीने लिहिलेला इतिहास' याच्या या चाळीस खंडापैकी पहिला खंड सुरवात होतो तो जगाच्या निर्मितीच्या गोष्टीपासून. सेमेटिक परंपरा असं मानते की अल्लाहने (सेमेटिक परंपरेत एकमेक आणि सर्व-शक्तिमान ईश्वराला विशेष शब्द आहे. त्याला केवळ ईश्वर म्हणून त्याच्या एकमेवाद्वितियतेचं स्वरूप लक्षात येत नाही. तो केवळ गॉड नसून 'द गॉड' आहे. मी हा सगळा अभ्यास इस्लामी परंपरेच्या दृष्टीने केला आहे त्यामुळे त्या ईश्वराला अल्लाह म्हणून उल्लेख करणार आहे. 'अल्लाह' ही नेमकी काय कल्पना आहे ते वेगळ्या ब्लॉगमध्ये मी सविस्तरपणे लिहिले आहे, त्याची ही लिंक - https://mukulranbhor.blogspot.com/2018/03/blog-post_25.html) सात दिवसाच्या अवधीत या विश्वाची निर्मिती केली. आणि मग खूप सविस्तरपणे दिवशी कशाची निर्मिती झाली हे सेमेटिक परंपरा सांगते. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम तिन्ही धर्म विश्वाची निर्मिती कशी झाली, यावर हेच उत्तर देतात. तपशिलाचे काही फरक त्यात  असतील, पण मुळातली गोष्ट तीच आहे. 



शिवाय विश्व निर्मितीची ती गोष्ट आपल्याला वाटते तितकी साधी नाही. तबरी त्याच्या इतिहासाची सुरवात या गोष्टीपासून करतो. या गोष्टींमध्ये 'इस्लाममध्ये शुक्रवारचं काय महत्त्व आहे' हे कळतं. पैगंबर म्हणतात, 'सूर्योदय पाहण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे शुक्रवार, कारण त्या दिवशी अल्लाहने आदामची निर्मिती केली, तो स्वर्गात स्थिरावला आणि शुक्रवारच्याच दिवशी त्याला पृथ्वीवर पाठवण्यात आले'. या पैगंबरांच्या हदीसचा संदर्भ घेऊन तबरी आपल्याला आदामच्या निर्मितीची गोष्ट सांगतो. 'ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचाताला काटा सेंकदाने देखील सरकत नाही हजार वर्षे ओलांडल्याशिवाय'चं गणित या सात दिवसांमागे आहे. तबरी सांगतो, पृथ्वीवरची हजारो वर्षे म्हणजे स्वर्गातील एक तास. अशा स्वर्गातील एका शुक्रवारी दिवसाचे ११ तास संपून गेल्यावर अल्लाहने आदामची निर्मिती केली. त्यानंतर पृथ्वीवरची चाळीस वर्षे जातील इतका काळपर्यंत त्याने आदमच्या शरीरात प्राण ओतला नाही. इतका काळपर्यंत त्याने आदामचं शरीर तसंच ठेवलं, मग त्याने त्यात प्राण ओतला. त्यांनतर मात्र आदाम काही काळ स्वर्गात राहिला. एक दिवस त्याने निषिद्ध झाडाचे फळ खाल्ले आणि पाप केल्यामुळे अल्लाहने त्याला पृथ्वीवर पाठवले. त्या दिवशीही शुक्रवारच होता. 

त्या दिवशीच्या सूर्यास्तापूर्वी अल्लाहने आदामला इव्ह बरोबर स्वर्गातून पृथ्वीवर पाठवून दिले. तबरी सांगतो की आदाम आणि इव्ह पृथ्वीवर उतरले तो 'भारत' होता. काही हादीसमध्ये land of india असा उल्लेख आहे. तर काही हादीसमध्ये it was in Dahna of the land of India असा उल्लेख आहे. तबरीच्या बाकीच्या लिखाणातून dahna चा नेमका अर्थ काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न गेल्या हजार वर्षात अनेकांनी केला आहे. त्यावरून dahna चा संबंध वाळवंटाशी शकतो असं अभ्यासकांचं मत आहे. त्यावरून 'भारताच्या भूमीतील वाळवंट' असा त्याचा अर्थ असू शकतो, असं मानण्यात येतं. एका हादीसमध्ये असा उल्लेख आहे की, भारत भूमी सुगंधी भूमी आहे, कारण आदाम  स्वर्गातून या भूमीवर उतरला तेव्हा स्वर्गातील सुगंध त्याने या मातीला दिला. 

एका हादीसमध्ये असा उल्लेख आहे की, आदाम पृथ्वीवर उतरला तो भारतात पण इव्ह उतरली 'जेद्दाह' म्हणजे अरबस्थानात. त्यानंतर दोघांचा एकमेकांना शोधण्याचा प्रवास चालू झाला, ते एकमेकांच्या जवळ आले, भेटले आणि एकमेकांना ओळखलं त्यावरून अराफत, जाम, अल मुझदालीफ अशा ठिकाणांची नाव पडली आहेत पण आदामला पृथ्वीवर पाठवलं ते भारताच्या भारतातील 'नुध' nudh या पर्वतावर!' हा प्रदेश नेमका कोणता आहे हे अजून स्पष्टपणे कोणाला सांगता आलेलं नाही. काही मुस्लीम अभ्यासक nudh मधील n चा उच्चार होत नाही, त्यामुळे udh चा संदर्भ 'बुद्ध'शी जोडतात आणि 'एडनच्या पूर्वेला नोदचा प्रदेश' या संदर्भावरून मेरूपर्वताशी याचा संबंध आहे का, अशी शंका उपस्थित करतात. पण अंती या सगळ्या शंका आहेत. 'नुध' नावाचा पर्वत श्रीलंकेत असल्याचं ही काही अभ्यासक म्हणतात.

अजून एका ठिकाणी उल्लेख असा आहे की, भारतामधील 'अल-दहनज' आणि 'अल-मंडल' या दोन ठिकाणांच्या मध्ये बुहायल नावाच्या नदीच्या जवळ वासिम नावाचा पर्वत आहे, तिथे आदाम उतरला. पृथ्वीवर आदाम उतरला तेव्हा त्याचे पाय या पर्वतावर होते, पण त्याचे तोंड अजूनही स्वर्गात होते. त्यामुळे अल्लाहला त्याचा आकार कमी करावा लागला. 

आदाम भारतात असताना अल्लाहचा त्याला आदेश आला की त्याने तीर्थयात्रा केली पाहिजे. गोष्ट अशी सांगते की आदाम तीर्थयात्रेसाठी निघाला तेव्हा त्याच जिथे जिथे पाय पडला तिथे तिथे 'गावं' निर्माण झाली आणि त्याच्या दोन पावलांच्या मधल्या प्रदेशात वाळवंट निर्माण झाली. पुढे गोष्ट असंही सांगते की, तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर आदामला पुन्हा भारतात यायचं होतं, पण देवदूत मध्ये पडून त्याची समजून घालतात आणि त्याने पुन्हा तीर्थस्थान सोडून कुठे जाऊ नये म्हणून सांगतात. आदाम ते ऐकतो. 

आदाम स्वर्गातून पृथ्वीवर येताना स्वर्गातील झाडांची पाने बरोबर घेऊन आला किंवा त्याचा मुकुट स्वर्गातील पानांपासून बनला होता. स्वर्गातून बाहेर पडल्यावर ती पाने सुकून गेली. पण त्यातून अनेक प्रकारची अत्तरं निर्माण झाली, असा उल्लेख अनेक गोष्टींमध्ये येतो. काही ठिकणी तर असे संदर्भ सापडतात की ठराविक प्रकारची अत्तरं ही फक्त भारतातील ठराविक ठिकाणी सापडतात याचा अर्थ आदाम तिथे उतरला असला पाहिजे.  

आदाम तीर्थयात्रेसाठी मक्केला गेला. तिथे तो इव्हला भेटला. यात्रेतील क्रियाकर्म करून झाल्यावर इव्ह बरोबर तो परत भारतात आला, असा उल्लेख एका ठिकाणी आहे. निवाऱ्यासाठी ते एका गुहेत राहत होते, तिथे पृथ्वीवर अल्लाहने त्यांना काय पेहेराव करायचा, कशापासून अंग झाकून घ्यायचे याची शिकवण देण्यासाठी देवदूत पाठवले, असे या गोष्टीत लिहिले आहे. 

तबरीच्या या इतिहासाच्या पहिल्या खंडात आदाम आणि इव्हबद्दल बरेच उल्लेख भारताशी संबंधित आहेत. त्यानंतर एका पर्शियन राजाचा तबरी उल्लेख करतो. लोखंडाचा प्रथम वापर त्या राजाच्या काळात सुरु झाला. तो पहिला राजा होत्या ज्याच्या काळात खनिज उत्पादनाला सुरवात झाली आणि त्याने त्याच्या प्रजेला खनिजांचा वापर कसा करायचा हे शिकवलं. तबरी लिहितो, शेतीमध्ये सुधारणा करणारा, शहरांची निर्मिती करताना अतिशय न्याय दक्ष म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे 'फेशदाद' अशी पदवी मिळालेला ओशाहॅंज नावाचा राजा एकदा भारतात येऊन गेला होता. 


पण याच्याशिवाय आणखी एक अतिशय महत्त्वाचा संदर्भ तबरीच्या लिखाणात सापडला. 'नोहाज आर्क' नावाची गोष्ट सगळ्यांना ऐकून माहिती असेल. पृथ्वीवर अधर्माचा प्रभाव वाढल्यामुळे प्रेषित नोहा अल्लाहला विनंती करतो की, "पृथ्वीवर तू प्रलय घडवून आण." अल्लाहशी जे एकनिष्ठ असतील त्यांच्यासाठी तो एक जहाज तयार करतो. तबरी सांगतो की ते जहाज तयार करण्यासाठी नोहाला चारशे वर्ष लागली. ते जहाजतयार करून अल्लाहशी एकनिष्ठ असलेल्या सगळ्या जीवांना तो एकत्र करून त्या जहाजावर नेतो. मग अल्लाह स्वर्गाची दारं उघडून पुथ्वीवर प्रलय आणतो. त्यामध्ये सर्व श्रद्धाहीन नामशेष होतात. आणि फक्त एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणारे शिल्लक राहतात. इस्लामी परंपरा असं मानते की आज पृथ्वीवर असणारे सर्व समुद्र हे त्या प्रलयातून शिल्लक राहिलेले आहेत. 

जेव्हा आदामला पृथ्वीवर पाठवून दिले त्यावेळी त्याच्याबरोबर काही गोष्टीदेखील पाठवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये लोखंडाची हत्यारे बनवण्यासाठी लागणारी साधने होती. आदाम पृथ्वीवर उतरला तेव्हा त्या पर्वतावर त्याला  लोखंडी झाड जमिनीतून वर आलेलं दिसलं. तो स्वर्गातून बरोबर घेऊन आलेल्या हत्यारांच्या मदतीने त्याने ते झाड तोडून काही वस्तू बनवल्या. त्यामध्ये सर्वप्रथम एक कुऱ्हाड किंवा तत्सम हत्यार बनवले ज्याचा उपयोग त्याने नंतर काम करण्यासाठी केला. परंतु त्यानंतर त्याने लोखंडापासून भट्टी तयार केली. त्या भट्टीचं आदाम काय केलं हे तबरी सांगत नाही. पण आदामच्या नंतर अल्लाहने नोहाच्या विनंतीवरून पृथ्वीवर प्रलय आणला आणि प्रलय ओसरला तेव्हा चा पुन्हा संदर्भ येतो. श्रद्धाहिनांच्या विरोधात जेव्हा प्रलयाची शिक्षा अल्लाहने दिली तेव्हा ती भट्टी कार्यान्वित झाली होती. तबरी म्हणतो हे सगळं भारतात झालं होतं. 

Saturday, 24 April 2021

अल-तबरीच्या लिखाणातील भारत - (लेख १)



इस्लामी इतिहासातलं महत्त्वाचं नाव म्हणजे 'अबू जाफर मुहंमद इब्न इब्न जरीर अल तबरी', म्हणजे 'अल तबरी.' इस्लामी इतिहासाबद्दल ज्यांनी थोडंफार जरी वाचन केलं असेल, कधी इस्लामी इतिहासाबद्दल काही कानावर पडलं असेल, त्याला हे नाव अपरिचित वाटणार नाही. नवव्या-दहाव्या शतकात होऊन गेलेल्या या माणसाने प्रचंड काम करून ठेवलं आहे, त्याने केलेलं कुराणचं भाष्य आजही प्रमाण म्हणून मानलं जातं. त्याने प्रेषितांचं लिहिलेलं चरित्र आजही प्रमाण मानलं जातं. इस्लामी न्यायशास्त्रात यांच्या शब्दाला किंमत आहे. असा हा माणूस.  

(तबरीच्या इतिहासाचे चाळीस खंड)


त्याच जन्म इराणच्या उत्तरेला कास्पियन समुद्राला लागून असणारा तबरीस्थान नावाचा प्रदेश आहे तिथे झालेला. इस्लामच्या स्थापनेनंतर २२४ वर्षांनी म्हणजे इसवीसन ८३९ मध्ये. आणि मृत्यू १७ फेब्रुवारी ९२३ मध्ये झाला. याचा अर्थ इस्लामी संस्कृतीचा DNA त्याच्या रक्तात भिनला होता. वयाच्या सातव्या वर्षी त्याने 'पवित्र कुराण' तोंडपाठ करून 'हाफ़ीज'चा दर्जा गाठला आणि लोकांना चकित केलं होतं. त्यामुळे नमाजचं नेतृत्व करण्यासाठी सुद्धा तो सातव्या वर्षीच पात्र ठरला होता. प्रेषितांच्या कृती अन उक्तीसुद्धा, म्हणजे हादीसचा अभ्यास करण्यासाठी तो पात्र ठरला.

त्यावेळी इस्लामी संस्कृतीचं नेतृत्व 'अब्बासी' खिलाफतीकडे होत. अब्बासी खिलाफतीची राजधानी बगदाद होती. इस्लामी धर्मशास्त्राचा 'इमाम हंबाली' याच्याबरोबर 'तबरी' पहिल्यांदा बगदादमध्ये गेला. हंबालीच्या हाताखाली त्याने शरियाच्या हंबाली परंपरेचा तर अभ्यास केलाच, पण हंबालीच्या मृत्यूनंतर त्यांनी इतर तिन्ही परंपरांचा सखोल अभ्यास केला. त्याकाळी जगातल्या सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक असणाऱ्या कैरो विद्यापीठाच्या आणि बगदाद विद्यापीठातील ग्रंथांचा 'तबरी' याने सखोल अभ्यास केला. 'कुराण'चे धर्मशास्त्र, त्याचा इतिहास आणि कुराणचे तबरीचे भाष्य आजही प्रमाण मानले जाते. पण त्याचे मॉन्युमेंटल काम म्हणजे त्याने लिहिलेला 'इस्लामी जगाचा इतिहास'. अब्बासी कालखंड हा इस्लामी इतिहासातला सुवर्णकाळ मानला जातो. त्यावेळी ज्ञात असणाऱ्या जागापैकी दोन तृतीयांश भागावर इस्लामी झेंडे पोचले ते अब्बासी काळात. अब्बासी काळात इस्लामी संस्कृतीचा सर्वांगाने विकास झाला. अब्बासी काळात उत्तमोत्तम इमारती उभ्या राहिल्या. साहित्य, काव्य या क्षेत्रात मोलाची प्रगती अरबी लोकांनी केली. कैरो, बगदाद येथे जागतिक दर्जाची विद्यापीठे निर्माण झाली होती. त्यावेळी ज्ञात जगात सर्वत्र त्यांचा व्यापार तर होताच. पण आताच्या निम्म्या पाकिस्तानपासून उत्तर आफ्रिकेतील आजचे सर्व देश, लिबिया, इजिप्त, अल्जीरिया, ट्युनिशिया, मोरोक्को आणि स्पेन इतका प्रचंड प्रदेश अब्बासी खिलाफतीच्या राजवटीखाली होता. अब्बासी कालखंडात या प्रदेशाला स्थैर्य सुद्धा मिळालं. इस्लमी धर्मशास्त्रातील सर्वात महत्वाचं असं सर्व साहित्य बहुतेक अब्बासी काळातच तयार झालेलं आहे. शरियाच्या चार परंपरा, प्रेषित महंमद पैगंबर यांचे सहीह बुखारी, सहीह मुस्लिम यांनी एकत्र केलेलं हादीस. प्रेषीतांचे चरित्र असं बरंच काही. 

(तबरीच्या कुराणच्या फारसी भाषांतराच्या सुरवातीच्या काही ओळी )

वयाच्या विशीत त्याने जगाचा प्रवासही केला होता. त्यामध्ये भारतात आला होता. अर्थातच त्याने कुराणवर केलेलं भाष्य, न्यायशास्त्राची घालून दिलेली नवीन पद्धत इत्यादीमुळे काहीसा वादामध्ये अडकलेला हा माणूस आहे.

'अल तबरी' यांनी 'जगाच्या निर्मितीचा इस्लामी सिद्धांत' इथपासून, म्हणजे अल्लाहने सहा दिवस पृथ्वीची निर्मिती केली, सहाव्या म्हणजे शेवटच्या दिवशी त्याने आदामची निर्मिती केली, इथपासून सुरवात करून इसवी सन ९१५मध्ये खिलाफत पुन्हा एकदा 'बगदाद'मध्ये आली, इथपर्यंतचा इतिहास लिहिला आहे. त्याने हे सर्व लिखाण केलं ते ही अब्बासी काळातच. 'अल तबरी' यांनी इतिहास, धर्मशास्त्र, तत्वज्ञान अशा आणि मानवी जीवनाशी संबंधित असा सर्व विषयावर भाष्य केलेलं आहे. इस्लामच्या अगदी सुवातीच्या काळात ह्या साहित्याची निर्मिती झालेली असल्यामुळे याला संदर्भ म्हणून खूप किंमत आहे. 

हादीस या प्रत्यक्ष प्रेषितांच्या गोष्टी असतात. परंतु इस्लामच्या इतिहासातला काळ जसा जसा पुढे जाऊ लागला तसा केवळ कुराण किंवा हदीस यातून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेनाशी झाली. प्रेषितांनी सांगितलं होतं की, एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधायचे असेल तर आधी कुराणमध्ये शोध, त्यात नाही सापडलं तर हदीसमध्ये. कुराण हदीसमध्येही उत्तर सापडलं नाही तर मात्र तुम्ही स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घ्या. अर्थात तो मानवी बुद्धीने घेतलेला निर्णय कुराण आणि हादीसने घालून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जाता कामा नये, हे उघड आहे त्यामुळे पैगंबरांनी तसं सांगितलं नाही. पण मानवी बुद्धीने घेतलेला निर्णय इस्लामने आखून दिलेल्या चौकटीची बाहेर जात कामा नये. पण त्यामुळे पैगंबरांच्या बरोबरीने इस्लामच्या निर्मितीपासून सोबत असलेल्या लोकांचे महत्त्व खूप वाढले. याचं साधं कारण म्हणजे ते प्रेषितांच्या बरोबर वावरले. त्यापैकी अनेक लोकं अल्लाहकडून आयात अवतरीत झाली तेव्हा प्रेषितांच्या आसपास होते. त्यामुळे प्रेषितांच्या हादीसच्या खालोखाल या प्रेषितांच्या सहकाऱ्यांच्या म्हणजे 'सलाफ' लोकांच्या गोष्टींना महत्त्व आलं. 'तबरी'ने या सलाफ लोकांच्या हदीस गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. तो पूर्ण झाला नाही.   

मागे अभ्यासाच्या निमित्ताने 'अल तबरी'चा उल्लेख अनेकदा अनेक ठिकाणी सतत येत असे. पण कधी मुद्दाम त्याच्याबद्दल वाचलं नाही, त्याने केलेला लिखाण वाचलं नाही. नंतर अशी वेळ आली की 'अल तबरी'ने लिहिलेलं वाचल्याशिवाय पुढेच जात येणार नाही. तेव्हा सुद्धा केवळ गरजेपुरतं वाचलं. पण त्यात काही दोन-पाच वेळा भारताचा संदर्भ येऊन गेला. इस्लामच्या इतिहासाचा, तत्वज्ञानाचा, राजकारण-समाजकारण-अर्थकारण या सगळ्याचा केंद्रबिंदू कायम इस्लामी जगातील तेव्हाचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. मध्ययुगात त्या खिलाफतींच्या राजधान्या होत्या, प्रेषित पैगंबरांच्या काळात मक्का-मदिना होते. त्यामुळे भारताचे येणारे उल्लेख उत्सुकता वाढवणारे होते. तेव्हा हा विषय डोक्यात आला होता, 'तबरीच्या लिखाणातील भारत'. आणि जसं जसं वाचत गेलो, अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी कळत गेल्या. त्याच्या चाळीस खंडात खूप वेळा भारताचा उल्लेख आहे. तो कोणत्या कोणत्या संदर्भात आहे, काय आहे असा सगळा आढावा या सिरीज विचार आहे. 

मी जे भाषांतर वाचून ही माहिती देतो आहे त्याने सुद्धा तबरीचं लिखाण भाषांतरीत करताना आलेल्या अडचणी मुद्दाम नोंदवून ठेवल्या आहेत. त्यात भाषांतरकार म्हणतो, तबरीला आधुनिक इतिहासाचे नियम लावता येणार नाही. तरी सुद्धा काळाच्या पुढे जाणारे इतिहास लेखनाचे नियम आणि शास्त्र तबरीच्या लिखाणात दिसते. पण अनेक ठिकाणी त्याने बोली कथा-गोष्टी वापरल्या आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी गोळा करून ठेवलेल्या हदीसच्या गोष्टी वापरल्या आहेत. तबरी स्वतः हदीसचा संकलक होता. त्यामुळे त्याला हदीस गोळा करण्याची आणि वापरण्याची शास्त्रशुद्ध पद्धत ज्ञात होती. त्यांना 'इस्नाद' म्हणतात. 

('हदीस म्हणजे काय?' हा प्रश्न ज्यांना पडला आहे त्यांच्याशी मी ब्लॉग तयार केला आहे, त्याची ही लिंक https://mukulranbhor.blogspot.com/2018/03/blog-post_18.html - हा ब्लॉग वाचून हदीस साहित्य म्हणजे काय हे कळेल.)  

तबरीचे लिखाण वाचताना सहज मला असं वाटून गेलं की भारतात आपण पुराण कथांचा अभ्यास करतो त्याप्रमाणे तबरीचा अभ्यास करता येऊ शकेल का? 


बाकी काहीही असलं तरी अतिशय सविस्तरपणे तबरीने घटना नोंदवून ठेवल्या आहेत. इस्लामचा उदय झाल्यानंतरच्या पहिल्या दोनशे वर्षातच इतकं मोठं काम तयार झालं, हेच आश्चर्यकारक वाटत मला. 

बघू काय काय सापडतं?


(टीप - तबरीचे लिखाण झाले दहाव्या शतकात. अर्थात ते लिखाण गायब वगैरे नव्हतं. मधल्या काळात सर्व इस्लामी सत्तांना तबरी माहिती होता. त्याचं कुराणवरचं भाष्य लोकं अभ्यासात होते. त्याचबरोबर तबरीचा सुद्धा लोकं वाचत होते. तबरीचा इसवीवन ९१५ मध्ये मृत्यू झाला त्यानंतर थोड्याच अवधीमध्ये त्याने केलेल्या इतिहास लेकखनाचे पहिले भाषांतर झाले होते. पण इस्लामी इतिहासातले प्राचीन संदर्भ आणि त्याचे नेमके अर्थ यामध्ये आणि मतमतांतरे आहेत. भारतीयांनी तबरीच्या लिखाणावर स्वतंत्रपणे लिखाण केलेलं नाही. त्यामुळे हा विषय सर्वस्वी नवीन आहे. त्यामुळे माझ्या तबरीच्या आकलनात अनेक चुका किंवा अपूर्णता असू शकते. शक्यतो जास्तीत जास्त अचूक माहिती देण्याचा मी प्रयन्त केला आहे. 

तबरीच्या लिखाणात सुमारे चाळीस-पंचेचाळीस वेळा तरी भारताचा संदर्भ येतो. यातला केवळ भारताचा उल्लेख असलेला परिच्छेद सांगून त्याचा नेमका अर्थ लागणार नाही. त्यामुळे मी असा प्रयत्न करणार आहे की त्याच्या पुढची मागची गोष्टही सांगायची. )

Friday, 23 April 2021

।। 'अल-तबरी' आणि त्याचा इतिहास ।।


'अल तबरी' नावाचा एक इतिहासकार होऊन गेला. त्याच जन्म इराणच्या उत्तरेला कास्पियन समुद्राला लागून असणारा तबरीस्थान नावाचा प्रदेश आहे तिथे झालेला. इस्लाम च्या स्थापनेनंतर २२४ वर्षांनी म्हणजे इसवीसन ८३९ मध्ये. याचा अर्थ इस्लामी संस्कृतीचा DNA त्याच्या रक्तात भिनला होता. वयाच्या सातव्या वर्षी त्याने 'पवित्र कुराण' तोंडपाठ करून 'हाफ़ीज' चा दर्जा गाठला. इतक्या लहान वयात संपूर्ण कुराण तोंडपाठ करून त्यांनी सर्वांना अर्थातच चकित केलं होत. त्यामुळे नमाजच नेतृत्व करण्यासाठी सुद्धा तो सातव्या वर्षी पात्र ठरला होता. प्रेषितांच्या कृती अन उक्ती सुद्धा अभ्यासण्यासाठी तो क्वालिफाईड झाला. 

त्यावेळी इस्लामी संस्कृतीचं नेतृत्व 'अब्बासी' खिलाफतीकडे होत. अब्बासी खिलाफतीची राजधानी बगदाद होती. इस्लामी धर्मशास्त्राचा 'इमाम हंबाली' याच्याबरोबर 'तबरी' पहिल्यांदा बगदादमध्ये गेला. हंबालीच्या हाताखाली त्याने शरियाच्या हंबाली परंपरेचा तर अभ्यास केलाच, पण हंबाली च्या मृत्यूनंतर त्यांनी इतर तिन्ही परंपरांचा सखोल अभ्यास केला. त्याकाळी जगातल्या सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक असणाऱ्या कैरो विद्यापीठाच्या आणि बगदाद विद्यापीठाच्या ग्रंथांचा 'तबरी' याने सखोल अभ्यास केला. 'कुराण' चे धर्मशास्त्र, त्याचा इतिहास आणि कुराण वरचे तबरीचे भाष्य आजही प्रमाण मानले जाते. पण त्याचे मॉन्युमेंटल काम म्हणजे त्याने लिहिलेला इस्लामी जगाचा इतिहास. अब्बासी कालखंड हा इस्लामी इतिहासातला सुवर्णकाळ मानला जातो. त्यावेळी ज्ञात असणाऱ्या जागांपैकी दोन तृतीयांश भागावर इस्लामी झेंडे पोचले ते अब्बासी काळात. अब्बासी काळात इस्लामी संस्कृतीचा सर्वांगाने विकास झाला. अब्बासी काळात उत्तमोत्तम इमारती उभ्या राहिल्या. साहित्य, काव्य या क्षेत्रात मोलाची प्रगती अरबी लोकांनी घातली. कैरो, बगदाद येथे जागतिक दर्जाची विद्यापीठ निर्माण झाली होती. व्यापार तर होताच. पण आताच्या निम्म्या पाकिस्तान पासून उत्तर आफ्रिकेतील आजचे सर्व देश, लिबिया, इजिप्त, अल्जीरिया, ट्युनिशिया, मोरोक्को आणि स्पेन इतका प्रचंड प्रदेश अब्बासी खिलाफतीच्या राजवटीखाली होता. अब्बासी कालखंडात या प्रदेशाला स्थैर्य सुद्धा मिळालं. इस्लमी धर्मशास्त्रच सर्वात महत्वाचं असं सर्व साहित्य बहुतेक अब्बासी काळातच तयार झालेलं आहे. शरियाच्या चार परंपरा, प्रेषित महंमद पैगंबर यांचे सहीह बुखारी, सहीह मुस्लिम यांनी एकत्र केलेलं हादीस. प्रेषीतांचे चरित्र असं खूप काही. 'अल तबरी' यांनी जगाच्या निर्मितीचा इस्लामी सिद्धांत इथपासून सुरवात करून इसवी सन ९१५ मध्ये खिलाफत पुन्हा एकदा 'बगदाद' मध्ये आली इथपर्यंतचा इतिहास लिहिला आहे. तो हि अब्बासी काळातच. 'अल तबरी' यांनी इतिहास, धर्मशास्त्र, तत्वज्ञान अशा आणि मानवी जीवनाशी संबंधित असा सर्व विषयावर भाष्य केलेलं आहे. इस्लाम च्या अगदी सुवातीच्या काळात ह्या साहित्याची निर्मिती झालेली असल्यामुळे याला प्रचंड किंमत आहे. आज 'अल तबरी' यांनी लिहिलेल्या इतिहास ग्रंथांची संख्या ४० आहे. ४० खंडात हे साहित्य विभागलेलं आहे. विल ड्युरांट किंवा अर्नोल्ड टॉयनबी यांनी एक हाती जगाचा इतिहास लिहिला त्या खंडांची संख्या प्रत्येकी ११ आणि १२ अशी आहे. पण नवव्या शतकात एकट्या माणसानी त्यावेळी उपलब्ध साधनांचा अभ्यास करून एका प्रदेशाचा इतिहास लिहिला, त्याची संख्या ४० खंड आहे! हा इतिहासत वाचताना काही अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या आहेत. तोपर्यंत ब्लॉगची लिंक https://mukulranbhor.blogspot.com/2021/03/blog-post.html Ⓒ Mukul Ranbhor

Thursday, 11 March 2021

अब्दुल कादर मुकादम यांची चलाखी

(अब्दुल कादर मुकादम यांच्या लेखाची लिंक - https://www.loksatta.com/vishesh-news/article-on-options-for-renaming-aurangabad-abn-97-2415420/)


अब्दुल कादर मुकादम यांनी 'औरंगाबादच्या नामांतरास पर्याय..' असा लेख लोकसत्तेच्या ७ मार्चच्या रविवारच्या पुरवणीत लिहिला आहे. औरंगजेबाच्या धार्मिक अत्याचाराचे संदर्भ देताना त्यांनी इस्लाम, इस्लामी धर्मशास्त्र, कुराण यांना 'दयाळू, कारुण्यमय, क्षमाशील' ठरवून वैयक्तिक औरंगजेब कसा धर्मांध होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कुराण कसे धर्मांध आणि हिंसक नाही, हे समजावून सांगायचं प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी कुराणातील एका आयतीचा संदर्भ दिला आहे. आणि 'कुराणातील आयत आदर्श आहे, पण त्याचा आधार घेऊन वागणारा औरंगजेब किती धर्मांध आहे,' असं प्रतिपादन अब्दुल कादर मुकादम यांनी केलं आहे. 


सर्वप्रथम त्यांनी वापरलेली आयात आणि वापरलेलं स्पष्टीकरण खोटं किंवा अर्धसत्य आहे. मुकादम लिहितात, 

'आणि जोपर्यंत (धार्मिक) छळ थांबत नाही तोपर्यंत त्यांच्याशी लढा, आणि त्यांनी जर तो छळ थांबविला तर ही गोष्ट लक्षात ठेवावी की आक्रमकांव्यतिरिक्त इतरांच्या बाबतीत शत्रुत्व ठेवण्याची परवानगी नाही.' 

यातून असं ध्वनित होतं की छळ होतो आहे तोपर्यंत शत्रुत्व ठेवावं, छळ थांबविल्यावर शत्रुत्व ठेवू नये. आणि कोणीही माणूस असा विचार करू शकतो की हे बरोबरच आहे की, हिंदू धर्मात ज्याप्रमाणे व्यक्तीच्या निधनानंतर शत्रुत्व उरत नाही, त्याप्रमाणेच हे आहे. तर हे तसं नाही.

मुळात मुकादम यांनी कुराणातील आयात जशी आहे तशी लिहिलेली नाही. दावअतुल कुराणमध्ये या आयतीची शब्दरचना कशी आहे ते पाहू, 

“'... आणि त्यांच्याशी लढा१ येथपावेतो की उपद्रव शिल्लक राहू नये आणि 'दीन' अल्लाहचाच व्हावा.२ आणि जर ते परावृत्त होतील तर अत्याचारी लोकांशिवाय इतर कोणाविरुद्ध आक्रमण योग्य नाही.३'”

आणि दावअतुल कुराणमध्ये या आयतीत गरजेच्या सर्व शब्दांचे पुरेसे सविस्तर स्पष्टीकरण दिलेले आहे. 


  1. येथे मुसलमान आणि मक्केचे इन्कार करणारे लोक यांच्यामध्ये जी तेढ होती ती चांगल्या प्रकारे समजावून घेतली पाहिजे. पवित्र कुराणचा दावा हा होता की, खान-ए-काबा (काबागृह) ज्याची बांधणी हजरत इब्राहिम (अ) यांनी एकेश्वरवादाच्या केंद्राच्या स्वरूपात केली होती. त्याच्या देखरेखीचे खरे हक्कदार इमान आणणारे लोक आहेत. अनेकेश्वरवादी लोक नव्हेत. ज्यांनी त्याच्यामध्ये मुर्त्या बसविल्या होत्या. हजरत इब्राहिम (अ) यांचा प्रार्थनेचा स्वीकार करून सर्वश्रेष्ठ अल्लाहने ज्या पैगंबरांना निर्माण करण्याचा वायदा केला होता त्याची पूर्तता हजरत मुहम्मद (स) यांच्या उदयाने झाली होती. या पैगंबरांच्याद्वारे या घराच्या मूळ उद्देशाची पुनःस्थापना करावयाची आहे. आणि म्हणून हे आवश्यक आहे की या घराला काफिर (नास्तिक) व मुश्रीफ (अनेकेश्वरवादी) लोकांच्या ताब्यातून मुक्त करून आणि कुफ्र (नास्तिकता) व शिर्क (अनेकेश्वरवादाच्या) मलिनतेपासून स्वच्छ करून मुसलमान समाजाच्या ताब्यात दिले जावे. कारण ते इस्लामचे केंद्रस्थान आणि इमान आणलेल्यांचा किबला आहे. हा वस्तुतः हजरत मुहंमद (स) यांचा मूळ उद्देश होता आणि या उद्देशाच्या पूर्ततेच्या मार्गात जर कोणती शक्ती आडवी आली तर तिला मार्गातून दूर करण्यासाठी सामर्थ्याचा वापर करणे अगदी आवश्यक होते. 


  1. ही लढाई त्यावेळेपर्यंत चालू राहिली पाहिजे जोपर्यंत हरम च्या पवित्र भूमीतून अनाचाराची स्थिती संपत नाही आणि सत्य धर्माचा प्रभाव पडत नाही. कारण की अल्लाहच्या घराचे स्वरूप एकेश्वरवादाच्या केंद्राचे आहे. आणि म्हणून या पवित्र भूमीवर दुसऱ्या कोणत्याही धर्मासाठी स्थान नाही. 


  1. जर हे परावृत्त होऊन इस्लामचा स्वीकार करतील तर मग त्यांच्या मागील अपराधांबद्दल त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. परंतु फक्त त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल जे आपल्या अत्याचारी मार्गावर कायम राहतील. (संदर्भ - दावअतुल कुराण (खंड - १, पान १०४))

हे स्पष्टीकरण पुरेसे आहे. आयतीच्या स्पष्टीकरणामध्ये हे स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की सत्य धर्माचा प्रभाव पडत नाही आणि अनाचार संपत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहील. यातल्या 'अनाचार संपत नाही' याचा सामान्यपणे आपण जो अर्थ घेतो तो होत नाही. व्यक्तीने किंवा समाजाने इस्लाम म्हणजे 'सत्य न स्वीकारणे' हा, मुसलमानांसाठी अनाचार आहे. या अल्लाहच्या भूमीवर अनेकेश्वरवादी अस्तित्त्वात असणं हा इस्लाम पाळणाऱ्या लोकांवर होत असलेला अनाचार आहे. 

आणि पहिल्या स्पष्टीकरणात अल्लाच्या घराचे शुद्धीकरण हे फक्त काबागृहापुरते मर्यादित नाही. अल्लाहचे घर म्हणजे ही 'पृथ्वी', ही पृथ्वी अनेकेश्वरवाद, कुफ्र याच्या मलिनतेपासून शुद्ध करायची आहे,  त्याचा अर्थ आहे. 

आणि अब्दुल कादर मुकादम यांच्या लेखाच्या दृष्टीने आयतीच्या स्पष्टीकरणातला तिसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. मुकादम जी शब्द रचना वापरतात तीच आपण वापरली तर 'छळ' थांबवणे म्हणजे इस्लामचा स्वीकार करणे, असा अर्थ आहे. आयतीत शब्द आहेत, 'आणि जर ते परावृत्त होतील, तर शत्रुत्व ठेऊ नये', यामध्ये असत्य धर्माच्या प्रभावातून जे परावृत्त होऊन सत्य धर्माकडे येतील त्यांच्याविरुद्ध शत्रुत्व ठेऊ नये. आणि एकदा हा इस्लाम स्वीकारला की त्यांच्या इस्लाम स्वीकारण्या पूर्वीच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा देऊ नये. आणि यानंतरही कोणाविरुद्ध लढाई सुरू राहील तर, जे आपल्या अत्याचारी म्हणजे असत्य धर्माचा प्रसार सुरू ठेऊन इस्लामवर अत्याचार करत राहतील त्यांच्याविरुद्ध. 

दावअतुल कुराणमध्ये या आयतीचे जसे स्पष्टीकरण आलेले आहे, तसेच्या तसे मी इथे सांगितले. मुकादम यांनी कुराणला क्षमाशील आणि दयाळू ठरवून फक्त औरंगजेब  कसा दोषी होता हे सांगितले आहे. कुराण आणि त्याचे स्पष्टीकरण पहिले तर आपल्या लक्षात येईल की कुराणचाच आदेश औरंगजेबाने तंतोतंत पाळलेला आहे. 

आपण फक्त दावअतुल कुराणच्या भाष्यावर विश्वास नको ठेवूया. इस्लामचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार म्हणजे सय्यद अब्दुल आला मौदुदी यांनी या आयतीबद्दल काय लिहिले आहे ते एकदा पाहूया. 

“जोपर्यंत उपद्रव नष्ट होऊन अल्लाहचा धर्म प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध करा. मात्र जर ते परावृत्त झाले तर लक्षात ठेवा की अत्याचा-यांशिवाय कोणाशीही शत्रुत्व उचित नाही.”

याठिकाणी 'उपद्रव' म्हणजे एखाद्या समूहाचा किंवा व्यक्तीचा केवळ या कारणास्तव छळ करणे की त्याने असत्य (बिगर इस्लामी धर्म) सोडून सत्य (इस्लाम) स्वीकारले आहे, हे अभिप्रेत होय. (संदर्भ - दिव्य कुरआन - सय्यद अबुल आला मौदुदी (पान - १००))

या दोन्ही स्पष्टीकरणातून आपल्या हे लक्षात येईल की व्यक्ती, समाज जोपर्यंत इस्लाम स्वीकारत नाही तोपर्यंत ती व्यक्ती, समाज मुसलमान समाजावर अत्याचार करतो आहे. जोपर्यंत तो इस्लामचा स्वीकर करत नाही तोपर्यंत असत्य वाटेवरून मार्गक्रमण करतो आहे. आणि म्हणून त्याच्याशी युद्ध केले पाहिजे, अशी इस्लामची भूमिका आहे. युद्धात पराभव करून किंवा तो स्वयंप्रेरणेने सत्य धर्माकडे आकर्षित झाला तर त्याच्याशी शत्रुत्व ठेवू नये. त्याने इस्लामचा स्वीकार केला तर तो मुसलमान नसताना त्याने केलेल्या पापांबद्दल त्याला शिक्षा सुद्धा करू नये, अशी इस्लामची भूमिका आहे. 

मुकादम यांनी मुळात या आयतीच्या शब्दरचनेत फेरफार केली आहे. खोट्या आयतीचा आणि त्याच्या अन्वयार्थाच्या आधारे त्यांनी केवळ औरंगजेबाला दोषी ठरवले आहे आणि कुराणला म्हणजे धर्माला पूर्णपणे दोषमुक्त ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. वरील आयतीचे खरे अर्थ पहिले असता असे म्हणता येते की औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना जी वागणूक दिली ती तंतोतंत कुराणला अनुसरून दिली.   

शिवाय, मुकादम त्यांच्या लेखात लिहितात की औरंगजेबाने सत्तेसाठी केलेल्या पाशवी हिंसाचाराला इस्लामी धर्मशास्त्रात कसलाही आधार नाही. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजी महाजरांचे उदाहरण घेतले आहे. ते लिहितात, संभाजी राजांना मुकर्रब खानाने पडकून जेव्हा औरंगजेबासमोर उभे केले तेव्हा संभाजी राजे शरणागत अवस्थेत होते. आणि शरण आलेल्या शत्रूबद्दल शत्रुत्व बाळगू नये असा 'कुराण'चा आदेश आहे. ती कुराणातली आयात आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी फेरफार करून सांगितली आहे, ते आपण वर पाहिलंच आहे. पण ज्या इस्लामी धर्मशास्त्राचा संदर्भ देऊन मुकादम बोलत आहेत, ते सुद्धा खोटंच आहे. 

इस्लामी धर्मशास्त्र म्हणजे कुराण, हादीस आणि प्रेषितांचे चरित्र. तिन्हीही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. तिन्हींचा एकत्र अभ्यास केल्याशिवाय इस्लामच्या अनेक बाबींचे व्यवस्थिती आकलन होत नाही. फेब्रुवारी ६२७ मध्ये झालेल्या खंदकाच्या युद्धाचा इथे मुद्दाम संदर्भ दिला पाहिजे. प्रेषित मुहम्मदांचा या युद्धात अभूतपूर्व विजय झाला. आणि बनी कुरैझा टोळीचा युद्धात पराभव झाला. त्यानंतर शरण आलेला सुमारे ८००-९०० ठार मारण्याचा निकाल प्रेषितांच्या आज्ञेवरून न्यायाधीशाने दिला. ((संदर्भ - स्पिरिट ऑफ इस्लाम - न्या. अमीर अली  (पान - ८०)) इस्लामी इतिहासात खंदकाचे युद्ध ही अतिशय प्रसिद्ध घटना आहे. 

मुकादम यांनी संभाजी महाराज 'शरणागत' होते असे लिहिले आहे, हेच मुळात सत्य नाही. पण शरण आलेल्या शत्रूबद्दल शस्त्रूत्व ठेवू नये, असे इस्लामी धर्मशास्त्राचा संदर्भ वापरून जे मुकादम लिहीत आहेत, तेही असत्यच आहे.    

औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे की शहराला मलिक अंबरचे नाव द्यावे यावर कोणतेही मत मी व्यक्त करत नाही. पण इस्लामी धर्मशास्त्र, कुराण यांना संपूर्ण दोषमुक्त ठरवण्याचा मुकादम यांनी जो प्रयत्न केला आहे, तो कसा असत्यावर उभा आहे हे मात्र सांगणे गरजेचे आहे. 


  • मुकुल रणभोर 

  • mukulranbhor111@gmail.com



Wednesday, 15 July 2020

'केशवराज'च्या मंदिरातली रम्य (?) रात्र!



आदल्या रात्री संगमेश्वराच्या त्या प्राचीन मंदिरात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. जो कार्यक्रम ऐकण्यासाठी मी किमान दोन-तीन महिने नियोजन करत होतो तो मी कसाबसा दहा-पंधरा मिनिटं ऐकला आणि तिथेच झोपून गेलो. देवरुखच्या ज्या मित्राकडे मी मुक्कामाला जाणार होतो त्याने मग मला उठवलं, आणि त्याच्या कारमध्ये नेऊन झोपवलं. माझ्या चेहेऱ्यावरून लक्षात येत होतं की मी किती दमलो होतो. रात्री साडे अकराच्या दरम्यान कार्यक्रम संपला. पुण्यातून निघताना मी नियोजन असं केलं होतं की, देवरुखला मुक्काम करायचा आणि सकाळी लवकर उठून दापोलीला जायचं. दापोलीच्या आसपासची जवळजवळ पाच-सहा ठिकाणं मी पहायची असं ठरवून गेलो होतो. पण आदल्या दिवशीच्या प्रचंड दमणूकीमुळे मी सकाळी लवकर उठूच शकलो नाही. झोप पूर्ण होऊन उठायलाच मला साडेनऊ वाजले. मित्राच्याही घरी प्रथमच गेलो होतो त्यामुळे लगेच निघणंही शक्य नव्हतं. थोडं उशिरा दापोलीसाठी निघू असं मनातच मी ठरवलं. त्याच्या घरीच नाश्ता करून नियोजित वेळेपेक्षा बराच उशिरामी देवरुखहून निघालो. माझी गाडी संगमेश्वरलाच होती. मग मित्राबरोबर त्याच्या गाडीवरून मी संगमेश्वरला आलो, तिथून तो परत गेला मी पुढे निघालो. 

संगमेश्वर ते दापोली अंतर जवळजवळ शंभर किलोमीटरचं होतं. मी संगमेश्वरहूनच इतक्या उशिरा निघालो की ठरवलेल्या पाच-सहा ठिकाणांपैकी एखादं जरी पाहून झालं तरी मी खुश झालो असतो. पण खेडलाच पोहोचायला दोन-अडीच झाले होते बहुतेक. अनेक वर्षांपूर्वी मी एकदा दापोलीला आई-बाबांबरोबर आलो होतो. त्यावेळी हर्णे, कर्दे, आंजर्ले, कड्यावरचा गणपती, हर्णे किल्ला वगैरे परिसर पहिला होता. पण तो मला अजिबात आठवत नव्हता. शिवाय त्यावेळी आम्ही कारने गेलो होतो आणि ज्यावेळी आपण ड्राईव्ह करत नसतो त्यावेळी रस्त्यांकडे आपलं शक्यतो लक्ष जात नाही. कोणतीकोणती गावं आपण पार करतो आहोत. रस्ते कसे आहेत, हॉटेल्स वगैरे आहेत का नाही याचं भान आपण जर गाडी चालवत नसू तर आपल्याला येत नाही. त्यामुळे मी स्वतः गाडी चालवत या भागांत प्रथमच फिरत होतो. गेल्या खेपेला काय काय पाहिलं होतं हे पूर्णतः विस्मृतीत गेलं होतं. ते एका अर्थी बरंही होतं. फार वेळ न लावता मी थेट आधी प्रथम कोळथरेला जायचं ठरवलं. या किनाऱ्यांची मी फक्त नावं ऐकून होतो. दापोलीहून कोळथरेला जाण्याच्या वाटेवर अनेक ठिकाणं होती, जी तिथेजाईपर्यंत मला माहिती नव्हती. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘बुरोंडी’ हे गाव. माझ्या कोकणाबद्दलच्या सगळ्या कल्पना या प्रत्यक्ष त्या भागात फिरून कमी आणि वाचलेल्या पुस्तकांतून अधिक तयार झाल्या आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे लेखक म्हणजे श्री. ना. पेंडसे. ‘दापोली’ आणि परिसर म्हणजे पेंडसे यांचा हक्काचा परिसर. पेंडस्यांच्या कितीतरी कादंबऱ्या या भागाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आहेत. गारंबीचा बापू, राधा, यशोदा, रथचक्र, तुंबडचे खोत, हद्दपार. या सगळ्या कादंबऱ्यात दापोली, गारंबी, आसूद, बुरोंडी, खेड, दाभोळ ही नावं सतत येत असतात. ते मी पुस्तकात अनेकदा वाचलं होतं. पण ‘कोळथरे’ला जाताता प्रत्यक्ष ‘बुरोंडी’ गावाची पाटी मी वाचली तेव्हा या सगळ्या कादंबऱ्या, त्यातली या गावाच्या अवतीभोवती घडलेले प्रसंग, व्यक्ती माझ्या नजरे समोरून तरळून गेल्या. 

बुरोंडीमध्ये फिरताना मला जाणीव झाली की हा सगळा तोच परिसर आहे, ही तीच माती आहे जिच्यातून पेंडसे यांनी अनेक मौल्यवान रत्न शोधून काढली आहेत. ‘तुंबाड’सुद्धा बुरोंडीपासून फार लांब नाही. पण माझ्या दिवसाच्या गणितात ‘तुंबाड’ बसू शकलं नसतं. दापोलीमध्ये एका दिवसचा मुक्काम करून मला लगेच पुण्याला निघायचं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा निवांत वेळ काढून या भागांत येण्याचा निश्चय करून मी निघालो. ते ‘कोळथरे’ला पोहोचलो. संपूर्ण किनाऱ्यावर मी एकटाच! निवांत काही वेळ तिथे फिरलो. अजून संध्याकाळ झाली नव्हती. ऊन अजून तसं तीव्र होतं. कोळथरेहून निघालो, लाटघरला आलो. तिथेही तसंच. निरवतेचीही भीती वाटावी इतकी शांतता. तिथे काही वेळ थांबलो. परत येताना तामसतीर्थ म्हणून एक अफलातून ठिकाण आहे. पृथ्वीवर उभ्या असलेल्या परशुरामाची एक विशाल मूर्ती तिथे आहे. त्याच्या आसपास प्रचंड जंगल आहे. एकूणच परिसर खूप रम्य आहे. 

परत येताना पुन्हा एकदा बुरोंडीमध्ये थांबलो. काही फोटो काढले. दरम्यान मध्ये कुठेतरी थांबून वडापाव-मिसळ असं काही तरी खाल्लं. कारण माझ्या डोक्यात जिथे मुक्काम करायचा अशी कल्पना तयार होत होती तिथे खायला काहीही मिळणार नाही हे मला माहिती होतं. पुण्यातून निघताना काय काय बघायचं अशी जी यादी मी तयार केली होती त्यात दापोलीपासून जवळ असलेल्या पन्हाळेकाजीच्या लेणी होत्या, असूद म्हणजे गारंबी हे गाव होतं. गारंबीमध्ये अनेकदा उल्लेख असलेलं व्याघ्रेश्वराचं प्राचीन मंदीर होतं आणि ‘केशवराजा’चं मंदिर होतं. त्यापैकी पन्हाळेकाजीच्या लेणी दापोलीपासून पंचवीसएक किलोमीटर लांब होत्या. आणि कोळथरे, तमासतीर्थ, लाटघर वगैरे पाहून परत दापोलीपर्यंत यायला बराच वेळ लागला. अंधार पडलेला होता. आणि आदल्या दिवशी मला वाटतं पाऊसही पडून गेलेला होता. त्यामुळे वातावरणात गारठा होता. म्हणून मी विचार केला की आता अजून पंचवीस किलोमीटरचा प्रवास करायचा आणि मानवी वस्तीपासून लांब असलेल्या पन्हाळेकाजीच्या लेणींत मुक्काम करायचा म्हणजे खूपच रिक्सी होती. मानवी वस्तीपासून खूप लांब गेल्यावर काय होतं हे मी कालच्याच रात्री चांगलंच अनुभवलं होतं. शिवाय लेणीत रात्री मुक्कम करायची कल्पना अगदीच नवीन आणि out of the blue नव्हती. राजमाचीच्या पलीकडे कर्जतच्या दिशेला असलेल्या कोंडणेच्या लेणींमध्ये मी अनेकदा मुक्काम केलेला आहे. एक-दोन वेळेला तर तुफान पावसातही भिजत भिजत रात्रीच्या वेळी लेणीत पोहोचून तिथे झोपलो आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने ती बाब फार धोकादायक नव्हती. शिवाय लेणींत झोपण्याचा अनुभव असल्यामुळे यावेळी मी विचार केला की या वेळी काहीतरी नवीन करू. जर मुक्काम पन्हाळेकाजीमध्ये करायचा नसेल तर दुसरा पर्याय माझ्यामनात होता तो केशवराज मंदिराचा. 

पुण्यातून निघताना मी ज्या ज्या ठिकाणांची यादी केली होती त्यातलं एकही ठिकाण मी याच्यापूर्वी पाहिलेलं नव्हतं. तमासतीर्थ किंवा लाटघरचे मी किमान फोटोतरी पाहिलेले होते. पण ‘केशवराज’ आणि असूद जवळचा व्याघ्रेश्र्वर यांची मी फक्त वर्णनं ऐकलेली होती. त्यामुळे केवळ शब्दांच्या भरोशावर मी माझ्या डोक्यात कल्पना करत होतो. 

(गारंबीच्या बापूमधील सुप्रसिद्ध 'पूल')
तमासतीर्थ, मिसळ-वाडापाव, पुन्हा दापोली असं सगळं करून असूदपर्यंत यायला मला रात्रीचे साडे-आठ तरी झाले. असूद हे गाव अतिशय रम्य गाव आहे. दापोलीहून जो रस्ता हर्णे बंदराकडे जातो त्याला समांतर एक रस्ता असूदकडे उतरतो. डोंगर उतारावर नारळी आणि पोफळीच्या जंगलात लहानलहान घरं असं या गावाचं स्वरूप आहे. घरांच्या शेजारून पाण्यासाठी काढलेले पाट वाहत जातात. अगदी शंभरएक वस्तीचं हे गाव अतिशय रम्य आहे. दाबकेवाडीतली लोकं अतिशय प्रेमळ आहेत. असूदचा डोंगर आणि पलीकडचा डोंगर यांच्यामधून एक नदी वाहत जाते. ‘गारंबीच्या बापू’मध्ये किंवा ‘यशोदा’मध्ये ज्या नदीवरच्या बांधावरून गुरव आणि गावकऱ्यांमध्ये वाद होतात ती नदी म्हणजे हीच असूदच्या पलीकडून जी वाहत जाते तीच नदी. असूदचा डोंगर आपण उतरत जातो, दोन्ही बाजूला उंचच उंच नारळाची सुपारीची झाडं आहेत. शिवाय फणस, आंबा तर आहेतच. त्यातून उतरण्यासाठी दगडी पायऱ्या केल्या आहेत. त्या उतरत आपण त्या नदीवरच्या पुलाजवळ येतो. पूर्वी तिथे लाकडी साकव होता, आता तिथे जास्त भक्कम असा सिमेंटचा पूल बांधला आहे. पण पूल म्हंटल्यावर आपल्या डोक्यात जे चित्र उभं राहील तसा हा पूल नाही. एकावेळी कसाबसा एक माणूस त्यावरून पलीकडे जाऊ शकेल एवढाच तो पूल आहे. आजूबाजूला तुफान जंगल आणि पुलाच्या खालून खळखळत जाणारी ती नदी. 

पुलाच्या पलीकडे पुन्हा डोंगर चढण्यासाठी दगडी पायऱ्या केल्या आहेत. अशा साधारण दीडशे-दोनशे पायऱ्या आहेत. त्याही तुफान जंगलातून आपल्याला पुढे घेऊन जातात. पण यावेळी मात्र मानवी वस्ती अजिबात लागत नाही. पुलाच्या अलीकडे असूद गाव संपतं. पलीकडे फक्त जंगल आहे. रात्रीच्या त्या अंधारात मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात मी ती पायवाट तुडवत पुढे जात होतो. गो.नी.दांनी त्यांच्या आयुष्यभराच्या अगणित प्रवासात राजमाचीचा एक अनुभव वेगळा लिहिला आहे. ते म्हणतात फक्त राजमाचीला निघालो असताना एकदा असं झालं होतं की अमानवी शक्तीचे भास झाले होते. अर्थात ते भास होते. मलाही आपल्याबरोबर कोणीतरी चालतं आहे असा भास होत होता. पण असे रात्री-अपरात्री अनेक ट्रेक केलेले आहेत, त्यामुळे असे भास ही नवीन गोष्ट नाही. शिवाय गोनीदांना आला तसा अनुभव आपल्यालाही यावा अशी इच्छा असल्यामुळे सुद्धा असे भास होत असतील. पण एक मात्र आहे, की अंधार प्रचंड होता. जंगलातलीच वाट होती, त्यामुळे किडे, पक्षी क्वचित प्रसंगी एखादं माकड, कोल्हा यांचे आवाज येत होतेच. कितीही भीतीदायक वातावरण असलं तरी तो अनुभव म्हणून अमूल्य आहे. आयुष्यात मी असूदहून रात्री केशवराजच्या मंदिराकडे एकट्याने केलेला प्रवास विसरणार नाही. जंगलाच्या गराड्यातून क्वचितप्रसंगी स्वच्छ,मोकळं काळभोर आकाश दिसत होतं, त्यात लखलखणाऱ्या चांदण्या दिसत होत्या. सोबतीला शांततेचा आवाज होता आणि झाडांच्या शेजारून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज होता, जंगलाचा म्हणून एक विशिष्ट आवाज असतो. असं एकूण रम्य, अतिशय रम्य वातावरण होतं. 

दीड-दोनशे पायऱ्या चढून थोडासा दमलेल्या अवस्थेतच मी मंदिरापर्यंत आलो. पण दमल्यामुळे आलेल्या घामावर फुंकर घालायचं काम जंगलातून येणारी थंड वाऱ्याची झुळूक करत होती. 

(सौजन्य - दर्या फिरस्ती वेबसाईट)

मंदिराची रचना नेमकी कशी आहे, हे ज्यांनी मंदिर पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी सांगणं आवश्यक आहे. पुलाच्या पुढे डोंगर चढण्यासाठी असलेल्या दीड-दोनशे पायऱ्या पार केल्यावर आपण एका मैदानावर येतो. तिथे डोंगराच्या बाजूला तोंड करून मंदिर आहे. मंदिराला एक दगडी तटबंदी आहे. तटबंदीच्या बाहेर एक मोठं झाड आहे, त्याला पार आहे. डोंगर उताराच्या बाजूला तटबंदी जिथे संपते तिथे पत्र्याच्या शेडमध्ये काही देवाच्या मूर्ती आहेत. मंदिर प्राचीन असलं तरी जीर्णोद्धारामध्ये त्याचं प्राचीन रूप आता पूर्ण बदलून गेलं आहे. आता पूर्ण आधुनिक रूप मंदिराचं सहज लक्षात येतं. मंदिराच्या गाभाऱ्याला फक्त समोर एक लहानसा दरवाजा आहे, बाकी पूर्ण गाभारा बंद आहे, पण मंदिराचा सभामंडप पूर्ण उघडा आहे. कशाबसे दोन बाजूला दोन एकेक फुटी कठडे आहेत, बाकी सभामंडप पूर्ण खुला आहे. डोंगराच्या बाजूने एक पाण्याचा पाट काढला आहे, त्याला एक गोमुख बसवलेलं आहे, त्यातून बारा महिने तेरा काळ पाणी वाहात असतं. ते पाणी साठवण्यासाठी एक दगडी बदली गोमुखाच्या खाली आहे. अर्थात कितीही वर्णन केलं तरी नेमकं स्वरूप प्रत्यक्ष ते पहिल्याशिवाय कळणार नाही. तरी अंदाज यावा म्हणून मी काही फोटो दाखवतो. 

माझ्याजवळ माझी मोठी ट्रेकिंगची सॅक होती. आणि बरोबर मी स्लीपिंग बॅगही घेतलेली होती. अंधार तर पडलेला होताच. त्या दीड-दोनशे पायऱ्या चढून वर आलो. त्या तटबंदीपर्यंत आलो. बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये काही मूर्ती होत्या त्यांच्या समोर एक पणती तेवत होती. चांदण्याशिवाय त्या भागात तेवढाच काय तो उजेड होता. बाकी अंधार अंधार! खरं म्हणजे बाहेर शूज काढून आत जाणं अपेक्षित होतं. पण इतक्या जंगलात इतक्या अंधारात शूज बाहेर ठेवणं म्हणजे किड्या-सापांसाठी मुक्कामाची सोय करून देण्यासारखं असतं. शूज तसेच पायात ठेवून तटबंदीच्या आत शिरलो. कठड्यावर बसलो. कठड्याच्या आतल्या बाजूला सॅक ठेवली. तिथे शूज काढून ठेवले. गोमुखातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज शांततेच्या आवाजाची सोबत करत होता. कठड्याच्या आतल्या बाजूला मी टेकून बसलो. पण जास्त वेळ अंधारात बघण्याची सुद्धा हिम्मत होत नव्हती. स्लीपिंग बॅग उघडली. आणि त्यात शिरलो. हवेत गारवा होताच. स्लीपिंग बॅगची चेन तोंडापर्यंत लावून घेतली. डोक्याच्यावर सॅक ठेवली. 

मला अनेकदा भूतांची स्वप्न पडतात. मला भूतांची भीती कमी पण भुतांच्या स्वप्नांची भीती जास्त वाटते. अर्थात आजच्या दिवसभरात सुद्धा मी भरपूर दमलो होतो त्यामुळे स्वप्न पडेल याची शक्यता कमी होती. तरी सुद्धा रिक्स नको म्हणून मी कानात हेडफोन्स अडकवले, भीमसेन जोशींचा अनेकांतला एक अप्रतिम ट्रॅक म्हणजे ‘मालकंस’ लावला, आणि डोळे मिटले. एकूण रम्य वातावरण, गार वारा, शांतता, दोनशे पायऱ्या चढून आणि दिवसभराच्या प्रवासाने दमलो होतो त्यामुळे झोप येण्याची फार वाट बघावी लागलीच नाही. ती लगेच आलीच! 

पहाटे दोनच्या दरम्यान जरा वारा सुटला. पत्र्याच्या शेडमधल्या दिव्याची सुद्धा फडफड सुरू होती. अचानक सुटलेल्या वाऱ्याच्या आवाजाने मला जाग आली. आणि बहुतेक पहिली झोप झाली होती. जाग आली तेव्हा मला लक्षात आलं की हेडफोनमध्ये अजून गाणी सुरू आहेत. स्लीपिंग बॅगमध्येच कुठेतरी पडलेला मोबाईल मी हाताने चाचपडला, गाणी बंद केली. गाणी बंद केली तशी माझ्या लक्षात आलं, की तटबंदीच्या बाहेर, पत्र्याच्या शेड जवळ कोणीतरी गुणगुणतं आहे. मी ज्या कठड्याला आतल्या बाजूने टेकून झोपलो होतो ती जागा मंदिराच्या बाहेर उभं राहून कोणालाही दिसणार नाही अशी होती. शिवाय रात्रीच्या अंधारात, काळ्या स्लीपिंग बॅगमध्ये झोपलेला मी तर जवळ येऊन पहिल्याशिवाय दिसलो नसतो. पण गुणगुणण्याच्या आवाजाने मात्र माझा भीतीचा मीटर उडायला लागला. अचानक मी हालचाल करणं बंद केलं. करणार माझी हालचाल किंवा माझा आवाज या दोन गोष्टींमुळेच माझं तिथलं अस्तित्व लक्षात आलं असतं. वाऱ्याच्या झुळुकीमुळे किंवा तेल संपल्यामुळे पण त्या भागात जळणारा एकमेव प्रकाशाचा स्त्रोत बंद झाला होता. काळ्या कभिन्न दगडामध्ये उभी असलेली केशवराजाची मूर्ती तशीच स्थब्ध होती. पण त्या सगळ्या स्तब्धतेला छेद देणारा एक आवाज अक्षरशः काळीज चिरत होता. त्या केशवराजाच्या मंदिराच्या तटबंदी पासून येणारी गुणगुण मी आयुष्यभर विसरणार नाही. 


त्या आवाजाने आणि त्याहून जास्त त्या काळ्या, शांत रात्री माझ्या शिवाय दुसऱ्या माणसाच्या अस्तित्वाची शक्यता जास्त भीतीदायक होती. अनेकदा रात्री अपरात्री ट्रेक केलेले आहेत. रात्री-अपरात्री किल्ल्यांच्या दगडी तटबंदीवर जाऊन चांदण्यात बसलेलो आहे. कधी गाणी म्हणत, कधी शांत. कधी एकटा कधी, मित्रांबरोबर! रात्री-अपरात्री बाईकवरून वाट्टेल तसे, वाट्टेल तिथे फिरलो आहे. पण ती गुणगुण आठवली की अजूनही अंगावर काटा उभा राहतो. 

कठड्याच्या आतल्या बाजूला मी अंग चोरून बसलो होतो. स्लीपिंग बॅगमध्येच होतो. डोक्याशी सॅक होती. पण माझी झोप गेली. ती गुणगुण आता अधिक भीतीदायक वाटू लागली. मनात मनात वाट्टेल ते विचार येत होते. पण उठून तो आवाज नेमका कुठून येतो आहे ते पहायची हिम्मत होईना. त्यावेळी मी बराच धार्मिकही होतो. मी राम नामाचा जप सुरू केला. मनातल्या मनात रामरक्षा म्हणायला सुरवात, रामरक्षा म्हणून झाली तशी अथर्वशीर्ष म्हंटलं. पुन्हा एकदा रामनामच सुरू केलं. पण भीतीचा अंश जास्त होता. त्यावर राम किंवा गणपती दोघंही काहीही करू शकले नाहीत. बहुदा मी केशवराजाच्या मंदिरात बसून रामाची आणि गणपतीची आठवण काढत होतो म्हणून असेल. पण भीतीवर कोणताही उपाय कामी येईना. पुन्हा हेडफोन कानात लावून गाणी सुरु करणं हा एक उपाय होता. पण मोबाईल सुरू करणं म्हणजे त्याचा प्रकाश सुद्धा सुरू होणं, आणि प्रकाश सुरू झाला तर कोणीतरी कठड्याच्या जवळ आहे हे सहज कोणाच्याही लक्षात आणून देणं. काहीही उपाय सुचेना. आणि गुणगुणणंही थांबेना. माझे डोळे उघडे होते, पण अंधारात दिसत काहीच नव्हतं. मला जाग येऊन दहा मिनिटं झाली, वीस मिनिटं झाली. पाउण तास झाला दोन तास झाले. झोपही परत येईना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती गुणगुण थांबेना. सलग दोन तास ती गुणगुण सुरू होती. पण साधारण तास-सव्वा तासानंतर त्याची सवय झाली. माझी सुद्धा स्तब्ध पडून राहायची तयारी झाली. पुढे-पुढे भीतीही कमी झाली. 

(गर्द झाडीमध्ये बसलेला केशवराज, या फोटोमध्ये ती तटबंदी आणि पत्र्याची शेड दिसू शकेल)

थोडी गुंगी येते आहे, असं वाटेवाटेपर्यंत ती गुणगुण वाढत गेली. मी ज्या कठड्याला आतल्या बाजूने टेकून होतो त्या कठड्याच्या पलीकडच्या बाजूने आता ती गुणगुण मला ऐकू यायला लागली. आधी किमान तो आवाज दहा-बारा फुटांवरून येत होता. आता तो आवाज अगदी एका फुटावर येऊन थांबला होता. स्लीपिंग बॅगमध्ये मला घामाच्या धारा लागल्या होत्या. आता तर जराशी जरी हालचाल झाली तरी लक्षात येणार, हे जाणवून मी अजून लाकडासारखा स्थिर झालो. डोळे गच्च मिटून घेतले. श्वास तर इतक्या जोरजोरात येत-जात होते, हृदयाचे ठोके मला एकदम स्वच्छपणे ऐकू येत होते. पण हलायची सोय नव्हती. 

पण तो आवाज तिथून हलला नाही. आधीचे दोन तास पत्राच्या शेड जवळून आवाज येत होता. नंतरचे दोन तास तो आवाज माझ्यापासून अगदी एक फुटावरून येत होता. पण जशी आधी आवाजाची सवय झाली तशी जवळून येणाऱ्या आवाजाचीही सवय झाली. भीती अजिबात कमी झाली नाही. पण आपल्याला या अस्तित्वापासुन काही धोका नाही, असं वाटायला लागलं. तसाच स्तब्ध पडून राहलो. हा खेळ सकाळचे सहा-सव्वासहा पर्यंत चालू होता.

दोन वाजता जो आवाज सुरू झाला ते जवळजवळ सव्वासहापर्यंत सुरू होता. त्यानंतर तो आवाज हळूहळू कमी होत गेला. वाऱ्याच्या झुळुकीबरोबर विरत गेला. आणि मलाही झोप लागत गेली. नेहमीप्रमाणे सव्वा सात वाजता मोबाईलचा गजर वाजला. पण तोपर्यंत बाहेर उजाडून आलं होतं. तरीही अत्यंत सावधपणेच मी उठलो. संपूर्ण परिसरात कोणीही नव्हतं. पण उजेडामुळे खूप आधार मिळाला. सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसत असल्यामुळे आता भीती वाटत नव्हती. स्लीपिंग बॅग आवरली. ती सॅकमध्ये भरली. शूज घातले. गोमुखातून येणाऱ्या पाण्याने तोंड धुतलं. तोडं पाणी प्यालो. आणि केशवराजाचं दर्शन घेतलं. काल रात्री अंधारात मी केशवराजाच्या मंदिरात आलो होतो, पण दर्शन घ्यायचं राहून गेलं होतं. त्याचं दर्शन घेतलं. रात्री झालेल्या महाभारतातून माझी सुटका केली म्हणून त्याचे आभार मानले. 

जंगलातल्या पक्षांनी आपला दिवस सुरू केला होता. एकून वातावरणाला जाग येत होती. आता कसली भीती नव्हती. रात्री ज्या ट्यूनची गुणगुण मी ऐकली होती तीच गुणगुणत मी पायऱ्या उतरायला लागलो. ज्या ट्यूनने रात्री आसमंत आठवलं होतं, त्याची आता भीती उरली नव्हती. गुणगुणत, फोटो काढत, मी एकेक पायरी उतरत खाली आलो. पुलाच्या या काठावर मी उभा राहिलो, त्या परिसराचा एक पॅनरोमा फोटो काढावा म्हणून कॅमेरा पॅन करत करत सगळा परिसर कव्हर करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं, की आपल्या उजव्या हाताला दहा फुटांवर एक स्मशान आहे!   


(माझ्या बाबांनी केलेलं केशवराज मंदिराचं पेटिंग)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

केशवराज मंदिर परिसरावर काही उत्तम ब्लॉग्स उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींच्या लिंक मुद्दाम इथे देतो.
१. दर्या फिरस्ती -

२. तालुका दापोली - Vlog - https://www.youtube.com/watch?v=WS7VMCnpd74

संगमेश्वरचं भूत

संगमेश्वराच्या ऐतिहासिक प्राचीन मंदिरामध्ये एक गाण्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला होता ते दोघेही माझे मित्र होते. मंदिरात गाण्याचा कार्यक्रम, तोही कोणतीही कृत्रिम म्युजिक सिस्टीम न वापरता, मंदिराच्या वास्तूरचनेचा फायदा घेऊन शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. असा कार्यक्रम मी चुकवणं शक्यच नव्हतं. शिवाय संगमेश्वरपर्यंत म्हणजे कोकणात जाता येणार होतं. मग आम्ही तीन मित्रांनी बाईकवरून कोकण ट्रीप करायची आणि संगमेश्वरला त्या कार्यक्रमालाही जायचं असं ठरवलं. प्रत्यक्ष ज्या दिवशी आम्ही निघणार होतो त्या दिवशी बाकीच्या दोघांनी ‘जमणार नाही’ असं सांगितलं. त्यामुळे आम्ही ठरवलेली ट्रीप रद्द झाली. पण माझ्या डोक्यात संपूर्ण ट्रीपचं नियोजन पक्कं बसलेलं होतं. ‘कोणी नसेल तर आपण एकट्याने जायचं, पण जायचंच’ असं ठरवून नियोजित वेळेला मी पुण्यातून निघालो. माझ्याबरोबर एक मित्र होता, त्याला ‘कराड’ला एका लग्नाला जायचं होतं. त्यामुळे कराडपर्यंत माझ्याबरोबर तो होता. सकाळी लवकर आम्ही पुण्यातून निघालो. मला वाटतं ९ च्या दरम्यान आम्ही कराडमध्ये पोचलो. कराडमध्ये शिवाजी चौकात एक अफलातून हॉटेल आहे, अगदी लहान, पण त्याच्याकडे खूप मस्त ‘मिसळ’ मिळते असं ऐकलं होतं. मग कराडमध्ये पोहोचल्यावर मिसळीचा नाश्ता केला. मित्राला तिथेच सोडलं आणि मी एकटा पुढे निघालो. दर वर्षी एकदा तरी कोकणात उत्सवाला आम्ही जातो त्यामुळे रस्ता मला नीट माहिती होता. कराडमधून मलकापूर, आंबा घाट, साखरपा असा सगळा रस्ता मला व्यवस्थित माहिती होता. 

आता काय मी एकटाच होतो. शिवाय बाईक होती. त्यामुळे हवं तिथे थांबा. हव्या त्या स्पीडने जा काहीही विचारणारं कोणीही नव्हतं. आंबा घाट उतरून साखरप्यात पोहोचलो तेव्हा मला वाटतं एक-दीड वाजून गेला होता. साखरप्यातून अगदी चार-पाच किलोमीटरवर देवरुख, तिथे मित्राचं घर होतं. त्याच्याकडे मी जाणार होतो. पण साखरप्यातून त्याला फोन करून, ‘आता मी नाही येत, रात्री मुक्कामाला येईन’ असं सांगितलं. आणि तसाच पुढे गेलो. सकाळी नाश्ता भरपूर झाला होता त्यामुळे अजून भूक लागलेली नव्हती. अजून थोडं पुढे जाऊ, अजून थोडं, असा मी विचार करत राहिलो. साखरप्यातून रत्नागिरी अजून चाळीस किलोमीटर तरी होतं. मला आठवतं आहे त्याप्रमाणे त्या दिवशी रविवार होता. कारण हातखंबा ओलांडून मी रत्नागिरीकडे वळलो तिथपासूनच मला भूक लागलेली होती. पण रविवार असल्यामुळे किंवा अजून कोणत्या कारणामुळे ते माहिती नाही पण काहीही सुरू नव्हतं. सगळी हॉटेल्स, किराणा मालाची दुकानं, स्वीट मार्ट काहीही सुरू नाही. रत्नागिरीमध्ये पोहोचलो तेव्हा तीन-सव्वा तीन झाले होते. भयंकर भूक लागली होती. रत्नागिरीमधले रस्ते कर्फ्यू लागल्याप्रमाणे सुनसान. भूक, ऊन आणि रिकामे रस्ते याने मला अचानक एकटेपणा वाटायला लागला. 

तशीच भूक पोटात ठेवून मी गाडी रत्नदुर्गाकडे वळवली. मागे केव्हातरी अनेक वर्षंपूर्वी रत्नदुर्ग पाहिलेला होता. त्यामुळे एवढं आठवत होतं की वरपर्यंत गाडी जाते. त्यामुळे चालायचे कष्ट पडणार नाहीत आणि आणखी भूक लागणार नाही, असं वाटून मी तिकडे निघालो. गाडी वरपर्यंत जात असली तरी किल्ला पाहण्यासाठी चालावं लागतं हे गणित मी विसरलो. बाईक पार्क केल्यावर माझ्या हे लक्षात आलं की ऊन कमी झालेलं नाहीये, भूकही कमी झालेली नाहीये आणि किल्ला मात्र चालतच फिरावा लागणार आहे. मग तसाच थोडाफार किल्ला पहिला. किल्ल्याच्या दोन्ही बाजूने समुद्र पाहिला. आणि परत गाडीपर्यंत आलो. तिथे कोणीतरी मला सांगितलं की बहुतेक गणपतीपुळे रस्त्यावर तुला काही हॉटेल्स चालू मिळतील. त्या दिशेला तू प्रयत्न करून पहा. माझ्या डोक्यात प्रकाश पडला, गणपतीपुळे म्हणजे आरे-वारे किनाऱ्याच्या बाजूने रस्ता जातो. रत्नागिरी ते गणपतीपुळे व्हाया आरे-वारे हा एक अतिशय रम्य प्रवास आहे. या दोन जोड किनाऱ्यांचं कौतुक मी खूप ऐकलं होतं, पण कधी तिकडे गेलेला नव्हतो. आज चांगली संधी आहे म्हणून तिकडे निघालो. 

रत्नागिरी मागे टाकून आपण पुढे येतो तेव्हा अनेक छोटी मोठी गावं आहेत त्यातल्या एका गावातूनच पुढे रस्ता जातो आणि एक वळण ओलांडून पुढे आलो की एकदम ‘आरे’चा समुद्रकिनारा आपल्यासमोर अवतरतो. किनाऱ्याला लागून डांबरी रस्ता आहे, आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गाव. ‘आरे’ गाव संपल्यावर खाडीवरचा पूल आहे तो ओलांडून डोंगरावर रस्ता जातो. तो डोंगर उतरला की पलीकडे ‘वारे’गाव. तो ही रस्ता असाच. त्याच्यापुढे गेल्यावर गणपतीपुळ्याच्या अलीकडे मला एक हॉटेल उघडं दिसलं. अधाशासारखा तिथे जाऊन बसलो. जे काय लवकर मिळेल ते आणून दे, असं सांगितलं. त्याने काहीतरी समोर आणून ठेवलं. ते काय आहे याचा फारसा विचार न करता मी ते संपवलं. त्याच्या हातावर पैसे ठेवले आणि निघालो. गणपतीपुळ्याचे मंदिर पाहण्यात मला फारसा इंटरेस्ट नव्हताच. मला तो रस्ता बघायचा होता. गणपतीपुळ्यापर्यंत जाऊन मी परत आलो. तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती. मी विचार केला ‘आरे’बीचवरून सूर्यास्त पहावा आणि संगमेश्वर करता निघावं. कार्यक्रम संध्याकाळी साडेनऊ वाजता होता. रत्नागिरीहून संगमेश्वर हे अंतर साधारण चाळीस-पंचेचाळीस किलोमीटर आहे. म्हणजे सूर्यास्त पाहून साडेनऊच्या कार्यक्रमाला मी वेळेत पोचू शकलो असतो, असं माझं गणित होतं. सूर्यास्त पाहिला, आणि मी निघालो. देवरुखच्या मित्राला फोन केला आणि मी थेट संगमेश्वरला येतो असं सांगितलं. अंधार पडायला सुरवात झालेली होती. आणि चाळीस-पंचेचाळीस किलोमीटरमधला बराचसा रस्ता मुंबई-गोवा हायवेचा होता. रात्रीच्या वेळी मुंबई-गोवा हायवेवरून चाळीस-पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास तसा धोकादायक होता. म्हणून त्याने मला सुचवलं की तू आतल्या रस्त्याने ये, अंतरही कमी होतं आणि ट्रक आणि मोठ्या वाहनाच्या ट्रॅफिकची भीती नाही. मीही विचार केला, की बरोबर आहे. मी एकटा आहे, रात्रीची वेळ आहे. कोणतीही रिस्क नको घ्यायला. गोवा हायवेवरून त्या आतल्या रस्त्याने जाण्यासाठी मी वळलो. 

अंधार पडून गेलेला होता. माझ्या गाडीची अवस्था काय फार चांगली नव्हती. गियर टाकण्यासाठी क्लच दाबला की हेडलाईट डीम होत असे. गोवा हायवेचा रस्ता सोडून मी आतल्या कमी वर्दळीच्या रस्त्याला लागलो. वर्दळ कमी असेल तर रिस्क कमी असा विचार मी केला, पण वर्दळ कमी असेल तरच जास्त रिस्क आहे हा विचारच मी केला नाही. अजिबात वस्ती नसलेल्या, अजिबात वर्दळ नसलेल्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मी निघालो होतो. जसा जसा पुढे जात राहिलो तसा तसा अंधार वाढतच जात होता. गाडीचा प्रकाश जेवढा पडत होता तेव्हढाच भाग डोळ्यांना दिसत होता, बाकीचा परिसर इतका अंधारून गेला होता की त्या अंधारात बघायचीही भीती वाटत होती. डोळ्यांत कोणी बोट घातलं तरी कळणार नाही, इतका अंधार पसरलेला होता. त्या अंधाराचा परिणाम व्हायला लागला. मी हळूहळू पॅनिक व्हायला लागलो. ज्या दोन गावांची नावं मला मित्राने सांगितली होती तीही मी विसरलो. आणि रस्ता चुकलो.



एका ठिकाणी रस्ता विभाजक होता. तिथे मैलाचा दगडही होता. पण त्यावरची अक्षरं पुसट झालेली आणि अंधार यामुळे एकही अक्षर लागत नव्हतं. अंदाजानेच एक रस्ता निवडला आणि त्या रस्त्याला निघालो. मनात एकदा शंका निर्माण झाली की सगळेच निर्णय चुकीचे वाटायला लागतात. इथे तर मी चुकलोच होतो. आणि नेमका रस्ता विचारायला कोणी माणसं नव्हती. असे आठ-दहा किलोमीटर गेल्यावर पुन्हा एकदा रस्ता विभाजक आला. या वेळेला विभाजाकाच्या इथे मैलाचा दगड नव्हता. तर कठडा होता. आणि कठड्यावर खाली मान टाकून, गुढग्यावर हात रेलून निराश अवस्थेत एक माणूस बसला होता. गोवा हायवे सोडल्यापासून जवळ जवळ बारा-पंधरा किलोमीटर मी एकही वस्ती पाहिलेली नव्हती. माणसाचं मागमूसही त्या रस्त्यावर नव्हता. प्रचंड अंधार होता. आता रात्रीच्या आड-सव्वाआठच्या दरम्यान इतक्या अंधारात, बहुतेक जंगलात हा माणूस करतोय काय? माझ्या मनात भीतीचं भांडं भरायला लागलं. पण थांबून रस्ता विचारण्यासाठी थांबणं भाग होतं. तिथपर्यंत गेलो, गाडीचा लाईट डीम झाला. माझ्या डोक्यात होतं की, त्याला संगमेश्वरचा रस्ता विचारायचा. आणि माझ्या रस्त्यावर त्याला जायचं असेल तर त्याला बरोबर घेऊन पुढे जायचं. त्याच्यापासून पाच-सहा फुटावर गाडी नेऊन उभी केली. लाईट पूर्ण बंद झाला. पण त्या डीम होत जाणाऱ्या प्रकाशात मला एवढं लक्षात आलं की मी थांबण्याचा विचारात आहे हे पाहून तो त्याच्या जागेवरून उठला. मी पोचलो, गाडी थांबवली, लाईट बंद झाला तोपर्यंत तो उठून चालत चालत माझ्याजवळ आला आणि एकदम गाडीवर मागे बसलाच! 

माझी वाचच बसली, आवाजच फुटेना. माझी मागे बघायची हिम्मत होईना. पण स्पीड मीटरच्या मागे जो दिवा लागतो त्या प्रकाशात मला त्याची खुरटी दाढी आहे हे लक्षात आलं. मागे बसून तोच बोलला, चला तुम्हाला संगमेश्वरपर्यंत पोहोचवतो. संमोहित झाल्याप्रमाणे मी गाडी सुरू केली. आणि त्याने हाताने दाखवलेल्या रस्त्याने निघालो. मनात अनेक प्रश्न उसळत होते. पण ते तोंडातून फुटत नव्हते. एकतर आवाजच फुटत नव्हता. भीतीने हात आणि पाय आखडले आहेत, असं माझ्या लक्षात आलं. भीतीने मला घामही फुटला. पण जंगल, रात्रीची दमट पण थंड हवा या सगळ्यात तो विरून जात होता. अशा स्थितीत मी आठ-दहा किलोमीटर पुढे गेलो. तोपर्यंत धीर गोळा केला. विचार केला की, आता आठ-दहा किलोमीटर तर या माणसाने आपल्याला काही केलं नाही, आपण घाबरलो, आवाज फुटत नाही, इतक्या रात्रीचा मानवी वस्तीपासून इतक्या लांब हा काय करत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी संगमेश्वरला जाणार आहे हे त्याला कसं कळलं? पण हे सगळं मनात खाली बसायला आठ-दहा किलोमीटरचा वेळ गेला. मन घट्ट करून मी त्याला विचारलं, ‘तुम्हाला कुठे जायचं आहे?’ त्यावर त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ‘इथे थांबावं गाडी. मला इथेच जायचं आहे’ असं सांगितलं. माझ्या डोक्यात होतं की, संगमेश्वरपर्यंत हा आपल्याला सोबत करेल, आणि इतक्या प्रवासात गप्पा होण्यासाठी कुठूनतरी सुरवात करावी लागेल. पण माझ्या तोंडून पहिला प्रश्न बाहेर पडतोय न पडतोय तोपर्यंत याने खांद्यावर हात ठेवला. त्याचा थंड हात माझ्या खांद्यावर पडला तेव्हा तर भीतीने माझ्या अंगावर शहाराच उभा राहिला. मी पुन्हा संमोहित झाल्यासारखी गाडी थांबवली. तो उतरला, आणि म्हणाला, ‘इथून असे या रस्त्याने जा. संगमेश्वरला पोहोचाल!’ अंधार काय कमी तर झालेला नव्हता. गाडी थांबवल्यामुळे गाडीचाही प्रकाश नव्हता. तो उतरल्यावरही समोर आलाच नाही, मागेच थांबला आणि एवढं बोलून त्याने पाठ फिरवली. मीही मागे वळून न बघता लवकर निघावं असा विचार करून गाडीला किक मारली. 

दहा-पंधरा फूट मी पुढे गेलो असेन, तर समोर कोरडा पडलेला धबधबा होता. रस्ता संपत होता, कोरडा पडलेला पाण्याचा प्रवाह समोर होता. मी मागे वळून पाहिलं, आसपास कोणीही नव्हतं. कुठेही जवळपास मानवी वस्तीच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. जो माणूस मागे दहा-पंधरा फुटावर गाडीवरून उतरला होता तोही अर्थात दिसत नव्हता. मोबाईलला रेंज नव्हती. 

फार विचार करत न बसता मी, गाडी फिरवली. गोवा हायवेपर्यंत परत आलो आणि भरपूर वर्दळ असलेल्या रस्त्याने संगमेश्वरला पोहोचलो. माझ्या डोक्यात जे नियोजन होतं त्यानुसार साडेनऊच्या कार्यक्रमाला मी साडेआठपर्यंत पोहोचणार होतो. पण रस्ता चुकला, एका माणसाने गंडवलं वगैरे सगळं झाल्यामुळे मी बरोबर साडेनऊलाच संगमेश्वरला पोहोचलो. मनातली भीती अजूनही गेलेली नव्हती. एकूण सुंदर वातावरणात चाललेला शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मी हार्डली लक्ष देऊन ऐकू शकलो. त्या दिवशी मला लक्षात आलं की भीतीने माणूस जास्त दमतो. चालू कार्यक्रमात मी मागे बसून पेंगत होतो. 

(टीप - हा अनुभव १०० टक्के सत्य आहे. मी स्वतः नास्तिक आहे. देव, भूतं-खेतं यांच्यावर माझा थोडासुद्धा विश्वास नाही. तरीही मला भुतांच्या गोष्टी ऐकायला आवडतात, त्या सत्य आहेत असं डोक्यात ठेवून मी त्या गोष्टी ऐकतो. पण हा अनुभव १०० टक्के सत्य आहे. आणि शब्दाचीही अतिशयोक्ती मी केलेली नाही. आणि फोटो गुगलवरून घेतलेला आहे.)

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....